Login

कथा -नात्यातील गोडवा गोकुळ भाग 2

A story About Struggle On The Sea
कथा -नात्यातील गोडवा

गोकुळ भाग 2


शामजी भाईंनी स्कॉटलंडला जाण्याची व्यवस्था केलीच. त्यांच्या पत्नीने सुद्धा त्यांची जाण्याची तयारी करून दिली. ते आणि त्यांचा मित्र कृष्णाजींनी सर्वांचा निरोप घेऊन व माईंना नमस्कार करून ते प्रवासाला निघाले. कृष्णाजींनी विमानाची दोन तिकिटे बुक केली होतीच .दोघेही स्कॉटलंड ला पोहोचले. तेथील पितळी मूर्त्या पाहून त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

कृष्णाजी! याला म्हणतात मूर्त्यांची घडणावळ. बघा! काय सुंदर आहेत या मूर्त्या.. जणू काही आपल्याकडेच पाहत आहेत असे वाटते. 'होय श्यामजी भाई! अप्रतिम आहेत या'. 'येथील शिल्पकारांनी, प्राण ओतून तयार केलेल्या आहेत. आपल्या ग्राहकांना खूप आवडेल'. या चला तर, येथील आणखी काही दुकाने शोधूया.

तेथील मार्केटमध्ये अशा कितीतरी अप्रतिम पितळी मूर्त्या होत्या. दोघांनाही निवड करण्यात कसरतच करावी लागली. तरीही त्यांच्या व्यवसायातील अनुभवाने त्यांनी चार-पाच मूर्त्यांचा सौदा केला. दोन दिवस फेरफटका मारून परतीच्या प्रवासाला निघण्याची तयारी केली. मूर्त्यांची पार्सल्स सोबत न घेता, थेट घरपोच पाठविण्याची व्यवस्था आधीच करून ठेवली.
कृष्णाजी! आपण दरवेळी विमानाने प्रवास करतो. यावेळी आपण क्रुझ ने म्हणजे जहाजाने प्रवास करूया. क्रूझ वरचा प्रवासाचा आनंद काही वेगळाच असतो. श्यामजी भाईंची इच्छा कृष्णाजी ला मान्य करावीच लागली. ठीक आहे. तसंच करूया. त्यांनी क्रुझ ची दोन तिकिटे बुक केलीत .आणि परतीच्या प्रवासाला निघाले.

ते दोघेही आनंदात होते की, सर्वात सुंदर मूर्त्या आपल्याच दुकानातून ग्राहकांकडे पोहोचणार... ते खूप खुश होते. त्या आनंदात ते क्रुझ वर असणाऱ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात सामील झाले.
श्यामजी भाईंना वाटले, आपण आपल्या कुटुंबाला सुद्धा परदेशवारी घडविणे आवश्यक आहे. आपल्या घरातील स्त्रियांना कुठेच जायला मिळत नाही. आपण नेहमी प्रवासाच्या निमित्ताने बाहेर पडतो. त्यांना यावेळी खूप अपराधीपणा जाणवायला लागला.त्यांनी मनोमन ठरविले की, आपण आपल्या आईला, पत्नीला, धाकट्या सुनेला, भावाला, मुलांना, सर्वांना घेऊन असा क्रुझ वरचा प्रवास करू...

आता त्यांना थोडं बरं वाटायला लागलं. पुन्हा ते इतर प्रवाशां सोबत समुद्रातील प्रवासाचा आनंद घेऊ लागले...


आणि अचानक... नियतीने पुढे काही वेगळेच वाढून ठेवले होते. ते जहाज एका मोठ्या वादळात सापडले. समुद्रात गटांगळ्या खाऊ लागले. त्या क्रुझ वरील प्रवाशांचा आक्रोश सुरू झाला. प्रत्येकाच्या मनात मृत्यूची भीती होती. साक्षात मृत्यू पुढ्यात उभा ठाकला होता. ते दोघेही एकमेकांचा हात धरून देवाचा धावा करू लागले. दोघांनाही वाटले, कुठून बुद्धी सुचली आणि आपण या जहाजाने जाण्याचा निर्णय घेतला.

आता आपण या संकटातून वाचू शकत नाही. ते देवाचा धावा करू लागले. "देवा आता तूच आमचा तारणहार आहेस".
त्या जहाजात समुद्रातले पाणी जाऊ लागले. जहाज फुटले होते. आणि अचानक संपूर्ण जहाज उलटे होऊन त्यातील प्रवासी दूर फेकल्या गेलेत.

शामजी भाई आणि कृष्णाजी सुद्धा बाहेर फेकल्या गेलेत .अशातच श्यामजी भाई अर्ध मेल्या स्थितीमध्ये एका निर्जन बेटावर वाहत गेले. ते त्या बेटावर बेशुद्धावस्थेत बराच वेळ राहिलेत. सूर्याची किरणे त्यांच्या अंगावर पडल्यामुळे थोड्या उष्णतेने ते शुद्धीवर आलेत. पाहतात तर काय... तिथे कुठलीच मनुष्यवस्ती नव्हती .अतिशय शांत निर्जन ठिकाणी ते असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी त्यांच्या मित्राला कृष्णाजी ला खूप हाका मारल्या. परंतु ते त्यांना कुठेच दिसले नाहीत .आता काय करावे? त्या बेटावर चे जंगल पाहून त्यांना धडकीच भरली. काटेरी निवडुंग, मोठमोठी नारळाची उंच झाडे, यांचे साम्राज्य दूरवर पसरलेले होते. विषारी सापांचे वास्तव्य असलेले, बांबूचे बन व अणकुचिदार खडक सर्वत्र पसरलेले... आता काय करावे त्यांना काही सुचेना...

त्यांना आपले कुटुंब आठवले .आपल्या कुटुंबात आपण किती सुरक्षित होतो,आणि आता हे होत्याचे नव्हते झाले. त्या बेटावर ते अडकून पडले. भुकेने व्याकुळ झाल्यामुळे, काही मिळते का, हे ते शोधू लागले. त्यांनी तेथील बांबूच्या साह्याने नारळ काढून, त्या नारळातील पाण्याने आपली भूक आणि तहान भागवली.त्या अणकुचिदार खडकांनी पावले सोलवटून रक्तबंबाळ होतील, या भीतीने ते तो वाळूचा किनारा सोडून कुठेच गेले नाहीत. निळ्या आकाशाखाली झोप व रात्री चांदण्या मोजणे, एवढेच त्यांच्या हाती होतं. जागे असताना ते, समुद्रात कोणते जहाज दिसते का, किंवा आकाशात विमान दिसते का, हे ते शोधायचे. हेतू हाच की, इशारा करून कोणीतरी नजरेस पडावे. व तेथून त्यांची सुटका व्हावी. त्यांना त्यांच्या मित्राची खूप आठवण येत होती. परंतु ते काहीच करू शकत नव्हते. नुसतं या ठिकाणाहून कशी सुटका होईल, याची वाट पहात, आला दिवस ढकलणे, हेच काय ते त्यांच्या हातात उरले होते.
असे काही दिवस त्यांना त्याच अवस्थेत राहावे लागले.


त्या बेटा वरून त्यांची सुटका होते का पाहूया पुढील भागात भाग ३ मध्ये


छाया राऊत बर्वे