Jan 19, 2022
कथामालिका

खेड्याकडे वाटचाल (भाग बारावा)

Read Later
खेड्याकडे वाटचाल (भाग बारावा)

खेड्याकडे वाटचाल (भाग बारावा)

तीनेक महिन्यानंतर मी दिव्याला व बाळाला घेऊन आलो.
 बाळाचं नाव आम्ही केदार ठेवलं.

 केदार वाड्यावर आल्यापासून वाड्याला नवचैतन्य आलं. जरा फावला वेळ मिळाला की बजाबा बाळाला विहिरीवर,जवळच्या शेतात फिरवून आणायचा. बाळाशी खूप गप्पा मारायचा.

बाळ दिसामाजी वाढत होता. दिव्याचं सावळं रुप घेऊन जन्माला आला होता. तिच्यासारखेच बोलके डोळे,कोणालाही आपलसं करणारं मधाळ हसू. 

शुभ्राची लेक आली की तर हातपाय हलवून ताता करायचा.तीही केदारला मांडीवर घ्यायची. 
त्याला आपली बाहुली खेळायला द्यायची. 

कधी वेळ मिळाला की आम्ही दोनतीन दिवस माझ्या आईवडिलांकडे जायचो. 

तेही आता थकत आले होते. बाबा बोलले नाहीत तरी आमचा शहरातला दवाखाना आता मी सांभाळावासा त्यांना वाटे. माझी द्विधा अवस्था झाली होती. 

गावकऱ्यांना सोडून शहरात जायचं म्हणजे त्यांच्या डोळ्यात पेरलेली स्वप्नं मी माझ्या हाताने चुरडण्यासारखं होतं व नाही गेलं तर आईबाबांना तो व्याप सांभाळणं कठीण जातं होतं.

शेवटी आठवड्यातले तीन दिवस मी बाबांच्या दवाखान्यात जायचं ठरवलं. माझ्या अनुपस्थितीत दिव्या माझेही पेशंट बघायची. 

केदार थोडा मोठा होताच शाळेत जाऊ लागला. बडबडगीते,कविता अगदी सुरात म्हणायचा. 

त्याला अक्षरं शिकवताना दिव्याच्या अगदी नाकीनऊ यायचे. बजाबासोबत माळीकाम करायला त्याला फार आवडे. 

दिव्या कधी केदारला तिच्या माहेरी घेऊन गेली की तो बजाबा पाहिजे म्हणत नुसता उच्छाद घाले. 

हा इवलासा पोर आपल्या लेकीला माहेरी राहू देत नाही म्हणून शुभ्राची आई त्याच्यावर नाराज व्हायची. 

शेवटी दोनेक दिवसांचं माहेर उपभोगून दिव्या परत वाड्यावर यायची. बजाबाला बघताच गुलाम दोन्ही हात पसरून त्याच्याकडे झेप घेई. 

आठवड्यातून एकदा दाढी करणारा बजाबा केदारला दाढी लागते म्हणून रोज उठला की दाढी करु लागला.

दिवस कसे पाखरासारखे उडून जात होते. केदार एकेक तुकडी वरती चढत होता. त्याच्या शिक्षकांमधेही तो लोकप्रिय होता. 

केदारला वाचनाची फार आवड होती. त्याच्या वयाला झेपतील अशी पुस्तकं आम्ही त्याच्यासाठी मागवून घेत होतो. 

कोणताही आनंद हा एकट्याने साजरा करायचा नाही या त्याच्या विचारसरणीनुसार त्याची गोष्टीची पुस्तकं साऱ्या वर्गभर फिरायची.
 गोष्टीत इतका रमायचा की स्वप्नातही त्या पात्रांशी मोठ्यामोठ्याने बोलायचा. कधी लढाईही करायचा.

 जत्रेला जाताना बजाबाच्या खांद्यांवर बसून जायला त्याला फार आवडे. 

पेपेरं, ढाल,तरवार, रंगीत पिसांची टोपी सगळं डबल घेऊन येई. एक टोपी बजाबाला तर एक त्याला. तशीच बाकीची आयुधही. मग खळ्यात या दोघांच युद्ध रंगे. 

शहरातल्या दवाखान्यात मी नवीन होतकरु डॉक्टर्सची नियुक्ती केली. कमीतकमी मेडीकल बिल आकारत असल्यामुळे तिथेही रुग्णांची गर्दी वाढत होती.  

आईबाबा आता घरीच आराम करायचे. ते दोघंही अधेमधे वाड्यावर येत. महिनाभर रहात. 

मी जमवलेल्या माणुसकीच्या गोतावळ्याचा सार्थ अभिमान मला आईबाबांच्या डोळ्यांत दिसे. 

केदारला आजीआजोबा वाड्यावर रहायला आले की खूप बरं वाटे. रात्री तो त्यांच्याच कुशीत गोष्टी ऐकत निजे. सकाळी उठला की आजोबांना बजाबाच्या सोबतीने त्याने लावलेली नवीन फुलझाडे दाखवे. 

आजोबांना पुजेसाठी गोकर्ण,कण्हेर,देवचाफा,जास्वंद,क्रुष्णकमळ,कर्दळी अशी रंगीत फुलं काढून देई. गावात राहिल्याने अनेक व्रतवैकल्यांची त्याला माहिती होत होती. 

गणपतीच्या सुट्टीत शाळेला अकरा दिवस सुट्टी असे. खरंतर आम्ही शहरात दिड दिवसाचा गणपती बसवायचो. पण केदारच्या इच्छेखातर त्याच्या आजोबांनी वाड्यावर गणपती आणण्यास परवानगी दिली. 

काही माणसं कामाला लावून वाड्याची साफसफाई व रंगकाम करुन घेतलं. केदार,बजाबा व आईबाबा गणपतीच्या शाळेत गणपतीचा पाट देऊन आले.

 चतुर्थीच्या आदल्या दिवशी गणपतीची भिंत पानाफुलांच्या नक्षीने रंगवली. पडदे लावून सुशोभीकरण केलं. बाकड्यावर चौरंग ठेवला. बाजूला घरातले देव आणून ठेवले.

 चतुर्थीदिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी विधी उरकून आम्ही बाप्पा आणण्यासाठी गणपतीच्या शाळेत गेलो. 

एकदोनतीनचार गणपतीचा जयजयकार असा जयघोष करत बाप्पाची मुर्ती घेऊन आलो. आईने दाराजवळ येताच मुर्तीवरुन भाकरतुकडा ओवाळून टाकला. चौरंगावर श्रींच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली. मुर्तीच्या वरती लाकडी माटी लावतात. तिला पानाफुलाफळांनी सजवले. 

(क्रमशः)

------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now