गोंदण भाग 2

Must Read Marathi Story
गोंदण (भाग -२)

आईच्या हाकेने कावेरी पळाली व सरळ माजघरात आजीसमोर उभी ठाकली.

"बेटा हात पाय धुवुन ये आणि हा खाऊ घे. . !" आजीने वाटी समोर ठेवली.

"अय्या. . बेसनाचे लाडू. . मला?"

"हो गं गौराबाई तुलाच. . ये ये!"
आजीच्या मायेने कावेरी हुरळून जायची. .

"मग कावू कुठे झोपणार आज ? आब्बाकडे की आजीकडे?"

आजोबांनी दारात येवून विचारले.

"मी ना आजऽ. . आज. . आजीकडे झोपणार. . आणि आजीकडून गोष्ट ऐकणार. . !"

"अरे लबाड. . आज आजीकडे का? ठीक आहे. . उद्या माझ्याकडे ये हो बाळा!"
आजोबा परत गेले तशी आजी म्हणाली. . " कावू मला नाही बाई जास्त गोष्टी येत बरं का तुझ्या आब्बासारख्या. . !"

" असू दे गं. . चालतं . . तुझ्याजवळ झोपायला आवडतं मला. . आणि हो एक काम पण आहे तुझ्याकडे!"

" अरे वा. . छान. . माझ्याकडे काय काम?"
आजी कुजबुजत थट्टेने म्हणाली.

" ते असू दे गं झोपताना सांगते!"
कावेरी आजीला मिठी मारून म्हणाली.

रात्री सगळी कामं आटपेपर्यंत कावेरी आजीच्या मागे मागेच फिरत होती.

आजी सोबत खोलीत झोपायला गेली तेव्हा तिच्या आईने हाक मारली.

"कावू येतेस का गं बाळा झोपायला?\"

" नाही आई आज मी आजी कडे झोपणार . . तुझ्याकडे तर कधीही झोपू शकते ना!"

"बरं बाई . . आज स्वारी आजोबाकडून इकडे आली काय? बेसनाचे लाडू दिलेत ना आजीने अजुन काय?" तिची आई कौतुकाने हसली.

आजीजवळच्या ऊबदार गोधडीत झोपायलं तिला खूप मजा वाटली.

थोड्याशा स्थूल आजीबाईंच्या कमरेभोवती वेढा घालून बिलगली.

"आजी खरच तुला गोष्टी येत नाहीत.
राम सीतेची , श्रावणबाळाची , दोन राण्यांची?" तिने हळूच विचारलं.

" झालं का तुझं सुरू?" आजीने मायेने डोक्यावरून हात फिरवला.

" ऐक ना आजी. तिकडे आमच्या घरी बाबा खूप शिस्त शिस्त म्हणून लवकर झोपायला लावतात. ते तर काहिच सांगत नाहीत. आईला येतात गोष्टी पण तिला वेळच नसतो. सारखी कामात असते. मग मला कोण आहे दुसरं ? तू आणि आब्बाच ना!"

" कशी लबाड आहे ना. . पण गुणाची गं . . मग गोष्ट ऐकायचीय का आता?"

"सांग ना गं!" ती लाडाने म्हणाली.

" कावेरी ध्रुव बाळाची गोष्ट माहितीय का तुला?"

"हो तोच ना तो आकाशात तारा बनला? आमच्या शाळेतल्या बाईंनी सांगितली होती एकदा."

"मग कुठली बाई सांगू?"

"आजी गोष्ट जाऊ दे ,एक विचारू का गं?"

"विचार की एवढं काय त्यात."

"हे गोंदण काय असतं? कुठे करतात?"

" कागं कावू असं का विचारतेस अचानक? करतात ना कुठे कुठे. पूर्वी घरी येवून करायची ती लोकं . आता यात्रेत वगैरे असतात त्या बायका. करून देतात."

"खूप दुखतं का गं?"

"हो बाई त्यावेळी थोडं दुखलं होतं. पण एवढं काही आठवत नाही आता. खूप वर्ष झाली ना गं."

"म्हणजे तुला पण गोंदण आहे?"

"हो आहे की. पण आज एवढं काय गं त्या गोंदणाचं ?"

"दाखव ना गं, कुठं आहे?"

" कावू , एक तर कपाळावर आहे बेटा , कुंकवाच्या खाली. तुझ्या आईलाही करवलं होतं तिच्या आजीने. "

"तसं नाही , ते अब्बांचं नाव ? हातावर ?"

"चल! काही तरीच तुझं. तुला कोण गं म्हणालं ? आजोबा का?"

" नाही काही. काशीमावशी आहे ना तिने सांगितलं. तिच्या हातावर आहे ना नाव तिच्या ते. . . !"

"हो हो कळंलं बरं. हेच काम होतं का माझ्याकडे?"

"आजी, मामीच्या हनुवटीवर किती छान दिसतात ते टिपके. तुझ्या हातावर तर मला कधी दिसलं नाही ना . . कुठे आहे गं ते गोंदण?"

तिला आजीच्या हातावर आतल्या बाजूने कधी दिसलं नाही. शिवाय खांद्यावरून पदर घेतलेला असे त्यामुळे कधी लक्षच गेलं नाही.

मग आजीने हळूच बाही थोडी वर करून डाव्या दंडावर लिहिलेलं नाव दाखवलं.

"वाऽ मऽ नऽ"

कावेरीने जोरात उच्चारलं.

