Login

गोंदण ( भाग -९)

गोंदणाच्या आवडीमुळे तिने झेललेला संघर्ष !


गोंदण ( भाग -९)

- स्वाती बालूरकर, सखी

ताईच्या लग्नात कावेरी करवली म्हणून खूप मिरवली. मान पान करून घेतला नटली मुरडली. लग्नातले सगळे विधीदेखील कुतुहलाने पहात होती.
पंगतीत पाणी वाढलं. नवरीसोबत आलेला आहेरही घेतला. सगळं खूप छान वाटत होतं. सगळेजण थट्टेने पुन्हा पुन्हा काय मग करायचं का लग्न असं विचारायचे. . कधी हो म्हणायची कधी नाही म्हणायची. सगळा खेळच तिच्यासाठी.
त्यावेळच्या साधेपणाच्या लग्नातही खूप मजा असायची. पत्रावळी मांडणे, रांगोळ्या काढणे, जेवणावळीत लागणार्‍या शर्यती. बुंदीचे लाडू सुद्धा चवीने खाणारे लोक आणि माणसांची एकमेकांवरची माया.
कावेरी तर सगळ्यांची म्हणजे सगळ्यांचीच लाडकी. तिला असंही सगळेजण आपलेच वाटायचे. शिवाय तिचा बोलका व लाघवी स्वभाव सगळ्यांना आवडायचा. लग्नात सतत नवरीसोबत बसल्याने त्या गोपाळ भावजींची लाडकी मेहुणी झाली होती.
सगळे विधी पार पडले तेव्हा सगळा नवरीचा वेष बदलून फ्रेश होऊन ताई व भावजी आले.
विहीणीची जातानाची पंगत झाली की पाठवणी होणार होती.
ताई व भावजी हळू हळू एकमेकांशी बोलू लागले होते. नजर मिळवत नव्हते तरीही. . लाजत लाजत खाली वर किंवा इकडे तिकडे बघत बोलणं चालू होतं.
"कावू, तू पण मस्त हात पाय तोंड धुवुन ये बाळा. बघ सगळ्यांनी किती कुंकु लावलंय तुला. साधा फ्रॉक घालून ये, आता!"


कावेरी गेली आणि नवरा नवरी दोघेजण हळू हळू एकमेकांशी बोलू लागले.

तिकडे पंगतीची तयारी सुरू झाली. विहिणीच्या पंगतीसाठी पुन्हा ताजी खीर बनवली गेली , गरम पोळ्या करायला सुरूवात झाली. कुरडया पापड रुखवतातले काही रंगीत पापड वगैरे तळण सुरू झालं.
रांगोळ्या काढणार्‍या पोरी पंगती समोर रंगीत रांगोळ्या घेवून बसल्या.
थोडं बहुत गाणे म्हणणार्‍या बायका. . विहिणीच्या पंगतीला कुठली गाणी म्हणायची असं सगळं ठरवत होत्या. मग कुणीतरी गाण्याची वही काढून लिहिलेल्या गाण्याची तालीम करू लागल्या.
कावेरीने आईला शोधलं. . मग तिच्याकडून कपडे घेतले. . छान हात पाय तोंड धुवून आली. . साधा कॉटनचा फ्रॉक घातला. केस ठीक केले पण आईची पिशवी सापडेना किंवा मग पावडर गंधाचा डबाही नव्हता. मामीला शोधलं पण ती पण दिसेना.

ती तशीच ताईजवळ अाली.
"अगं हे काय. . तू अजून तशीच फिरतीय. . वेणी तरी घालून घे कुणाकडून. . काजळ लाव थोडं. कावू कपाळावर काय गं ? गोंदवून घेतलंस? कुठे गं?" ताईने पाहताच विचारले.
"ताई आवडलं नं . . मला पण खूप आवडतं म्हणूनच. . आजीच्या गावी यात्रेत. . !"
"अगं एवढासा जीव तुझा. . ते दुखतं ना गं खूप. . कशाला मग एवढा सोस. . ?

" एवढं काही नाही दुखलं. . थोडंच दुखलं गं. . पण मस्त वाटलं ना. . गंध नाही लावलं तरी दिसत नाही. पुन्हा मी हनुवटीवर पण करणार आहे. . कुणाला सांगू नको. . आणि नंतर. . ते. . !" कावेरी बोलता बोलता राहिली.
"बाप रे. . अगं ते जुन्या बायका करायच्या हल्ली शहरात नाही करत कुणी. . तुला कसं आवडलं. . एवढं? काकू काही नाही बोलली का ?" ताईला कौतुक करावं की आश्चर्य . . तेच कळत नव्हतं .

