खेड्याकडे वाटचाल(भाग सहावा)

Going towards village

खेड्याकडे वाटचाल (भाग सहावा)

पावसाळ्याच्या दिवसात येथे मुसळधार पाऊस. सगळे शेतकरी भातशेतीमधे गुंतलेले असायचे. मी व दिव्याही शेती बघायला जायचो. उन्हाळ्यात झाडांचा पालापाचोळा गोळा करुन शेतकरी शेताच्या कुणग्यांत पसरायचे. मग तो जाळायचे. अशाप्रकारे कुणगे भाजून ती शेतजमीन पेरणीला सज्ज करायचे. 

एकदा पाऊस पडू लागला की शेताची नांगरणी करुन भातपेरणीला सुरुवात होते. काही दिवसांत भाताची हिरवीगार रोपं वाऱ्याच्या मंद झुळुकीसोबत डुलायला लागायची. त्या द्रुष्याचं वर्णन शब्दात करता येणं शक्य नाही.

 चारीबाजूने पसरलेल्या सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगा, डोंगरांच्या कपारीतून वहाणारे पांढरेशुभ्र धबधबे,वरती आकाशाचा मंडप,त्यात उमटलेलं सप्तरंगी इंद्रधनु व खाली हिरवागार शालू पांघरलेली अवनी..जणू स्वर्गच प्रुथ्वीवर अवतरला आहे असे वाटते. 

ही भातरोपं एकवीस दिवसांची झाली की ज्या कुणग्यांत त्यांना लावायचे असते तिथे उकळ,दूड,तास,चिखल करतात व भाताची काढलेली रोपे(तरवा) हा या चिखलात एका विशिष्ट पद्धतीने मागे मागे येत लावला जातो. 

भल्या पहाटे उठून न्हाणंधुणं,स्वैंपाक आटपून  घरातली सर्वजणं तरवा लावायला जायची. दुपारी जेवायला घरी आली की पुन्हा शेतात. दिवस मावळताना घरी येऊन न्हाणीतल्या कढत पाण्याने न्हायची. जोत नांगरुन दमलेल्या बैलांना वैरण,पाणी देऊन मग स्वैंपाकासाठी चुलीत आग घालायची.

या पावसात काम केल्याने अनेकजणांना सर्दी,ताप सुरु व्हायचा मग दवाखान्यात ही गर्दी व्हायची. फी कमी आकारत असल्याने व लवकर गुण येत असल्यामुळे बाजुच्या गावांतील लोकंही आमच्या दवाखान्यात येऊ लागली होती. बजाबा नंबर देण्याचं काम करायचा. मी व दिव्या दोघंही दिवसभर पेशंट अटेण्ड करुन थकून जायचो.

आषाढ संपला,लोकांची लावणीची कामं झाली होती तरी शेतातलं रान काढणे,चार कापणे अशा कामांसाठी त्यांना शेतात जावं लागे. श्रावण महिना सुरु झाला तसे घरोघरी भक्तीगीतं ऐकू येऊ लागली. 

एके दिवशी एक ताई दिव्याकडे आली व म्हणाली,"डाक्टरीनबाई मला पाळी पुढे जायच्या गोळ्या देवा. आता रक्षाबंधन येईल. पाळी आली तर मला भावाला राखी बांधता येणार नाय. भावभावजय मुंबयसून यायची हायत. त्यांना काय सांगू? नी त्यांका कायमाय गोडधोड करुन घालूक व्हया. मी भायरचा झालय तर सगळ्यार पानी पडतला."

दिव्या तिला म्हणाली,"काही होत नाही या चार दिवसात राखी बांधली तर पण गोळ्या घेऊन मात्र जीवाची वाट लावशील. इतर कुणी आलं नै ते माझ्याकडे या अशा गोळ्या मागायला!"

यावर ती ताई म्हणाली,"अवो डाक्टरीनबाई,बाकीच्या बाया मेडीकलमधना घेतत असले गोळये. मकाच(मलाच) तरास  हुतो त्या मेडीकलवाल्याचे गुळयेन म्हनान तुमच्याकडे इलय(आले). आता मात्र दिव्याला फार राग आला. तिने सगळ्याच गावातल्या लोकांची मिटींग बोलवली. सगळेजण दिलेल्या वेळेत आले. बजाबाने सतरंजा अंथरल्या. एका बाजूला पुरुष तर एका बाजूला महिला बसल्या. मधेमधे त्यांची चिल्लीपिल्लीही बसली.

दिव्या त्यांना म्हणाली की तुमच्याकडे बऱ्याच चांगल्या सवयी आहेत. तुम्ही सुनेला लेकीप्रमाणे वागवता,लग्नात हुंडा घेत नाही. त्यांच कौतुक पण काही वाईट सवयीही आहेत तुमच्यात. सगळीजणं एकमेकांकडे बघू लागली.

