Login

गोंदण (भाग -१३)

A craze of a girl for tatto, puts her in trouble.
पूर्व सुत्र -

" उर्मी परवा शाळेत भेटूयात , तुझ्याशी खूप बोलायचंय!"
"टाटा!" उर्मीने हात हलवला .
कावेरी वल्लभच्या सायकलवर मागच्या सीटवर बसून निघाली.
उर्मीला मोठा भाऊ नव्हता, त्यामुळे वल्लभचं ते सायकलवर डबल सीट नेणं खूप आवडलं तिला.

क्रमशः

गोंदण - (भाग १३)

कावेरीच्या शाळेची तयारी सगळी झाली आणि गणवेश शिवायला टाकलेला त्या शिंप्याकडे चकरा मारून हैरान केलं तेव्हा त्यांनी ड्रेस दिला.

प्राथमिक शाळेतून पाचवीच्या वर्गात चाललेली होती त्यामुळे खूप काही बदलणार होतं. गणवेश बदलला होता . शाळेची वेळ बदलली होती. काही वर्गमित्र-मैत्रिणीं ही नवीन आले होते तर काही शाळा सोडून गेले होते. कुणाची बदली झाली तर कुणी गाव सोडून गेले होते.

मोठ्या वर्गात अभ्यास खूप असतो त्यामुळे रोजच्या रोज करायचाच असं सांगत होते सगळेजण. विशेष म्हणजे एक मराठीच्या बाई सोडल्या तर सगळे शिक्षक नवीन होते.
प्रत्येक शिक्षक मात्र हे म्हणत होते की "आता तुम्ही मोठ्या वर्गात आलात , पूर्वीसारखं नाही. खेळ समजू नकात."

मनात एक अशी भावना होती की मोठे झालोत व लगेच मग अभ्यासाचं टेंशन यायचं.

उर्मी आणि कावेरीची खूपच गट्टी जमली होती.
तिला कधी गाडी सोडायला यायची तर कधी सोडायला ड्रायवर सोबत यायचा.

पण परत येताना मात्र ती कावेरीसोबत पायीच यायची. शाळेपासून घर जवळ होतं .
परतताना रोज उर्मीच्या घरी बसून गप्पा मारून शाळेविषयी काहीतरी चर्चा करूनच ती घरी यायची.

कावेरी अभ्यासात खूप हुशार असल्यामुळे उर्मिलाला तिची सोबत सोडवत नव्हती आणि उर्मिलाचं राहणीमान आणि घरातल्या गोष्टी शिवाय तिचा सरळ स्वभाव पाहून कावेरीला तिची मैत्री सोडत नव्हती.

दोघींचे स्वभावही एकमेकींना खूप आवडायचे, दोघींमध्ये कधीच भांडण व्हायचं नाही. उर्मीच्या घरी मदतीला नोकर होते त्यामुळे असेल कदाचित पण तिच्या डब्यातही काहीतरी वेगळे पदार्थ असायचे. कावेरी रोज पोळी भाजी किंवा लोणचं पोळी न्यायची. त्यातल्या त्यात कधी साखर तूप पोळी किंवा साखरांबा, गुळांबा कारळाची चटणी असं काही कावेरीने आणलं की उर्मीला ते स्वतः खायची व स्वतःचा डबा कावेरीला द्यायची.

कधी कधी तर काही कावेरीने कधीही न खाल्लेले नवीन पदार्थ उर्मीच्या डब्यात असायचे.

त्यावेळी कावेरीला दुसर्‍या जास्त मैत्रिणीं सुद्धा नव्हत्या.

ब्रेड कावेरीच्या घरी क्वचितच आणलं जायचं . कुणी गावाहून पाहूणे आले व त्यांनी आणलं तर किंवा कुणी आजारी पडलं तर दूध ब्रेड खाण्यासाठी.

त्यामुळे लोणी लावून भाजलेले ब्रेड म्हणजे कावेरीला खूप श्रीमंत पदार्थ वाटायचा.

