Login

गोंदण (भाग-४)

Struggle of a girl with the desire of tatto.

पूर्वसुत्र-

"कावू तू अत्तर लावीत होतीस की बायका मोजत होतीस?" मामा थट्टेने म्हणाला.

इतक्यात आजी म्हणाली ". . अगं माधवी खरच दमलीय गं ती, सकाळची उठलेली आहे, जनासोबत सगळं गाव पालथं घालून आली. संध्याकाळी पण किती मदत केली तिने!"

" आमच्या नातीची दृष्ट  काढा पहिले. साडीत किती छान दिसत होती कावू!"
आजोबांचं वेगळंच.
सगळ व्यवस्थित  पार पडलं .
सगळे गप्पा मारत बसले तेव्हा आईच्या मांडीवर डोकं ठेवून कावेरी शांत झोपी गेली होती.

क्रमशः

कथा पुढे -

चैत्रगौरीचे  हळदी कुंकू झाले व कावेरी व तिच्या आईला परत जाण्याचे वेध लागले.
तिकडे घरी कावेरीचे बाबा व तिची एक आजी दोघेच होते.  आईने जाण्याचा विषय काढला अन कावेरी हिरमुसली .

" इथे पुन्हा कधी यायचं, मग? थांबूयात ना आई "

"अगं कावेरी , दरवर्षी  येतेसच की गं उन्हाळ्यात आणि दिवाळीत. यावर्षी  उन्हाळ्यात जमेल की नाही माहित नाही म्हणून आणि  आताच आलोय ना आपण. .!"

" अगं पण आईऽ  माझी कामं झाली नाहित इथली."

मामी व आजी मोठ्यांदा हसल्या.

" कागं कावू. . असं काय काम आहे तुझं आमच्या गावात?” मामीने विचारलं.

"आहे आपलं साधंच. . म्हणजे काम नाही पण . . असू दे . . पुन्हा पाहू!"

तिच्या या विचार करण्याच्या व बोलण्याच्या अभिनयावर सगळे खुश झाले.

" परीक्षा आहेत ना वार्षिक . . त्या कुठे झाल्यात ? एरवी शाळा शाळा करते गं आई ,पण इथे आली की मात्र सगळ्ळ विसरते बाई ही!"

आईने तिला जवळ घेत डोक्यावरून हात फिरवला.

" हो गं आम्हालाही खूप लळा लागलाय तिचा. . ती गेली की घर खूप मोठं वाटायला लागतं गं !. . कधी पर्यंत  या म्हणालेत जावईबापू?"आजीने कावेरीला  जवळ  ओढल

" तसं नाही पण ,उद्या निघावं म्हणते दुपारच्या बसने."

" उद्या निघताय का ? बरं . . मग फराळाचं  तर आहेच, देते सोबत. रात्री काहीतरी तरी गोड करूयात जेवताना. आवर गं बाई कावू!"

कावेरी जाण्याच्या कल्पनेनेच आजीला बिलगली.
"असं नाही करायचं हो.  तू हुशार मुलगी की नाही, बघ तुझ्या मैत्रिणीनाही तुझी आठवण येत असेल आता शाळेतल्या बाई काय म्हणतील? कावू यावेळी जा बरं आणि पुन्हा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आंबे खायला ये . . बाबा पण येतील ना तेव्हा मग तुझी राहिलेली कामे करूयात आपण."

इतक्यात आजोबा म्हणाले,"  मग तुझ्या शंभूला पण आठवण येइल की रोज संध्याकाळी?"
" आजोबा तेच. . तर आज मी येणारच आहे तुमच्यासोबत मंदिरात,  जाऊयात ना?"
"हो जाऊयात ना."
पण हे सगळं बोलताना तिची नजर काशी मावशीला शोधत होती.
तिचं काहीतरी काम होतं त्यांच्याकडे आणि ती आतुरतेने वाट पाहत होती.
आईने आवराआवरी सुरू केली, कावेरीला तर स्वतःचे कपडे सुद्धा गोळा करायला नको वाटत होतं. .  चार वाजले आणि काशी मावशी संध्याकाळच्या कामासाठी आल्या.

त्यांना मागच्या अंगणात बोलावले आणि कुजबुजत विचारले  " काशी मावशी येथे यात्रा कधी भरणार आहे?"
" काय घ्यायचंय यात्रेतून काहो धाकल्या बाई?"

"तसं नाही तुम्ही म्हणालात ना ते गोंदण  यात्रेत असतं म्हणून"

" ते होय . .  कुणाला करायचंय तुमाला?"

"हळू बोला हळू!"
"धाकल्या बाई ते  करू पण सहन होईल का तुम्हाला?"

"मावशी ते छोटेसंच करूयात ना. . पण
कोणाला सांगायचं नाही!" ती जोर देवून पण कुजबुजत म्हणाली.
"अजाबात न्हाय सांगणार"
"बघा बरं?  तुम्हाला माझी शपथ!"

