Login

गोंदण भाग 1

Struggle Of A Lady
गोंदण
(भाग१-निरागसता)
लेखिका - सौ. स्वाती बालूरकर देशपांडे, सखी

संदर्भ - या कथेचा कालखंड १९७०-९० या दशकांमधला आहे. त्यामुळे काही संदर्भ आधुनिक काळात मानले जातील असं नाही. वाचताना त्या अनुषंगाने वाचावी ही विनंती.)

"कावेरी ऽ ऽ . कावेरीऽ ऽ …. कुठेस गं ?"

वामनरावांच्या हाका मंदिराच्या आवारात ऐकू येत होत्या .

कावेरी मात्र मंदिराच्या आतल्या पायर्‍यांच्या मागे लपून आजोबांची मजा घेत होती.

"आबा मी कुठे ?"

तिने गोड आवाजात हाक मारली .

वामनरावांच्या लक्षात आले की ती कुठे लपली आहे पण ते दमले होते. मिश्किलपणे म्हणाले "मी म्हातारा ना गं ? कसे शोधू तुला ? आता जातोच मी घरी !"

या वाक्याने कावेरी पटकन पळत आली आणि आजोबाना येवून बिलगली.

"अरे लबाड! आब्बांना सतावतेस काय ? चला घरी नाहीतर आजीच शोधायला यायची"

"मी तिच्याबरोबर पण खेळणार लपाछपी . . !"

" अगं कावेरी ऐक तर. . !" म्हणेपर्यंत कावेरी मंदिराच्या विशाल मोकळ्या पटांगणात इकडून तिकडे पळायला लागली.

नक्षत्रासारख्या सप्तवर्षीय नातीला खणाच्या परकर पोलक्यात असं आनंदाने बागडताना पाहून वामनरावांना कोण आनंद होत होता.

कावेरीवर त्यांचा आणि सुमतीबाईंचा खूप जीव होता.

उन्हाळ्यात दोन महिने आणि दिवाळीच्या सुट्यांत तिचा खूप सहवास मिळायचा.

या वेळेला कुठल्याशा कारणाने कावेरी आणि तिची आई अक्षय तृतीयाच्या आठ दिवस अगोदर घरी आलेले होते.

पुरातन काळ्या दगडाचं हेमाडपंथी मंदिर आणि त्याचं इतकं मोठं प्रांगण कावेरीला खूप आवडायचं.

उंच असलेले ते रेखीव शिखर आणि आतली अमृतेश्वराची पिंड खूपच मनोहर होती. . कावेरीला ती खूप आवडायची.

तितक्यात सुमतीबाई आल्या आणि कौतुकाने तिला जवळ घेत म्हणाल्या "काऊ झालं का तुझ्या शंभूचं दर्शन ?"

"हो तेव्हाच. . मी तर आब्बासोबत लपाछपी पण खेळले. तू पण पटकन दर्शन घेऊन येना. आपण दोघी लपाछपी खेळूयात!" कावेरी लाडाने म्हणाली.

" चल गं. . काहीतरीच काय माझं काय खेळायचं वय आहे का गं?"

सुमतीबाई पदर ठीक करीत म्हणाल्या!

" अहो काय त्यात इतकं ? पोर म्हणतीय तर खेळा की. . तुम्ही काही लपू शकणार नाही. . पण ती लपेल तुम्ही फक्त शोधा म्हणजे झालं !"

हे बोलताना वामनरावांनी डोळे मिचकावले आणि सुमतीबाई लाजल्या .

"अहो काही पण काय बोलताय? घर ढीगभर कामं पडलीत. . येत्या आठवड्यात चैत्रगौरीचं हळदीकुंकू आहे त्याची तयारी बाकी आहे !"

" कावेरी तुमची गौर आहे ना . . हळदीकुंकादिवशी मदत करायला. . ही तर खरी गौरच आहे आपली, नाही का ?. . हिलाही नटवा त्यादिवशी!"

वामनराव कौतुकाने कावेरीजवळ आले.
"हे बाकी खरं हं . . कावेरी माझी गौरीच आहे . . चल गं . . माझ्यासोबत अजून एकदा दर्शन घे गं तुझ्या शंभूचं. . मग सगळेच घरी जाऊया. . खूप झालं खेळणं केव्हाची आलायत दोघं!"

सुमतीबाई लाडाने म्हणाल्या. त्यांनी कावेरीचे डोक्यावर मायेनं हात फिरवला कावेरी पदरा मागे लपली.

दोघी आत मंदिरात गेल्या.

ती पुन्हा एकदा छोट्याशा गाभाऱ्यातून आत गेली. शंकराचे मनोभावे दर्शन घेतले. बाहेर आली व पुन्हा नंदीच्या शिंगामधून महादेवाची पिंड पाहू लागली.

