गोळ्यांचा वाडा भाग-१

This story is about an old person Mr. Gole who is in love with ancestral home.

भाग - १

गिरीश माने एक तरुण, दिसायला रुबाबदार, कुरळे केस, साधारण सहा फूट उंच, खूप देखणा पण स्वभावाने फार शिष्ट, मितभाषी, सतत कामात मग्न. असा हा गिरीश लहानपणापासून खूप हुशार.

घरची परिस्थिती गरिबीची असताना फार काबाडकष्ट करून तो वास्तुविशारद (Architecture) झाला होता. पण दुर्दैवाने हे सुख बघायला त्याचे आई बाबा आता या जगात नव्हते. 

कॉलेजच्या कॅम्पस मधूनच त्याला लगेच एका चांगल्या फर्ममध्ये जॉबही मिळाला. पियुष पंत आणि मिथिलेश मेटे यांची मुंबईतील नामांकित फर्म 'पंत अँड मेटे असोसिएशन' इथे पहिलाच जॉब मिळणं तितकसं सोपं नव्हतं. पण गिरीशने आपल्या हुशारीवर ते साध्य केलं होतं.. 

गिरीश आता ज्युनिअर आर्किटेक्ट म्हणून कामाला लागला होता.. 

पियुषच्या टीम मध्ये लवकरच गिरीशने आपली छाप सोडली होती.. अनेक छोट्या मोठ्या assignment वर त्याने पियुषला मदत केली होती. पियुषही गिरीशच्या कामावर खुष होता.. त्यामुळे हल्ली पियुष काही कामं गिरीशच्या एकट्याच्या अंगावर टाकून निर्धास्त होत होता.. आणि आजच त्यांच्या फर्मला एक मोठं काम मिळालं होतं..

मिथिलेशच्या एका लांबच्या काकांचा एक खुप जुना वाडा होता वेळासला. श्रीराम गोळे त्याचे मालक.. गोळेकाकांना जाऊन एक वर्ष झालं होतं. त्यांचा मुलगा प्रतिक आणि त्याची बायको रुपाली गेली अनेक वर्षे अमेरिकेत राहत होते. गोळेकाकांना खुप वाटत होतं की मुलाने भारतात परत यावं. गावात नाही राहणार ते माहीत आहे.. पण शहरात राहून अधून मधून वेळासला येऊन जाऊन वाड्याची देखभाल करावी. आपली पण ख्याली खुशाली घ्यावी.. पण परदेशी गेल्यावर तिथे स्थायिक न होता खुशीने परत येणारे खुप कमी. प्रतीक असाच रमला होता परदेशी. त्याच्या मुलांनी तर भारत पाहिला ही नव्हता. 

काका सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांना पुरेल एवढं निवृत्ती वेतन होते. त्यांच्या पत्नीला जाऊन खुप वर्षं झाली होती. काकांना बाकी कसलीच चिंता नव्हती. पण या पिढीजात वाड्याचं आपल्या मागून काय होईल..? 

ही एकच चिंता त्यांचं मन पोखरत असायची. प्रतिक आणि रुपाली आता भारतात येणार नाही हे त्यांना कळून चुकलं होतं.

आपल्या मागुन प्रतिक वाडा कुणाला तरी विकून टाकणार हे १००% आणि मग गोळ्यांचा हा वाडा कुणा परक्याचा होईल या विचारात काका रोज रात्री झोपत असत आणि रोज सकाळी हीच चिंता त्यांना उठवत असे. पण एक दिवस काका झोपले...ते सकाळी उठलेच नाहीत.

खरंतर प्रतिकला तो वाडा खुप वर्षांपासून विकायचा होताच. त्याचे सासरे मनोहर सरपोतदार वाडा विकत घेणार होते. त्यांचे देशात वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल्स, रिसॉर्ट होते.. असंच त्यांना त्या वाड्याच्या जागी एक हिस्टोरीकल रिसॉर्ट करायचे होतं. प्रतीकने अमेरिकेतुनच सगळी कागदपत्रांची पुर्तता केली.. आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारांना यायचे कष्ट पण त्याने घेतले नव्हते..

सरपोतदारांना बाकी वाडा आधीच आवडाला होता. त्यामुळे एखाद्या आर्किटेक्टला वाडा दाखवून, त्यात कश्या सुधारणा करता येतील.. बाकी काही नवीन कल्पना वापरून नूतनीकरण करता येईल यासाठी त्यांनीच प्रतिकच्या ओळखीने पंत अँड मेटे असोसिएशनला हे काम दिलं होतं.

सरपोतदारांकडून आलेलं काम म्हणजे खूप मोठं काम होतं.

त्यामुळे पियुष स्वतःच या वाड्याची पाहणी करायला जाणार होता. तो सोबत गिरीशला घेऊन जाणार होता.
"गिरीश उद्या आपल्याला वेळासला तो वाडा पाहायला जायचं आहे.. सकाळीच निघु.. तरच वेळेवर गावात पोहचू.. तु तयार राहा आपले ६-७ दिवस तरी जातील तिकडे.. तशी बॅग भर. ओके??"

"ओके सर.. मी तर खूप उत्सुक आहे या कामासाठी.." गिरीश खुष होत बोलला..

दुसऱ्या दिवशी दुपारी साधारण १२.३०-१ पर्यंत पियुष आणि गिरीश वाड्यावर पोहचले.

वेळास.. कोकणातलं इतर गावांसारखंच निसर्गसंपन्न गाव.. गावात पोचताना समुद्राच्या किनाऱ्यानेच जावं लागतं.. समुद्राचा प्रशस्त आणि शांत किनारा लाभलेलं हे गाव..

प्रतिकने त्यांना गावातील चित्तरंजन सानेचा नंबर दिला होता.. काका गेल्यानंतर वाड्याच्या चाव्या त्याच्याकडेच होत्या. चित्तरंजन हा प्रतिकचा बालमित्र होता. गावात आल्यावर पियुषने चित्तरंजनला कॉल लावला.. घराचा पत्ता विचारुन दोघे त्याच्याकडे आले..

"तुम्ही जेऊन मगच वाड्यावर जाता का?? तसं ही बरेच दिवस तिथे कुणी गेलेलं नाहीये त्यामुळे साफसफाई पण केलेली नाहीये" .. चित्तरंजन पियुष आणि गिरीशला म्हणाला..

"अहो नको.. आम्ही आता वाटेत हेवी ब्रेकफास्ट केलाय.. त्यामुळे आत्ता भुक अशी नाहीच आहे.. संध्याकाळी बघु.." असं म्हणुन पियुष आणि गिरीश चाव्या घेऊन वाड्यावर पोहचले..

पण वाड्याकडे येताच त्यांना धक्का बसला.. वाड्याचं अंगण झाडून साफ होतं.. आणि अजुन चक्रावणारी गोष्ट म्हणजे
 
वाड्याचं दार सताड उघडं होतं..

(क्रमशः)

✍️ प्रियांका सामंत

टीप : कथा पुर्णपणे काल्पनिक आहे. 

कथेचे सर्व अधिकार लेखिकाधीन. नावासहित शेअर करण्यास हरकत नाही.