Login

गोंदण (भाग -३)

struggle of a girl for desire of the tatto.

गोंदण ( भाग-३)

पूर्व सुत्र-

आज चैत्रागौरीचं हळदी कुंकु होतं. गावात आमंत्रणं करायची होती. 

घरातली कामं करण्यासाठी असलेली जनाबाई गावात हळदी कुंकू सांगायला जाणार होती. 

कावेरीने विचारलं "मी जाऊ का सोबत."

आई नको म्हणाली पण आजीने करंडा घेवून जा म्हणून सांगितलं. 

कावेरी आनंदाने उड्या मारू लागली.

कथा पुढे-

(भाग -३)

मग कावेरी,  तीन झालरीचा  नवीन फ्रॉक , छान दोन वेण्या घालून, वेणीत फूलं लावून तयार !  . .. . 

"गोड गं कावू" मामीने गोड पापी घेतली. 

जनाबाई सोबत गावात  हळदी कुंकवाचं निमंत्रण सांगायला जाताना कावेरीने प्रश्न विचारून तिला भंडावून सोडलं. 

जनाबाईला तिचं खूप कौतुक वाटलं  होतं. इतके प्रश्न पडतात एवढ्याशा मुलीला, शिवाय कावेरी हुशार आहे हे तर कळतच होतं.


 

जनाबाईला कावेरीने  शिक्षणाबद्दल विचारलं , तर जना कधी शाळेतच  गेली नव्हती असं कळालं . . . मग?

कावेरीला ते काही पटेचना. 

शाळेत न जाता माणूस जगुच कसा  शकतो असं वाटायला लागलं. 

"जनामावशी तुझी आई ओरडली नाही का तुला?  बाबांनी धपाटे नाही दिले का ? शाळेत नाही गेली म्हणून?"

 तिच्या या बोलण्याचं तर  जनाला खूप हसू आलं.  

"काय बी वाटतं तुम्हास्नी,  तसं नाही हो कावेरीताई. आमचे आई बा पण शिकलेले न्हाइत ना . . ते बी शेतावर मोलमजुरी करायचे. . मग मला  ते कसं काय पाठवतेल साळत?"

"असं कसं. .  हो का ? मग लग्न?"

" साळचं काय त्यात? लगीन तर समद्यांचं होतंय की. . माजं बी झालं !"

" जनामावशी . .   तू पण रडलीस का लग्न झाल्यावर ?  सगळे रडतात ना . . म्हणूनच मला लग्न नाही करायचं" हिरमुसलेला चेहरा पाहून जना ला खूप हसू आलं.

" ते नवऱ्याच्या घरी जाताना. .  नाही बाई  . . . मी काय नाही रडले. .  उलट माझ्या बा पेक्षा  नवऱ्याच्या घरी जास्त सुख लाभलं. .  शेतकरी हाय ना . . मी   इथं वाड्यावर काम करते."

" म्हणजे जना मावशी तुला बिलकुल लिहिता वाचता येत नाही का. . तुझं नाव पण  नाही?"

" जना  लिवता यायचं. . आता ते बी इसरलं बगा!"

" तुला न आता  मी शिकवेन ,  मी इथं  असेपर्यंत रोज . . . "

"अगं बाई. . मग कुठं लिवनार?"

" मी असेपर्यंत पाटी घेऊन येत जा, नाहीतर माझीच आहे.  तुला तुझं नाव लिहून दिलं की  रोज गिरवायचं, वर्गातला गृहपाठ खूप कठिण असतो. जऽ ना,  किती सोपे तुझं नाव!"

" हो ताई शिकल की !"

 तिच्या या बोलण्यानं  तर जनाबाईला खरच खूप चांगलं वाटलं.

" मावशी तू काम करते ना आजीकडे , काम करते  वाड्यावर तर तुला पगार मिळतो . . हो ना. . मग तुला  पैसे मोजता येतात का तुला?"

" येतात की मग . . साळत जायचा  अन पैसे  मोजायचा. . काय संमंध तेवढं शिकवलं  माझ्या आई बा नं अन माझ्या धन्याने."

  इतक्यात कावेरीचं लक्ष जनाच्या हाताकडे गेलं.

"  तू नाही  गोंदवून घेतलं तुझ्या नवर्‍याचं नाव हातावर ?"

"नायबा. .   मी नाई मनले!"

" का नाई  म्हटलं . . किती छान दिसतं  ते हातावर, मला खूप आवडतं !"

" तुम्ही लिवा की मग लग्न झाल्यावर. . नवर्‍याचं नाव!  कावेरीताई अन् हो  त्याच्या हातावर माझं नाव हाय गोंदवलेलं. .!"

