गोंदण (भाग-८)

struggle of a girl in desire of tatto.

गोंदण ( भाग -८) 

लेखिका - स्वाती  बालूरकर , सखी 

पूर्व सुत्र-

 दोन दिवस कावेरी सतत आरशासमोर जाऊन, केलेले गोंदण कसे दिसत आहे ते पाहत होती.

पहिल्या  रात्री थोडीशी सूज आली होती,  गोंदणाच्या बाजूचा भाग थोडासा लाल झाला होता.

 दोन दिवसानंतर त्यांची कातडी फुगली व तो पापुद्रा  काढून टाकल्यावर ते सुंदर हिरवंगार गोंदण  कावूच्या कपाळावर  उठून दिसायला लागलं.

 आता दुखायचं कमी झालं होतं.

 तिला वाटलं आपण चंद्रकोर केली तरी चाललं असतं.

 पुढच्या वर्षी करूयात  पुन्हा किंवा मग मामी सारखं हनुवटीवर टिपके.

ती स्वतःला च सांगत राहिली.

यात्रा दरवर्षी लागते ना मग थोडी मोठी झाल्यावर ते आपल्याला कमी दुखेल.
 यावेळची तर उन्हाळ्यातली सुट्टी मार्गी लागली होती.
तिला  खूप  खूप  आनंद झाला होता .
आता  पुढच्या आठवड्यात. . इथून तिच्या  चुलत बहिणीच्या लग्नासाठी मामा मामी सोबत  तिच्या वडिलांच्या गावाकडे जायचं होतं.

कथा पुढे-  


सकाळी आंघोळ झाली की ती आरशात तो गोंदण बघायची  आणि चार वाजता पुन्हा हातपाय तोंड धुतलं की गंध लावण्याच्या आधी ती त्या गोंदणाला एकदा बघून  घ्यायची व त्याच्यावर  गंध लावायची.
 कधी गोल कधी उभं तर कधी छोटं व कधी मोठं. कधी मोठा टिपका कधी छोटा टिपका.

हे गोंदण पुसलं तरीही जात नाही व पाण्याने धुतलं तरी जात नाही याचं  कावेरीला खूप कौतुक वाटत होतं. 

मनाच्या कुठल्यातरी कप्प्यात गोंदणासाठीचं ते आकर्षण तसंच जतन झालं .

 म्हणजे " आपल्याला जर एखादी गोष्ट नेहमीसाठीच हवी असेल तर ती गोंदवूनच घ्यावी म्हणजे ती मरेपर्यंत  आपल्यासोबत राहते " अशी धारणाच तिच्या मनात पक्की झाली. 

म्हणूनच तर काशीमावशीच्या हातावर तिच्या नवर्‍याचं नाव आहे . यात्रेत  कुणा माणसाच्या हातावर त्याच्या बायकोचं नाव आणि एका मुलाच्या दंडावर  त्याच्या आईचं नावंही गोंदवलेलं पाहिलं होतं तिने. 

पुढचा आठवडा आला व मामा मामीने सगळी तयारी केली. कावेरीच्या चुलत बहिणीच्या लग्नाला जाण्याची तयारी. आजीकडून तर नवीन दोन फ्रॉक  आणि आणखी एक कल्पना साडी . . लग्नासाठी. 

मामीने मण्यांचा गुंफुन कंबरपट्टा बनवला होता.  तो पण ती लग्नात घालणार होती. नवरीच्या रूखवतात ठेवण्यासाठी पण काही वस्तु बनवल्या होत्या.

यावेळी मामा व मामी सोबत बसमधे प्रवासाचा अनुभव खूप छान होता. 

प्रवासात कावेरीला खूप भूक लागायची व तिचे आईबाबा तिला बाहेरचं काहिच खाऊ द्यायचे नाही.
 पण मामीने बाहेरून काही घ्यावं लागू नये म्हणून खूप  खाऊ सोबत घेतला होता. 
गप्पा गप्पात प्रवास कधी झाला कळालं नाही. 