खूप सुंदर कोरीव आणि मोठा नंदी होता.

सुंदर मंदिराच्या बाहेर सूर्य अस्ताकडे निघालेला होता.

मावळत्या सूर्याची किरणे मंदिराच्या शिखरावर मुक्त खेळत होती.

संध्याकाळचा गार वारा मनाला धुंद करत हाेता.

मंदिराच्या प्रांगणात एक अलौकिक शांतता वाटायची म्हणून वामनराव संध्याकाळी बराच वेळ येऊन इथे बसायचे आणि जेव्हा जेव्हा कावेरी यायची तेव्हा तर नित्यनेमाने तिला इथे घेऊन येत.

तिलाही आजोबांसोबत खेळायला, मंदिराच्या अवतीभवती बागडायला, खूप आवडायचं !

कावेरीच्या आजोबांच छोटंसं गाव, त्यात नाईकांचा इतका मोठा वाडा आणि त्या वाड्यांमध्ये दोन नोकर राबायला.
मोठं दार, बाहेरची बैठक , सात- आठ खोल्या, येणार जाणार, सण वार. . सगळच भारी!

आंब्याची तर एक वेगळी खोली होती. . तिचं विशेष आकर्षण होतं कावेरीला.
उन्हाळ्यात तिला मनसोक्त आंबे खायला मिळायचे.

याउलट कावेरी तालुक्याच्या गावी राहायची .
तिचे वडील तिथे पोस्टात नोकरी करायचे.
तीन खोल्यांचं भाड्याचं घर होतं . . आणि खूप शिस्त.

तिथे सगळ अगदी आटोपशीर होतं. कुठेही बडेजाव नाही की खर्चिकपणा नाही.

त्यामुळे आजोळी आली की तिला हरखून गेल्यासारखं व्हायचं. . खूप लाड आणि हवं ते मिळणार.

कावेरी आजी सोबत घरी आली. . काही बाही खाल्लं आणि खेळायला लागली.

तिची आई आणि मामी काहीतरी कामात होत्या.

त्यांनीही तिच्याकडे लक्ष दिलं नाही.

कावेरीला आता काहिच काम नव्हतं मग ती झोपाळ्यावर बसून उगीचच सगळ्यांना निरखून पाहत राहिली.

काशी ने अंगणातलं वाळवण गोळा केलं आणि झाडायला लागली.

काशी मावशीचं काम करणं , त्यांची झाडतानाची लय, अशी ती लक्षपूर्वक पाहत होती. . .

एकदमच वारा आला आणि काशी मावशीचा पदर उडाला.

लक्षपूर्वक काशीबाईंना निरखून पाहताना कावेरीच्या हे लक्षात आलं की तिच्या हातावर काहीतरी डिझाइन काढलेला आहे. हातावर काय काढले असावं या उत्सुकतेने ती त्यांच्याजवळ पळत गेली.

“काशी मावशी काय गं तुझ्या हातावरती? मेंदी लावली का ?”

“ मेंदी ठीक आहे पण वाळली पण …..!”

ती जवळ जाऊन पाहू लागली .

“ अगं बये मेहंदी नाय काय गोंदण हाय गोंदण ! “

“पण तेच कसं असतं बघू बघू “ तिने तिच्या हातावर पाहिलं…. तुळशीचे वृंदावन काढलेलं होतं आणि दुसऱ्या हातावरती तिच्या नवऱ्याचं नाव लिहिलेलं होतं …. हनमंत !

कावेरीने मोठ्याने नाव वाचले तशी काशी लाजली .

“माझ्या धन्याचं नाव हाय ते….”

“पण ते इथे का लिहिलय ?”

“तसं लिवत असत्यात . . मोठ्या मालकिन बाईच्या हातावर बी हाय की मालकांचं नाव गोंदलेलं !”

“अय्या मला माहितच नाही . . . मी पहिलं नाही कधी . . मी पाहून येवू का आत्ता ?”

कावेरीला खूप अप्रुप वाटत होतं त्या गोंदनाचं...हिरवं गार किती छान दिसत होतं हातावर .

“नका न ल्हान्या ताई . . मालकिन बाई माजघरात हायेत. रात्रीच्याला बगा .”

काशी तिला थांबवत म्हणाली .

"मामी साहेबांचा चेहरा पाह्यलाय का कधी? हनुवटीवर हाय की गोंदण!"

"हो का? ते पण गोंदणच. . मला माहितच नव्हतं ना मावशी. . ते बघू का आता ?"

" बघा की कोण नको म्हणतंय तुम्हास्नी?"

" काशी मावशी तुम्ही कुणाला सांगू नका पण मला खूप आवडलं हे. . तुमचं हातावरचं गोंदण!"

" व्हय का . . बरं बरं!" आणि काशीबाई अंगणात पुढच्या कामासाठी निघून गेली.

