गोलियाथ क्रेन भाग २

संतोष यूनियन लीडर कडे गेला पण त्याने हात वर केले. आता संतोष जवळ राजीनामा देण्या शिवाय कोणताही प?

गोलियाथ क्रेन

भाग  २

भाग १ वरून पुढे वाचा ......

वैशाखने सर्व प्रकारच्या क्रेन चालवण्याचं ट्रेनिंग, वेळात वेळ काढून घेतलं होतं त्यामुळे आज जेंव्हा प्रसंग पडला, तेंव्हा अगदी सराईता सारखी क्रेन चालवून त्यानी लोडिंग करायला सुरवात केली. सुरवातीला खालचे लोकं जिवाच्या भीतीने, घाबरत घाबरत काम करत होते, पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की साहेब एक्स्पर्ट आहेत म्हणून. मग काय, दिवस भरात वैशाखने जवळ जवळ ३० ट्रक भरून स्लीपर पाठवले.

संध्याकाळी, वैशाख जेंव्हा खाली उतरला, तेंव्हा चांगलाच दमून गेला होता. ऑफिस मध्ये जाऊन फ्रेश झाल्यावर त्याने हेड ऑफिस ला फोन लावला, पण कोणी उचलला नाही. घरी गेल्यावर साहेबांना घरी फोन लावू, असा विचार करून, त्यानी घरी जाण्याचा निर्णय घेतला.

घरी गेल्यावर वैशाखने मुंबईला GM साहेबांना फोन करून दिवस भरात काय घडलं यांचा वृत्तान्त दिला.

“तुम्ही काय अॅक्शन घ्यायचं ठरवलं आहे?” – साहेब.

“साहेब, एकाच वेळी सर्व टायमर जाम होणं ही गोष्ट काही बुद्धीला पटत नाहीये, हा जर मुद्दाम केलेला प्रकार असेल तर यांचा शोध घेणं आवश्यक आहे. असं करण्यात काय हेतु असेल तो आपल्याला कळलाच पाहिजे, कारण एखादी मोठी दुर्घटना होण्याची पुरेपूर शक्यता होती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, मी नसतांना हे झालं आहे.” – वैशाख.

“हूं, तु म्हणतो आहेस ते बरोबर आहे, पण हे शोधणार कसं? गवगवा झाला तर नवीनच अडचण उपस्थित होईल. तो संतोष कुमार यूनियन लीडर आहे, बघ विचार कर.” – साहेब.

“ठीक आहे साहेब, वातावरण गढूळ न होता, काही करता येतं का ते बघतो. पण याचा छडा लावला पाहिजे असं मला वाटतं.” – वैशाख

“बघ, आपलं काम ठप्प होणार नाही, यांची काळजी घे.” – साहेब.

दुसऱ्या दिवशी सकाळी, फॅक्टरीत पोचल्या पोचल्या शिंदे आला. तो वैशाखची वाटच पाहत होता.

“हूं, शिंदे आज काय मामला?” – वैशाख.

“सर” शिंदे म्हणाला, “संतोष क्रेन वर जाणार म्हणतो आहे. मीच थांबवलाय त्याला. काल जे काही घडलं त्यानंतर, तुमच्या परवानगी शिवाय त्याला क्रेन वर कसं जाऊ द्यायचं? म्हणून थांबलो आहे. तुम्ही सांगितलं तर लगेच बाकीच्या ट्रक भरायला घेतो.”

“आज दिवस भरात उभे असलेले सर्व ट्रक भरून होतील?” – वैशाख.

“हो सर, तसा संतोष आपल्या कामात चोख आहे, कालच कसं काय डोकं फिरलं होतं समजत नाही.” शिंदे म्हणाला.

“ठीक आहे, जाऊ द्या त्याला क्रेन वर, करा सुरवात.” – वैशाख. “पण एक मिनिट, असं कर, आधी त्याला माझ्याकडे घेऊन ये.”

“ओके सर.” – शिंदे.

थोड्या वेळाने, शिंदे आणि संतोष वैशाखच्या केबिन मधे आले.

“काय संतोष, बरा आहेस ना?” – वैशाख.

संतोष ने नुसतीच मान हलवली.