"कोणताही सण यायचा असला की तुमच्या बायका मेडीकलमधून जाऊन पाळी पुढे मागे करायच्या गोळ्या आणतात व चण्याशेंगदाण्यासारख्या घेतात. खरंय ना हे."

यावर गावचे सरपंच म्हणाले,"त्याचा काय आसा,आमच्या देवाधर्माक आपड चलना नाय. चार दिस भायर बसुचा लागता हे अडचणीचे दिसात. मगे वाडीउपरात(नैवेद्य) कोण करीत? म्हनान ओ बाकी काययेक नाय.

यावर मीच म्हणालो,"अहो, झाडाला फुल आल्याशिवाय फळ येत का? तसंच पाळी आल्याशिवाय गर्भधारणा कशी होईल. एक जीव निर्माण होण्याची तयारी स्त्रियांमधे बाराव्या वर्षापासून सुरु होते. बरं यात अशुद्ध काहीच नसतं तरी तुम्ही तिला बाहेर बसायला लावता. बरं याकाळात आरामाचं म्हणाल तर केर कआढणे,कपडे धुणे,शेण सारवणे,..जी जी जमतील ती कामं तिच्याकडून मोकळी बसलेय म्हणून करुन घेता. मग विश्रांती कसली देता तिला?" माझ्या बोलण्यावर सगळे चिडीचूप झाले.

दिव्या त्यांना समजवू लागली की या ज्या गोळ्या तुमच्या स्त्रिया सणावारांकरता पाळी पुढेमागे करण्यासाठी घेतात त्यांचे त्यांच्या शरीरावर फार गंभीर परिणाम होतात. या गोळ्या डॉक्टरी सल्ल्याशिवाय कधीच घेऊ नयेत. स्त्रिया जेंव्हा बाहेरून progesterone पाळी पुढे जायच्या गोळ्यांच्या स्वरुपात (norethistrone) घेतात तेंव्हा त्यांच्या शरीरातील संप्रेरकांची(harmones)पातळी त्या वाढवतात. त्यामुळे पाळीच्या काळात गर्भाशयातील जे अस्तर पडून जात असतं त्या नैसर्गिक प्रक्रियेला 
 विरोध होतो. त्यांना वाटतं पुढच्या पाळीत सगळं निपटून जाईल. 

खरं म्हणजे ज्या स्त्रियांना अतिरिक्त रक्तस्त्रावाचा त्रास होतो, किंवा ज्यांना गर्भाशयाचा कर्करोग आहे अशा स्त्रियांना पूर्ण त्यांच्या केसचा अभ्यास करुन या गोळ्या आवश्यकता असल्यास आम्ही रेकमेंड करतो.  फारच गरज असेल तर एखादेवेळी तीन चार दिवस या गोळ्या घेण्यास हरकत नाही पण तेही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार. तुम्ही अक्षरश: चण्या, शेंगदाण्यासारख्या या गोळ्या घ्यायला लागला आहात.  याचे घातक परिणाम तुमच्या घरच्या मंडळींनाही कळले पाहिजेत.
या गोळ्यांच अतिसेवन केल्याने डोकेदुखी, अनियमित रक्तस्त्राव, नैराश्य, वजन वाढणे, शरीरावर जास्तीची लव वाढणे, चक्कर येणे,यक्रुताच्या कार्यात बिघाड होणे, काविळ,ब्रेन स्ट्रोक,पँरालिसिस, फिट येणे,वारंवार गर्भपात होणे, तसेच पाळीसंबंधी समस्या(pcod) ,फायब्राइड ह्या व अश्या अनेक आजारांना तुम्ही महिला बळी पडता."

सरपंच उठून चभे राहिले व म्हणाले,"आजपासून आमच्या गावात या गोळ्या कोणी घेणार नाही. डॉक्टरसाहेब सांगतात म्हणजे आपड मानायची गरज नाही. तरीपण कोनाक पाळूचीच आसली तर त्याना आपले बायलेक पुरो आराम देवचो. देवाचो नैवेद त्याचो तेना बनवुचो. नैवेदाच्या नावाखाली बायलेक गुळये खावूक देता नये."

सगळ्यांनी आमच्या म्हणण्याला पाठिंबा दिला. शेवटी काय आम्ही त्यांच्या भल्यासाठीच तर सांगत होतो.

बरेच महिने झाले तरी शुभ्रा वाड्यावर आली नव्हती. मी गावकऱ्यांकडे चौकशी केली. मला एक वाईट बातमी समजली ती म्हणजे शुभ्राचा नवरा रुपेश दारु पिऊ लागला होता.

(क्रमश:)

-----सौ.गीता गजानन गरुड.

🎭 Series Post

View all