गोष्ट आहे किरणची भाग-3 अंतिम भाग

Gosht Ahe Kiranchi Part3


वाट पाहून पाहून, किरण थकली.. पण सासर हुन, कुणीच तिला न्यायला आले नाही.

मग भावानेच एकदा सासरी जाऊन चौकशी केली. "की, तुम्ही नाही येणार? तर मग मी घेऊन येतो."
पण.. त्यालाही अपमानित होऊन परतावे लागले. चार महिने, सहा महिने, हळूहळू वर्ष..

मुलगी आता पाऊल उचलु लागली होती. म्हणून एक दिवस किरणच मुलींना घेऊन, वडिलांसोबत सासरी आली. आणि तिने विनंती केली.
"अहो काहीही करा. मला घरात घ्या. आणि मी आणि माझ्या मुलींने कुठे जायचे? काय खायचे? कसे राहायचे?"

अशी तिची कळकळीची विनंती ऐकूनही, कुणालाच पाझर फुटला नाही. दोन्ही मोठ्या जावांनी, बघून नाकं मुरडली आणि आपल्या आपल्या कामाला निघून गेल्या. काहीही मात्रा चालली नाही.
"चल पोरी,अशा या दगडाचे काळीज असलेल्या माणसात, मी आता तुला राहूही देणार नाही. मुली झाल्या म्हणून काय झालं? एक दिवस याच मुलींच्या जीवावर, मानानं मिरवशील तूऽऽ. चल."
असं किरणचे वडील तिला म्हणाले.

ज्या घरात, वाजत, गाजत, मानाने प्रवेश केला होता, आज त्याच घरातून लाचार होऊन, परतावं लागत होते.

परत आल्यावर..
किरणने \"आता आपल्याला काहीतरी काम करावे लागेल.\" असे वाटू लागले. दोन मुलींना वाढवायचं होतं. पण गावामध्ये (गाव तसे छोटेसेच होते) तिच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. \"नवऱ्याने टाकलेली\" हा भाव त्यांच्या नजरेत कायम असायचा. या कडवट नजरा, तिच्या मनाला पोखरत होत्या. आणि तिच्या कोणत्याही कामावर विरजण टाकीत होत्या.

पण..
पुन्हा मन तिला सांगत असे, \"नाही किरण, तुला असे ठिसूळ होऊन चालणार नाही. कारण जसं लाचार तुला व्हावं लागलं. तसंच किंवा त्यापेक्षाही जास्त लाचार तुझ्या मुलींना व्हावं लागेल. त्यांचा कोणताही दोष नसताना. हे तुला आवडेल? नाही!!\"

दरम्यान मोठ्या भावाची बदली, पुण्याजवळच्या गावातील शाळेवर झाली. तो स्वतःची फॅमिली घेऊन तिकडे गेला होता.

म्हणून मग.. किरणनेही तिकडे जायचे ठरवले. आणि तेथेच काहीतरी काम करून, मुलींनाही तेथेच शाळेत घालायचे.

त्या गावी मग भावाने हिला, छोटेसे लेडीज मटेरियल चे दुकान टाकून दिले. आई-वडिलांसोबत मग ती तेथे राहू लागली. आणि आजपर्यंत हा वसा तीने चालवलेला होता.

…………


टाळ्यांचा कडकडाट शांत झाल्यावर, हेड सर म्हणजे, श्रीरंग सर हात जोडून बोलू लागले.
"मी आज सगळ्यांची माफी मागतो."
असं म्हणत स्टेज वरच्या सगळ्यांकडे, अपराधी भावनेने बघीतले.नंतर किरणताई कडे येऊन म्हणाले.
"किरण तुझा अनंत अपराधी आहे मी."

सगळं हे काय चालु आहे कोणालाच काहि समजेना? अचानक हेड सर अशी माफी का? मागत आहेत.
"नकुशी\" असलेल्या या मुलीचा, मीच पिता आहे.म्हणजे किरणताई माझी पत्नी आहे.गेल्या वीस वर्षांपासून मी यांच्या शोधात होतो.आणि आज असे हे अनपेक्षित पणे माझे सौभाग्यच म्हणेन मी माझ्या समोर प्रगट झाले.आजचा हा सत्कार खरंतर या आईचाच व्हायला पाहिजे.कारण तिच्यातील जिद्दीनेच या दोन्ही मुली उच्च पदावर आहेत."
दरम्यान सोनालीही स्टेजवर आलेली होतीच.


दोघींनाही आपले बाबा अचानक समोर बघुन
खुपच भारावल्या सारखे वाटले.
पण वृषाली गेल्या दोन वर्षांपासून, त्यांना ओळखत होती.नव्हे त्यांच्याकडेच शिकत होती.आजची ही नव्यानेच झालेली ओळख..


विलक्षण आनंदात त्या दोघीही होत्या.
आईला खुपदा हा प्रश्न विचारला होता."आमचे बाबा कुठे आहेत?"
पण आई एवढेच म्हणत होती की ,"वेळ आल्यावर नक्की सांगेन."

ती वेळ नियतीनेच अशी मॅनेज केली होती.
दोन्ही मुलींच्या डोक्यावर हात ठेवून श्रीरंग सर म्हणाले,"मुलींनो,मी तुमचा खुपच अपराधी आहे.जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे.पण आता मला सोडुन जाऊ नका."

स्टेजवरील सर्वच जण निशब्द होऊन, हे पाहत होते.

मग शिक्षणाधिकारी साहेब उठले.आणि त्यांनी किरणताई चा शाल आणि श्रीफल देऊन सत्कार केला.ते म्हणाले.
"आजच्या या सत्कार सोहळ्यामुळे एकमेकांपासून दुरावलेले कुटुंब जवळ आले.या दोन मुलींना त्यांचे बाबा गवसले आहेत. हेच मोठं साध्य अन् आजच्या कार्यक्रमाचे फलित आहे."

असे म्हणुन त्यांनी श्रीरंग सरांनाही पुष्प गुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.आणि खुप खुप शुभेच्छाही दिल्या.व पुढील कार्यक्रमास सुरुवात केली..



🎭 Series Post

View all