गोंदण (भाग -६)

Struggle of a girl in desire of a tatto.

गोंदण ( भाग -६)
पूर्व सुत्र-


आंब्यासाठी तर खास तिला इथे यायला आवडायचं.
" कावेरी , संध्याकाळी खा बरं का आंबे. . काढून देतो थोडे पिकलेले. मग मंदिरात जावू आपण." आजोबा ओसरीत बसल्या बसल्याच कावेरीला म्हणाले.
कावेरी खूप आनंदली.



कथा पुढे - गोंदण (भाग -६)


संध्याकाळी आजोबांनी खरच खोलीतून पिकलेले पाहून टोपलीभर आंबे काढून दिेले. मग काय चोकून खायचे छोटे छोटे आंबे वेगळे आणि रसाचे वेगळे.
मनसोक्त आंबे खावून झाले.
संध्याकाळी शंभूच्या दर्शनाला जायचं होतं पण यात्रेची गर्दी आहे त्यामुळे दर्शन नीट होणार नाही शिवाय आजोबांना कावेरीला फिरवणं जमेल की नाही असं वाटून आजीने थांबवलं.
"मग मी कुणासोबत जाऊ यात्रेत?"
कावेरीने हळूच विचारलं .
"मामी नेईल ना उद्या !" आजी म्हणाली.
"हो जाऊ यात की . . चार वाजता काम आवरलं आणि चहापाणी झालं की निघू.
आठ - दहा दिवस राहणार आहेस ना तू कावेरी. . . एकदाच काय अजून दोनदा पण जाऊ शकतो आपण. " कावेरीची मामी म्हणाली.
" अय्या हो. . किती छान. . अजून किती दिवस आहे यात्रा?"
" असेल ना हो अजून आठ दिवस ?सुरू होवूनही आठ दिवस झालेत. " मामी.
" होगं आहेत अजून आठ दिवस. . काय घेणार कावू यात्रेत. ?" मामा म्हणाला .


" मला काय माहित काय मिळतं तुमच्या यात्रेत?"
" खेळणी, खाऊ, कपडे, सगळं मिळतं . . तुला हवं ते घे! ए काय गं . . ने बरका हिला उद्या आणि हवं ते घेवून दे. .जमलं तर मी पण येईन सोबत. आपली लाडाची भाची आहे ना !"
"हो जाऊयात मामी पण मी ना फक्त बघणार आहे यावेळी. . घेणार नाही काही!"
" असं का गं कावू?"
" म्हणजे पुढच्या वेळी जाऊयात ना तेव्हा हवं ते घेणार. "
" पण का तसं. . ?"
" मामीऽ. . मला प्रश्न पडतो , मी पाहू की विकत घेवू? त्यापेक्षा सगळं पाहणार , किंमत विचारणार अन घरी येवून विचार करून ठरवणार . . काय घ्यायचं ते. मग दुसर्‍या दिवशी पटकन जायचं आणि हवं ते घेवून यायचं ."
" असं होय. . छानच की. यावेळी जमलं बुवा कावू तुला. " मामी म्हणाली.
"चला आवरा . . उद्याचं उद्या बघू!" आजी म्हणाली.
ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी कावेरी मामा व मामी सोबत यात्रा पाहण्यासाठी गेली.
यात्रेत खरंच खूप गर्दी होती. जवळपासच्या खेड्यातलेही खूप लोक यायचे.
यात्रेच्या आस पास मोकळ्या पटांगणात बैलगाड्या लागलेल्या होत्या. तिथे लागलेली सगळी दुकाने, खेळणी, कपडे, खाण्याच्या वस्तू बघून कावेरी खूप हरखून गेली.
यापूर्वी कधीतरी लहानपणी एक दोनदा यात्रेत गेली असेल पण गर्दीमुळे तिला सतत हरवण्याची भीती वाटायची.
तिच्या वडिलांना वस्तू न घेता उगीचच चौकशा केलेल्या आवडायच्या नाहीत. त्यामुळे ती किंमतही विचारू शिकायची नाही.
किंमत माहित नसताना वस्तु मागणे तिला आवडायचं नाही कारण वडिल थोडेसे कडक स्वभावाचे होते.
याशिवाय तिला छोटे-मोठे खेळ खेळायची इच्छा असायची ,तिथे थांबलेलं बाबांना आवडायचं नाही.
यावेळी तिला थांबावं वाटलं तर थांबणं अन पाहणं शक्य होतं . कारण यावेळी असं काही नव्हतं. . मामा आणि मामी दोघेजण सोबत आले होते.
त्यांनी कावेरीला पुर्ण स्वातंत्र्य दिलं होतं.
ती एका दुकानात असलेल्या वस्तु निरखुन पाहत होती, मामा मामी तिला कौतुकाने पाहत होते.
किती प्रकारचे कानातले, गळ्यातले, गळ्यातल्या वेगवेगळ्या माळा बरच काय काय होतं तिथे.
तिला एक नेल पॉलिश घ्यायची होती तिने मैत्रिणींना लावलेली पाहिली होती पण आईला कधीच आण म्हणून विचारली नव्हती.
शिवाय वेगवेगळया रंगांचं गंध तिने ठरवलंच होतं की तिला यावेळी घ्यायचं आहे.

