गोलियाथ क्रेन
भाग १
वैशाख चार दिवस कंपनी च्या कामा साठी ओमान ला गेला होता, आणि चार दिवसांनंतर आजच फॅक्टरीत आला होता. तो एका मोठ्या कन्स्ट्रकशन कंपनीत मॅनेजर होता आणि इथे त्याची साइट इनचार्ज म्हणून सहा महिन्या पूर्वी बदली झाली होती.
सकाळी फॅक्टरीत आल्यावर, गेल्या चार दिवसांचा रीपोर्ट बघत असतांना त्याच्या लक्षात आलं की चार दिवसांपासून क्रेन बंद पडल्यामुळे, एकही स्लीपर रेल्वेला पाठवल्या गेला नाहीये. त्याने सुपरवायजर ला बोलावणं पाठवलं. त्यांच्या फॅक्टरीत रेल्वेला, रुळा खाली टाकण्यासाठी, लागणारे सीमेंटचे स्लीपर तयार व्हायचे.
शिंदे सुपरवायजर आल्यावर वैशाखने त्याला विचारलं “कोणची क्रेन बंद होती? आणि तीही चार दिवस? काय प्रकार आहे हा?”
“सर ट्रक मधे आपण ज्या क्रेननी स्लीपर लोडिंग करतो, ती गोलियाथ क्रेन बंद पडली. मेंटेनन्स वाले चार दिवस प्रयत्न करत होते, इलेक्ट्रिकल ब्रेकडाऊन होता साहेब, आत्ता सकाळीच थोड्या वेळापूर्वीच दुरूस्त झाली.” – शिंदे.
“असं काय झालं होतं की चार दिवस लागले? आज पर्यन्त असं कधी झालं नव्हतं. नेमकं काय झालं ते सांगा, नाही तर असं करा संजयलाच बोलवा. त्याच्याच कडे मेंटेनन्स ची जबाबदारी आहे न? बोलवा त्याला.” – वैशाख म्हणाला. हेड ऑफिस ला सकाळी ११ वाजता रोज रिपोर्टिंग असायचं त्यामुळे, त्याला सगळी माहिती गोळा करणं आवश्यक होतं.
या ठिकाणी, गोलियाथ क्रेनची थोडी माहिती देणं आवश्यक आहे. गोलियाथ क्रेन हे एक अवघड प्रकरण आहे ३० फुट अंतर ठेवून रेल्वे चे रूळ बसवलेले असतात, आणि त्या रुळांवर साधारण पणे १२ ते १५ फुटांवर लोखंडी स्ट्रक्चर चे ३० फुट उंच, दोन दोन कॉलम समोरा समोर रुळांवर उभे केलेले असतात, या कॉलमला खाली लोखंडी चाक बसवलेली असतात आणि या चाकांनी रुळांवर क्रेन चालते. या कॉलम वर आडवा क्रेन चा प्लॅटफॉर्म बसवलेला असतो. इथे, हे लक्षात घेणं जरूरी आहे की आपल्या आगगाडीच्या रुळांमधले अंतर पांच ते साडे पांच फुट असतं. आणि क्रेन च्या रुळांमधले ३० फुट. साहजिकच ही क्रेन चालतांना बरीच हलते, थोडे बहुत झटके पण बसतात. अश्या परिस्थितीत दोन ते तीन टनांचं वजन घेऊन ते ट्रक मधे लोड करायचं, आणि ते ही ट्रकला कुठेही धक्का लागू न देता, हे फार कौशल्याचं काम असतं. बरं खाली २०-२५ माणसं असतात, त्यांच्याही सुरक्षेची काळजी घ्यायची असते. ऑपरेटर च्या छोट्याश्या चुकी मुळे त्यांनाही इजा होण्याची शक्यता असते. पाण्यांनी काठोकाठ भरलेली परात घेऊन एकही थेंब न सांडता २०-२५ फुट चालून बघितलं, की कळतं हे काम किती अवघड आहे ते. क्रेन चालवणारा माणूस हा तीस फुट उंचीवर क्रेनला एक केबिन असते त्यात बसलेला असतो. क्रेन ऑपरेटरला या साठी विशेष ट्रेनिंग दिलेलं असतं.
मेंटेनन्स सुपरवायजर संजय आला. चार दिवस सलग काम केल्यामुळे, चेहरा निस्तेज झाला होता, कपडे पूर्ण मळले होते. बिचारा वैतागला होता आणि आता साहेब काय बोलणार या विचारांनी घाबरला होता.
“काय झालं होतं संजय क्रेनला? चार दिवस लागले दुरुस्त करायला? ” वैशाखने विचारले.