अशाच ब्रेडचे सॅण्डवीज आयुष्यात पहिल्यांदा कावेरीने उर्मीच्या डब्यात पहिल्यांदा खाल्लं होतं.

असं काही खाल्लं की घरी येऊन मग ते सगळं इत्थंभूत वर्णन करून सांगायचं असा स्वभाव!

कधी कधी तिच्या आईची हसून पुरेवाट व्हायची.

"अगं काय हे काऊ , दर रोज काहीतरी माहिती घेऊन येतेस . . . पण मला तितकासा वेळ नसतो गं सगळं करायला. स्वयंपाक, (कपडे) धुणे ,भांडे , दळण करणे , निवडणं टिपणं यात सगळा दिवस कुठे जातो ते कळत नाही गं!"

"पण मी तुला कर असं म्हणालेच नाही ना गं तुला !"

" हो गं बरोबर . . . पण कावू , तू सांगितलंस इतक्या कौतुकाने. . . तर मग मला वाटतंच ना की आपणही करून द्यावं आपल्या लेकीला."

"अगं आई तसं नाहीए. तू शाळेत जात नाहीस ना , म्हणून मी माझ्या सगळ्या गमती जमती व गप्पा तुला सांगते . उलट आपल्या डब्यातले सगळे पदार्थ उर्मीला खूप आवडतात गं! तू त्या खलबत्त्यात कुटून चटण्या करतेस ना गं त्या तर इतक्या आवडतात तिला!"

"बरं बाई राहिलं पण सांगत जा हो गप्पा मला . पण तिच्या आईला इतका वेळ मिळतो का गं ? सगळं करायला ?"

" काही पण आई तू! तिच्या कडे त्या सुमन काकी आहेत ना त्या किती मदत करतात. घरातली सगऴी कामं करतात त्या. उर्मीची आई तर मस्त खटावू च्या साड्या नेसून इथे बस , तिथे बस करत असते." हे सगळं बोलताना कावेरी उर्मीच्या आईची हुबेहुब नक्कल करत होती.

ते पाहून कावेरीच्या आईला व भावाला खूप हसू आलं.

"पण कावू बाळा , अशी नक्कल करू नये गं कोणाची. बरं वाटतं का हे ?"

" अगं आई , हे काय मी नाही पाहिलेलं, ते तर. . . उर्मीलाच तिच्या आईची नक्कल करून दाखवते मला.

काही दिवसात वल्लभदादा पण बाहेरगावी गेला. तो शिकायला दुसरीकडे रहात होता.

आई बाबा आणि कावेरी तिघे जण होते. घरी आल्यावर कावेरीला करमायचं नाही.

मग घराजवळच्या मैत्रिणींसोबत बांगड्यांच्या तुकड्यांचे काचकुरे तर कधी सागरगोटे खेळायचे व कधी चिप्पी पाणी. हे सगळे खेळ तिला मनापासून आवडायचे.

खेळात कुणी खोटेपणा केला की मात्र ती चिडायची व रुसून घरी निघून यायची.

घरात खूप माणसं असावी असं तिला वाटायला लागलं. अभ्यास होताच. त्यादिवशी शिकवलेलं लगेच वाचायचं आणि धडा वाचून त्याचे प्रश्न उत्तर आपल्या मनाने लिहायला आवडायचे.

त्यामुळे दुसर्‍या दिवशी शिक्षकांनी काहीही प्रश्न विचारले तरीही तिची उत्तरं तयार असायची.
सुट्ट्यांमधे मामाच्या गावी गेलेले दिवस आठवायची कधी कधी.

तिथे अंगणात झोपणं , गच्चीवर झोपणं किती छान अनुभव गाठीशी होते.

तेव्हा रात्री पाहिलेलं आकाश पाहून तिला कितीतरी प्रश्न पडायचे.

कधी मामी तर कधी आजोबा काही बाही सांगायचे.