 कावेरीला प्रत्येक गोष्टीचं वाटणारं कुतुहल तिच्या डोळ्यात दिसायचं. मामी ला खूप छान वाटायचं  हे सगळं. . तिचं प्रश्न विचारणं . . आश्चर्यानं बघणं . व निरागस हसणं. 

कावेरी गावाकडे पोहोचली आणि जाताच आईला बिलगली. .  कितीतरी वेळ. .

" का गं , कावू . .  काय झालं ?"

"काही नाही. . पण यापुढे दोघीच जाऊयात आजीकडे. . . !"

यावेळी पंधरा दिवसात तिला आईची खूप आठवण आली होती.  का कुणास ठाऊक!

 शिवाय मनानेच कपाळावर गोंदवलं होतं . . ती पण काय म्हणेल म्हणून दडपण होतं.

मामीने बाजूला घेवून विचारलं "कावू तिथे छानच राहिलीस ना बाळा . . आता काय झालं ?"

" नाही गं मामी. . तुम्ही सगळे खूप लाड करता . . पण आईची खूप आठवण आली यावेळी. . म्हणून!"

"असू दे हो. . !' मामी लाड करत म्हणाली.

"आणि मग लग्न झाल्यावर काय करशील गं? आईला नेशील का सासरी?"

काकू म्हणाली.


" . पण काकू  मला लग्नच करायचं नाही मुळी!"


माई आजी आल्या आणि कावेरी त्यांना बिलगली.
 
"आऽजी, मी आले."

" हो हो . . सगळ्या मुली असंच म्हणतात. . . पुन्हा करतातच वेळ आल्यावर. . आता बघ गोदाताईचं लग्न होतंय किनई. . !" काकू थट्टेने  म्हणाल्या.

कावेरीने सगळ्यांच्या पाया पडण्याचा सपाटाच लावला. प्रत्येकजण जवळ घ्यायचा, डोक्यावरून हात फिरवायचा किंवा तोंडभर आशीर्वाद  द्यायचा. 

कावेरी होतीच तशी लाघवी. 

लग्नघरातील धूमच  वेगळी.

 सगळीकडे पाहुणे मंडळींची गर्दी.  समूहाने सगळेजण इकडे तिकडे बसलेले, प्रत्येकाचा कुठल्यातरी विषयांवरती गप्पांचा ओघ.
  बायका मात्र सतत खाण्या पिण्याची तयारी, चहा करताना किंवा कप बशा धुताना दुसत होत्या. काही अनुभवी बायका  लग्नाच्या साहित्याच्या तर आहेर मानपान इत्यादी  तयारीमध्ये होत्या.

 कामं वाटून घेतलेली होती.

 या सगळ्यांमध्ये कावेरी सर्वात लहान आणि लाडकी होती  आणि तीच  तर उद्या करवली होती .

 रात्री जेव्हा झोपण्याची वेळ आली तेव्हा तिला वाटलं की आईजवळ झोपावं . . पण आईची काम काही संपेनात . . त्यामुळे ती मग माई अाजीच्या मागे लागली.

खूप दिवसांनी दोघींची गाठ पडली. माई आजी म्हणाली. ." कावेरी, तुझ्यासाठी मी नवीन  दोन तीन गोष्टी शिकलेय बरं का. . चल झोपतेस ना  माझ्याजवळ?"
" हो का , चल गं  मग. . मी पण गंमत आणलीय तुझ्यासाठी. "
 कावेरी आजीसोबत गेली. ."तुला सहाण लागतं ना आजी वात्या करायला?"
" हो त्याचं काय आता. . ?"

" हे घे मी तुझ्यासाठी आणलं . . यात्रेतून !"

" अगं बाई खरच की काय? . किती छान आहे गं कावू हे. . तुला बरं म्हातारीची आठवण राहिली एवढी. . !" आजीने तिला कवटाळलं. 

त्यांना सख्खं कुणी नसल्याने. . हीच त्यांची नात  होती . . मनाने जवळची. . त्यांचे डोळे पाणावले एवढी निरागस माया बघून. चिमुरड्या जिवसनी त्यांच्यासाठी विकत काहीतरी आणावं हे खरंच अप्रुप होतं. 