“साहेब, क्रेन चालू केल्यावर फूल स्पीड मधे चालू होत होती, आणि स्टॉप केल्यावर एकदम थांबत होती, खूप झटके मारत होती. वजन उचलणारा हुक घड्याळाच्या लंबका प्रमाणे हेलकावे घेत होता, आणि त्यामुळे क्रेन अजूनच झटके मारत होती. ऑप्रेटर तर घाबरूनच जो खाली उतरला, तो वरती आलाच नाही. त्याचा दोष नाही साहेब, परिस्थितीच भयंकर होती.” – संजय
“अरे, असं कसं झालं, आज पर्यन्त तर असं काही झाल्याचं ऐकिवात नाही, मग? काय प्रकार आहे हा, मास्टर कंट्रोल खराब झाले का? काम करत नव्हते काय? तुम्ही काय केलं?” – वैशाख.
“साहेब, हॅंडल कितीही फिरवले तरी मास्टर कंट्रोलर कामच करत नव्हतं. आम्ही चेक केलं त्याच्यात काही फॉल्ट नव्हता. तीन दिवस आम्ही रात्रंदिवस फॉल्ट शोधत होतो, पहिल्या दिवशी, दिवसभर शोधूनही काही सापडलं नाही, तेंव्हा हेड ऑफिस ला पण फोन पण केला होता, चीफ इंजीनियर साहेब पण गोंधळात पडले होते, ते म्हणाले की वायरिंग डायग्राम प्रमाणे एक एक पॉइंट चेक करा. दुसऱ्या दिवशी त्या प्रमाणे संपूर्ण चेक केलं पण काही मिळालं नाही. सर्व ठीकच दिसत होतं. मग साहेब म्हणाले की सर्व वायरिंग काढून टाका आणि नव्याने करा.” – संजय श्वास घ्यायला थोडा थांबला.
“मग तसं केलं, आणि फॉल्ट मिळाला?” – वैशाख.
“नाही साहेब, संपूर्ण वायरिंग बदलायचं तर दोन दिवस गेले असते, मग मी विचार केला की आत्ता पर्यन्त फक्त वायरिंग चेक केलं होतं, मग आता वायरिंग काढायच्या अगोदर पॅनल मधले एक एक करून, सर्व कॉम्पोनंट चेक करून बघू, म्हणून आम्ही एक एक कॉम्पोनंट काढून तो चेक केला, आणि साहेब फॉल्ट सापडला.” – संजय.
“कुठे होता फॉल्ट?” – संजय
“टायमर मधे. आपल्या क्रेन मधे सगळे न्यूमॅटिक टायमर आहेत, त्यामध्ये खूप धूळ सांचली होती आणि त्यामुळे जाम झाले होते. ते टायमर साफ करून पुन्हा लावले आणि क्रेन पहिल्या सारखी चालू झाली.”
“धूळ सांचली आहे, हे तुम्हाला आधी कळलं नाही?” – वैशाख.
“नाही साहेब, सेटिंग बरोबर होतं, पण अॅक्शन चुकीची असं झालं होतं. धूळ, टायमरच्या आत प्लंनजर असतो, तो ज्या खांचेत वर खाली होतो, त्यात धूळ बसली होती. म्हणून वरुन सेटिंग बरोबर दाखवत होतं, पण जाम झाल्या मुळे टायमर काम करत नव्हते.” – संजय
“किती टायमर आहेत पॅनल मधे?” – वैशाख.
“सर, पांच.” – संजय.
“आणि सर्वच्या सर्व, पाचही टायमर जाम झाले होते?” – वैशाख.
“हो सर.” – संजय.
“संजय हे तुला जरा विचित्र वाटत नाही का? एखादा टायमर खराब होणं समजू शकतो, पण सगळेच? आणि ते ही एकाच वेळेस?” – वैशाख.
“हो साहेब, हे कुणी तरी मुद्दाम केलं आहे असा संशय मला पण येतो आहे. दर आठवड्याला ब्लोअर लावून सगळी धूळ साफ केल्या जाते. त्यामुळे, ज्या प्रमाणात धूळ होती, ते मुद्दाम केल्या शिवाय शक्य नाही साहेब, पण कोणी केलं असेल ते माहीत नाही.” – संजय.
“ठीक आहे, जा तू. मी बघतो.” – वैशाख.
संजय गेला आणि वैशाख विचारच करत होता, की कोणाचं काम असेल हे? तेवढ्यात शिंदे सुपरवायजर आला.
“सर प्रॉब्लेम आहे.”
“आता काय झालं? क्रेन तर ठीक झाली ना?” – वैशाख.
“तो संतोष कुमार, क्रेन ऑपरेटर, तो क्रेन वर जायला तयार नाही.” – शिंदे
“का? त्याचा काय प्रॉब्लेम आहे?” – वैशाख.
“तो म्हणतो, की त्याचं समाधान झालेलं नाहीये, क्रेन अजून ठीक झाली नाहीये, म्हणाला की तो खाली पडून मेला तर कोण जबाबदार?” – शिंदे.
“तुम्ही क्रेन स्वत: चेक केली का?” – वैशाख.
