Oct 18, 2021
कथामालिका

खेड्याकडे वाटचाल (भाग दुसरा)

Read Later
खेड्याकडे वाटचाल (भाग दुसरा)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

 खेड्याकडे वाटचाल (भाग दुसरा)

मेडीकलची बेग घेऊन मी आजीसोबत निघालो. आजी एका मोडकळीस आलेल्या घरात रहात होती. मातीचं घर होतं. काही ठिकाणी वाळवीने पोखरलं होतं. मी ओसरीतून आत गेलो. 

आतला अंधार अगदी अंगावर आला. एका बाजूला गोधडीवर एक अस्थिपंजर देह विसावला होता. दाढीची खूटं वाढली होती. छातीचा भाता जोरजोरात हलत होता. मी आजोबांना तपासलं. छातीत कफ साचला होता. अंगही तापलं होतं. आजीने गरम पाणी आणलं, मग मी आजोबांना इंजेक्शन दिलं. 

माझ्याजवळ असणारी अँटीबायोटीक्स व कफ सिरप दिलं. आजी मला फी विचारु लागली. मी तिच्या पाठीवर थोपटलं व चारेक दिवसांनी दवाखान्यात येऊन औषध घेऊन जा म्हणालो. त्या माऊलीकडून फी घेऊन मी असा कितीसा श्रीमंत होणार होतो? 

म्हातारी म्हणाली,"तुमास्नी चाय दिली आसती पण आमच्या हातचं कोण खात न्हाईत. आमी हलक्या जातीतले." अजुनही गावात जातीव्यवस्था टिकून आहे याचा विषाद वाटला. मी म्हणालो,"तुमचं नी माझं रक्त वेगळं नाही आजी. आम्ही डॉक्टर एखाद्याला रक्त चढवताना त्या रक्तदात्याची जात नाही विचारत आजी. तू आण चहा बनवून.

 आजीने चुलीत आग घातली न् गुळाचा कोरा चहा बनवला. दूध नव्हतं तिच्याकडे. नाक नसलेल्या कपातला तो चहा मला अम्रुताहून मधुर लागला." मी आजीला खर्चासाठी दोनशे रुपये दिले न् तिचा निरोप घेतला. गावच्या नदीवरील पुलावर येऊन उभा राहिलो. नदी अगदी संथ वहात होती. आजुबाजूच्या झाडांची प्रतिबिंब नदीच्या पाण्यावर पडली होती.दूरवर डोंगरांची रांग दिसत होती. खूप समाधानी व प्रसन्न वाटत होतं.

दुसऱ्या दिवशी रविवार म्हणून दवाखाना बंद होता. तरीही मला पहाटेच जाग आली. बाजूच्या घरात कोंबडी पाळली होती. त्यांतले दोन तुरेवाले कोंबडे तांबडं फुटायच्या आधीच आरवायला सुरवात करीत. एकवेळ गजर बंद करु शकतो पण हे पठ्ठे सगळ्यांना उठवूनच दम घेतात. मी खळ्यातआलो. जास्वंदीची लालबुंद फुलं नुकतीच उमलत होती. पिवळसर केशरी ठिपके असलेलली कर्दळीची फुलंही आपला गंध मिरवत होती. पारिजातकाचा सडा शेणाने सारवलेल्या जमिनीवर पडला होता. 

इतक्या पहाटे माडाखाली कोण म्हणून मी कानोसा घेत हळूहळू घराच्या डाव्या बाजूला गेलो. बजाबाची भाची शुभ्रा माडाच्या अळीत ठेवलेल्या फडतरीवर बसून न्हात होती. न्हाणीघरात न्हाण्यापरीस हे असं माडाखाली न्हाणं तिला आवडत असावं. तिने छातीपर्यंत परकर गुंडाळून घेतला होता. तिचं ते ओलेतं रुप पाहून माझं भान हरपलं.

 मी त्या आरसपानी देहाकडे मुग्ध होऊन बघत राहिलो. तिच्या गोऱ्या पावलांत चांदीचे पैंजण उठून दिसत होते. आतून कोणीतरी आवाज दिला तसा मी दचकलो व तिथून सटकलो . तिथून सटकलो खरा पण शुभ्रा माझ्या मनात भरली. 