"म्हणजे तुला गोंदण नाहीय का गं ?. .पण तुझं तर लग्न झालं ना आता. . !" तिने विचार करण्याच्या मुद्रेत बोटाने डोक्यावर मारल्यासारखं केलं.
" नाही बाई. . माझी आई काही कर नाही म्हणाली. माई आजी म्हणाल्या होत्या एकदा. . पण नको ते सुया टोचतात म्हणलं की खूप भीती वाटते मला. "
"मग कसं ?"
" कशाचं?. . तुला एवढा का प्रश्न पडलाय?. . तू सांगितलंच नाहीस की तू आता का गोंदण करवलंस?" ताई ने खरच जाणून घेण्याच्या दृष्टीने विचारलं.

ताईचं व कावेरीचं हे बोलणं आता गोपाळरावही ऐकत होते. छोटी मेहुणी त्यांना आवडली होती. तिची ती बडबड व चेहर्‍यांवरचे हावभाव पाहून ते देखील मजा घेत होते.
कावेरीने ताईला जवळ बोलावून हळुच सांगितलं " मी लवकर केलं कारण . . . . मला कळालं की आपण मेल्यावर देव स्वर्गाच्या दारातच विचारतो की का गं . . नांदून आली पण गोंदून आली नाही का ?. . म्हणून. . !" दबक्या आवाजात तिचं हे बोलणं खूपच मोहक वाटत होतं.
तिच्या या बोलण्याणे तर गोपाळ भावजी खूप मोठ्यांदा हसले. . म्हणजे ही निरागसता की तो बोलण्याचा टोन किंवा काय ते गोड . . पण त्यांना खूप हसायला आलं.
सगळेजण त्याच्याकडे पहायला लागले.
नवरा मुलगा एवढा जोरात का हसला. नक्की कावू ने काहीतरी विनोद केला असावा.
गोपाळ भावजींनी तिला इशार्‍याने जवळ बोलावलं व विचारलं. " कावेरी हे गोंदून आली कळालं . . पण नांदून आली म्हणजे काय गं?" ते तोंडावर हात ठेवून हसू दाबत होते.

""भावजी  , तेच तर मला माहित नाही ना.  विचारलं पण . . कुणाला विचारलं तर नीट सांगत नाहीत. . हसतातच. म्हणे लग्न होऊ दे मग कळेल. . पण ताई तुझं तर लग्न झालं ना आज मग तुला कळालं का . . नांदून आली. . ? आणि तुला तर गोंदण पण नाही. . मग. .   मला तर  इतकं कळतच  नाही बाई!"


आता या बोलण्यावर. . पुन्हा हशा. .!


 आता हळू हळू रांगोळी काढणार्‍या, उगीच मिरवणार्‍या पोरी . . सहजच नवरा नवरीजवळ येवून बसत होत्या . उगीच तेवढीच मजा. . !


आणि  या  नवरीच्या मावस , चुलत , मामे बहिणी  नवीन भावजींच्या लक्षात रहाव्यात म्हणूनही! 


शिवाय नवरा- नवरी काय बोलतात ही उत्सुकता असायची बर्‍याच  लोकांना. . पण इथे तर कावेरी एकटीच पुरे होती. . गप्पा मारायला व मनोरंजन करायला. 


मग गोदाताईने तिच्या मावस बहिणीला शीलाला  बोलावलं व नवरीचा स्पेशल मेकपचा डबा मागवला. 


तेव्हा मेकप म्हणजे एखादं चेहर्‍यांचं क्रीम व पॉण्ड्स पावडर , पावडरचा पफ आणि काजळ- गंध एवढंच  असायचं. 

लिपस्टिक चा किंवा इतर मेकप चा प्रचार प्रसार नव्हता सामान्य लोकांत. खूप श्रीमंत किंवा मग सिनेमातील हिरोइन  वगैरेच सगळं वापरायच्या. 


शीलाकडून कावेरीला छान तयार करवलं. . वेणी घातली , पावडर लावली, डोळ्यात  काजळ  घातलं . . मग त्या गोंदणावर साजेसं गंध लावून दिलं. 


आता कावेरी खूप छान व फ्रेश दिसत होती. 


" गोदाताई तू खूप छान आहेस. . !" ती खुश होऊन बोलली. ताईने नवरी मुलीचा स्पेशल बॉक्स वापरू दिला म्हणून तिला काहीतरी विशेष  असल्यासारखी फीलिंग आली होती. 


" हो का गं कावू. . तू पण खूप छान आहेस!"


