Aug 09, 2022
कथामालिका

खेड्याकडे वाटचाल (भाग तेरावा)

Read Later
खेड्याकडे वाटचाल (भाग तेरावा)

खेड्याकडे वाटचाल(भाग तेरावा)

एकदोनतीनचार गणपतीचा जयजयकार असा जयघोष करत बाप्पाची मुर्ती घेऊन आलो. आईने दाराजवळ येताच मुर्तीवरुन भाकरतुकडा ओवाळून टाकला. चौरंगावर श्रींच्या मुर्तीची स्थापना केली. चौरंगाभोवती सुरेख रांगोळी रेखाटली. फळांच ताट समोर ठेवलं. फुलांची परडी ठेवली.  मुर्तीची प्राणप्रतिष्ठा गुरुजींकडून करण्यात आली.

 मुर्तीच्या वरती लाकडी माटी लावली. तिला पानाफुलाफळांनी सजवले. ही पानंफुलं माळरानावर मुबलक प्रमाणात मिळतात. हरणं,तेरडा,शेरवडा,कांगला,काकडी,कवंडळे,नारळ यांचा यात समावेश असतो. काकडी तर परसवात असतेच. या सर्व पुष्पपत्रींमुळे गणराया शांत व प्रसन्न होतो अशी कोकणवासियांची श्रद्दा आहे.

 कोकणात मुखवट्याच्या गौरी नसतात. एका बांबुच्या रोवळीत तांदूळ पसरवून ती विहिरीजवळ नेतात. तिथल्या आघाडा,हळद,हरणं,तेरडा या रोपांची जुडी करून रोवळीत ठेवतात. 

विहिरीजवळचे काही खडे त्यात ठेवतात व न बोलता घरातली कुमारिका ही गौराई आणून गणेशाच्या मुर्तीशेजारी स्थानापन्न करते. 

गावातली काही मुलं आरतीसाठी जमा झाली. एका सुरात    आम्ही आरती केली. 

आई,दिव्या व वासंतीने मिळून भेंडी,कोबी,गवार,घेवडा,अळूच्या गाठी अशा एकूण पाच भाज्या बनवल्या. अळुच्या गाठी ही इथली स्पेशालिटी आहे. त्यासाठी परसवातली अळुची पानं रात्रभर वाळत घालतात. ती मलूल झाली की घरातली आजी गजाली सांगत सांगत या अळुच्या पागोट्याच्या आकाराच्या गाठी करते.  मग तिची सून कढईत तेल तापत ठेवून लसणाची फोडणी देते. त्यात मालवणी मसाला,वरील गाठी,मीठ व उकडलेले काळे वटाणे टाकून एक वाफ देते. उतरवताना भरपूर ओलं खोबरं घालतात. 

गावठी सुरय तांदळाच्या पीठाचे कळीदार मोदक हळदीच्या पानात वाफवले. शिवाय वरण,भात,काळ्या वटाण्याची आमटी,पापड, घरी घातलेलं अंबाडीचं लोणचं. बाप्पाला, गौराईला नैवेद्य दाखवला. घरभर उदबत्तीचा,सुग्रास अन्नाचा दरवळ सुटला. बाप्पाच्या आगमनाने घर कसं प्रसन्न झालं. 

आरतीची तळी केदार नेहमी स्वतःच्या हाती घ्यायचा. काही दिवसांत सगळ्या आरत्या केदारने मुखोद्गत केल्या.

बायका संध्याकाळी गौरीगणपतीसमोर फुगड्या घालायच्या. झिम्मा खेळायच्या. गाणी म्हणायच्या. त्यांत केदारही भाग घेऊ लागला. शिवाय संध्याकाळी वाडीतल्या भजनानांही तो आमच्यासोबत यायचा. 

गौरीपूजनादिवशी ओवसे भरले जातात. सुपात सुकामेवा,फळं ठेवून ती पतीला व आजुबाजूच्या स्त्रियांना दिली जातात.

 वाड्यातही चार भजने ठेवली होती. भजन झालं की भजनकऱ्यांना चहा व सफेद वटाण्याची उसळ द्रोणातून दिली तर कधी चहा व नेवऱ्या,कधी चहा व बुंदीचे खडखडे लाडू दिले. 