“क्रेन ओके आहे सर, मी स्वत: क्रेन वर जाऊन खात्री करून घेतली आहे, पण तो तयार नाहीये. काय करायचं? लोडिंग अजूनही चालू झालेलं नाहीये, आता पर्यन्त ट्रक वाले थांबले होते, पण आता क्रेन ठीक झाली म्हंटल्यांवर, ते ही गडबड करायला लागले आहेत. तुम्ही चला साहेब,” – शिंदे.
वैशाख साइट वर पोचला साइटवर गोंधळ चालला होता, सर्व कामगार जमले होते, ट्रक ड्रायव्हर पण जमले होते आणि एकच गोंधळ उडाला होता. वैशाख आल्या वर जरा शांतता झाली. सर्व जण बाजूला सरकले.
“काय संतोष काय प्रॉब्लेम आहे ?” – वैशाख.
“मेरा संजय पर भरोसा नाही हैं। क्रेन गिरगई, और मैं मर गया, तो कौन जिम्मेदार?” – संतोष कुमार.
“अरे, संतोष, आता क्रेन पूर्ण दुरुस्त झाली आहे, हा शिंदे पण क्रेन वर जाऊन चेक करून आला आहे, तर तू का एवढा घाबरतो आहेस?” -वैशाख.
“साहेब, माझा या संजय वर विश्वास नाहीये. तो जे काम चार दिवस करू शकला नाही, ते आज तासा भरात कसं काय केलं? नाही सर मी क्रेन वर जाणार नाही. फायनल.” – संतोष
“मग लोडिंग कोण करणार? हे ट्रक इथे उभे आहेत, त्यांना काय सांगायचं?”– वैशाख
“ते मला काही माहीत नाही. तुम्ही ऑफिस मधे बसता, तुम्हाला काय कळणार आमच्या अडचणी. एवढंच असेल तर तुम्हीच रिस्क घ्या न, तुम्हीच का नाही वर चढत आणि लोडिंग करत? मला सांगताय लोडिंग कर म्हणून, आमची पण फॅमिली आहे साहेब.” – संतोष.
“संतोष, तू जरा जास्तच बोलतो आहेस. यांचे परिणाम काय होतील हे तुला माहीत आहे ना? मुकाट्याने क्रेन वर जा.” – वैशाख जरा जरबेनेच म्हणाला.
पण संतोष वर वैशाखच्या बोलण्याचा काही परिणाम झालेला दिसला नाही, तो म्हणाला, “साहेब, तुम्हीच क्रेन चालवून बघा म्हणजे कळेल की ऑफिस मधे बसून लोकांना हुकूम देणं किती सोपं असतं आणि साइट वर प्रत्यक्ष काम करणं किती जोखमीचं असतं ते.” असं बोलून, संतोशने नकारार्थी मान हलवली आणि तो शेजारी असलेल्या सीमेंट च्या स्लीपर वर जाऊन बसला. आता परिस्थितीने वेगळच वळण घेतलं होतं. दूसरा कोणीही ही क्रेन चालवण्यात वाकबगार नव्हता, गंभीर पेच उत्पन्न झाला होता, सगळे ट्रक ड्रायव्हर आता वैशाख कडे पाहत होते.
“सर अवघड झालं आहे, हेड ऑफिस वरुन कोणी तरी बोलवावा लागेल.” – शिंदे
वैशाख विचार करत होता, की परिस्थिती गंभीर आहे, स्लीपर चं लोडिंग होणं जरुरीचं होतं. त्यानी निर्णय घेतला आणि क्रेन च्या दिशेने चालू पडला. सगळे आश्चर्याने पाहत होते, त्यांना समजेना की वैशाखच्या मनात काय आहे ते. लोकांच्या कडे लक्ष न देता वैशाख क्रेन वर चढला. ऑपरेटर केबिन मधे जाऊन क्रेन चालू केली, आणि खाली सूचना द्यायला सुरवात केली, की लोडिंग चालू करा म्हणून.
वैशाखने सर्व प्रकारच्या क्रेन चालवण्याचं ट्रेनिंग, वेळात वेळ काढून घेतलं होतं त्यामुळे आज जेंव्हा प्रसंग पडला, तेंव्हा अगदी सराईता सारखी क्रेन चालवून त्यानी लोडिंग करायला सुरवात केली. सुरवातीला खालचे लोकं जिवाच्या भीतीने, घाबरत घाबरत काम करत होते, पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की साहेब एक्स्पर्ट आहेत म्हणून. दिवस भरात वैशाखने जवळ जवळ ३० ट्रक भरून स्लीपर पाठवले.
संध्याकाळी, वैशाख जेंव्हा खाली उतरला, तेंव्हा चांगलाच दमून गेला होता. ऑफिस मध्ये जाऊन फ्रेश झाल्यावर त्याने हेड ऑफिस ला फोन लावला, पण कोणी उचलला नाही. घरी गेल्यावर साहेबांना घरी फोन लावू, असा विचार करून, त्यानी घरी जाण्याचा निर्णय घेतला.
क्रमश:.......
स्पर्धा – पुरुषवादी कथा.
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा.
https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187
धन्यवाद