शांत बसलेल्या कावेरीच्या मनात एकच विचार की हे मेहंदीसारखं दिसणारं गोंदण काढतात कसं ?. . आणखी किती दिवस राहतं ?

मामीच्या हनुवटीवरचा गोंदण माझ्या कसं लक्षात नाही आलं ?
हळूच बघू का?
विचारू का मामींना की तिला आवडणार नाही?
पण तिला वाटलं की पहिले आईला विचारावं आणि मग मामीला !
मनात एक ना अनेक विचार घोळू लागले.

सुरुवात कशी करावी, आईला आवडेल का?

कारण तिच्या गावामध्ये तिने कुणालाच गोंदलेलं पाहिलेलं नव्हतं किंवा मग तिचं लक्षही गेला नसावं!

मनात काहीतरी विचार करून हळूच ती आई आणि मामींकडे आली जिथे त्या दोघेजणी लाडू वळत बसलेल्या होत्या .

मग ती आई जवळ येवून मांडीवर भार देवून बसली .

“काय झालं गं कावेरी थकलीस का गं खेळून?”

"अं हं . . उगीच. . आई. .एक सांगशील का?"

"काय गं . . . कावू?"

" विचारलं तर सांगशील ना ?"

" अगं बोल की. . असं काय विचारायचंय तुला?
" मामी ते हनुवटीवर हिरवं गंध लावते ना . . ते कुठे मिळतं?"

" अरेच्चा हे विचारायचं होतं होय. . . इतके आढे वेढे घेवून. . . मलाच विचारायचं ना सरळ. . तुला हवय का ?" मामी खूप लाडाने कावेरीकडे पहात बोलली.
" म्हणजे मामी ते गंधच आहे ना. . गोंदण नाही ना. . मी म्हटलं होतं काशी मावशींना!"

कावेरीच्या या भोळ्याभाबड्या युक्तिवादावर मामीलाही हसू आलं.

ती म्हणाली "नाही गं काऊ ते गोंदणच आहे, काशी मावशींनी बरोबर सांगितलं तुला !"

"अय्या हो . . मग कुठे मिळतं ते गोंदण?"

"अगं मिळत नाही . . करवून घ्यावं लागतं."

"म्हणजेच ते हिरवे तीन टिपके तू करवून घेतलेस हनुवटीवर?"

"हो. . का गं?"

"मला खूप आवडतात ते. . पण मला वाटायचं की ते गंधच आहे. . आणि अंघोळ केल्यावर ?"

"अगं बाळ ते जात नाही ते . . पाण्याने. नेहमी तसंच राहतं."

"अय्या हो किती छान म्हणजे रोज रोज लावण्याची कट कट नाही . . हो ना!" कावेरी खूप उत्साहित होती.

यावर मामी खूप प्रेमळ हसली.

" पण हो बरं कावू. . करताना खूप दुखतं बरं का ते. . "

" हो. . पण छानही दिसतं ना. . नको बाई मला!"

कावेरीचा पडलेला चेहरा पाहून मामी लाडाने म्हणाली, "काही आवडत असेल तर त्रास तर सहन करावाच लागतो ना. . आणि एकदाच . . रोज काही नाही पुन्हा!"

" हो का? . . मामी, आईला सांगू नको हां की मी इतके प्रश्न विचारून तुला त्रास दिला म्हणून. . !" डोळे किलकिले करून कावेरी म्हणाली.

" काही होत नाही गं . . तू लाडकी भाची ना आमची मग काय? आणि हो तुझ्या आईचं गोंदण नाही पाहिलंस का कधी ? "

"नाही आईला नाहीय काहीच . . असं हनुवटीवर?"

"अगं तसं नाही. हनुवटीवर तर तुझ्या मामाला आवडतं म्हणून गोंदवलं मी.
पण सगळ्याच बायका कपाळावर गोंदवतात."

"मग आई. . ?"

"अगं तुझी आई नेहमी कुंकू लावते किनई.. . म्हणून लक्षात आल नसेल तुझ्या.कुंकाच्या खाली गोंदण असतं ना. . !"

"हो ना बरोबर. . म्हणून मी नाही पाहिलं. . मला वाटलं हिरवं गंधच आहे.!"

"पण कावू. . आता नको विचारू कुणालाच काही. उद्या आई अंघोळ करून येईल ना पहा. . !" मामी डोळे मिचकावत म्हणाली.

"कावेरी. . कुठयस गं बाळा. आजी खाऊ देतीय ये ना. . !"

"आले आले. . !"

आईच्या हाकेने कावेरी पळाली व सरळ माजघरात आजीसमोर उभी ठाकली.

क्रमशः

(कावेरी असं काय विचारणार आहे जे पुढे तिच्या आयुष्यात एक वादळ बनून समोर येणार आहे?)

🎭 Series Post

View all