" आणखी एक माई  आजी. . 
 मला तुला काहीतरी सांगायचे आहे?"

"  काय गं  बेटा. . ?"    झोपताना तिला आजीने जवळ घेतल्यावर तिने  सांगितलं की तिने गोंदण  करवलय.

 आजीला आनंद झाला पण 
"  कुणासोबत गेली होतीस  कावेरी. . ? त्रास नाही झाला ना ? "
मग तिने सगळइ हकीकत सांगितली यात्रेची.

  रात्री आजीशी गप्पा मारत ती झोपी गेली.

 प्रवासाने थकली पण होती.

 मग दुसऱ्या दिवशी सकाळी घरामध्ये देव ब्राह्मणाचा कार्यक्रम होता.
  सकाळी आंघोळ घालताना आईचं तिच्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं.

"  हे काय कावू  गोंदण करवलस. . कधी आणि कुठे ?"

" असं काय गं . .  कधी म्हणजे आजीकडे यात्रेत?"
 आणि मग  आई कावेरी ला काहिच म्हणाली नाही.
" आई तुला पण  गोंदण  आहे मामीला आहे मग . . तू रागावलीस का माझ्यावर?"

  "काहीतरीच करतेस बाई तू. .! काय गरज होती एवढं . . लगेच करवायला ?. . किती दुखतं ते. . आणि  आजकाल कुणी नाही करवत गं ते   म्हणजे . . . शहरात तर पद्धत च राहिलीनाही."

"पण मला आवडतं ना गं!"

 " कावू मला कळालं ते. .  तू आजीकडे त्यावेळी विचारत होतीस तेव्हाच . .  पण आता तुला नेहमी तिथेच गंध लावावे लागेल. .  तेवढ्याच आकारचं. . तुला तर रंगीत गंध  आणि वेगवेगळं गंध लावायला आवडतं ना. . आता  वेगळं काही करू शकत नाहीत तू"

" नाही ना गं. . असू दे . .    आई ,मला खूप आवडतं ना ते हिरवं गोंदण . .  रागाऊ नकोस ना गं. . चुकलं का ?"

" रागावण्याचा प्रश्नच नाही कावू  जावू दे , असू दे,  छान दिसतंय. . केस छान वाळवून घे उन्हात. . जा बरं. . गोदाताईसोबत बसवते तुला  आणि तिच्या सोबत नटवते."

आईने प्रेमाने समजावले.

कावेरी नवीन कपडे घालून तयार.

  नवरीसोबत करवलीचे पण  सगळे लाड.

 तिला पण लाल पांढर्‍या टिपक्यांचा  मळवट भरला, पायाला कुंकवाने डिझाइन काढली. 

 नवीन परकर पोलकं घालून कावेरी हुंदडत  यायची मग थोड्या थोड्यावेळाने  सारखी ताईच्या बाजूला बसून असायची आणि गप्पा ऐकायची.

औक्षणाची वेळ आली की . . 'ये गं करवली चल ओवाळ. . 'असं म्हणायचं कुणीतरी.


 हळूच गोदाताईला म्हणाली ," सगळेच जण म्हणतात लग्न झाल्यावर ताई नवऱ्याच्या घरी जाणार. . कशाला गं ?"

" तुला  वाईट वाटतं ना. .पण हो  ना गं. .  सगळ्या मुलींना लग्न झाले   की आपल्या हक्काच्या घरी जाता येतं. . " गोदा बोलली. 

" का ?. . आपल्या बाबांचं घर आपलं हक्काचं नाही का?. . पण दुसर्‍यांच्या घरी जायचंच कशाला ?"

" अगं बाबांचं घर तर  नुसतंच आपलं माहेर असतं . . पन नेहमीसाठी हक्काचा नसतं."

तुला आपल्या घरातून दुसर्‍यांच्या घरी पाठवुिन देतायत आणि तू खुश अाहेस . . ताई. . भेटुन ये त्यांना. . नवर्‍याला, पण. . त्यांच्याच घरी नेहमीसाठी कसं राहणार ?"

