खेड्याकडे वाटचाल (भाग पहिला)

Going towards village

#पाऊल_खेड्याकडे (भाग पहिला)

लहानपणापासून माझं खेडेगावात काम करण्याचं स्वप्न होतं. डॉक्टरकीची पदवी मिळाल्यावर मी कोकणातल्या एका छोट्याशा खेडेगावात दवाखान्यासाठी जागा शोधू लागलो. भाऊसाहेबांचा वाडा गावात मध्यवर्ती ठिकाणी होता. मी भाऊसाहेबांना माझा मानस सांगताच त्यांनी आनंदाने तळमजल्यावरची एक खोली मला दवाखान्यासाठी व दुसरी रहाण्यासाठी दिली.  भाऊसाहेबांची पत्नी बऱ्याच वर्षांपूर्वी हे जग सोडून गेली होती. त्यांना मुलंबाळ नव्हते. 

वाड्याच्या देखरेखीसाठी बजाबाला ठेवलं होतं. बजाबा,त्याची बायको वासंती व त्याची भाची हे तळमजल्यावरच्या एका खोलीत मुक्कामाला होते. वाड्यासभोवतालचा परिसर हिरवागार होता. उंचच उंच माड,पोफळी,डेरेदार आम्रव्रुक्ष,काजू,पेरुची विस्तारलेली झाडं जणू वाड्यावर चहूबाजूंनी पहारा करत होती. मागील बाजूला विहीर होती. विहिरीवर पाणी शेंदून घरात आणावं लागे. प्रवेशद्वारावर मधुमालतीच्या  गुलाबीसर झुबक्यांचे तोरण शोभून दिसायचे. वाड्याच्या डाव्या आड्याला क्रुष्णककमळीचा वेल पसरला होता. निळसर जांभळ्या रंगाची ती सात्विक फुलं फारच आकर्षक दिसायची.

मी आंघोळीसाठी पाणी गरम करत ठेवलं. तितक्यात बजाबा आला व मला म्हणाला,"डाक्दरांनू,न्हाणीखाली आग घातलय. पानी तापलाहा. तुमी पानी तापवूची काययेक गरज नाय. चोवीस तास न्हानयेत गरम पानी असता. कधीव जाऊन हात,पाय,ताँड धुवून येवचे. तुमचे कपडे वासंती धुईत. तुमाला दोन टाईम चाय,नाश्ता,जेवान आनून देऊ. तुमी फकस्त तुमची डाक्दरी करा."

मी बजाबाला विचारलं,"तुम्हा दोघांना महिन्याला किती पैसे द्यायचे?" यावर तो उत्तरला,"तुमी देवमानूस,आमची सेवा करुक इलाहास(आला अहात). पैशाचा काय नाय. तुमच्या मनाला येतील तितकं देवा. अगुदर तुमचा दवाखाना चालू होवंदे नीट. फुढचा फुढं."

शाळेत मित्र मालवणी असल्याने ही मालवणी भाषा मला थोडीबहुत परिचयाची होती. बजाबा मला न्हाणीघराजवळ घेऊन गेला. चुलीवर एक मोठे मातीचे मडके तापत ठेवले होते. त्या धुराचा गंध न्हाणीघरात भरुन राहिला होता. चुलीवरच्या पाण्याला एक विशिष्ट मस्त गंध होता. मन अगदी फुलून आलं. आजुबाजूला जास्वंदीची हिरवीगार झाडं,फाद्याफांद्यांवर उमललेली त्यांची लालबुंद फुलं,पक्षांचा गुंजारव. एकुणच सुरेख वातावरण होतं. बजाबाने मला चहाघावण असा नाश्ता आणून दिला. 

मी आईबाबांना फोन केला व मी सुखरुप असून रहायला व दवाखान्यासाठी योग्य जागा मिळाल्याचं सांगितलं. माझे आईबाबा दोघेही डॉक्टर होते. पुणे शहरात आमचा दवाखाना होता. मला आयतं गादीवर बसायला मिळणार होतं पण मला डाऊनलेवलला काम करण्याची इच्छा होती. खेड्यातल्या लोकांची सेवा करायचं मनात ठरवलं होतं. माझ्या बाबांना माझा सवभाव माहित होता. त्यांनी मला माझ्या मनाप्रमाणे वागण्याची म्हणजे माझी जीवनवाट चाचपडत का होईना पण स्वतः शोधण्याची मोकळीक दिली. मित्रांनी मला वेड्यात काढलं. आईला तर माझा निर्णय मान्यच नव्हता पण अखेरीस तिने होकार दिला.

मी फुलोरा या खेडेगावात येण्यापूर्वी इथे डॉक्टर नव्हता. कोण आजारी झालं की त्यांना शेजारच्या गावी जावे लागे. आपल्या गावात डॉक्टर आलाय हे कळताच गावचे सरपंच व इतर मान्यवर लोक येऊन मला भेटून शुभेच्छा देऊन गेले.

 दवाखान्यात ठेवायला एक खाट,गादी,टेबल,खुर्ची तालुक्याच्या गावावरुन आणली. दारावर डॉ. अरविंद नलावडे, एम.डी. आयुर्वेद अशी पाटी लावली. आठवडाभराच्या प्रेक्टीसनंतर माझ्या लक्षात आलं की इथल्या माणसांत विटेमिन्स,मिनरल्सची कमी आहे. अशक्तपणा,संधिवात व यासारख्या हातीत हात घालून येणाऱ्या बऱ्याच दुखण्यांनी गडी,बायामाणसं बेजार झाली होती. मी जमेल तेवढं स्वस्तात उपचार करीत होतो. येणाऱ्या रुग्णांची,त्यांच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी करत होतो. 

पेशंटनाही गुण येत होता. त्यांचा माझ्या औषधोपचारावर विश्वास बसत होता. अशीच एक आजी दवाखान्यात आली. खणाची चोळी,हिरवं लुगडं नेसलेली. भाळावर कुंकवाचा टिळा,कुंकवाखाली हिरवं गोंदण. चेहऱ्यावर,हातावर अगणित सुरकुत्या. "डाक्दरा, माज्या घोवाक(नवरा)निसती धाप घालताहा. जरा बेगिन ये बघूक. लै उपकार होतीत रे माज्या वासरा." मी मेडीकल बेग घेऊन आजीसोबत निघालो.

(क्रमश:)

🎭 Series Post

View all