गोंदण ( भाग-५)

struggle of a girl in desire of a tattoo.

गोंदण  ( भाग -५)
पूर्वसुत्र-

" तुला नाही कळणार ते . . अजून तू लहान आहेस.  पण गोंदण असलंच पाहिजे असं सांगितलं. .  म्हणून मी करून घेतलं."
" हो का !"  कावेरीच्या मनात पुन्हा गोंदवून घ्यावे असा विचार बळावला.
यातलं काहीच तिला आईला सांगायचं नव्हतं .
तिचं काशी मावशी बरोबर ठरलेलं होतं , गावाकडे. त्यामुळे यावेळेस उन्हाळ्याच्या सुट्टीत गेल्यावर तिला ते काम करायचं होतं आणि तिला कुणालाच कळू द्यायचं नव्हतं.

कथा पुढे- (भाग -५)
परीक्षा झाली मग  कावेरीचे आठ दिवस असेच  कॉलनीतल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळण्यात गेले.  ती संध्याकाळी माई आजींसोबत विठ्ठलाच्या मंदिरात  जायला लागली. कावेरी तिथल्या आलेल्या लोकांनाही बारीकीने बघायची, सावळ्या विठूला मनभरून पहायची , कधी किर्तनात तर  कधी भजनात रमायची.
या दरम्यान  तिची माई आजींशी छान मैत्री झाली होती.
कावेरीचं काही बाही प्रश्न विचारणं , लाडात आल्यावर  त्यांना बिलगणं , त्यांची मदत करणं सगळं माईंना  आवडायला लागलं होतं.
शाळेतला निकालही आला कावेरी नेहमी प्रमाणे वर्गात पहिली आली होती. शिक्षकांकडूनही खूप कौतुक झालं. यावेळी निकाल घ्यायला बाबा आले होते सोबत. त्यांना मुलीचं खूप कौतुक वाटलं पण त्यांना बोलून दाखवायची सवय नव्हती. मायेने डोक्यावरून हात फिरवला इतकंच.
दरवर्षी  प्रमाणे  उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या व कावेरीच्या मनात आजोळी जाण्याचे विचार भिरभिरू लागले. 

"आई कधी जायचं गं आजीकडे? सांग ना!"

" यावर्षी काही जमेलसं वाटत नाही कावू . . आणि आताच तर जावून आलोय ना आपण. . . पुन्हा दिवाळीत जाऊयात."

