Aug 18, 2022
कथामालिका

खेड्याकडे वाटचाल (भाग पंधरावा)

Read Later
खेड्याकडे वाटचाल (भाग पंधरावा)

खेड्याकडे वाटचाल (भाग पंधरावा)

कपिलेच्या चीकाचा वासंती व बजाबाने गुळ,वेलची पूड,नारळाचं दूध घालून खरवस केला. केळीच्या पानावर देवाला व तुळशीला नैवेद्य दाखवला नंतर शेजाऱ्यांना वाटण्यासाठी बजाबाकडे केळीच्या पानात बांधून दिला. सोबत केदार होताच. प्रत्येक घरी सांगत होता,"आमच्या कपिलेला पाडा झाला. त्याचं नाव ढवळ्या. हा खरवस घ्या." (आता पुढे..)

याचदरम्यान आमच्या मांजरीनेही चार देखणी पिल्लं जन्माला घातली. केदार त्यामुळे बराच बिझी झाला. मनीमाऊची पिल्लं जसे कापसाचे पुंजके थोड्याच दिवसांत केदारच्या पायांत घुटमळू लागले. केदार त्यांना ताटलीत दूध द्यायचा. 

त्यांच आवरलं की कपिलेला व ढवळ्याला आपल्या हातांनी वैरण घालायचा. बजाबा त्यांना बादलीतून पाणी दाखवायचा. शाळेत जातानाही केदार त्याच्या या पाळीव सदस्यांना टाटा बाय करुन निघायचा. तो घरी यायच्या वेळेस मनीमाऊ पिलांना घेऊन वाड्याच्या दरवाजाजवळ त्याची वाट पहात बसायची. 

एकदा तर शाळेतून येताना केदारला एक केविलवाणं कुत्र्याचं पिल्लू डबक्यात दिसलं. त्याच्या आईला कोणी दुचाकीस्वार उडवून गेला होता. केदार व त्याच्या मित्राने ते पिल्लू जवळच्या तळ्यात नेऊन स्वच्छ धुतलं व खिशातल्या रुमालाने त्याला कोरडं केलं. ते पिल्लूही आमच्या घराचा एक सदस्य झालं. केदारने त्याचं नाव मोती ठेवलं.

एकदा दिव्याची आई आमच्याकडे चार दिवस रहायला आली होती. तिने केदारला म्हंटलं,'तुझ्या मावशीचा मयंक बघ,स्विमिंग चेंम्प झाला. तुला काय येतं?केदारचा चेहरा एवढासा झाला. मी मात्र त्याला रात्री कुशीत घेतलं व पावसात तुला पोहायला शिकवेन असं सांगितलं त्याबरोबर त्याची कळी खुलली.

 दिव्याला तिच्या आईची दोन नातवांमधे तुलना करणं आवडत नव्हतं. केदारलाही याच तिच्या तुलना करण्याच्या स्वभावामुळे तिचा लळा कधी लागलाच नाही. 

पावसाळ्यात केदार माझ्या पाठी लागला,पोहायला शिकवण्यासाठी. भल्या पहाटे आम्ही नदीच्या वाटेकडे शेतातून चालत जायचो. 

पाऊस पडायला सुरुवात झाल्याने सडा हिरवागार झालेला असायचा. ते लुसलुशीत,कोवळं गवत तुडवत जायला मजा यायची.  सोबत मोतीही यायचा. 

माझं पोहणं बघून केदार साताठ दिवसांत पोहायला शिकला. मग मोतीला घेऊन एकटाच जायचा. मोतीसुद्धा त्याच्यासोबत पाण्यात डुंबायचा. वाडीतली इतर लहान मुलंही केदारसोबत पोहायला जाऊ लागली. 

केदार त्याच्या मित्रांसोबत झाडावर चढायला शिकला. सुट्टीच्या दिवशी मुलं बजाबाला सोबतीला घेऊन डोंगरावर जायची.  शेवगा,तेरं,पेवगा,एक पानाची भाजी,कंटोळी,कुरडू,टाकळा ,घोटयाळेचे वेल या व अशा औषधी रानभाज्या बजाबा मुलांना ओळखायला शिकवे. या रानभाज्या मग सगळी मिळून वाटून घ्यायची. 

केदार व त्याचे मित्र सुट्टीला आमच्या शेतात यायचे. गड्यांसोबत व माझ्यासोबत साफसफाई करणं, पेरु,चिकू काढणं,नवीन रोपं लावणं अशी कामं करायचे. करता करता बरंच शिकायचे. मीही त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायचो. 

परसवात झाडं लावणं कमी केलं होतं कारण मोठमोठे वानर फळ खाण्यासाठी म्हणून यायचे व घराच्या कौलांवर नाचायचे. 

जसजसा ढवळ्या मोठा होऊ लगला तसा कपिलेसोबत बजाबा त्यालाही चरायला घेऊन जाई. कपिलेने एका साजिऱ्या पाडीला जन्म दिला. अशा तर्हेने आमच्या गाईगुरांच्या संख्येत भरभराट होत होती. बजाबावर एकट्यावर सारा भार पडू नये म्हणून त्याच्या जोडीला गावातलाच एक माणूस ठेवला.

 एकदा आमच्या पायरीजवळ एक मण्यार आली होती. मांजरांची व मोत्याचा आवाज ऐकून आम्ही बाहेर आलो. मांजरांनी तिला वेढून धरलं होतं. बजाबाने तिला बाटलीत भरुन लांब रानात सोडून दिलं. मांजरांमुळे घरात उंदीर,घुशी,झुरळं टिकत नव्हती.मांजरं एवढी गुणी की दुधाचं पातेलं उघडं जरी असलं तरी त्यात तोंड घालत नव्हती. 

केदारची बारावी झाली. तो पुढील शिक्षण घेण्यासाठी मिरजेला गेला. त्याच्या एवढ्या साऱ्या गोतावळ्याला सोडून जाणं त्याच्या जीवावर आलं होतं. 

केदार मिरजेला गेल्यावर घर अगदी ओकंबोकं झालं.

 मधल्या काळात दिव्याची आई बाथरुममध्ये पाय घसरुन पडली. दिव्याच्या वडलांना एकट्याने तिचं करणं जमेना. त्यांनी थोरल्या जावयांना फोन लावला व काही दिवसांसाठी थोरल्या लेकीला माहेरी पाठवा म्हणून सांगितलं. 

दिव्याची बहीण चारेक दिवस जाऊन राहिली पण तिच्या घरातही गैरसोय होऊ लागली. 

तिच्या मुलाने तिला फोन करुन विचारलं,"मम्मा तू किती दिवस आजीकडे रहाणार? आणि तू तिथे राहून ती बरी होणार का? माझी सेमिस्टर जवळ आलेय व तुला माहितीय परीक्षेच्या वेळी तू मला जवळ लागतेस शिवाय मला त्या कुकच्या हातचा टिफिन नाही आवडत. सो प्लीज,रिटर्न टू अवर होम. आजीसाठी एखादी मेड बघ."

यावर दिव्याची बहीण तिच्या लेकाला म्हणाली,"कळतय रे बेटा, तुझे हाल होताहेत. मी असं करते आजीआजोबांना आपल्याकडे घेऊन येते."

(क्रमशः)

------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now