गोंदण (भाग -१०)

The craze for tatto n the struggle.


वाचकहो, 

गोंदण  (भाग -९) नंतर खूप कालांतराने हा भाग -१० टाकते आहे. क्षमस्व !

आता कथा कंटिन्यू  होईल व पूर्ण होईल.

-लेखिका


पूर्व सुत्र-


आई मी पाणी वाढू का !" कावेरीचा प्रश्न.
"हळूच बरं कावू , छोटा जग घे आणि ताटात पडु  देवू नकोस पाणी!" मामीने सांगितलं.
क्रमशः 


गोंदण (भाग -१०)

कथा पुढे-

पंगती झाल्या.

घास भरवणे , उखाणे सगळ्या चाली रीती, हौस मौज . . चिडवा चिडवी सगळच झालं.

कावेरी फक्त पहात होती की गोदाताई कशी वागतीय. . म्हणजे लग्न ठरल्यापासून कसे बदल होतायत. ती सतत नवरी सोबतच बसलेली असल्यामुळे तिला ते जाणवत होतं.

आतापर्यंत तरी किती लाड व किती लक्ष देतात. . नवरा नवरी कडे म्हणजे लग्न छानच असतं असं तिने मनाशी समजून घेतलं होतं. अक्षतांनंतर तर गोदाताई खुश दिसत होती. . भावजींशी हळूहळू बोलतही होती. . !

आता हे पंगतीमधे समया काय लावल्या !
रांगोळ्या काय काढल्या! काय थाट बाबा! कावेरीचं सगळं निरीक्षण व मनात सगळे विचार .


सकाळपासून गोदावरीच्या पटापट ५-६ साड्या देखील बदलून झाल्या.

हे सगळं मनात छान वाटत होतं. . पण तिला ते आठवलं पुन्हा की नवर्‍याच्या घरी जावं लागतं वगैरे. . ती विचारात पडली.

मग पाठवणुकीची वेळ आली आणि काकू , तिची आई, माई आजी सगळ्याच रडायला लागल्या.

भारी भारी साड्या नेसलेल्या बायका , कपाळभर कुंकु झालेलं आहेर करून व करवून घेवून. . मुलीकडच्या काही जणींना तर फ्रेश व्हायलाही वेळ मिळाला नाही.

तेव्हा एवढं मेकपचं प्रस्थही नव्हतं.

कावेरीला हे कळेचना  की  ही पद्धत कुणी काढली. 

आपण ज्या घरी जन्मलो राहतो, खेळतो ते आपलं घर, आपले आई- बाबा , दादा ते सगळं   सोडून द्यायचं. .  नवीन माणसासाठी . . " पण का ?"

पण हे विचारण्या योग्य व्यक्ती तिला भेटली नाही.

गोदाताईच्या पाठवणुकीला सर्वांचीच संमती होती शिवाय गोदाताईचाही या गोष्टीला विरोध नव्हता त्यामुळे ही रीतच आहे असंही तिच्या मनात खोलवर रूतलं.

सगळ्यांशी गळाभेट झाली व जाताना तिने कावेरीलाही मिठी मारली.

सगळ्यांना पाहून तिलाही रडू आलं.

सगळेजण नेमकं का रडतात हे पण तिला कळत नव्हतं पण सकाळपासून आनंदात असलेली सगळेजण अचानक गोदाताई जाताना रडायला लागले .

गोदाताई इतका वेळ खुश होती मग कावेरीने विचारलं ," गोदाताई तू का रडते आहेस ?"

"अगं मग हे सगळं माझं घर, माणसं सोडून जाताना वाईट नाही वाटणार का? रडू येतच ना ?"

" मग जाऊ नको ना! रडतेस पण जातेस पण ?"

तिच्या या निरागस वाक्यावर रडणारांच्या ओठावरही हसू आलं.

गोदाचे पती गोपाळ म्हणाले, "अगं काऊ, तुझी ताई नाही आली तर मी एकटा कसा परत जाऊ?"

" मग तुम्ही पण राहून जा ना इथेच!"

"आणि मग माझे आईवडील ? त्यांचं काय ?"

"हा बरोबर! त्यांचा प्रॉब्लेम होईल नाही का ? पण मग आमच्या गोदाताईंना इथे पुन्हा राहता येणार नाही का?"