"काय गं आई. . ? पण आताच तर आंबे मिळतात ना मामाकडे. .दिवाळीत काय?"
दोन दिवस कावेरीची भुणभुण चालत राहिली.
मग अचानक अानंदाला उधाण आलं कारण मामाचं पत्र आलं तो शहरात कामाने येतोय म्हणून. तो जाताना कावेरीला सोबत नेणार आहे.
कावेरीने आपले आपले फ्रॉक व परकर पोलके आवरून ठेवले. कपड्यांच्या  व्यवस्थित  घड्या घालून बाबांच्या गादीखाली ठेवून दिले म्हणजे उद्यापर्यत ते छान घडीत बसतील. मग ती आपलं सामान आवरू लागली.
माई आजींना मात्र काळजीच लागली की कावेरी गावाला गेल्यावर कसा दिवस जाईल.  पण थोड्या दिवसांचीच गोष्ट होती. कावेरीच्या चुलत भावाचं उन्हाळ्यात लग्न होतं. तिच्या आईला घरचं लग्न म्हणून मदतीसाठी अगोदरच तिथे जायचं होतं. बाबा वेळेवर येणार होते. सुट्यांमधे कावेरीचा भाऊही घरी येणार होता. 
भाऊ येण्यअगोदर  ती आजोळी जाणार होती. पण त्याची एक अनामिक भीती होती कावेरीला. तो चांगलाच बोलायचा तिच्याशी , छानच रहायचा पण लहान पणी केंव्हातरी त्याने जोरात रागावले किंवा मारले असेल. . त्यावेळची ती दहशत तिच्या मनात बसलेली.
पुढे त्यांच्या गावातल्या शाळेपेक्षाही चांगल्या शाळेत त्याला पाचवीला अॅडमिशन मिळालं म्हणून त्याला बाहेर गावी जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला ठेवलं होतं.
कावेरीची आई व माईआजी लग्नघरी जाणार होत्या. लग्नाअगोदरची  कितीतरी कामं होती त्यामुळे मदत हवीच होती. मुहुर्त करायचा होता , धान्य भरायचं व निसायचं होतं. हवं तर कुर्डया, पापड उन्हाळी कामं होती.
मसाला, मेतकुट करायचं होतं. वर्‍हाड त्यांच्या मूळ गावाच्या घरातून निघणार होतं . त्यामुळे माधवीच्या मोठ्या जाऊबाई व भावजी म्हणजे कावेरीचे मोठे काका रंग रंगोटी करवण्यासाठी गावच्या घरी येवून राहिले होते.
खरेदी कावेरीकडेच होणार होती. नगरला कपडा चांगला मिळतो म्हणून तिकडेच  सगळे येणार होते. कावेरीच्या आईलाही वाटले की एवढ्या कामात व गराड्यात कावूकडे लक्ष देणे होणार नाही त्यामुळे ती आजोळी गेली तर बरेच आहे.
तिची काळजी राहणार नाही व ती रमेल तिकडे.
लग्नाला तर मामा, मामी किंवा आजोबा कुणीतरी येणारच होतं. . ते घेवूनच येतील तिला असं वाटून माधवीने म्हणजे कावेरीच्या आईने भावासोबत तिला पाठवायचे ठरवले. 
बाबांनीही होकार दिला.
बाबा काय म्हणतील याचीच काळजी होती कावेरीला.
तिच्या बाबांचा तिच्यावर खूप जीव होता  पण ते बेशिस्तपणा  खपवून घ्यायचे नाहित त्यामुळे कावेरीला त्यांच्यासोबत किती  वाटले तरीही मनसोक्त खेळता यायचं नाही. तिला वाटायचं बाबांनी लाडाने जवळ घ्यावं किंवा हसून खेळून बोलावं. . म्हणजे मामा किंवा आजोबा बोलतात तसं . . पण तसं व्हायचं नाही.
बाबांच्या चेहर्‍यांवरचे गंभीर भाव पाहून कधी रागाने पाहतील किंवा एखादा फटका देतील असं वाटायचं.

यावेळी मात्र बाबा सुद्धा तिला जवळ घेवून म्हणाले, "यावेळी एकटी जाणार आजोळी. नीट राहशील ना गं कावेरी? दादा किंवा आई येणार नाहित बरं का सोबत. त्यामुळे आजी आणि आबांना त्रास द्यायचा नाही.
गावात कुठेही भटकायचं नाही.  हट्ट करायचा नाही. "
" हो बाबा शहाण्यासारखं राहिन."  कावेरीने सगळ्या अटी मान्य केल्या.
संध्याकाळी कॉलनीत मित्रमैत्रिणींबरोबर खेळताना सर्वांना सांगून झालं की मी आजीकडे चाललेय  कारण मामा उद्या घेण्यासाठी येणार आहे.
बॅग भरून कावेरी मामाच्या येण्याची वाट पहात होती.
आई देखील बाबांसारख्याच सूचना देत होती. असे करू नको, तसे कर. काहीही प्रश्न विचारून मामीला उगीचच  भंडावून सोडू नकोस.
मग काय दुसर्‍या  दिवशी मामा आला व त्याच्या कामाकरीता दोन दिवस राहिला. परत जाताना कावेरी मामासोबत निघाली.
संध्याकाळच्या बसने निघाले व रात्री मुक्कामी गावी पोहोचले.
आजी आजोबांना खूप आनंद झाला.
मामीने गरमागरम खिचडी व लोणकढं तूप वाढलं सोबत शेगडीवर भाजलेले उड दाचे पापड.
कावेरीला यावेळी आईशिवाय आल्यामुळे खूप वेगळं वाटत होतं. सगळे जास्तच लाड करीत होते.
रात्री ती आजोबांकडे गेली झोपायला कारण त्यांची रंगवून सांगितलेली गोष्ट ऐकायची होती.
सकाळी लवकर उठली आणि सगळं निरिक्षण करण्याचा तिचा उद्योग सुरू झाला.
बंबातलं पाणी कसं तापतं, चुलीतली लाकडं आजी कशी अलीकडे ओढते, काशीमावशी कसं झाडझूड व सारवण करतात. . सगळं ती बारीकीनं बघायची.
जनाबाई चुलीला कसं सारवतात आणि रांगोळी काढतात. . ते पाहताना तिलाही ते सगळं करावं वाटायला लागलं .
मग हणमंत कुर्‍हाडीच्या  एका घावात कसा सरपण फोडतो , कशी लाकडे तोडून वाळवतो. . सगळं सगळं तिला अप्रूप.