" अगं हळू! असं आजोबांचं नाव मोठ्याने काय?" आजी दबक्या आवाजात म्हणाली.

कावेरीला खूप हसू आलं. म्हणजे सगळे हातावर करतात तर आजीने दंडावर करवलंय म्हणून.

"आजीऽ सगळ्या बायका नवर्‍याचं नाव का लिहितात? मग नवरा पण बायकोचं लिहितो का ? मला तर हे काहिच माहित नव्हतं ."

कावेरीचे प्रश्न काही संपायचं नाव घेत नव्हते. एक एक चालूच.

"अगं कावू, जुन्या काळात लवकर लग्न व्हायची ना गं. . माझं तर नवव्या वर्षीच लग्न झालं होतं. सासरी मी १२-१३ वर्षांची असताना आले होते. कपाळावर तर गोंदवलं होतं. मग यांना आवडतं म्हणून हे तेव्हाच केव्हातरी केलं असावं हातावर. आता नाही बाई लक्षात. आणि असा काही नियम नाहिय करावच म्हणून . ज्याची त्याची आवड न गं . नवरे काही लिहित नाही बाई असं हातावर वगैरे. . म्हणजे मी तर पाहिलं नाही कुठे?"

"बापरे आजी इतक्या छोट्या मुलीचं लग्न कसं केलं. .? मग तेव्हा पासून तू सगळं काम करतेस? कमाल आहे ना! मला लग्नच करायचं नाहीय मुळी."

"तसं नाही गं. वरवरची कामं करायची मी, पुन्हा पुन्हा शिकुन घेतलं सगळं.
आणि आता नाही करत कुणी इतक्या लवकर लग्न . तुझ्या आईचं पण योग्य वयातच लग्न केलं. तू तर खूप शीक. तुझ्या आई बाबांना तुला खूप शिकवायचंय."

"हो मला खूप शिकायचंय, नोकरी करायचीय, आणि. . ."

" लग्न गं , कावू?"

" नाही करायचं. . . म्हणजे बघू!"कावेरी विचारात पडली.

आजीला खूप हसू येत होतं.

" म्हणजे करायचंच नाही की उशीरा करायचंय? "

" आजीऽ लग्न तर करायचं नाही. म्हणजे सासरी जायचं नाही पण ते नवर्‍याचं नाव ते गोंदण. . आवडलं मला. . मग बघू. . नोकरी लागल्यावर सांगेन तुला !"

आजीला कौतुक वाटत होतं या बडबड्या नातीचं . तिच्या लग्नापर्यंत देवाने आपल्याला ठेवावं इतकच.

आजी नाती, गप्पांत रात्री दोघी झोपी गेल्या.

रात्री उशीरा झोपूनही आजी उठली की कावेरी उठलीच.


उगीचच चौकात ओसरीवर बसून सगळ्या हालचाली बघत होती.
सगळेजण पारोशा कामात होते.
आजोबा बंबात सरपण टाकत होते. मस्त वातावरण होता. मंद धुराचा वास ही तिला छान वाटत होता. मग तिने पाहिलं की आजी स्नान करून आली.
हळूच तिच्या मागून खोलीत गेली. आजीने साडी नेसली व पुन्हा त्या आरशाची पेटी उघडून कुंक कोरण्यासाठी बसल्या. कावेरी सगळं टिपत होती. आजीच्या कपाळावर सुंदर गोंदलेलं होतं. त्यावर मेण लावून मग त्यावर कुंकवाचा थर लावून आजीने सुंदर गोल आकारात कोरलं.
थोडावेळ पाहून ती पुन्हा अंगणात पळाली.
त्या दिवशी तिने आईला पण कपाळावरच्या गोंदणावर गंध लावताना पाहिलं.

"कावू लवकर अंघोळीला जा. बघ काशी मावशी सडा टाकतायत. बाजूला सरक ना. मी आणि मामी मोठी रांगोळी काढणार आहोत, तुला बघायचीय ना ये. आटप बरं !"
काशीमावशीचं शेण आणून पाणी मिसळत सारवणं , पाण्यात शेण कालवून सडा टाकणं ती पहात होती.
मधेच नाकाला हात लावायची कारण तुला शेणाचा वास आवडायचा नाही.

आईच्या आवाजाने कावेरी सरकली.
आंघोळ करून कावेरीपण छान तयार झाली. मामीकडून गंधाने चंद्रकोर काढून घेतली. आईकडून काजळ लावून घेतलं.
कितीतरी वेळ आई व मामीला रांगोळी काढताना पहात होती. तिला रांगोळीही शिकावी वाटत होती पण आई हात लावू द्यायची नाही.
हनमंता , काशीमावशीचा नवरा आंब्याची पानं आणून देवून गेला. सगळी लगबगच चालू होती.

आज चैत्रागौरीचं हळदी कुंकु होतं. गावात अामंत्रणं करायची होती.

घरातली कामं करण्यासाठी असलेली जनाबाई गावात हळदी कुंकू सांगायला जाणार होती.
कावेरीने विचारलं "मी जाऊ का सोबत."
आई नको म्हणाली पण आजीने करंडा घेवून जा म्हणून सांगितलं.
कावेरी आनंदाने उड्या मारू लागली.

क्रमशः

©® स्वाती बालूरकर देशपांडे , सखी
३ फेब्रुवारी \"२२

🎭 Series Post

View all