" शंभुचा मंदिराच्या समोर म्हसोबा हाय. . तेची असती की जत्रा उन्हाळ्यात,  तुम्ही या आंबे खायला तवा!"
दोघींचं काहीतरी ठरत राहीलं आणि काशीबाईला कुजबुजताना  खूप हसू येत होतं, तितकच कौतुकही वाटलं.

संध्याकाळी कावेरी आजोबा सोबत महादेवाच्या मंदिरात गेली.
मनसोक्त खेळली, शंभू चे दर्शन घेतलं आणि घरी आली.
पण ती खूप उदास होती.
रात्री जेवणाचा छानच बेत होता सगळं अगदी साग्रसंगीत!
कावेरीच्या आईच्या आवडीच्या सांज्याच्या पोळ्या, कच्च्या कैरी आलेल्या होत्या त्याच्या ताज्या फोडी,  चटणी कोशिंबीर, बरंच काही!

तिला कल्पना करवेना की उद्या आपण पुन्हा आपल्या छोट्या तीन खोल्यांच्या घरात राहणार. शंभू चे दर्शन नाही होणार, मोकळ्या पटांगणात खेळायला नाही मिळणार!
रात्री ती थोड्या वेळ आजोबांकडे गोष्ट ऐकेपर्यंत झोपली पुन्हा पळून आजी कडे आली, आजीच्या कमरेला घट्ट विळखा घालून तिच्या पदराखाली झोपली.
दुसरा दिवस उजाडला कावेरी जायला निघाली.
जनाबाई आणि काशीबाईला सुद्धा ऊर भरून आला होता .
"पुन्हा सुट्ट्या लागल्या की या बरं बाई" दोघी बोलल्या.
मामा बस स्टँडवर  सोडायला गेला आणि कावेरी पुन्हा आपल्या छोट्या दुनियेत व्यस्त झाली.
दोन दिवस तिला करमलच नाही पण पुन्हा मैत्रीणींमध्ये रमली .
यावेळी तिच्या मैत्रीणींना सांगण्यासाठी तिच्याकडे खूप काही होतं.
ती गावातल्या आठवणी सांगत राहायची आणि तिच्या भोवती रिंगण करून तिच्या मैत्रिणी बसलेल्या असायच्या.
कावेरी मुळातच हुशार, चाणाक्ष मुलगी. शाळेतही ती खूप लोकप्रिय होती आणि तिच्या कॉलनीतही!
पूर्वी गावी गेली की अल्लडपणा , लाडू , खाणे - खेळण्यात  वेळ जायचा पण  यावर्षी मात्र तिला गावातला आणि शहरातला फरक जाणवायला लागला.
ती सतत मनात तुलना करत असायची गावी हे चांगलं किंवा शहरांमध्ये ते चांगलं तिला दोन्ही आवडायचं.
यावेळी डोक्‍यात बसलेलं गोंदणाचे वेड मात्र  डोक्यातून गेलं नाही.

त्यानंतर तिने लक्ष देऊन बघायला सुरुवात केली, कुणा- कुणाला कुठेतरी गोंदण  दिसायचं आणि तिला खूप आनंद व्हायचा.

तिच्या वडिलांची काकू गेल्या एक वर्षापासून  त्यांच्या घरी राहायची.
माई पण मायाळू होत्या पण त्यांना मूलबाळ नव्हतं म्हणून काका वारल्यावर कावेरी चे वडील त्यांना आपल्या घरी घेऊन आले होते.
घरात त्यांची खूप मदत व्हायची मुळातच शांत स्वभाव  पण एक होतं की स्वतःला मुलं नसल्यामुळे तो एक नैसर्गिक वात्सल्याचा भाव त्यांच्यात नव्हता.
अौपचारिकता होती थोडी, त्यामुळे तिच्या  गावाकडच्या आजी एवढी आहे तेवढी कावेरी  त्यांच्या जवळ जायची नाही, त्यांच्याशी अंतर राखूनच वागायची.
माया ही लावल्याने लागते आणि तोडल्याने तुटते , ते खरंच आहे!

यावेळी जेव्हा कावेरी परत आली त्यावेळी माई आजीने म्हणजे वडिलांच्या काकूने  तिला खूप मायेने जवळ घेतले होते. तिला पटकन तिच्या आजीची आठवण झाली.
कावेरी नसताना घर किती रिकामं रिकामं वाटायचं हे माईंना यावेळी जाणवलं.
यावेळी कावेरीच्याही ते लक्षात आलं. माहित नाही पण  जाणवलं  की त्या ही मायाळू आहेत.

कावेरी चा एक मोठा भाऊ होता जो आठवीत शिकत होता पण त्याला बाहेरगावी शिकायला ठेवलेलं होतं.
माई   आजींना   कावेरीने नेहमी काळे गंध  किंवा कुंकु लावलेलं पाहिलं होतंपण  यावेळी जेव्हा ती गावाहून परत आली तेव्हा ती सर्वांच्या कपाळावर  आणि हातावरती बारीक लक्ष देऊ लागली.
त्यावेळी तिच्या लक्षात आलं की माई पण काळं गंध लावते. . की कुंकू लावते , त्याच्याखाली गोंदण आहे .

