चांगलं वाईट

Good And Bad From Eyes Of Mother To Her Son


"आई आई आज ना शाळेत मॅमने आम्हाला गांधीजीची गोष्ट सांगितली." अयान धावतच घरी आला. घाई घाईत पायातील जोडे काढून तो आई जवळ गेला.
"बरं. पण पुढचं बोलायच्या आधी हातपाय धु, कपडे काढून व्यवस्थित ठेव. पाणी पी. तुझा टिफिन, पाण्याची बॉटल काढून ठेव. मग आपण शांततेत बोलू." निकिता त्याला टॉवेल देऊन म्हणाली.

"ओके ओके मी करतो सगळं." तिसऱ्या वर्गात जाणारा अयान बाथरूममधे जाऊन हातपाय धुवून आला.

त्याचे आवरणं होईपर्यंत निकिताने दोघांसाठी खायला डाळिंब घेतलं.

"बोला साहेब काय झालं आज शाळेत?" निकिताने त्याला पाण्याचा ग्लास देऊन विचारलं.

"आज काय आहे माहितेय तुला?" अयानने विचारलं.

"नाही बा. तुच सांग." सर्व माहित असूनही माहित नसल्याचा आव आणून ती उत्तरली.

"अगं आज महात्मा गांधीजीचा वाढदिवस आहे." अयान तिला सांगू लागला, "मॅम म्हणत होत्या कि गांधीजी अही..." तो मधेच अडकला. त्याला तो शब्द आठवेना.

"अहिंसे चे पुजारी होते. असंच ना?" निकिता म्हणाली.

"हो हो हेच. पण याचा अर्थ काय होतो गं? मला मॅमचं काही समजलं नाही." अयानने विचारलं.

"म्हणजे ते शांतता प्रिय होते." निकिताने सांगितलं.

"ते नाही आई. ते अहिंसा म्हणजे काय होतं?" अयानचा प्रश्न.

"अहिंसा म्हणजे हिंसा न करणे. हाणामारी, मारामारी न करणे. म्हणजे गांधीजी असं सांगायचे कि कोणी आपल्याला एका गालावर मारली तर आपण दुसरा गाल समोर करायचा." निकिता डाळिंब दाणे काढत त्याला सांगू लागली. पण त्याचे प्रश्न आज संपतील असं काही दिसेना.

"पण तु तर मला सांगतेस कि कोणी मला मारलं तर त्याला मी दोन द्यायच्या." अयान निर्विकारपने डाळिंब दाणे खात म्हणाला.

आपला मुलगा आपलीच उजळनी घेतोय या विचाराने निकिताने डोक्याला हात लावला. अयान मुळात खूपच शांत प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याला इतर मुलं त्रास द्यायची. त्यात संस्कार वर्गात ताई व शाळेत मास्तरीण बाई नेहमी सांगायच्या कि लहान मुलांना मारायचं नाही. त्यांना काही समजत नाही म्हणून ते मारतात, ते नाजूक असतात वगैरे वगैरे. याने अयानवर कोणी आपल्याला त्रास दिला तरीही आपण त्याला त्रास नाही द्यायचा या आशयाचा संस्कार झाला. त्याच्या अंगावर नखोरे ओढलेले दिसायचे. कधी कधी कपडेही अस्ताव्यस्त दिसायचे. काही विचारलं तर तो फक्त रडायचा. त्याच्या पेक्षा वयाने लहान मुलंही त्याला मारतात आणि हा फक्त रडतो हे बघून निकिताने त्याला सांगितलं,
"तूझ्यावर कोणी हात उचलला तर अजिबात गप्प बसायचं नाही. त्यालाही दोन ठेऊन द्यायच्या."

"पण मॅम मग मला पनिशमेंट देतील. त्या मुलाचे आई बाबा माझी कम्प्लेंट करतील." अयान तेव्हा बोलला होता.

"देऊ दे मॅमला पनिशमेंट आणि करू दे आई वडिलांना कम्प्लेंट. मी येईल ना शाळेत तूझ्या बाजूने बोलायला. पण आता तु प्रतिकार करायला शिकलंच पाहिजे." निकिताने त्याला सशक्त बनवायचा निर्धार केला होता.