कावेरीला हे कळेचना  की  ही पद्धत कुणी काढली.  आपण ज्या घरी जन्मलो राहतो, खेळतो ते आपलं घर, आपले आई- बाबा , दादा ते सगळं   सोडून द्यायचं. .  नवीन माणसासाठी . . " पण का ?"

" तू लहान आहेस  बाळा, तुला आताच नाही कळणार.  योग्य वेळ आल्यावर जेव्हा तुलाही लग्न करावं आणि नवऱ्याच्या घरी जावंसं वाटेल  तेव्हा कळेल. . ! आम्ही नाही आलो का आमच्या आई बाबांचं घर सोडून. . तुझी आईपण आली किनई. . !" मामीने तिचा चिंताग्रस्त  चेहरा पाहून व गोदाला विचारून  समजावलं. . !

घरात दिवसभर थट्टामस्करी चालली होती  आनंदाचे वातावरण होते.
 हे वातावरण सगळं कावेरीला आवडत होतं पण ते लग्न करून नवऱ्याच्या घरी जावं लागतं हे काही तिला पटत नव्हतं.


देवब्राह्मण, पुण्यवचनाचे विधी, आहेर आणि येणारे पाहुणे व जेवणावळी. .  दिवसभराचा कार्यक्रम निर्विघ्न  पार पडला.

 आज रात्री तिने ठरवलं होतं की आईला किंवा मामीला कुणाला तरी मनातलं विचारायचं .

गोदाच्या मामाने आणलेला आहेर सगळेजण बघत होते.  तेवढ्यात गोदा लग्नादिवशीचं ब्लाऊज फिट येतय का बघण्यासाठी साडी नेसून आली.

 "अय्या !  या साडीत . . किती छान दिसतेय ना ताई !"  गोदावरीला साडीमध्ये पाहून कावेरी म्हणाली.

 "अगं कावेरी, तू पण छान दिसशील.  आवडली का साडी? करायचं  का लग्न तुला पण ?"

"  काय बाबा, सगळे जण मला लग्न लग्न म्हणून  मागे लागलेत .  मी छोटी आहे अजून ? एवढा मोठा नवरा असतो . .  !"

" तसं काही नसतं. . छोट्या नवरीला . .  छोटा  नवरा पाहून  देवूयात की. .  माई आजींना विचार सात वर्षाची असतानाच लग्न झालंय त्यांचं. . मग काका आजोबापण अकरा वर्षांचेच होते तेव्हा . .  हो की नई हो माई!" माईंनी हसून होकारार्थी  मान हलवली.

"नकोच पण. .  असू देत . . लग्न काय पण मग मी त्यांच्या घरी जाणार नाही. .  अगोदरच सांगून ठेवते!" कावेरी निक्षून सांगत होती.

" म्हणजे लग्न करायला तयार आहेस  तर?" मामीने हळूच हनुवटी चिमटीत धरून विचारलं .

" म्हणजे  इतके लाड करणार. .  इतके नवीन कपडे मिळणार असतील . . गोदाताई सारकजे तर मी लग्न करेन  पण ते  नवऱ्याच्या घरी वगैरे जाणार नाही  हां!"  आणि सगळेजण हसायला लागले. 

बायकांच्या घोळक्यात सगळ्या बायकांची लाडकी कावू बोलत होती. 

हशा ऐकून बाबा आले होते. . व शेवटचं वाक्य ऐकून   तिचे वडील म्हणाले, "उगीचच का छळतोय दिला तिला ? खूप शिकवायचं आहे कावेरीला . . कारण  ती अभ्यासात हुशार आहे. आता  इतक्या लवकर  लग्न वगैरे करणार नाही तिचं. . योग्य वेळ आल्यावर तीच करेल मनाने!"

 हे मात्र तिला आणि तिच्या आईला दोघांनाही पटलं. इतके दिवस कडक शिस्तीचे  वाटणारे बाबा तिला आज  खूप जवळचे वाटले. तिलाही खूप शिकायचं होतंच. .बरं झालं बाबाच म्हणाले. 

क्रमशः 
 ©® स्वाती बालूरकर,सखी

दिनांक  १२. ३ . २०२२

🎭 Series Post

View all