एक दिवस तिने लक्ष देऊन पाहिलं आणि मग हळूच ठरवलं  की आजीला  विचारायचं तिने हे गोंदण कुठे करून घेतलं.
हळूहळू  थोडे दिवस गेले.

कावेरी माई आजी सोबत सुद्धा आता रमू लागली.
माईंनाही नातीबद्दल स्नेह निर्माण झाला. तिच्याशी बोलणं  गोड वाटायला लागलं.
तिला खाऊ घालणं, सोबत मंदिरात जाताना तिला घेऊन जाणे, भाजी घ्यायला जाणे, छोटे-मोठे स्वयंपाक घरातील कामं करताना कावेरीला मदतीसाठी बोलावंणं अशी दोघांमध्ये चांगलीच गोडी झाली.
कावेरीच्या तिसरीच्या परीक्षा संपल्या त्या दिवशी तिने माई आजी ना विचारलं "सगळ्या आजींना गोष्टी  सांगता येतात ना . . माहित  असतात  तर तुला पण येतात का गं?"
त्यांना कळलंच नाही की काय उत्तर द्यावे?
त्यांना मूलबाळ  किंवा  नातवंड नसल्यामुळे या गोष्टी शिकणार कुठून ,व  त्या सांगणार कुणाला?
पण हे सगळं त्या इवल्याशा कावेरीला कशाला म्हणून त्या काही म्हणाल्या नाहीत.
"मला माहित  आहेत खूप  गोष्टी पण सांगता येतील का नाही. . विचार करेन. सवय नाही गं. . म्हणजे सगळ्यांनाच गोष्टी सांगता येत नाहीत !"

" मग माई आजी. . ? माझी ती आजी आणि आजोबा खूप छान सांगतात गोष्टी."
" कावेरी मी तुझ्यासाठी प्रयत्न करेन हवा तर. . "
मग दोन दिवस संध्याकाळी शुभंकरोती म्हणल्यानंतर ती आजी च्या मागे लागली एक गोष्ट सांग ना
माई पण हळूहळू एखादे इकडचे तिकडचे जुळवाजुळव करून तिला गोष्ट सांगायला लागल्या.
एक दिवस कसे कोण जाणे कावेरीला माई आजींजवळ झोपावं वाटलं.

आईला  विचारलं तर तिने  माईंना विचारले.
त्याच हो म्हणाल्या.
मग रात्री कावेरी माईंकडे  झोपायला आपलं पांघरूण घेवून  आली.
एक गोष्ट  ऐकून झाल्यानंतर हळूच तिने माई आजींना विचारलं.
" आजी तू काळं कुंकू का लावतेस?"
" बेटा ते कुंकू नाही बुक्का आहे, विठोबा ला वाहतो ना अापण तो. . "
" पण का असंच?"
" बाळा काका आजोबा नाही त ना  म्हणून."
" कुठे गेलेत गं  ते?"
" तेव्हाच देवा घरी  गेले ना  बेटा!"
" मग ते होते तेव्हा?"
"तेव्हा  मी पण लाल कुंकू लावायची सगळ्यांसारखं."
" माई  पण का गं असं?"
"असंच असतं बेटा, तशी पद्धत आहे."

" माई आजी एक विचारू?"

" तू तो बुक्का लावतेस ना त्याच्याखाली तुलापण गोंदण  आहे का?"
" हो आहे की . का ग?"
"  कुठे केलय ते?"
"अगं  कुठेतरी यात्रेमध्ये त्या बायका येतात ना गोंदवायला त्यांच्याकडून करून घेत़लं. "
" तू लहान होतीस तेव्हाच?"
" हो पण तुझ्या पेक्षा थोडी मोठी असेल तेव्हा,   माझ्या आत्याने मला गोंदवून घ्यायला लावलं."
" हो का ?. .पण का करायचं विचारलं नाहिस?"
" विचारलं ना तेव्हा तिने सांगितलं, आपण जेव्हा देवाच्या घरी जाऊ मग तेव्हा देव बायकांना विचारतो का ग नांदून आलीस पण  गोंदून  नाही आलीस?' असं!"
" म्हणजे काय?"
" तुला नाही कळणार ते . . अजून तू लहान आहेस.  पण गोंदण असलंच पाहिजे असं सांगितलं. .  म्हणून मी करून घेतलं."
" हो का !"  कावेरीच्या मनात पुन्हा गोंदवून घ्यावे असा विचार बळावला.
यातलं काहीच तिला आईला सांगायचं नव्हतं .
तिचं काशी मावशी बरोबर ठरलेलं होतं , गावाकडे. त्यामुळे यावेळेस उन्हाळ्याच्या सुट्टीत गेल्यावर तिला ते काम करायचं होतं आणि तिला कुणालाच कळू द्यायचं नव्हतं.
क्रमशः
©® स्वाती  बालूरकर देशपांडे , सखी
दिनांक  १२.०२.२०२२

🎭 Series Post

View all