एका ठिकाणी बंदुकीने फुगा फोडण्याचा खेळ होता, मामा तिथेच थांबला, मामा ने मामी ने पण नेम लावला पण बक्षिस काही लागलं नाही.
मग कावेरी ची वेळ आली.
आणि काय आश्चर्य पाच नेम मारण्याची संधी होती तर तिसर्‍यांदा तिचा नेम लागला व लाल फुगा फुटला.
त्या फुग्यांमध्ये जे लिहिलं आहे ते बक्षीस म्हणून मिळतं तर तिला दहा रुपयांचे बक्षीस लागले.
२५ पैसे तिकिटाला देवून त्या काळातले दहा रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम झाली.
त्यामुळे तिला खूपच आनंद वाटला.
" चला आता मिळाले आहेत दहाऽ रुपयेऽ. . तुझे तूच खर्च कर बरं का कावू. तुला काय हवं ते घे . . हवे तर ते तसेच ठेव. मी घेवून देईन काय पाहिजे ते. " मामा कडेवर घेवून बोलला.
"यांनी किती वेळा प्रयत्न केला असेल आतापर्यंत . . पण कधीच त्यांचा नेम बरोबर लागला नाही. . तू मात्र नशीबवान बरं कावू. . पहिल्याच प्रयत्नात!" मामी हसत हसत बोलत होती. मामा मात्र खजील झाला.
"आणि तुमचा नेम बाईसाहेब? " मामा मुद्दाम मामीला उद्देशून म्हणाला.

"आमचं सोडाच. . दोन्ही डोळ्यांनी समोर दिसणारं झुरळ मरत नाही आमच्याकडून मग एक डोळा बंद करून बंदुकीचा नेम काय लागणार?"
त्यावर कावेरी टाळ्या वानवून हसू लागली.
यानंतर तिघेजण एका तंबूमध्ये गेले . तिथे सगळे वेगवेगळे प्रकारचे आरसे होते ज्याच्या मध्ये माणसं लठ्ठ किंवा रोड दिसतात ,चेहरे वेगळे दिसायला लागतात अगदी चित्र विचित्र आणि स्वतःलाच पाहून हसू यायला लागतं .
कावेरीने तिने खूप वेळ घेतला. प्रत्येक आरशात ती आपले बदललेले नाक, डोळे दात बघून खूप हसत होती.
लठ्ठ व बुटक्या मामा मामीला बघून तर तिला खूपच हसू आलं. काहीतरी जादू आहे असच वाटायला लागलं.
तिथून निघाली तर मामाने विचारलं "आता खरी जादू बघायची का ?"
" हो मला खूप आवडतात जादूचे प्रयोग. . आमच्या शाळेत पण एक जादूगर आला होता मागच्यावर्षी !"
मग मामाने एका ठिकाणी तिला जादूचे प्रयोग दाखवले . तिला खूप आवडले. ती विचारच करत राहिली की टोपीखाली अंडं होतं ते कुठे गेलं . . मग ते दोन अंडे कसे झाले. . अन शेवटी कावेरीने फुंकर मारली की टोपीखाली कोंबडीचं पिल्लू कुठुन आलं?
सगळीच धमाल.
त्यानंतर राहाट पाळण्यात बसण्याची वेळ आली.
इतका मोठा पाळणा तिने कधीच पाहिला नव्हता १० -१२ पाळण्यांचा.
पण तिला भीती वाटत होती.
कारण शाळेतल्या सरू ने सांगितले होते की रहाट पाळणा जेव्हा खाली येतो ना तेव्हा पोटात खड्डा पडल्या सारखा होतो.
भीतीपोटी ती नाही म्हणाली.
" मामी पोटात दुखलं तर ?"
" काही नाही होणार. मी माझ्या मांडीवर बसवून घेवू का तुला ? . . बरं एक काम करूयात अहो. . आपण नाहिला छोट्या पाळण्यात बसवूयात, जेव्हा तिची भीती जाईल तेव्हा मोठा."
कावेरीला मामीचं मत पटलं. मग सार पाळण्याच्या हाताने फिरवल्या जाणार्‍या रहाट पाळण्यात बसली. तिला खूप मजा आली.

