गोंदण (भाग -१२)

A craze for tattoo will fetch problems in her life.


गोंदण -  (भाग १२)

लेखिका  - स्वाती  बालूरकर , सखी


पूर्व सुत्र - 


"अरे बघ ना , गोदाचं सासर काय पाहून आली तर तिला वाडा व स्वतंत्र खोली वगैरे पण कळायला लागलीय.  म्हणजे नवरा कसा का असेना. . . वाडा मोठा हवा!" बाबा टाळी देवून हसले, आई पदरा आडून व वल्लभ मोठ्यांदा हसला.


एरवी धाकात ठेवणारे  व गंभीर राहणारे बाबा यादरम्यान  बदलत होते.   आजकाल मिश्किलीनं बोलत होते पोरांशी.

कावेरीच्या लाघवी पणाने व इतर लोकांकडून कावेरीचं कौतुक ऐकून ते कावरीचा लाड करत होते.
माया अगोदरही होती पण ती वागण्यात दिसत होती.


गोंदण - (भाग -१२)

कथा पुढे -

बाबांबद्दल तिच्या मनात खूप धाक होता , तो आता हळू हळू कमी होत होता.

आपलेच बाबा आहेत आपण हवं ते बोलू शकतो असं वाटायला लागलं तिला.
आज वल्लभ दादासोबत ती उर्मी कडे गेली होती. तिला सोडून तो मित्राकडे गेला होता. परत येताना तिला घेवून जाणार होता.

इतक्या दिवसानंतर  मैत्रिणीला भेटून दोघींनाही  खूप आनंद झाला होता.  एखाद्या वर्षापूर्वीच  ते इथे रहायला आले होते.
उर्मीच्या घरचं वातावरणच वेगळं होतं. 

ते म्हणजे श्रीमंत प्रस्थ! दारासमोर जीप उभी असायची. एक नोकर बाहेरची कामं करायला व एक मोलकरीण  घरातली कामं करायला.

तिच्या आईला कधी घरातली धुणी भांडी करताना पाहिलं नव्हतं. नेहमी टाप टीप रहायची. उंची भारीच्या साड्या नेसलेल्या असायच्या.

उर्मीचे केस बॉबकट होते , कधी कधी जुट्टू घालायची पण राहणीमान एकदम आधुनिक होतं .
कावेरीला उर्मीचं खूप कौतुक आणि उर्मीच्या आईला कावेरीचं कौतुक.

" अगं कावेरी , यावेळी खूप दिवसांनी भेटलीस गं. अगदी पूर्ण सुट्टया गावाकडे घालवल्यास!" उर्मीची आई म्हणाली.

" हो ना काकू , काय करणार ! खूप कामं होती शिवाय गोदाताईचं लग्न नव्हतं का ? मग डायरेक्ट आजोळहून काकूंकडे गेलो गावी , लग्न तिकडे होतं ना ! "

"बाई खरच की? किती कामं गं तुझ्यामागे? "


"काकू आम्ही दोघी बाहेर खेळायला जावू का?" कावेरीने उर्मीकडे बघून विचारलं.

" अगं नको पुन्हा शाळा सुरू झाल्यावर रोज खेळतालच ना! उर्मीचे बाबा यायची वेळ झालीय. ते चिडतील पुन्हा . त्यापेक्षा दोघी इतक्या दिवसांनी भेटलात तर बसून गप्पा मारा, जा आत मधे."

"चल गं कावू तुला खूप काही दाखवायचंय, चल ना माझ्या खोलीत बसूयात!"

उर्मी तिला ओढून घेवून गेली.
तिच्या आईला खूप छान वाटलं कारण सुट्टयांमधे उर्मी खूप एकटी पडली होती.
दोघी खोलित गेल्या व उर्मीने कपाट उघडलं.


उर्मी उन्हाळयात कुठे कुठे फिरायला गेली होती तेथून आणलेल्या वस्तू, कपडे वगैरे कावेरीला दाखवत होती. तिच्या वस्तु पाहून उर्मी आपली मैत्रिण आहे याचा अभिमान वाटत होता.

तिच्या खोलीत बसून दोघी जणी गप्पा मारत होत्या.
तिच्याच वयाच्या मुलीची वेगळी स्वतंत्र खोली, तिच्या अभ्यासाची पुस्तकं ठेवण्यासाठी एक वेगळी अलमारी, एक टेबल खुर्ची, कपड्यांसाठी कपाट हे सगळं पाहून कावेरीला खूप भारी वाटत होतं.
तिने शाळा सुरू होणार म्हणून पुस्तकं आणली होती.

पूर्ण नवीन पुस्तकांचा सेट पाहून कावेरी हरखून गेली. कितीतरी वेळ त्या पुस्तकांना उघडून त्यातल्या प्रिंटिंगचा वास घेत होती.

तिचे बाबा दरवर्षी ओळखीच्या कुणाचे तरी कुंवा मग तिची पुस्तकं फेवून अर्ध्या किमतीत मिळणारी पुस्तकं किंवा कमी किमतीत मिळणारी पुस्तकं घेऊन यायचे.

त्यामुळं कावेरीनी कधी नवीन पुस्तकांच्या प्रिंटिंग हा वास पाहिला नव्हता.
मग दोघी जणी बसून नवीन पुस्तकांना कव्हर घालायला लागल्या.
उर्मी म्हणाली, "कावू तुझ्या अक्षरात नाव टाक बरं का माझ्या पुस्तकांवर, म्हणजे वर्षभर तुझं अक्षर माझ्यासोबत राहील ."
"तू किती छान आहेस गं उर्मी ! पण माझं अक्षर आवडतं तुला ?" कावेरी आनंदून गेली.

उर्मी "कितीही मनात आणलं किंवा मी कितीही प्रयत्न केला तरी तुझ्यासारखं सुंदर अक्षर माझं येतच नाही गं! "

" अगं असं काही नाही, हळूहळू लिहायचं व अक्षरांना बरोबर वळवायचं तर येईल बघ . मी तुला शिकवीन यावर्षी माझ्यासारखं लिहायला!"
"खरच !"
"हो !"

इतक्यात त्यांची मोलकरीण दोघींसाठी खाण्याच्या वस्तू घेऊन आली आणि सोबत रसना!
रसना तर कावेरीचं फेव्हरेट शरबत त्यात ऑरेंज किंवा मँगो फ्लेवर तिला खूप आवडायचा.
त्यांच्या घरी केवळ उन्हाळ्यात रसना आणला किंवा केला जायचा, एरवी नाही. मग लिंबू शरबत किंवा चहा असंच .

पण उर्मीच्या घरी नेहमी कुठलं ना कुठलं शरबत तयार असायचंच. व येणार्‍या माणसाचं खूप अगत्य व्हायचं.

मग कावेरीने तिचा यात्रेतील गमतीजमती सांगायला सुरुवात केली.
ऊर्मी साठी ते सगळं नवीन होतं.

तिने कधीच गाव किंवा यात्रा पाहिली नव्हती, त्यामुळे ती मन लावून ऐकत होती.

" तुला माहितीय का उर्मी यात्रेमध्ये मी गोंदून आले !"
" गोंदून म्हणजे काय? "

"हे बघ आपण इथे गंध लावतो किनई तसं त्याच्याखाली पक्कं गंध . . . म्हणजे हिरव्या रंगाचं!"
"असं पक्कं, असं हिरवं ? काही नसतं गं फक्त नुसतं तोंड धुतले की ते निघून जातं, कोणतं का असेना!"
"नाही उर्मी, हे जात नाही, साबण लावलं तरीही!"
" तू चल बरं न्हाणीत , तुझं गंध धुवून दाखव म्हणजे मला बघायचंय , चल बरं माझ्यासोबत!"

उर्मीला तिला बाथरुममध्ये घेऊन गेली .

कावेरीने साबण लावून चेहरा स्वच्छ धुतला व दाखवलं .

कपाळावर मधोमध हिरवा गडद गोल गोंदलेलं होतं.
" कावू हे किती छान दिसतंय तुला , " तिने हात लावून पाहिलं .

"अगं जात नाही?"
" नाही गेलं ना , पुढच्या वेळी मी इथे करणार !" तिने हनुवटीवर बोट ठेवून दाखवलं.

" पण केलं कसं?"
मग कावेरीने घडलेल्या सगळ्या घटना अगदी मनोरंजक पध्दतीने इत्थंभूत उर्मिला ला सांगतल्या .

गोदाताईच्या झालेल्या लग्नाबद्दल व लग्नाची घेतलेली मजा व पडलेले प्रश्न किती काही बिलायचं होतं , सांगायचं होतं, पण इतक्यात वल्लभदादा च्या सायकलची घंटी वाजली.

कसवेरी पळतच बाहेर आली.

" आले रे दादा!"

" उर्मी परवा शाळेत भेटूयात , तुझ्याशी खूप बोलायचंय!"
"टाटा!" उर्मीने हात हलवला .
कावेरी वल्लभच्या सायकलवर मागच्या सीटवर बसून निघाली.
उर्मीला मोठा भाऊ नव्हता, त्यामुळे वल्लभचं ते सायकलवर डबल सीट नेणं खूप आवडलं तिला.

क्रमशः

©®  स्वाती  बालूरकर देशपांडे , सखी
दिनांक - ०७ .१० .२०२२


🎭 Series Post

View all