" अय्या असं पण असतं ? मी विचारलं आजीकडे. . तिला पण माहित नाही. "

" हो ताई . .  असं पण असतं की व्हय म्हणजे  आपण ज्याच्यावर प्रेम करतो ते नाव हातावर लिहीलं की  आपण कधी विसरत   ते. . अन . .  माजं धनी म्हणत्यात की जोडी पक्की करतो देव. .  म्हणून माजं नाव लिवलंय त्यानी.  तसं हाय का नाय काय माहित पण आमचं  धनी  म्हनतात."

अशा गप्पा करत , गावात फिरत दोघी निघाल्या होत्या. शंभूचं दर्शन ही घेतलं. १२ -१३ घरी हळदी कुंकवाचं निमंत्रण दिलं.

प्रत्येक घरी कावेरीचं कौतुक होत होतं. 

कुणी चौकशी करत होतं तर कुणी लाड करत होतं. कुणी खाऊ दिला तर कुणी खेळायला ये असं सांगितलं.

कावेरीचं मन जणु एखाद्या टिप कागदा प्रमाणे किंवा स्पंजप्रमाणे सगळं टिपत होतं.

तिचं सगळ्यांच्या कुंकवाकडे किंवा साड्यांकडे लक्ष. कुणाच्या घरी खेळण्यांकडे लक्ष!

गावातल्या काही जणी नववारीत होत्या तर कुणी सहावारीत होत्या. 

कुणाच्या हातावर, तर कुणाच्या तळव्याच्या मागे, हनुवटीवर गोंदवलेलं. . हे हलकेच नजर शोधत होती.  पांडे काकु्च्या कपाळावर तर चंद्रकोर त्यावर कुंकु, खाली एक रेष व टिपका. . ते फारच आवडलं तिला. . म्हणजे सगळं तिच्या शहरातल्या परिस्थिती पेक्षा खूप वेगळं होतं. तिचं मन सतत  तुलना करत रहायचं.

सगळे तसंच म्हणायचे की शहरातलं जीवन व खेड्यातलं / गावातलं जीवन खूप वेगळं असतं. खूप फरक असतो त्यात.  राहणीमान , खाणं -पिणं, कपडे, शाळा, दुकानं. . सगळच वेगवेगळं !

आजीकडे गावत आली की कवेरिला फ्रॉक घालायला विशेष आवडायचे नाही. ते फ़क्त त्यांच्या तालुक्यातच. . शहरातच!

 एरवी शाळेचा गणवेश असायचा मग  घरी आलं  की फ्रॉक किंवा छोटे वनपीस  आई शिवून आणायची.

आजोळी आलं की मात्र परकर पोलके. आजी  नेहमी वेगवेगळे शिवून ठेवायची. कधी जरीचे , कधी खणाचे तर कधी रेशमाचे! एकदा तर भरत काम करवून आणलं होतं पोलक्यावर.

मामीही खूप हौशी!

 आजी आजोबकडून दोन ड्रेस तर मिळायचेच वर्ष भरातून .

आजही हळदी  कुंकवासाठी वेगळी छोटीशी कल्पना साड़ी मागवली होती आजीने  मामीला सांगून.

दुपारपासून घरात सगळं कार्यक्रमाचं वातावरण तयार झालं होतं. 

नोकरांच्या मदतीने झोका बांधला होता ओसरीत. 

सगळी कडे आंब्यांची पानं व फुलांच्या माळा बांधल्या गेल्या . मागून सुरेख विणकामाचे पडदे बांधले. सकाळीच चैत्रगौरीला कोमट पाण्याने आंघोळ घालून नवीन रेशमी वस्त्र आणि सगळे दागिने  घातली होते. पूजा अर्चा व नैवेद्य  आरती झाली.

संध्याकाळी गौरीला झोक्यात बसवलं. सजवलं. दुपारपासूनच सजावट सुरू झाली. गौरी समोर सगळी ठेवणीतली खेळणी काढून मांडण्यात आली. समोर सुंदर  रांगोळी काढण्यात आली. हळदी कुंकवासाठी  आतले चांदीचे भांडे व गुलाबदाणी अन अत्तरदाणी ही काढून भरण्यात आली.

कावेरीची आई मामीच्या बरोबरीत कामं करत होती.

दरवर्षी  आजीकडे वेगवेगळया  प्रकारे गौरीची सजावट करतात असं काशीमावशी पण सांगत होत्या.  कावेरी मात्र खूपच अप्रुपाने हे सगळं बघायची. 