“शिंदे म्हणत होता की तू ट्रक लोडिंग करायला तयार आहेस म्हणून.” - वैशाख.

“हो सर.” – संतोष

“काल काय झालं होतं?” वैशाख.

“मेरा दिमाग घूम गया था, और उसके लिए मैं सॉरी बोलता हूँ सर.” – संतोष

“आज क्रेन वर चढलास, आणि पुन्हा डोकं फिरलं तर? खाली उभे असलेल्या  लोकांच्या जीवाला धोका होईल. इतनी बड़ी रिस्क मैं कैसे ले सकता हूँ, फिरसे तेरा दिमाग घूमेगा नहीं इसकी क्या गारंटी हैं?” वैशाख ने आता जरा कडक स्वरात विचारलं.

“सर, काय बोलता आहात तुम्ही, मला ७ वर्ष झाली या कंपनीत, पण आज पर्यन्त असा इलजाम कोणी लावला नव्हता. लोडिंग झालं नाही तर कंपनीची बादमामी होईल आणि नुकसान पण होईल.” – संतोष.

“हे शहाणपण काल कुठे गेलं होतं?” – वैशाख.

“साहेब, मी सॉरी बोललो ना, मी लोडिंग नाही केलं तर कोण करेल?” – संतोष.

“मला हेड ऑफिसला सगळे रीपोर्ट द्यावे लागतात. कालचा रीपोर्ट पण मी दिला. GM साहेब म्हणाले की संतोष एक खूपच चांगला ऑपरेटर आहे, सध्या त्याची मनस्थिती ठीक नसेल, तर त्याला नका पाठवू क्रेन वर. संतोष आपल्या साठी फार महत्वाचा माणूस आहे, आपणच त्यांची काळजी घ्यायला हवी. हेड ऑफिस मधून ते  दूसरा ऑपरेटर पाठवत आहेत. तो आल्यावर करेल लोडिंग. तू कशाला चिंता करतो आहेस, साहेबांनी सांगितल्या प्रमाणे आम्हीच तुझी काळजी घेतो आहे. जा आराम कर.” – वैशाख.

“साहेब, मला माफ करा, मी तुमच्याशी काल खूप वाईट वागलो. पण आता पुन्हा नाही असं होणार. साहेब, गॅरंटी देतो साहेब मी.” संतोष.

“लोडिंग च्या वेळेला खाली जे लोक असतात, त्यांनी कसा विश्वास ठेवायचा? सगळ्यांच्या समोर तू ही गॅरंटी दिलीस तर मी परवानगी देईन. कबूल आहे?” -वैशाख

मग थोडे आढे वेढे घेत, संतोषने सर्वांच्या समोर कबूल दिली आणि खात्री पण दिली आणि मगच क्रेन वर चढला.

त्या दिवशी लक्षणीय वेगाने, त्याने उभे असलेले सर्व ट्रक लोड केले आणि मगच खाली उतरला.

त्या नंतर, आठ एक दिवस शांततेत गेले, स्लीपर पाठवण्याची तारीख रेल्वे कडून यायची होती, त्यामुळे, संतोशला काहीच काम नव्हतं. आठ दिवसांनंतर, हेडऑफिस कडून त्याला बोलावणं आलं.

संतोष वैशाख कडे आला. “साहेब, मला H.O. ला कशाला बोलावलंय? साहेब मी तुमची माफी पण मागीतली. तरी तुम्ही माझी तक्रार केली? माझ्या कामात काही खोट दिसली का?”

“नाही नाही, असं काही नाहीये, तुझ्या एक दिवसांच्या वर्तनावरून, तू इतकी वर्ष जी सेवा कंपनीला दिली ती कशी नजरे आड करता येईल? या खुर्चीवर बसून असे   दुष्ट बुद्धीने निर्णय घेता येत नाही. काळजी करू नको, तुझं प्रमोशन होते आहे. तुला सर्व मशीन ची चांगली जाण आहे, आणि हेच लक्षात घेऊन कंपनीने तुला टेस्टिंग सुपरवायजर म्हणून नेमण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे कुठलीही मशीन रीपेयर झाल्यावर तुझ्या सर्टिफिकेट शिवाय कूठल्याही साइट वर जाणार नाही. ही तुझ्या कामाची कंपनीने घेतलेली दाखल आहे.

