गोल चपाती व सुगरणी

प्रत्येक स्री सुगरण असते फक्त सराव हवा

"चंदन चंदन हो,
चंदनाच्या बारा जाती"

.ही ओवी आहे कविवर्य ना.धों महानोराचीं....जात्यावर दोघी मावश्या गव्हाचं दळण दळत दळत ओवी गात आहेत.
सरसर पिठ पडतंय,हे मऊसुत पिठ घ्यावं.पितळेची परात घ्यावी ,त्यात आधी तवलीनं  पाणी वतावं ,मग मीठ टाकावं तेलाची धार सोडावी अन् गोबऱ्या हातानं पिठ एकजीव करत मळुन घ्यावं ,पांढऱ्या कपड्यानं झाकुन ठेवावं अन् पुन्हा चंदनी पोळपाटावर  चपाती  लाटावी  चुलीवर ठेवलेल्या पसरट व खोलगट तव्यात चपाती शेकावी .

गरमागरम चपातीतली वाफ काढत वाफाळलेल्या चहासोबत गुटुगुटु खावी...

अशी चपाती करुन खायची सुंदरशी कल्पना आहे ना.
कल्पनाच आता अशी करावी लागेल.
पण मी मात्र या सुखाची साक्षीदार आहे.

टम्म फुगलेल्या चपातीचा थाट न्यारा असतो . दुरडीत चपात्या ठेवुन शिक्क्यावर ति दुरडी ठेवली तरी चपाती ती चपातीच राहिली ना वातट ना शिळी... आई कधी जोडगव्हाच्याही चपात्या करायची..लाल रंग असायचा जरा पण त्याची चव अहाहाच.


मामीच्या घरची चपाती अगदी पातळ व डोळ्यानेच खावीशी वाटणारी इतकी सुरेख...

लग्नानंतर सासुबाईच्या हातची चपाती...अतिशय गोल सुबक, आकाराने छोटी तरीही अगदी चविष्ट चपाती.



लग्नानंतर एक दोन महिन्यात मावसदिराने विचारलं ,
अहो वहिनी तुम्हाला चपात्या करता येतात का?

मी अगदी सहजपणे ...हो येतात की..


पण वहिनी तुम्हाला सांगु का माझ्या मम्मीसारख्या चपात्या कुणीच करु शकणार नाही. माझी मम्मी खरी सुगरण आहे....

होय का,,
पण माझ्या सासुबाई व आई सुद्धा फार छान करतात.

त्यावर दिर म्हणाला
हो वहिनी करतात,
पण माझ्या मम्मीच्या हातची चपाती खासच असते...

मी त्यावर उत्तरले,

प्रत्येकाला चपाती जमतेच ..त्यासाठी सराव आवश्यक असतो ...सराव झाला की
नवशिक्या नववधुने केलेली चपाती कधी भारताचा नकाशा असतो तर कधी त्रिकोनी फळी...

जरी नसला आकार तरी
त्यात प्रेम व माया असे परी...

चपाती गोल हवीच फक्त सराव हवा,
करण्याची हौस हवी...
हळुहळु आकाशातील इंद्रधनुचा
आकार घेत घेत
गोल चपाती होईल रंगबावरी.

" त्यात मायेच्या ओलाव्याने
तिन पदरी चपाती "
" आपला दिमाख दाखवते
होऊन साजरी"

मोठ्या संगमरवरी पोळपाटावर चपाती लाटताना बालपणी खेळलेल्या भातुकलीची आठवण जशीच्या तशी समोर येते.

रानभर वाऱ्याच्या झुळकेने हळुवार हेलकावे खात गव्हाच्या ओंब्या डुलतात तेंव्हा...

गोल गरगरीत चपातीची सावली तिन पदर घेत रिंगण पुर्ण करते.

       "ओंब्या गव्हाच्या लोंबती
       सुख मनातलं सांगती"


सौ.जयश्री दयानंद पोळ
(Jश्री)
खोपोली


     


      




Disclaimer:    The opinions expressed in this post are the personal views of the author. They do not necessarily reflect the views of Momspresso.com. Any omissions or errors are the author\"s and Momspresso does not assume any liability or responsibility for them.