Aug 09, 2022
कथामालिका

खेडयाकडे वाटचाल (भाग चौथा)

Read Later
खेडयाकडे वाटचाल (भाग चौथा)

पाऊल खेड्याकडे (भाग चौथा)

बजाबा व मी शुभ्राला आमच्या शहरातल्या घरी घेऊन गेलो. आईबाबांना मी त्या दोघांची ओळख करुन दिली व शुभ्राच्या अपघाताबाबत सांगितलं. 

माझ्या वडिलांचे एक मित्र प्लास्टिक सर्जरी करतात. मी शुभ्रा व बजाबाला घेऊन त्या डॉक्टरांकडे गेलो. काही दिवसांत शुभ्राची प्लास्टिक सर्जरी झाली. तिचा चेहरा बऱ्यापैकी आधीच्या चेहऱ्याशी मिळताजुळता झाला.

 शुभ्रा त्यादिवशी खूप खूष झाली. उत्साहाच्या भरात तिने मला मिठीत घेतलं. बरेच दिवस आमची अशी भेट झाली नव्हती. शुभ्राच्या डोळ्यातील आनंदाश्रुंनी माझी पाठ भिजली. मी बराच वेळ तिच्या केसांना कुरवाळत होतो.

 तिच्या केसांचा शेपटा जाऊन खांद्यापर्यंतचा हेअरकट करावा लागला होता पण तोही तिला शोभून दिसत होता.
आम्हाला कळलच नाही कधी माझी आई येऊन आमच्या पाठी दारात उभी होती ते. मला अरविंद अशी एकच हाक मारुन ती तेथून तडकाफडकी निघून गेली. 

मी अजुनही माझ्या व शुभ्राच्या नात्याबाबतची कल्पना आईला दिली नव्हती. आम्हा दोघांना एकमेकांच्या बाहुपाशात पाहून ती प्रचंड चिडली. 

इकडे शुभ्राही घाबरुन रडू लागली. तिला कसंबसं गप्प करुन मी घरी गेलो. आईने डोक्याला एका फडक्याने गच्च बांधले होते. मी घरात शिरताच तिने माझ्या बाबांना साद घातली व माझ्या व शुभ्राच्या मिठीबद्दल त्यांना सांगितलं. मला खूप बोलू लागली. ही थेरं करण्यासाठी त्या शुभ्राला इथे घेऊन आलास का वगैरे. मग मीही निक्षून सांगितलं की माझं शुभ्रावर प्रेम आहे व मी तिच्याशीच लग्न करणार. 

आई जोरजोरात हातवारे करुन भांडू लागली. मी आईला एवढं चिडलेलं कधीच पाहिलं नव्हतं. बाबा तिला शांत करु पहात होते पण ती अचानक खाली कोसळली. बाबांनी तिला तपासलं. 

रक्तदाब अतिशय कमी झाला होता. तिला बोलताही येत नव्हतं. जमिनीवर आपटल्याने कपाळाला टेंगुळ आलं होतं. मी तिच्या पायाखाली उशा ठेवल्या. एम्बुलन्स बोलवली व एका चादरीत तिचं मोटलं ठेवून आम्ही तिला खाली आणलं व एम्बुलन्समधून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो.

इसीजी काढण्यात आला. आईला सौम्य ह्रदयविकाराचा झटका आला होता. यानंतर आईला त्रास होईल असं तिच्यासमोर काही घडू नये याची जबाबदारी सर्वस्वी मी व माझ्या वडिलांवर होती.

मी पुर्ण भ्रमित झालो होतो. मला आई हवी होती पण आईला शुभ्रा नको होती. आई शुद्धीवर आली नव्हती . मी डॉक्टरांशी बोलून शुभ्राकडे जायला निघालो. शुभ्राला घडल्या प्रकाराची माहिती दिली. शुभ्राने माझा हात हातात घेतला व म्हणाली,"आईची किंमत मला माहिती आहे डॉक्टर कारण मला आई नीटशी आठवतही नाही. मला तिचा पुरेसा सहवास मिळाला नाही. माझ्यामुळे तुम्हा मायलेकरात वितुष्ट आलं तर मी स्वतःला कधीही माफ करु शकणार नाही. तुम्ही तुमच्या आईने ठरवलेल्या मुलीशीच लग्न करा. माझी शपथ आहे तुम्हाला. यापुढे आपण चांगले मित्र बनून राहू." मला काय बोलावं ते सुचत नव्हतं. त्यादिवशी शुभ्रा बजाबासोबत गावी गेली.
आई हळूहळू बरी झाली तशी तिने माझ्यासाठी स्थळं पहायला सुरुवात केली. शुभ्रा निघून गेल्याने तिचा राग बराचसा निवळला.

आईच्या दुरच्या नात्यातल्या भावाची मुलगी दिव्या ही डॉक्टर होती. तिच्यासोबत माझं लग्न जुळवण्यात आलं. महिनाभरात लग्न झालंसुद्धा. लग्नाच्या आधी मात्र मी दिव्याला माझ्या पहिल्या प्रेमाची कल्पना दिली होती. दिव्यानेही ते सहजरित्या घेतलं.

लग्नाच्या आधी शुभ्राने मला फोन करुन आता दिव्या हीच तुमची पत्नी आहे व तिला पुरेपूर सुख द्या अशी ताकीद दिली. किती मोठा त्याग करीत होती शुभ्रा तोही माझ्यातलं व माझ्या आईतलं नातं संपू नये याकरता शिवाय तिची जागा घेणाऱ्या दिव्याला भरपूर प्रेम द्या म्हणून सांगत होती. 

आईच्या इच्छेनुसार अगदी थाटामाटात माझं व दिव्याचं लग्न झालं. आता दिव्या माझी पत्नी होती. लग्नानंतरचा सत्यनारायण झाल्यानंतर आम्ही गोव्याला मधुचंद्राकरिता गेलो. दिव्या खरंच स्वभावाने खूप चांगली होती. मी तिच्याशी जुळवून घेत होतो. ती मला समजून घेत होती. 

मी व दिव्या वाड्यावर गेलो. वासंतीने आमच्यावरुन भाकरतुकडा ओवाळून टाकला,डोळ्यांना पाणी लावलं. शुभ्रा आमच्या स्वागताला औक्षणाचं ताट घेऊन आली. तिने आमचं औक्षण केलं. मी दिव्याशी तिची ओळख करुन दिली.

(क्रमश:)

-----सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now