"कावू. . तू विचारलं होतंस ना  मागच्यावेळी ते शंभूच्या मंदीरासमोर यात्रेबद्दल. . ती आहे बघ पुढच्या आठवड्यात !" आजीने सहजच दोन दिवसांनी सांगीतलं.
"अय्या हो! मग मज्जा. . म्हणजे माझं ते काम होणार तर . . ?"

" खूप मज्जा तर आहे. . रहाटपाळणे , उसाचा रस , सगळी खेळणी व मिठाईची दुकानं लागतात. पण तुझं कसलं काम गं?" मामीने  हळूच  विचारलं.
सांगावं की सांगू नये या भ्रमात कावेरी शांत झाली. पण पुन्हा विचार करून म्हणाली " काम नाही मामी तसं पण एक  बघायचं आहे एक यात्रेत?"

" काय? सिनेमा?" मामीने मुद्दाम खोडीने विचारलं.
" सिनेमाऽ. . सिनेमा पण असतो यात्रेत?"
" हो तर. . तंबू थियेटर लागतं ईकडे. . मोकळ्या मैदानात. पडदा असतो मधे व दोन्हीबाजूंनी बघू शकतो सिनेमा. . !"
मामी उत्साहाने म्हणाली.
मग खूप गप्पा झाल्यावर हळूच कावेरी मामीच्या जवळ गेली व म्हणाली ," खरं सांगू का ?"
" सांग ना बाळा?"
" ते गोंदण असतं ना.  ते करणार्‍या  बायका येतात म्हणे. . ना यात्रेत? त्या कसं करतात गोंदण ते पहायचं होतं."
" हो का? . . बरं कुणी सांगितलं हे तुला ? "
"आमच्या घरी माई आजी आहेत ना त्या म्हणाल्या. म्हणून!" कावेरी थोडी भीतच म्हणाली.
"असं का? जाऊयात ना.  दाखवीन हो तुला सगळं. नाहीतर आबा आहेतच . . नाहीतर काशी मावशी पण फिरवून आणतील. चालेल ना ?" मामीने कावूला पायरीवर जवळ बसवलं आणि डोक्यावर मायेने हात फिरवत म्हणाली.
"हो. जाईन की. . यात्रेत. . फिरून येईलच. मामी, त्या खोलीतून खूप सुगंध येतोय . . आंबे पिकलेत का गं ?"
आंब्यासाठी तर खास तिला इथे यायला आवडायचं.
" कावेरी , संध्याकाळी खा बरं का आंबे. . काढून देतो थोडे पिकलेले. मग मंदिरात जावू आपण." आजोबा ओसरीत बसल्या बसल्याच कावेरीला म्हणाले.
कावेरी खूप आनंदली.

क्रमशः
©® स्वाती  बालूरकर देशपांडे , सखी
दिनांक  १७ .०२.२०२२

of a girl in desire of a tattoo.

🎭 Series Post

View all