“खरंच का साहेब,” संतोष च्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.

“हो अगदी १०० टक्के.” – वैशाख.

“मग साहेब ही क्रेन कोण चालवणार?” – संतोष.

“मला माहीत नाहीये, पण वरच्या साहेब लोकांनी काही तरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल. ते पाठवतील दुसऱ्या कोणाला तरी.” – वैशाख.

संतोष यथावकाश टेस्टिंग सुपरवायजर म्हणून सेंट्रल वर्क शॉप मधे रुजू झाला.

टेस्टिंग सुपरवायजरइन चार महिन्यांनंतर, बहुतांश लोकांबरोबर संतोशची भांडणं व्हायला लागली आणि त्यांच्या विरुद्ध तक्रारींचा पाऊस पडायला लागला. त्याला वाईट वर्तणूकी बद्दल कारणे द्या अशी नोटिस मिळाली. तो यूनियन लीडर ला भेटला, पण लीडरने त्याला स्वच्छ शब्दांत सांगितलं, की आता तो सुपरवायजर असल्याने, यूनियन चा मेंबर नाहीये, त्यामुळे यूनियन त्याच्यासाठी काही करू शकणार नाही. वरतून त्याने संतोषला प्रेमाचा एक सल्ला पण दिला की “वर्तणूक सुधार नाहीतर काही खरं नाही” म्हणून. आता संतोषला कळेना की इतके दिवस त्याच्या अवती भोवती असणारी माणसं अशी अचानक विरोधात का चालली आहेत? आणि एक दिवस त्याच्यावर चौकशी समिती बसवण्यात आली. आठच  दिवसांत सर्व साक्षी पुरावे गोळा करून चौकशी कमिटी ने निर्णय दिला की “संतोष वर वाईट वर्तणूकीचा आरोप सिद्ध झालेला आहे त्यामुळे त्याला कंपनीतून काढून टाकण्याची ही कमिटी शिफारस करीत आहे.”

दुसऱ्याच दिवशी कंपनीच्या H.R ने संतोषला बोलावले, म्हणाला, “ तुला कामावरून काढून टाकण्याची शिफारस कमिटीने केली आहे. तुला पुनर्विचार करा अशी मागणी करायची असेल तर तू करू शकतोस. त्याच्या साठी तुझ्या जवळ आठ दिवस आहेत. येत्या आठ दिवसांत तुझ्या कडून काही उत्तर आलं नाही तर कंपनी तुला कामावरून काढून टाकेल. तुझ्या भल्या साठी एक सल्ला देतो आहे. तू राजीनामा दिलास, तर इतकी वर्ष तू केलेलं काम कंपनी विसरणार नाही, आणि तुला सर्व फायदे मिळतील. जर कंपनी वर तुला बडतर्फ करण्याची वेळ आली तर त्यात तुझंच नुकसान आहे. कसलेही फायदे तुला मिळणार नाहीत. वाईट वर्तणूकी बद्दल कामावरून काढून टाकल्याचं पत्र पाहिल्यावर तुला कुठे नोकरी मिळेल असं वाटत नाही. विचार कर. आणि आठ दिवसांत निर्णय घे.”

संतोष यूनियन लीडर कडे गेला पण त्याने हात वर केले. आता संतोष जवळ राजीनामा देण्या शिवाय कोणताही पर्याय नव्हता. तो आणि त्याची फॅमिली रस्त्यावर आली असती, शेवटी त्याने राजीनामा दिला.

त्याच रात्री H.R. ने फोन करून वैशाखला बातमी दिली. काही दिवसांनी कळलं की कुठेही नोकरी न मिळाल्या मुले संतोषनी एक चहाची टपरी चालवायला घेतली आहे. म्हणून. सर्व साइट आणि ऑफिस मधे ही बातमी पसरवण्यात आली. कंपनीशी पंगा घेतल्या वर काय होऊ शकतं याचं उत्तर सर्वांना मिळालं होतं. आता सर्व आघाड्यांवर शांतता होती.

****समाप्त***

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद

  

🎭 Series Post

View all