"आई मी कार्टून बघू थोडं?" अयानने विचारलं तशी ती भूतकाळातुन वर्तमानात परतली.

"थोड्या वेळाने. आधी मी काय म्हणतेय ते ऐक." निकिता त्याला जवळ बसवून म्हणाली, "बाळ मी तुला कधीच इतरांना विनाकारण त्रास द्यायला सांगितलं नाही. जर तुला कोणी त्रास दिला तर प्रतिकार करायला सांगितलं आहे."

"हो बरोबर. पण मग गांधीजीनी अहिंसाला इतकं महत्व का दिलं?" अयानचा प्रश्न.

"कारण तो काळ खूप कठीण होता. एकीकडे आपलं आंतरिक स्वातंत्र्य युद्ध तर दुसरीकडे इतर देशांचं महायुद्ध. यात सामान्य नागरिक होरपळून निघत होता. अशात शांतता प्रस्थापित करणं खूप महत्वाचं होतं. तेव्हा गांधीजीनी अहिंसेचा मार्ग धरला. सत्याग्रहाचा मार्ग दाखवला. पण कोणताही गुणधर्म अती असणं वाईटच. मग तो कितीही चांगला का असेना.

समोरचा तुम्हाला मारतोच आहे, तुम्ही सहन करतच आहात. तरीही त्याला काही फरक पडतच नाही उलट तुम्हाला त्रास द्यायला जोर येतोय. अशावेळी थोडं हिंसक व्हावंच लागतं. कमीत कमी आपण कोणतीही चुकीची वागणूक सहन करणार नाही इतकं त्याला कळवायला हवंच. म्हणजे आपल्याला कळायला हवं कि कुठे आणि किती प्रमाणात अहिंसावादी बनून राहावं. हिंसा आणि अहिंसा मधे एका अ चे अंतर आहे. त्यात ताळमेळ बसवून आयुष्य जगायचं." निकिताने त्याला समजावलं. पण बरंच काही त्याच्या बाल बुद्धीवरून निघून गेलं हे त्याच्या चेहऱ्यावरून तिला दिसून आलं.

वातावरणात आलेला तणाव निवळण्यासाठी तिने त्याला हसून विचारलं, "कुत्रा तुला चावला तर तु त्याला चावणार का?"

"ईईई अजिबात नाही. पण मी त्याला काठीने नक्कीच मारणार." अयान उग्र हाव भाव चेहऱ्यावर आणून उत्तरला.

"तेच बघ. असं म्हणतात कि कुत्र तुम्हाला चावलं तर तुम्ही कुत्र्याला चावणार का? नाही ना. मग कोणी वाईट वागलं तर का त्याच्याशी वाईट वागायचं?
मी म्हणते कुत्रा चावला आपल्याला तर नाहीच चावायचं त्याला आपण. पण दोन तीन फटके तर नक्कीच द्यायला हवे त्या कुत्र्याला. म्हणजे तो परत आपल्या वाटेला येणार नाही. तसंच कोणी वाईट वागलं तर आपण नाही वागायचं वाईट त्याच्याशी. पण इतकंही चांगलं नाही वागायचं कि तो परत आपल्याशी खेटाने घेईल. झालंच तर त्याला त्याची चूक कळेल असा धडा नक्कीच शिकवावा. असं माझं मत." निकिता बोलून बोलून दमली. अयानने तिला पाण्याचा ग्लास भरून दिला. तिने तो गटागटा रिता केला.

"आई आजसाठी पुरे इतकं. मला समजलं चांगलं वाईट, हिंसा अहिंसा. आता मी कार्टून बघू?." अयान कंटाळवाणा चेहरा करून म्हणाला.

"हो बापा बघ कार्टून. मी ताट वाढून आणते आपल्याला जेवायला." हिंसा - अहिंसा या विचारात निकिता स्वयंपाक खोलीत निघून गेली.