" येईल ना ! सणावाराला, तुम्हाला भेटायला पाठवेन मी ! नाहियेत आपण एक काम करूयात. . "

नवीन भावजींनी तिला कडेवर उचलली आणि म्हणाले , "चल तू सोबत!"

" कुठे ?"

"आमच्या घरी ! म्हणजे तुझ्या गोदाताईला सोबत होईल ना!"

" आई मी जाऊ?"

मग ने कावेरीच्या आईला म्हणाले," काही म्हणा पण तुमची मुलगी फारच चुणचुणीत आहे आणि खूप हुशार , आईबाबा हिला पाठराखीण म्हणून पाठवलं तरी चालेल!"

सगळेजण हसले.

कावेरी ने आईकडे असं पाहिलं जणु डोळ्यांनीच विचारतीय की " आई मी जावू का गोदाताई सोबत?"

"अगं काऊ हे काय ? परत जायचंय २-३ दिवसात मग तेरा तारखेला शाळा सुरू होणाऱ!"

" ठीक आहे भावजी नको म्हणते तिची पण अडचण होईल ना पण नक्की हे बघ बाळा ये आमच्या घरी, आमच्या घरी सगळ्यांना आवडेल तू आलेलं ."

विहिण बाई म्हणाल्या,"खूपच चुणचुणीत , चपळ आहे तुमची मुलगी!"

बाकी सगळे जण गोदावरीला बसमध्ये बसविण्यासाठी तिचं सामान ठेवण्यासाठी पुढे गेले.

कावेरीने मामीचा हात धरला आणि एका बाजूला ओढत घेऊन आली," काय झालं कावू तिकडं गोदा चाललीय ना ?"

"मामी ,मला तुझ्याशी बोलायचं !"

"इतक्या तातडीनं काय बोलायचं आहे?"

" मला सांग ही गोदा ताई तिकडे गेली तर ती पुन्हा इथव राहू शकत नाही का?"

"अगं लग्न झालेलेच आहे ना तिचं ?"

"समजा लग्न नाही केलं तर ? का जायचं दुसर्‍यांच्या घरी?"

" अगं कावू , हे बघ तुझी आई आहे की नाही त्यात आमच्याकडे राहते का? म्हणजे तिच्या आईबाबांकडे ?"

"नाही. कुठे राहते तुमच्या घरी ? ती तर आमच्या घरी राहते ना . तिचं घर आहे ते !"

" मग हे पण बघ की लग्नापूर्वी तिचं घर होतं तुमच्या आई बाबांचं लग्न झालं मग तुझे बाबा तिला तिकडे घेऊन गेले. मग तिने घर सांभाळलं."

" नाही ते तिचं घर आहे ना . हे बघ गोदा ताई आपली आहेना तिच्या घरी होती , तरी लग्न झालं की भावजींच्या घरी. . . ?" कावेरी नाराजीने म्हणाली.

"अगं कावू, असं कसं? बघ तुझ्या मामांचं लग्न झालं, मी इथे आले व तुझ्या मामाचं घरच माझं घर झालं. पण आजी आजोबा घरी आहेत , तुझी आई सासरी आली. आता तुझे आईबाबा आहेत , त्यांच्या घरी तू राहतेस पण लग्न झालं की तू तुझ्या नवर्‍याच्या घरी जाशील . मग तेच तुझं घर ! असंच असतं त्यामुळे सगळ्यांना लग्न करावं लागतं !" मामी सगळी उदाहरण देवून समजाऊ पहात होती.

" मुलींना मुलांना सगळय़ांनाच लग्न करावं लागतं ?"

"हो मग?"

"मुले कुठे जातात त्यांच्या सासरी, ते छान त्यांच्या घरी जातात राहतात आणि मुली घर सोडून जातात पण हे काही बरोबर नाही !"

कावेरीची निरागसता व तिचं हे नाराज होणं पाहून मामीला खूप कौतुक वाटत होतं . पण ती किमान मनातलं बोलतीय हे पाहून छान वाटलं.

" मामी लग्न तसं छान आहे ,नवीन कपडे मिळतात, मेहंदी, दागिने , हौस होते पण घर सोडून द्यायचं म्हणजे . . . काही पटत नाही."

