गोष्ट छोटीशीच असते..

कथा दिवाळीची


गोष्ट छोटीशीच असते..

गोष्ट छोटी डोंगराएवढी..
उत्सव नात्यांचा..

घरी लेकाला आवडतो तसा स्वतःला होत नसतानाही केलेल्या फराळाला हातही न लावता लेक जेव्हा दुसर्‍यांच्या फराळाची स्तुती करतो तेव्हा ती गोष्ट छोटीशीच असते पण आईच्या मनाला लागलेली असते..

मुलांसाठी हवे तसे कपडे, फटाके घेऊन सुद्धा पूजा करून नंतर फटाके वाजवायला जा असे सांगणार्‍या वडिलांशी मुले जेव्हा बोलत नाहीत तेव्हा ती गोष्ट छोटीशीच असते पण वडिलांच्या मनाला लागलेली असते.


सतत आपल्या चित्रकलेचे, आर्टचे लोकांना प्रदर्शन करणारा मुलगा जेव्हा रांगोळी काढायला नकार देतो तेव्हा गोष्ट छोटीशीच असते पण आईच्या मनाला लागलेली असते.


जगभर हिंडणाऱ्या धाकट्या भावाला मोठ्या बहिणीच्या घरी पाच मिनिटेही जायला वेळ नसतो तेव्हा गोष्ट छोटीशीच असते पण बहिणीच्या मनाला लागलेली असते.

मित्रांचे, मैत्रिणींचे, फुलांचे स्टेटस ठेवणाऱ्या बहिणीला भाऊबीजेच्या दिवशीही भावाचा फोटो स्टेटसला ठेवावासा वाटत नाही, तेव्हा गोष्ट छोटीशीच असते पण भावाच्या मनाला लागलेली असते.

माहेरच्यांना चहाफराळ देणाऱ्या वहिनीला नणंदेला साधे पाणीही विचारायला वेळ नसतो तेव्हा गोष्ट छोटीशीच असते पण नणंदेच्या मनाला लागलेली असते.


भावासाठी डबे भरभरून पाठवणाऱ्या नणंदेला स्वतःच्या वहिनीला तू ही चव बघून सांग कसे झाले ते हे बोलावेसे वाटत नाही, ती ही गोष्ट छोटीशीच असते पण वहिनीच्या मनाला लागलेली असते..

घरातली साफसफाई, फराळाचे करूनसुद्धा बाहेरच्या लक्ष्मीचे कौतुक करणारे शब्द जेव्हा गृहलक्ष्मीच्या कानावर पडत नाही तेव्हा गोष्ट छोटीशीच असते पण गृहलक्ष्मीच्या मनाला लागलेली असते.

स्वतःसाठी भरजरी साड्या, दागिने घेणारी बायको जेव्हा नवर्‍यासाठी साधासा शर्टही घेत नाही तेव्हा गोष्ट छोटीशीच असते पण नवर्‍याच्या मनाला लागलेली असते.


दर दिवाळीला सगळ्यांना मॅसेजमधून, फोन करून शुभेच्छा देणारी व्यक्ती जेव्हा साधे दिवाळीचे स्टेटसही ठेवत नाही आणि कोणाच्या ते लक्षातही येत नाही तेव्हा गोष्ट छोटीशीच असते पण त्या व्यक्तीच्या मनाला लागलेली असते.

आपल्याच कुटुंबातला एक सदस्य जीवनमरणाच्या दारात असतो, अशावेळेस इतर सदस्य शुभ दीपावलीचे संदेश टाकत असतात, स्वतः साजरी केलेल्या दिवाळीचे फोटो टाकत असतात तेव्हा गोष्ट छोटीशीच असते पण त्या सदस्याच्या जवळच्या माणसांच्या मनाला लागलेली असते.

अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी सणासुदीला घडत असतात, ज्याने मनं दुखावलेली असतात. अशा गोष्टी कोणासोबतही होऊ नये हीच इच्छा. दिवाळी हा खरेतर नात्यांचा उत्सव असतो. पण काही वेळा ही नाती जोडण्याऐवजी तुटलीही जातात. दिवाळी म्हणजे नेहमीच आनंदाची. त्याच दिवाळीची दुसरी बाजू दाखवण्याचा हा प्रयत्न.

शेअर करणार असाल तर नावासह करावे, ही विनंती.


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई