Aug 05, 2021
कथामालिका

गोळ्यांचा वाडा भाग-३

Read Later
गोळ्यांचा वाडा भाग-३
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

भाग - ३

गिरीशला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.. पुन्हा पुन्हा डोळे चोळुन तो देव्हाऱ्याकडे बघु लागला..

"अरे सकाळी तर सदु काका पुजा करत होते.. घंटा वाजली म्हणून आपण उठलो.. आणि आता सगळं गायब..?"

गिरीशला काहीच उमजत नव्हतं..

"सदु काकाऽऽऽऽऽऽ.. ओ सदु काकाऽऽऽऽऽऽ" स्वतःभोवतीच गोल गोल फिरत गिरीश काकांना हाक मारत होता.. मात्र काका कुठेच दिसत नव्हते..

" काका... अहो काका... इकडे या..." अचानकच गिरीशला मागुन आवाज आला..

"काय झालं साहेब..." 

"आ??" सदु काकांना असं अचानक आपल्या मागे बघुन गिरीश दचकला..

"अहो इथले देव गायब कुठे झाले..."

"अहो साहेब आहेत जागेवर.. देव कुठे जाणार..??? हे काय" असं म्हणत काकांनी देव्हाऱ्याकडे हात केला..

गिरीशने पाहिलं.. सगळे देव देव्हाऱ्यात होते.. थोड्यावेळापुर्वीच वाहिलेली ओली फुलं ही होती.. घंटा होती.. देव्हाराही चकचकीत दिसत होता..

आता मात्र तो थोडा घाबरला.

"अहो काका.. आत्ता.. आत्ता मी पाहिलं तेव्हा खरंच नव्हते देव इथे..."

"अहो तो तर चराचरात असतो...!! कधी आपल्याला दिसतो तर कधी नाही दिसत."

"हं" असं म्हणुन गिरीश ने बाजुला पाहिलं.. तर काका नव्हते..

"काऽऽऽकाऽऽऽ" 

आजूबाजूला घडत असलेलं सगळं अगम्य उलगडत नसल्यामुळे गिरीशचं डोकं बधीर होत होतं. पियुषला कॉल करावा म्हणून त्याने मोबाईल हातात घेतला.. 

"अरे हा बंदच आहे ना" म्हणून त्याने सहज घरातल्या फोनवरून करून बघू म्हणून फोन उचलला. तर तो फोन चक्क चालू होता.

"अरे काल सर तर म्हणाले की फोन बंद आहे.." मोबाईल बंद असल्यामुळे पियुषचा नंबर आठवायला त्याला डोक्याला जरा ताण द्यावा लागला.. आठवुन आठवुन त्याने नंबर डायल केला.. पण त्याचा मोबाईल बंद होता.

'आता कसं कळेल की सर नीट पोहचले का? आई कशी असेल त्यांची??' तो स्वतःशीच पुटपुटला.

गिरीश दुपारचं जेऊन खोलीत आला.. सकाळी ड्रॉईंग बुक मध्ये केलेल्या नोंदी पाहत तो बसला होता.. मात्र त्याच्या डोळ्यांवर हळूहळू झापड येत होती.. काकांच्या हातचं जेवण जेऊन झोप मात्र गाढ लागत होती.. एवढं खरं.. आपल्या मनाशी तोच विचार करत क्षणातच तो गाढ झोपला..

संध्याकाळी मांजराच्या आवाजाने त्याला जाग आली.. गिरीशला प्राण्यांचं फार कौतुक होतं.. म्हणुन तो त्या मांजराला वाड्यात शोधत होता.. तोच त्याला त्या मांजराचा कर्कश आवाज ऐकू आला.

'अरे हे मांजर असं का ओरडत असेल??'

तो सगळीकडे ते मांजर शोधत होता. आवाज तर जवळ येत होता पण मांजर दिसत मात्र नव्हतं. तेवढ्यात त्याला अंगणात सदु काका दिसले..

"सदु काका इथे तुम्ही मांजर पाळलय का? "

"मांजर?? नाही ओ... मी एकटाच असतो इथे.."

"मग हे मांजर कुठून ओरडतंय..??"

"मांजर?? ओरडतंय?? मला नाही आवाज येत... तुम्हांला काय भास होतात का वाड्यात?? सकाळी काय देव गायब झाले... आता काय तर मांजराचा आवाज आला... आता रात्री कुत्र्याचा आवाज नाही आला म्हणजे झालं..." असं म्हणत काका तसेच मिश्किल हसले..

"अहो पण काका"

"हे बघा इथे जवळपास कुठलं घर नाहीय.. त्यामुळे कुत्री-मांजरं तर सोडाच माणसं पण येत नाहीत इकडे..!!"

"ठीक आहे.. ठीक आहे काका...तुम्ही चिडू नका.. मी जरा फिरून येतो समुद्रावर"

"हो या... सांभाळून फिरा... समुद्रात उगाच डुंबायला जाऊ नका.."

"हो..."

"काका.. तुम्ही पण येता का..???"

"नाहीऽऽऽ तुम्ही जा... मी वाडा सोडून बाहेर जात नाही..."असं तडक बोलुन काका आत गेले..

'हे प्रकरण जरा विचित्रच आहे...' गिरीश पुटपुटला.

गिरीश समुद्रावर एकटाच निघून गेला. किनारा शांत होता. माणसांची गडबड नाही. समुद्राच्या लाटा, सोसाट्याचा वारा, स्वच्छ वाळू, आणि समोर काहीवेळातच समुद्रात उडी घेईल अस वाटणारा सोन्याचा गोळा... असं विलोभनीय दृश्य पाहून त्याचे डोळे दिपले. सुर्यास्त झाला आणि गिरीश वाड्याकडे यायला वळला.. वाटेत चालताना त्याच्या डोक्यात वाड्यात सकाळपासून जे जे घडत होतं त्याचे विचार डोक्यात घोळत होते..

"नक्की काय घडतंय?? की हे घडतंय असं भासवलं जातंय?? जेवणातुन काही दिलं जातंय हे नक्की.. जेवल्यावर ५-१० मिनिटं पण शुद्ध राहत नाही.. जाग येताना स्वतःहुन येत नाही.. कसल्या ना कसल्या आवाजानेच येते.. हे सगळं काय आहे??"

या अशा विचारातच तो वाड्याकडे आला.. तो आला तेव्हा वाड्याचे दरवाजे सताड उघडे होते. अंगणातलं फाटक उघडून आत जाणार तोच एक पांढरा शुभ्र कुत्रा आतून धावत आला आणि गिरीशच्या अंगावर जोरात भुंकू लागला. तो गिरीशला आत येऊच देत होता. गिरीश काकांना हाका मारू लागला.

"काका...ऽऽऽ काका...ऽऽऽ अहो काका...ऽऽऽ हा कु...त्रा..." आणि अचानक तो कुत्रा गायब झाला.. आणि तेवढ्यातच काका बाहेर आले.

"अहो काय झालं.. का घसा फोडताय??"

"अहो आता इथे एक कुत्रा.."

"कुत्रा?? कुठाय कुत्रा..? डोक्यावर परिणाम झालाय का?"
आता खूपच चिडले होते.

आता गिरीशला हे सगळं शंकास्पद वाटू लागलं. कुणाला तरी हा वाडा विकू द्यायचा नाहीय आणि म्हणून हे घडवून आणलं जातंय एवढ्या निष्कर्षाप्रत तो आला होता.

'हे सदु काका तर हे सगळं करत नसतील ना? आयतं वाड्यात राहायला मिळतं... म्हणून मला घाबरवत असतील...' तो स्वतःशीच बोलत होता.

तेवढ्यात त्याला काकांचा आवाज आला.. "साहेब जेवायला येताय ना??"

जेऊन तो खोलीत आला.. उद्या सकाळी आपण इथून निघू. इथे असं राहण्यात काहीच अर्थ नाही.. तसंही अशा निर्जन ठिकाणी न राहिलेलं बरं. या विचारातच त्याने बॅग भरली.. मुंबईत जाऊन सरांशी बोलून बघू पुढे काय करायचं ते... 

असा विचार करत तो झोपला.

रात्री केव्हातरी मोबाईलची रिंग वाजू लागली.. त्याने त्याची झोप मोडली.. तो उठला मोबाईल पाहिला. तर ऑफ असलेला मोबाईल वाजत होता. स्क्रीन वर मात्र काहीच दिसत नव्हतं.. तो मोबाईल हातात घेणार तोच मोबाइलची रिंग वाजायची थांबली. 

कदाचित भास झाला असेल.. २ दिवस झाले मोबाईल बंद आहे.. वाजेल कसा.. उगाच मनाचे खेळ.. असं स्वतःलाच समजावत तो पुन्हा आडवा झाला.. त्याला झोप लागणार तोच दारावर टकटक जाणवली.. तरी त्याने दुर्लक्ष केलं..

पुन्हा काहीच वेळात.. "टकटक"

आता मात्र गिरीश सावध झाला.. "कोण आहे...??"

"कोण आहे बाहेर..."

काहीच प्रतिसाद नव्हता.

तरीही त्याने दार उघडलं. बाहेर कुणीही नव्हतं. 

मात्र बाहेर सोसाट्याचा वारा सुटला होता.. 

तो घाबरत घाबरत खाली उतरला. खाली आला.. वाड्याची दारं उघडीच होती.. पहाट झाली होती.. पुर्वदिशा हळूहळू उजळत होती..
 
नीट लक्ष देऊन ऐकलं तर विहिरीतुन पाणी काढायचा आवाज येत होता.. तो अंगणात गेला.. तर फक्त रहाट आणि दोरी हलत होती. कळशी वर खाली होत होती.

आता मात्र गिरीशला दरदरून घाम आला.

"सदुकाका...ऽऽऽऽऽऽ" म्हणून तो जोरात ओरडला.

 

आजूबाजूला पाहिलं तर गिरीश खोलीतच होता.. बाजुला पियुष बसला होता.. बऱ्यापैकी उजाडलं होतं..

"अरे केव्हाचा हलवतोय तुला.. किती गाढ झोपलास?"

"सर?? तुम्ही?? इथे??"

"हे बघ.. काही बोलु नकोस.. तुझं सामान कुठेय??"

"ती काय बॅग भरुन ठेवलीय"

"ठीक आहे.. आपण निघू इथून..."

गिरीश निमुटपणे निघाला.

ते दोघे खाली आले. सदुकाका वाटच बघत उभे होते.

"काय साहेब निघालात वाटतं..." त्यांच्या चेहऱ्यावर तेच आणि तसंच मिश्किल हास्य होतं..

" हो येतो आम्ही...." ..पियुष

"बरं.. निघा.. वाड्याच काम करायचं ठरलं तर या हा परत.."

"हो काका.. येतो आम्ही..".. गिरीश

"काका.. तुमची हरकत नसेल तर तुमच्या सोबत फोटो काढला चालेल??" पियुष ने विचारलं..

"हो.. काढा की.. बघा तरी तुमच्या फोटोत हा म्हातारा कसा दिसतो ते"

पियुषने सेल्फी घेऊन तिथून काढता पाय घेतला. गिरीश अजूनही घडलेल्या घटनांतून सावरला नव्हता.. तो मुकाट गाडीत येऊन बसला..

गाडीत बराच वेळ दोघे शांत होते. शेवटी गिरिषच म्हणाला

"सर.. आई कशी आहे..."

"आईला काही झालंच नव्हतं.. तो कॉल आलाच नव्हता मला..."

" म्हणजे...? ".. गिरीश तिनताड उडाला..

"अरे मला पहाटे मोबाईल रिंगने जाग आली.. तेव्हा मी फोन उचलला... पलीकडे बाबा बोलत होते... आईला झटका आला हे ऐकून मी थेट मुंबई गाठली... घरी गेलो तर आईनेच दार उघडलं..."

"......"

"अरे मला इतक्या प्रवासात परत घरी कॉल करण्याची बुद्धी पण नाही झाली... घरी जाऊन मी मोबाईल काढुन पाहिला तर तो ऑफ.. तेव्हा माझ्या लक्षात आलं.. आदल्या रात्री आपले दोघांचे ही फोन बंद झाले नव्हते का.."

"मी मोबाईल चार्ज केला.. ऑन करुन कॉललॉग बघितला तर असा कोणताच कॉल मला आला नव्हता.. गिरीश मी तुला फोन लावत होतो तर तो ही लागत नव्हता.."

"म्हणुन मी तडक ऑफीसला गेलो.. मिथिलेशकडून वाड्यावरचा लँडलाईन नंबर घेतला तर तो कुणी उचलेनाच.."

"हो सर.. तुम्ही परवा रात्री म्हणालात की फोन बंद आहे.. मी काल सकाळी सहज म्हणुन उचलुन बघितला तेव्हा चालु होता.. पण तुम्ही फोन केला तेव्हा रिंग ऐकूच नाही आली"

"असं कसं शक्य आहे गिरीश.. चांगले ५-६ फोन केले मी.. आणि ते ही वेगवेगळ्या वेळी.. फोन उचलला जात नव्हता म्हणुन मग लगेच तुला न्यायला आलो तसाच...तुला इथे एकट्याला ठेऊन गेलो खरा पण परत येईपर्यंत जीवात जीव नव्हता...!"

"सर.. कुणी केलं असेल हे सगळं...??"

"मला त्या सदुकाकांवर संशय आहे गिरीश.. कारण त्याच माणसाचा फायदा आहे वाडा तसाच राहिला तर त्याला राहत येईल निवांत..."

" खरंतर सर.. मलाही असंच वाटत सर.." असं म्हणत गिरीशने त्याच्यासोबत घडलेला सगळ्या गोष्टी पियुषला सांगितल्या.

"हं.. मी मिथिलेशच्या कानावर घातलंय थोडंफार.. तो आज प्रतिकशी बोलेल..आता तुझी गोष्ट मुंबईत पोहचलो की सांगू आणि मग रीतसर नोटीस आणून त्या सदु काकाला बाहेर काढू"

तितक्यात पियुषला मिथिलेशचा कॉल आला.

"हॅलो, अरे पियुष.. प्रतिकच्या म्हणण्यानुसार गोळे 
काका असताना एक सदु नावाचा माणूस सोबतीला होता.. पण काका गेल्यावर त्यानेच काकांचं सगळं केलं आणि तो वाडा बंद करून सानेंना चाव्या देऊन गेला त्याच्या मुलीकडे गेलाय..."

"बरोबर मिथिलेश.. तो परत राहायला आलाय वाड्यात.. आम्हांला म्हणाला तो मी मुलीकडे होतो.. त्याच्याकडे दुसऱ्या चाव्या असतील..."

"असेल तसं.. मला सांगा.. तुम्ही निघालात का??"

"हो"

"बरं.. तुम्ही या सुखरूप.. मग उद्या ऑफिसमध्ये भेटून बोलूच..." असं म्हणत मिथिलेशने फोन ठेवला.

दुसऱ्या दिवशी सक्काळी लवकर तिघेही ऑफिसमध्ये भेटले. प्रतिक अमेरिकेत असल्याने त्याच्याशी बोलायलाब तिकडे रात्रीची वेळ योग्य होती.. तिघांना एकत्र प्रतिकशी बोलता यावं म्हणुन मिथिलेश प्रतिकला व्हिडिओ कॉल लावत होता. 

तितक्यात प्रतिकचाच मिथिलेशला कॉल आला.

"अरे आता तुलाच करत होतो कॉल..."

"बोल मिथिलेश काय प्रॉब्लेम झाला तिथे नेमका...??""

तेवढ्यातच गिरीशचं लक्ष प्रतिकच्या मागे असलेल्या फोटोफ्रेमवर गेलं..

"सर, एक मिनिटं तुमच्या मागे हा फोटो कुणाचा???"

त्याच्या या अनपेक्षित प्रश्नाने मिथिलेश आणि पियुष त्याच्याकडे पाहू लागले.

"प्रतिकने सुद्धा फोटोफ्रेम कडे पाहिलं.. ते माझे वडील श्री. श्रीराम गोळे... ते गेले म्हणून तर वाडा विकतोय मी..."

पियुषने पण एव्हाना तो फोटो नीट पाहिला...आणि तो जागच्या जागी उडाला.

"काय.....??? हे गोळेकाका आहेत....???????? How is this possible ?????"

मिथिलेश आणि प्रतिक दोघेही प्रश्नार्थक चेहरा घेऊन पियुष आणि गिरीशकडे पाहत होते..

"अरे पियुष काकाच आहेत ते..त्यात अशक्य काय आहे..." मिथिलेशने ही दुजोरा दिला.

"अरे मिथिलेश हीच ती व्यक्ती जी वाड्यात होती... थांब मी त्या सदुकाकांचा सेल्फी घेतलाय आमच्यासोबत...!" असं म्हणुन पियुषने त्याचा मोबाईल मिथिलेशला दाखवला..

सेल्फी दोघांचाच होता.. पण प्रतिकच्या घरातल्या फ्रेम मध्ये गोळे काका तसेच मिश्किल हसत होते...!!!

(समाप्त)

✍️ प्रियांका सामंत

टीप : कथा पुर्णपणे काल्पनिक आहे. कथेद्वारे लेखिका अंधश्रद्धेला पसरवु इच्छित नाही.

कथेचे सर्व अधिकार लेखिकाधीन. नावासहित शेअर करण्यास हरकत नाही.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now