कावेरीची आई पण हे हळदी कुंकु करायची पण एवढी लगबग  नसायची तिथे. घर लहान होतं त्यामुळे देवाच्या बाजूलाच गौर बसवली जायची. शेजारच्या  पाच बायकांना हळदी कुंकवाला बोलवायचं इतकं सरळ सोपं. 

 आईपण मामींना हेच सगळं सांगत होती गप्पांमधून.

सतरंज्या टाकल्या गेल्या, समया लावल्या गेल्या. मग सगळा थाट होईपर्यंत  संध्याकाळ  झाली. वाटलेली दाळ, कैरीचं पणं सगळी व्यवस्था  झाली. 

हाताखाली जनाबाई व काशीबाई होत्याच. 

कावेरीच्या आजी , मामी व आई खूप छान तयार झाल्या, भरजरी साड्या नेसल्या.

कावेरीची तर मजाच! तिला सुंदर  कल्पना साडी नेसवली होती. गंगावन लावून लांबसडक वेणी घातली होती. मोत्याचा कंबरपट्टा!  हातात मोत्याच्या बांगड्या!  मोगऱ्याचा गजरा माळला होता. कावेरी खूप सुंदर  दिसत होती अगदी दृष्ट  लागण्याजोगी!

 आजोबा खूप आनंदले होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिला गौरीसारखं सजवलं होतं आजी व मामीने. 

आजोबांनी मंदिरात जाताना आवाज दिला. 

"कावू तुझ्या शंभुच्या दर्शनाला चाललोय गं ,  आज तर तू येणारच नसशील ना!"

"हो आबा, म्हणून तर मी सकाळीच जना मावशीसोबत जाऊन आले मंदिरात." कावेरी लाडाने सांगत होती.

"अरे वा छानच की."

मामाही बाहेर गावी गेलेला होता. 

सगळं बायकांचं राज्य. . त्यावेळी हाच तर विरंगुळा होता बायकांना .

हळु हळु बायका हळदी कुंकवाला यायला लागल्या.

कावेरीने अत्तरदानी हातात घेतली होती. 

बायकांनी दर्शन घेतलं की त्यांना बसवून  मामींचं हळदी कुंकु देणं ,लगेच कावेरी जाऊन हाताच्या मुठीवर अत्तर लावत होती. तिला केवढा कार्यभाग पार पाडल्यागत वाटत होतं .

 आलेल्या बायका  सजावट बघत होत्या. मग कैरी घातलेली वाटली दाळ देणं , मग उखाणे घेणं गप्पा . . तो हास्याचा कल्लोळ ! 

कावेरीची आई सर्वांच्या ओट्या भरत होती. इतक्या सवाष्णी एकदाच लाभल्या म्हणून. 

जनाबाईंनी सर्वांना पणं दिलं. 

हसत खेळत कार्यक्रम  खूप छान पार पडला.

पुरूष मंडळी परतली. 

सर्वांनी थोडं थोडं खाऊन घेतलं. बायकांना मुळी भूकच नव्हती पण सणादिवशी तसं कसं उपाशी झोपायचं म्हणून तोंडं उष्टी केली.

कार्यक्रम  खूप छान झाला. सगळ्याजणी खूप दमल्या होत्या.

कावेरी पण सगळ्यांच्या मध्यभागी बसून मोठ्याने म्हणाली" काय रे बाबा. . मी पण खूप दमलेय आज फिरून फिरून!"

 सगळेजण मोठ्यांदा हसले.

"कागं कावू काय काम केलंस तू दमायला. . ?"

" अगं आई . .अत्तर लावलं ना इतक्या  बायकांच्या हाताला. .  १३-१४ घरी सांगितलं तर २५ बायका कशा काय आल्या गं आजी?"

पुन्हा सगळे हसले.

"कावू तू अत्तर लावीत होतीस की बायका मोजत होतीस?" मामा थट्टेने म्हणाला.

इतक्यात आजी म्हणाली ". . अगं माधवी खरच दमलीय गं ती, सकाळची उठलेली आहे, जनासोबत सगळं गसव पालथं घालून आली. संध्याकाळी पण किती मदत केली तिने!"

" आमच्या नातीची दृष्ट  काढा पहिले. साडीत किती छान दिसत होती कावू!"

आजोबांचं वेगळंच.

सगळ पार पडलं .

सगलके गप्पा मारत बसले तेव्हा आईच्या मांडीवर डोकं ठेवून कावेरी शांत झोपी गेली होती.

क्रमशः 

©® स्वाती  बालूरकर, सखी

दिनांक  ०७.०२ .२०२२

🎭 Series Post

View all