गोंदण (भाग -११)

A craze for tatto makes her life miserable .


गोंदण ( भाग -११)

कथा पुढे -

लेखिका -©® स्वाती बालूरकर देशपांडे , सखी

गोदाताईचं लग्न व कार्यक्रम उरकले.

कावेरी व तिचं कुटुंब गावाकडून परत येण्याच्या तयारीत होतं .

माई आजी तिथेच राहिल्या होत्या.
मामी- मामा तर परत गेले होते.

आता घर खूप उदास वाटायला लागला

आई म्हणाली, " चला सामान आवरायला घ्या.
कावू तुझे सगळे कपडे घेवून ये बघू. ती मामाकडून आणलेली पिशवी पण घे. आपल्याला उद्या परत जायचे आहे."

"बाप्पा रे! पुन्हा परत गेल्यावर सगळं तेच!"

"हे काय आता. . . संपत आल्या ना सुट्ट्या? यावर्षी तर खूप मजा पण केलीस तू!"

" हो पण . . . इथे किती मित्रमैत्रिणी झालेत माझे! पुन्हा परत जायचं, पुन्हा शाळा, पुन्हा अभ्यास !\"

कावेरीचा हा लागलेला सूर पाहून आईला खूप हसू आलं . गेल्या कित्येक दिवसात अभ्यासाचा अन कावेरीचा काहीच संबंध नव्हता.

यापूर्वी दरवर्षी किमान उन्हाळ्यात शुद्धलेखन लिहिणे, पाढे शिकणे किंवा लिहिणे आणि वाचन इतकं तर ती करायचीच.

गोदाची मांडव परतणी झाली.

सामान बांधलं आणि निरोप द्यायची वेळ आली आता मात्र कावेरीला खूपच चुटपूट लागून राहिली होती.

इतके दिवस तिला सगळेच पाहुणे छानच वाटायचे कारण जे गोड बोलतात ते सगळे चांगले असतात या समजेप्रमाणे किती लोकांना तिने लळा लावला होता.

अखेर निघावं तर लागलंच , मोठ्या काकूंच्या तर कमरेला विळखा घालून रडायलाच लागली. काकूंनी खूप खाऊ दिला होता तिला व तिच्या दादाला.

"गोदा सासरी गेली आता तू पण चाललीस कावू? बघ घरात मला करमणार नाही आता!" काकू लाडाने म्हणाल्या.

" हो ना मला पण तसंच वाटतय. पण मी काय करणार ना काकू? आई बाबा चल म्हणाले तर जावंच लागेल ना , लहान आहे ना मी. . . नाहितर राहिले असते थोडे दिवस तुमच्या सोबत!"

तिच्या या बोलण्यावर तर काकूंना एवढी माया आली की त्यांनी तिला कवटाळलं आणि पापा घेतला.

"एवढी कशी गोड गं तू! तुझ्या पोरीने फार जीव लावला बघ! सोडवेना मला आता " काकू कावेरीच्या आईला म्हणाल्या.

" महा लाघवी आहे आपली कावेरी! माझ्यासाठी पोरीने यात्रेतून सहाण आणलाय हो!" माई आजी कौतुकाने म्हणाल्या.

बसचा प्रवास लांबचा होता. बसच्या प्रवासाचा कावेरीला खूप कंटाळा यायचा.

चित्रात बघून रेल्वे तिला खूप आवडायची पण तिने कधीच रेल्वेचा प्रवास केला नव्हता.

इतकंच काय तिने रेल्वे किंवा आगीन गाडी प्रत्यक्षात पाहिली देखील नव्हती.

झुक झुक आगीनगाडी गाणं ऐकून तिला वाटायचं की माझ्या मामाचं गाव पण रेलगाडी ने जोडलेलं असतं तर किती छान झालं असतं. पण काय करणार?

बसमधले ते हादरे व ते सीट तिला बिलकुल आवडायचे नाहीत. शिवाय खिडकीची सीट मिळाली तर बरं नाहीतर बसणं अवघड होऊन जायचं .

खिडकीतून गार वारं आलं की तिला झोप यायची मग ती आईच्या किंवा बाबांच्या अंगावर रेलून जायची. आई थोडा आधार द्यायची पण बाबा मात्र चिडायचे . कारण चोपून तेल लावून घातलेल्या वेण्यांमुळे बाबांच्या शर्टाच्या बाहीला तेलकट डाग पडायचे. शिवाय तिला प्रवासात भूक लागायची.

या सर्व गोष्टींमुळे एकदा सिनेमात पाहिलेली रेल्वे तिला चांगली वाटायची. कधीतरी एकदा ला होईना पण रेलगाडी ने प्रवास करावा असं तिच्या मनात राहून गेलं.

बसचा लांबचा कंटाळवाणा प्रवास झाला. सामान खूप होतं . सगळं व्यवस्थित घरी पोहोचलं.
काही न करता देखील कावूला बसून बसूनच थकायला झालं होतं.

कावेरीचं कुटुंब खूप दिवसांनंतर आपल्या घरी परत आले होते.

आईला घर आवरण्याचा ताण होता कारण गोदाच्या लग्नामुळे बरेच दिवस घर सोडून जावं लागलं होतं.

घरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य होते. तरीही आईने बर्‍याच सामानावर जुन्या सुती साड्या व जुन्या चादरी वगैरे टाकल्या होत्या. या सगळ्यावर कावेरीचं बारीक लक्ष होतं.

घराच्या साफसफाई दोन चार दिवस कावेरीने मदत केली , तिच्या क्षमतेनुसार . . . पण थकवा अशी दाखवायची बाबांना जणु सगळं काम तिनेच केलंय.

आता शाळा सुरू व्हायला ४ दिवस बाकी होते.

तर तिने बाबांना सांगितलं, "मला एक छोटासा टेबल हवा आहे. मी पाचवीला चालले ना, मग अभ्यास कसा करणार?"

" अच्छा म्हणजे टेबल खुर्चीशिवाय अभ्यास होत नाही का ?" बाबांनी कौतुकाने विचारलं .

"तसं नाही पण मार्क चांगले हवे असतील तर टेबल हवाच !" आग्रहाचा सूर.

"म्हणजे आम्हाला जे कमी मार्क पडलेत ते यामुळेच कमी पडले कारण टेबल नव्हता!" बाबा आतून मिश्कील असले तरीही चेहर्‍यांवरचे भसव गंभीर होते.

" म्हणूनच कमी पडले असं नाही पण? काय बाबा तसं नाही म्हटलं मी. म्हणजे पाचवी हा मोठा क्लास झाला तर सारखं जमीनीवर बसून अभ्यास करणं बरं वाट त नाही ना म्हणून!" आत तिच्या आईला हे सगळं ऐकून खूप हसू येत होतं व ती सगळी नाटकं बघत होती.

"बरं कावेरी मॅडम ठीक आहे." बाबा ठीक आहे बघूयात म्हणाले म्हणून ती केवढी आनंदी झाली. पटकन जाऊन बाबांना बिलगली.

"कावेरी आता मोठी होतीय ना, पाचवीला जातीय तर मग लांबून बोलायचं ,असं लहान बाळासारखं येवून बिलगायचं नाही कुणालापण!"

बाबांचा सूर ऐकला की कावेरी बावरली.

"कोणालापण कशाला हो बाबा तुम्ही माझे बाबा आहात ना म्हणून . . . पण तुम्हाला तर लाडच करावा वाटत नाही ना!"

"कावू, तिथे आजोळी आणि गावी काकूकडे खूप जास्त लाड झालेत तुझे आता बाहेर या सगळ्यातून . फक्त शाळा व अभ्यास याकडेच लक्ष दे व चांगले मार्क मिळव. एक कर मात्र. . "
बाबांनी मायेने डोक्यावरून हात फिरवला.

"काय बाबा ?"

"आता चांगके मार्क मिळवण्यासाठी वेगळी खोली मागू नको म्हणजे झालं!"

" काय हो बाबा . . म्हणजे कधीच मला माझी खोली मिळणार नाही का उर्मीसारखी?"

"ही उर्मी कोण?" बाबांना नाव नवीनच वाटलं.
आई काम आटोपून हात पुसत आली.

"अहो ती नाही का तहसीलदाराची मुलगी, मागच्यावर्षी हिच्या वर्गात आली, उर्मिला. तिला म्हणे वेगळी स्वतंत्र खोली आहे. बाईसाहेबांनी तिथेच टेबल खुर्ची पाहीलीय."

" तुला स्वतंत्र खोली मिळेल काऊ पण ती तुला नवऱ्याच्या घरी गेल्यावरच मिळेल." ते हसले.


" नवरा काय हो बाबा ? मी तर अजून किती लहान आहे."

"जाशीलच ना नवर्‍याच्या घरी कधीतरी . . ?"

"आई बघ ना! म्हणजे गोदाताई सारखा मोठा वाडा असेल तर जाईन मी, छोट्या घरात नाही !"
आता मात्र कावेरीचे आईवडिल व वल्लभ दादा पण मोठ्यांदा हसला.

"अरे बापरे, एेका यांचे प्रताप, काय बाबा मला हॉस्टेलवर आणि कावू ला एकदम मोठा वाडा ?"
वल्लभ आतल्या खोलीतून म्हणाला.

"अरे बघ ना , गोदाचं सासर काय पाहून आली तर तिला वाडा व स्वतंत्र खोली वगैरे पण कळायला लागलं. म्हणजे नवरा कसा का असेना. . . वाडा मोठा हवा!" बाबा टाळी देवून हसले, आई पदरा आडून व वल्लभ मोठ्यांदा हसला.

एरवी धाकात ठेवणारे व गंभीर राहणारे बाबा यादरम्यान बदलत होते. आजकाल मिश्किलीनं बोलत होते पोरांशी.

कावेरीच्या लाघवी पणाने व इतर लोकांकडून कावेरीचं कौतुक ऐकून ते कावरीचा लाड करत होते.
माया अगोदरही होती पण ती वागण्यात दिसत होती.

क्रमशः
©® स्वाती बालूरकर देशपांडे , सखी
दिनांक - २६. ०९ .२०२२

🎭 Series Post

View all