गोष्ट आहे किरणची भाग-2

Gosht Ahe Kiranchi Part2


किरण ताई म्हणाल्या," होऽऽ ही माझीच मुलगी आहे. ज्या मुलीला नकोशी म्हणून, वडिलांसहित त्यांच्या घरातील, इतर लोकांनी नाकारले होते. त्याच मुलीने स्वतःच्या मेहनतीने. जिद्द ठेवून अभ्यास केला आणि आज शासनाच्या मानाच्या खुर्चीवर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे."
आईचे हे बोलणे ऐकून, वृषाली ही तिच्याकडे आश्चर्याने पाहत होती.
म्हणून किरण ताईने, तिच्या पाठीवरून हळूच हात फिरवला आणि तिला समजावत म्हणाली, "होय बाळा, तुझ्या बाबतीतीलच हे विधान आहे. मी माझ्या दोन्ही मुलींना हिऱ्याप्रमाणे समजून पैलु पाडत राहिले. मोठी मुलगी ही उच्च शिक्षण घेऊन. चांगल्या पदावर काम करत आहे.अश्या या मुलींचा मला अभिमान आहे."

हे बोलणे चालू असतानाच शिक्षणाधिकारी साहेबांनी टाळ्या वाजवल्या. आणि त्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. पण किरणताई मात्र, आपल्या भूतकाळात हरवल्या.

……..


किरणला दिवस होते.आठ महिने पूर्ण झाले होते. नववा महिना लागला होता. सोनाली तीन वर्षाची होती.म्हणजे पहिली मुलगी.या दुसर्‍या बाळंतपणासाठी माहेरी जायचे नव्हते.

पण सासूबाईंचा, हेकेखोर आणि कजाक स्वभाव असल्यामुळे तिला माहेरी जावे लागणार होते. आणि घर खटल्याचे!! काळजी घेणारे असे कोणी नव्हते. ज्याला त्याला आपआपली कामे प्रिय होती. सासूबाईंच्या या तिखट स्वभावामुळे कोणीही तोंड उघडण्याचे धाडस करत नव्हते.

सोनालीचे बाबा.. त्यांना सध्या तरी हातात काहीच काम नव्हते. त्यामुळे बेकाम म्हणून सर्व हीनवत होते. बीकॉम चे \"बेकाम\" झाले. असेच सगळेजण म्हणत होते. त्यामुळे तिलाही तशीच वागणूक होती. अशातच हे दुसरं बाळंतपण.. मग तर पहायलाच नको.
खाण्यापिण्याचे काही नव्हते. पण अवांतर खर्चाला रुपया सुद्धा हातात राहत नव्हता.तिला म्हणजेच किरणला सगळ्यांचा शब्द झेलून, कामं करावी लागत होती. पहिली मुलगी असल्याने, आता सर्वांनाच मुलगा हवा होता.

किरण बाळंतपणाला माहेरी आली.मोठा भाऊ शिक्षक होता. त्याचेही लग्न झाले होते. नुकताच त्यालाही मुलगा झालेला होता. त्याच्याही मागे त्याचा संसार होता. आई-वडील होते. वडील असेच हातावर काम करून पोट भरत होते. पण भाऊ नोकरीला लागल्यामुळे परिस्थितीला हातभार होती.

अशा एकूण परिस्थितीमुळे, तिला माहेरी बाळंतपणासाठी जायचे नव्हते. जसे होईल तसे सासरीच करायचे होते. पण नवऱ्याचे घरात काहीच चालत नव्हते. त्यामुळे इच्छा असूनही, तो काहीच बोलू शकत नव्हता.

दिवस पूर्ण झाले. आणि किरणला मुलगी झाली. छान गुटगुटीत, बोलक्या डोळ्यांची, जणू बाहुलीच. किरणला ही बाहुली कुशीत घेताना खूप आनंद झाला होता. पण मनात भीतीचे काजवे चमकत होते. की \"आता घरी गेल्यावर आपली जास्तच कसरत होणार आहे.\"

झालंऽऽ सासरी तर खडा जंगीच झाली. मुलगी झाली. असे कळाल्यावर.


असं कळाल्यावर. साधी चौकशी सुद्धा कोणी केली नाही. कशी आहे? बाळ कसे आहे? वगैरे..
नवऱ्याला तर मुलगी झाली, याचा आनंद व्यक्त करावा की दुःख. हेच समजेना. घरातले वातावरण बघून.. आई तर खूप रागावली होती त्याच्यावर.

एकूणच काय घरात कोणालाच ही मुलगी हवीशी वाटली नव्हती. फक्त किरण चा नवरा येऊन भेटून गेला होता. तेही उभ्या उभ्याच एक चक्कर त्यांनी टाकली होती.

आईला हे कळाल्यावर तिने किरणला परत आणण्यास स्पष्ट नकार दिला होता. \"पोरगी झाली तिला, तिला आणि तिच्या पोरींना, माझ्या घरात जागा नाही. त्यामुळे आणू नकोस.\" असे आईने स्पष्ट सांगितले होते.


आईच्या या म्हणण्याचा त्याच्यावर परिणाम झाला. म्हणून काही दिवसानंतर त्याने घर सोडले आणि शहर गाठले.

🎭 Series Post

View all