मग मामा-मामी व कावेरी मोठ्या पाळण्यात बसले. कावेरी मामीचे दोन्ही हात घट्ट धरून बसली होती. खरच खूप मजा आली.
तिच्या मैत्रिणीनी सांगितल्याप्रमाणे जाताना खूप भीती वाटल्या सारखे वाटले होते आणि उतरताना पोटात खड्डा पडतो आणि खूप हसू यायला लागलं.
यावेळी मात्र तिची पाळण्याची भीती निघून गेली.

छोट्या मुलांसारखं ते घोड्यावर बसून माणूस फिरवतो, तिथे पण ती जाऊन आली.
परत निघताना मामाने काही-बाही खाऊ घातलं. गरमागरम जिलेबी घेऊन दिली.
"कावेरी यात्रेत काही घ्यायचं होतं ना तुला ?" मामाने तिला विचारलं .
कावेरी मामीकडे पाहून म्हणाली. " काही घ्यायचे नाही आज. . तुला सांगितलं ना मसमी फक्त यात्रा बघायचीय मला. पण काय गं . . ते नाही का मामी? "
" काय गं बेटा ?"
" पण मी जे शोधते ते मला दिसतच नाही ,पूर्ण यात्रा संपत आली !"
कावेरी हळूच मामीच्या कानाजवळ बोलली. मामीने वाकून ऐकलं. मग विचारलं,
"असं काय आहे जे तुला दिसलं नाही?"
" मी तुला विचारते पण आईला सांगू नको. . . !"
" काय. .गं?"

"ते करतात ना ते गोंदण का काय? यात्रेत करतात म्हणे ना. . आमच्या माई आजी म्हणल्या होत्या. . . ते कुठे दिसलं नाही."

" अरे हो. . तुला मागच्या वेळी आवडलं होतं ना माझं गोंदण! चल मी तुला दाखवते. . पण खूप दुखतं बरं का ते करताना!"
मामी उगीचच दबत्या आवाजात म्हणाली.
" नाही मामी मला फक्त पाहायचं आहे ते."

" ठीक आहे मग . . ? मग मामांना कुठल्यातरी दुकानात उभं करून आपण जावूयात. "
मामी ने तसच केलं व तिला घेऊन यात्रेच्या एका कोपऱ्यात नेलं जिथे सिनेमाचं तंबू थिएटर होतं.
त्याच्या बाजूला दोन तीन बायका गोंदणाचं सामान व कागदावर काढलेल्या डिजाईन घेवून बसलेल्या होत्या . गोंदणासाठी बसून असलेल्या बायका व मुली होत्या.
गोंदण करवून घेताना त्यांच्या विचित्र ओरडण्याचे कावेरीला खूप हसू आले.
ती उभी राहून पहात राहिली.
काही बायका तुळशीवृंदावन ,कमळाचे फूल ,कपाळावर गंध आणि हनुवटीवर टिपके तर कुणी डोळ्यांच्या बाजूला टिपके, एक बाई दंडावर लिहून घेत होती.
मात्र ते दुखत आहे हे तिला कळत होतं, पण ते सगळं सहन करत होती.
झालं. . मग त्याच्यावर तेल लावून दिलं .
त्या बाईने विचारलं " का गं, का आवडतं तुला गोंदण. . करायचं का माय?"

" नको बाई. . ती मुलगी बघ हाताला पाहून कशी रडते आहे !"
"रडतीय आता थोडा वेळ. . पुन्हा उद्या परवा तर ही वरची कातडी निघून जाईल. . मग किती छान दिसेल." मसमीने सांगून पाहिलं.
"दुखत नसेल तर चालेल पण पुढच्या वेळेला पाहूयात !" कावेरीच्या मनातली इच्छा पूर्ण झाली .
तिला कळालं होता की कुठे गोंदवतात व कसे ? किती पैसे घेतात !
मनात काहीतरी निश्चय करून आनंदाने ती घरी निघाली.
येताना मामीने तिला भातुकलीचे लाकडांचे भांडे घेऊन दिले.
मग काय घरी आल्यापासून तिने ओसरीत आपलं छोटं स्वयंपाकघर मांडलं आणि मग तिला माहित असलेले सगळे पदार्थ ती खोटे खोटेच करु लागली, आणि खोटे खोटेच जेवायला ही वाढू लागली.
आजोबा आजी तिच्या या खेळांमध्ये खूप रंगले.
रात्री ती आजीकडे झोपायला गेली. आजीच्या पोटाला विळखा घालून रमली खरी पण तिच्या डोळ्यात सतत गोंदण वाल्या बायका , त्यांच्या कागदावरची चित्र दिसत होती.
मला वाटलंच तर यातलं कुठलं चित्र गोंदवलं तर कमी दुखेल त्याचाच विचार करत तिला झोप लागली.
क्रमशः 

©® सौ. स्वाती  बालूरकर देशपांडे, सखी

दिनांक  २२.०२ २०२२


🎭 Series Post

View all