माझं न्हाणं झाल्यावर मी देवासाठी फुलं काढायला कंबरेला पंचा गुंडाळून गेलो. 

यावेळेस तिथे कोणी नसायचं खरं पण नेमकी शुभ्रा मांजराने दुधात तोंड घातलं म्हणून त्याच्यापाठी धावत आली व येऊन माझ्यावर आदळली. मला अशा उघडबंब अवस्थेत पाहून ती बिचारी भलतीच गांगरली व सॉरी सॉरी म्हणाली. ओढणीचं टोक तोंडात धरुन मिस्किल हसत तिथून पसार झाली. मी भलताच संकोचलो. पाचसहा फुलं तोडली असतील,तसाच माझ्या खोलीत आलो व देवपुजेला बसलो.

बजाबा माझ्यासाठी चहा व गरमागरम लुसलुशीत आंबोळ्या घेऊन आला. मी बजाबाकडे शुभ्राची चौकशी केली. बजाबा म्हणाला,"डाक्दरांनू, शुभी ही माझ्या भैनीची लेक. शुभी दोन वरसांची व्हती तवा तिची आई शकुंतला परत गुरवार राह्यली. 

बाळंतपनाचे येळी माज्या भयनीची तब्येत बिघाडली. लेकराला जन्म देऊन शकुंतला देवाच्या घरला निघून गेली कायमची. शुभीला भाऊ देऊन गेली ओ माजी भैन. बायको गेली तेचा धसका माज्या भाओजींनी घितला.येके दिसी गळ्याला फास लावून तेंनी तेंची मोकळीक करुन घेतली. पाठी दोन गोजिरवाणी लेकरं सोडून गेले बघा. 

शुभ्राचे आजीआजोबा म्हातारे व्हते. तेंचे हाल आमास्नी बगवनात. आमका(आम्हाला) पोरटोर नव्हतं. आमी दोनिवली लेकरा सांभाळुचा ठरिवला.  शुभ्रा नी शुभमला  आमी वाड्यात घिऊन इलाव(आलो). माज्या वासंतीन सवताच्या लेकरापरमान दोगांना वाढीवल्यान. न्हानाची मोठी केल्यान. दोनीव भैनभावंडा आक्शी नक्षत्रासारी पन कोनाची नजर लागली यांच्या नात्याला. शुभम बारीवीत व्हता. माका म्हनाक लगलो सहलीक जाऊचा हा समिंदरावर . मिया तेका पैसे दिलय. वासंतीन पुरीभाजीचो डबो करुन दिल्यान. आमचो शुभम नी तेचो येक मित्र दोगेव समिंदराच्या पानयात गुडुप झाले. तवापासना शुभीची रयाच गेली. गावातली लोका तिका पांढऱ्या पायाची म्हनतत. ह्या शुभीचा लगीन कसा होतला हीच चिंता लागून रहिली हा माज्या जीवाक."

शुभ्राच्या वाटेवर दैवाने काटेच काटे पेरले होते. मला तिची फार दया आली. मधे काही दिवस शुभ्रा तिच्या आजीकडे गेली होती. शुभ्रा वाड्यात नसल्यामुळे माझं मन बेचैन होत होतं. 

मला कर्दळीशेजारी,क्रुष्णकमळाजवळ ती तिच्या बारीक फुलाफुलांच्या चुडीदारमधे उभी असल्याचे भास होत होते. विहिरीवर गेलो तरी शुभ्रा बाजूच्या माडाच्या अळीतल्या फडतरीवर बसून न्हातेय व गाणं गुणगुणतेय असे भास व्हायचे. दवाखान्यात रुग्णांची गर्दी असली की वेळ कसाच निघून जायचा पण रात्र मात्र अंगावर यायची. न राहवून मी बजाबाला विचारलं,"शुभ्रा कधी येणार?" बजाबा मिशितल्या मिशीत सूचक हसला व म्हणाला,"येत थोड्या दिसांनी."

(क्रमश:)

------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now