"कावू बाळा ,तुझं पण लग्न होईल तूपण जाशील आणि त्यावेळी बघ आनंदाने जाशील. तू आता लहान आहेस ना म्हणून तुला सगळं कळत नाहिय. "

" ठीक आहे पण मग तिकडे आईची आठवण आली तर ?" कावू पुन्हा चिंतामग्न .

"हो येतेच. आईच्या आठवणीने डोळ्यात पाणी येतं .थोडे दिवस सवय व्हायला लागते पण सगळ्याच मुली लग्न करून सासरी जातात! मग यायचं भेटायला, हवं तेव्हा!" मामीचा बोलणं बरंच पटलं होतं पण हे का आणि कुणी सुरू केलं
हे मात्र डोक्यातून जात नव्हतं .


"बरं असू दे ! चल गोदाची बस निघते आहे . चल बर पटकन !"

बसमधून जाताना गोपाळ भावजी फक्त कावेरीला बाय करत होते त्यांना मोठं कौतुक वाटलं होतं या सगळ्यांचं.

बस हलणार होती-

" चलना कावेरी पुन्हा आणून सोडू आम्ही पुन्हा दोन दिवसांनी!" भावजी बोलले.

कावेरी पुन्हा आईकडे बघु लागली.

" नको बेटा, नवीन गावी, नवीन माणसं! आपण पुन्हा हवं तेव्हा जाऊ. गोदा , जावईबापू आम्ही पुन्हा येवू पुढच्या आठवड्यात. येताना आम्ही कावेरीला घेवून येवू बस्स !"

वर्‍हाड गेलं, गोदाची बस गेली, जवळचे पै पाहुणेही गेले.

लेक सासरी गेली, घर रिकामं झालं, घरात गतिमान असलेल्या बायका कामं सोडून शिथिल झाल्या. मांडव वारं लागलं .
कोण कुठे, कोण कुठे, जागा मिळेल तिथे थकून गेलेल्या आराम करू लागल्या .

दोन दिवस सगळी आवराआवरी झाली चार दिवसांनंतर पुन्हा गोदाच्या घरी दोघे चौघेजण निघाले.

कावेरीने मात्र खास हट्ट केला. ती त्यांच्या घरी त्यांच्यासोबत गेलीच.

गोदाचं सासर ,तिथली माणसं व त्यांच्या घरचे पूजापाठ पाहिले.

सत्यनारायणाची पूजा झाली व खूप थाटामाटात सगळं झालं. सासरची सगळी माणसं प्रेमळ होती. कावेरी तर तिथे सगळ्यांच्या मनात घर करून होती.

तो मोठा वाडा कावेरीला खूप आवडला .

तिला गोदाताईंचा घर खूप आवडलंय असं तिनं कानात जाऊन तिला सांगितलं. "गोदाताई हरकत नाही, घर ठीक आहे. ठीक मग गोदाताई तू इथे राहू शकतेस! इथली माणसं पण पाहिली गं , छान आहेत!" कांनात सांगताना कावेरीने इतक्या मोठय़ाने सांगितले की ते सगळ्यांना ऐकायला गेलं .
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या व मोठय़ांदा हसले.

कावेरीला कळालंच नाही की तिचं काय चुकलं. जणू काय तिथे तिला निरीक्षण करून खातरजमा करायला पाठवलं होतं.

जे होतं त्याकडे गोपाळ भावजींचं लक्ष होतं.

" कावेरी मग नक्की ना अाता तुझी गोदाताई माझ्याकडे राहायला हरकत नाही ना?" त्यांनी निघताना विचारलं होतं.

गेल्या दिवशी तर तिने सगळ्यांशी ओळख करून घेतलं होतं व जवळच्या शिव मंदिरात ते सगळेजण मुलं मुली संध्याकाळी खेळायला गेली होती.

तिथल शिवमंदिर पाहून तिला आजीच्या गावातलं ते विशाल मंदीर आठवलं. शंभो शंभो! मनात म्हणाली होती.

क्रमशः

©®स्वाती बालूरकर, सखी

(कावेरी लग्नाहून परत आल्यावर कसा असेल तिचा प्रवास ?)

🎭 Series Post

View all