कधी सुट्ट्या लागतील व कधी पुन्हा गावाला जाईन असं तिला वाटत होतं.

वर्गात उद्या वातावरण हा धडा शिकवणार होत. तिने वाचून पाहिला पण काहीच कळालं नाही.

दुसर्‍या दिवशी इतिहास भूगोलाच्या क्लासमध्ये तिच्या सरांनी वातावरण शिकवायला सुरू केलं. तिला धडा न कळाल्यामुळे ती काहीच उत्तर देवू शकली नाही.
"सर आपण पृथ्वी मधे राहतो ना मग वातावरण कुठे असतं ?"
"कावेरी लक्ष देवून ऐक , आपण पृथ्वी वर राहतो , पृथ्वीमधे नाही आणि पृथ्वी च्या आजूबाजूला वातावरण असतं. सभोवताली, सगळी कडे वेढलेलं पण दिसत नाही. कळालं का ?"

वर्गात सगळे हसले.

"पण सर पृथ्वीवर कसं राहणार ? ती तर गोल असते ना ? आपण पडून जाऊ?"
सगळेजण पुन्हा हसले.

" कावेरी पृथ्वी म्हणजे काय तुला रबरी बॉल वाटला की काय? किती प्रचंड आकार आहे पृथ्वीचा ? कल्पना आहे का ? " सर म्हणाले.

कावेरीच्या मनातल्या शंका काही जाईचनात .

"मग पृथ्वी तर फिरते ना सर ? तुम्ही आता म्हणालात ?"

"हो . पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वी भोवती फिरतो. कळालं का ? तर आपण काय चर्चा करत होतो वातावरण?"

कावेरीच्या चेहर्‍यांवरचे प्रश्न चिन्ह तसेच राहिले .

विचार करत राहिली.

"आपण पृथ्वी वर तर बाकीची माणसं कुठे राहतात? मग खालच्या बाजूला राहणारे माणसं डोके खाली व पाय वर करून कसे राहत असतील? मग त्यांची घरं व ती जंगलं , डोंगर नद्या व समुद्र ? त्यांचं काय ?"


मधल्या सुट्टीत जेवतानाही तिचे वेगळेच चालले होते. तिचं लक्षच नव्हतं.

सिंधू तिची वर्गमैत्रीण पण तिथेच आली.

"कावेरी काय झालं गं ? तू कावून गप गप झाली आज?"

"अगं तिला काही समजलं नाही ना शिकवताना की ती अशीच करते. नाही तर नाही धड्याखालचे प्रश्नोत्तर लिहायचे अन झालं बाई माझं तर . . !" उर्मीने सिंधूला सांगितले.

"मला तर काहीच कळंलं नाही पण सरांना कसं इचारायचं अन समदे हसले तर? मनून मी इचारत नाही. " सिंधू भोळेपणाने म्हणाली.

" नाही गं सिंधु, मला नाही समजलं ना की मला काहीच करावं वाटत नाही बघ. प्रश्नोत्तरं पण कशी लिहायची मग?"

"अगं साळा पास करायची अन झालं. पुन्हा घरचं कामच तर करायचं. मग पृथ्वी गोल असू नायतर सपाट तेला काय होतंय , माजी आय तर म्हणती आपल्याला तर गोल भाकरीच थापायच्या ना मंग कशाला ?"

" सिंधू तुला भाकरी करता येतात ?" उर्मी आश्चर्याने म्हणाली.

"हो . मग शेतकर्‍यांची लेक हाय म्या . दुसरीत होते तवापासनं भाकरी शिकवल्या आईनं. . . कालवण बी करते ना कधी कधी ?"

"बापरे ! कमालच म्हणायची तुझी. माझी आई तर किचनमधे पाय ठेवू देत नाही मला. ब्रेड पण भाजू देत नाही ." उर्मीला सगळं नवलच वाटत होतं.

क्रमशः

लेखिका ©® स्वाती बालूरकर , सखी.
दिनांक १४. १०. २२

🎭 Series Post

View all