" माझं एक ऐकशील का गं. . तू ते तसं गोंदवून घे?"  कावेरीचं हे बोलणं गोपाळरावांनी ऐकलं व कुतुहल म्हणून लक्ष द्यायला लागले. 

" बोल गं . . कसं . . कपाळावर. . की हनुवटीवर ?" ताई सहज विचारत होती.


" म्हणजे भाऊजींचं नाव काय. . सांग बरं. . ?"

" अगं असं सांगत नसतात नाव. . !" गोदा लाजून चूर


" पण का?. . नुसतं नाव?"


"ते नवर्‍याचं नाव घेत नसतात गं कावू!" गोदा पुन्हा नवर्‍याकडे  तिरकस बघत बोलली.


अगं पण. . ते उखाण्यात घेवू शकतेस हां. . " मावस बहिण शीला लगेच म्हणाली.


"बरं जाऊ दे नवीन भाऊजी , तुमचं नाव काय?" कावेरीने सरळ भावजींनाच विचारलं.


" का गं तुझ्या ताईने सांगितलं नाही का माझं नाव!" आता मात्र गोदाताई लाजली.


" अरे देवा. . नाव सांगायला का एवढा त्रास देताय. . ?" कपाळाला हात मारत कावेरी बोलली.


"असू दे. . कावेरी माझं नाव गोपाळ. . बस्स! आता सांग माझ्या नावाशी काय काम होतं?"

भावजींना पहायचंच होतं की ही नावाचं काय सांगते. 


" तर . . ताई तू. . तुझ्या हातावर इथे. . म्हणजे मधल्या बाजूला असं गोंदवून घ्यायचं. . की . . गोऽ पाऽ ळऽ. . . किंवा गोपाळराऽव!"


 आता मात्र गोदाताई या कल्पनेनेच  लाजून चूर झाली. 

कावेरी मोठ्याने ओरडून बोलली पण ते सगळ्यांना ऐकू गेलं.

" खूपच छान कल्पना आहे. . नवरीबाई. . मग माझं नाव लिहा तुमच्या हातावर. . " गोपाळराव मिश्किलपणे बोलले.


" त्याने काय होईल गं कावू?" गोदाताईचा इशारा गोपाळरावांकडे पण प्रश्न कावेरीला.


" त्याने . . तुम्ही दोघे खूप सोबत राहताल. .  म्हणजे आपल्या आवडत्या माणसाचं नाव लिहायचं गोंदवून . . मग छान सोबत राहतो आपण. .  आमच्या आजीच्या दंडावर  आजोबाचं नाव आहे, काशी मावशीच्या हातावर तिच्या नवर्‍याचं नाव आहे. .  हनुमंत" आणि ती तोंडावर दोन्ही हात ठेवून हसायला लागली. . . सगळेच हसले. 


" आता तर लिहावच लागेल नाव. . " गोपाळराव प्रेमाने बघत म्हणाले.


" कावू तू गं कुणाचं. . नाव लिहिणार. . ?" गोदाने मुद्दाम विषय बदलला .


" धत. . माझं कुठं लग्न झालंय. . आणि मला कुठे माहिती मला कोण आवडतं. . मी अजून छोटी आहे. !" कावेरीला सुचलंच नाही. . कुणाचं नाव घ्यावं.


"चला चला नवरा नवरीला बोलवा. पानं मांडलीत. . मुलींनो थोडं मोकळं सोडा गं त्यांना. . चला उठा. " कावेरीची आई बोलली.


माई आजी लांब उभ्या राहून कौतुक बघत होत्या.


"माधवी अगं समया पेटवा त्या. . विहिण बाई आल्या बघ. आणि अगरबत्ती ही लावा पंगतीत.!"


"हो काकू आहे . सगळी व्यवस्था आहे."


मग जेवणाची पंगत सुरू झाली.


"आई मी पाणी वाढू का !" कावेरीचा प्रश्न.


"हळूच बरं कावू , छोटा जग घे आणि ताटात पडु  देवू नकोस पाणी!" मामीने सांगितलं.


क्रमशः 

©® स्वाती  बालूरकर, सखी

दिनांक २० .०३ .२०२२

नोट- 

नमस्कार  सुवाचकहो, 

काही वैयक्तिक  कारणांमुळे गोंदण ही कथामालिका मधेच थांबली होती. 

आता  मी पुन्हा त्याचे पुढचे भाग येत्या काही दिवसात टाकणार आहे . 

दिरंगाई बद्दल क्षमस्व . इतर कथांप्रमाणेच  या कथेला पण आपले प्रेम मिळेल या अपेक्षेत! 

लेखिका - स्वाती बालूरकर , सखी.

दिनांक  १८.०९ .२०२२


🎭 Series Post

View all