बाबांनी बजाबा व वासंतीसाठी नवीन कपडे आणले होते.  ते त्यांना घालायला लावले. शेजारच्या बायका बोलावून दिव्याने त्यांच्या मदतीने नेवऱ्या,लाडू केले. कोकणात करंज्यांना नेवऱ्या म्हणतात. चणे खरपूस भाजून जात्यावर भरडतात. 

ती डाळ सुपात घेऊन पाखडतात. अशाने त्यातली टरफलं निघून जातात. मग ही डाळ परत दळतात. या पीठात किसलेला गुळ,भाजलेले अर्धबोबडे शेंगदाणे, वेलची,जायफळ पूड घालून सारण बनवलं जातं.

  मैद्याची पाती लाटून त्यात हे सारण भरुन नेवऱ्या करतात. नेवऱ्या अगदी गच्च भराव्या लागतात. पोकळ भरल्या की खुळुखुळु वाजतात. 

मग कोणाला खायला दिल्या की वाजवून म्हणतात,"ह्या गो काय खुळखुळा! भुतूर काय घातलास नाय ता. नेवरी कशी गच भराक व्हयी. आमच्या टायमाक आमी टाकी भरुन करु.' याच सारणाचे जरा डालडा किंवा साजूक तूप घालून लाडू वळतात.

गणपतीच्या दुसऱ्या दिवसाला उंदरपी म्हणतात. त्यादिवशी  आईने सुवासिक तांदळाच्या कण्यांची गुळ,नारळाचं दूध घालून खीर केली.  

तिसऱ्या दिवशी बिरडी केली. ही केदारला विशेष आवडली. बिरडी करण्यासाठी वासंतीने आदल्या दिवशी रात्री सुरय तांदूळ धुवून पातळ साडीवर वाळत घातले.

 सकाळी ते छान भाजून घेतले. थोडे जिरे,धणेही भाजले व ते मिश्रण जात्यावर दळलं. मग गुळाचं पाणी करुन त्यात हे पीठ घट्ट् भिजवून त्याची गोल बिरडी बनवली.(एक गोळा दोन्ही तळहातावर गोल फिरवून त्याची जी लांबोडी तयार होते ती दोन्ही टोकं चिकटवतात.) तेल गरम करून ती छान तळून काढली. ही बिरडी अगदी खमंग,खुसखुशीत होतात आणि विशेष म्हणजे या पदार्थांची चव याच उत्सवात अफलातून लागते.

 नंतर मात्र प्रत्येक दिवशी कधी आजोबांच्या,कधी केदारच्या पसंतीचे गुलाबजाब,जिलेबी,बासुंदी,शिरा,शंकरपाळे असे जिन्नस नैवैद्याला केले गेले. 

अनंतचतुर्दशीच्या दिवशी पाच भाज्या,वडे काळ्या वटाण्याची आमटी,सफेद वटाण्याची उसळ केली. आरती केली. सुखसम्रुद्धीसाठी,शांतीसाठी बाबांनी गणरायाला गार्हाणं घातलं. आम्ही पाठोपाठ होय महाराजाचा सूर लावला. देवाला नैवेद्य दाखवला व चारेक वाजता बाप्पाला खळ्यात आणलं. 

वाडीतील सगळे बाप्पा एकाचवेळी बाहेर पडले. नदीकाठी एका रांगेत बाप्पाच्या मुर्त्या मांडल्या. बाप्पांना धुपदीप अगरबत्तीने ओवाळण्यात आलं. 

सामुदायिक आरती म्हंटली व गुळ,खोबरे,फळांची शेरवणी करून सगळ्यांना वाटली. 

बाप्पाचं नदीच्या डोहात विसर्जन केलं. तिथली थोडी माती पाटावर ठेवून घराची वाट धरली. यावेळी मात्र सगळ्यांची मने भावूक होतात. घरी आल्यावर बाप्पाशिवायची ती आरास अगदी केविलवाणी दिसते. 

 लहान मुले हमखास रडतात मग त्यांचे आजीआजोबा सगळ्यांचे गणपतीबाप्पा पाण्यात तळाला जमून गप्पा मारतात व तू किती मोदक खाल्ले असं एकमेकांना विचारतात अशी पुर्वापार चालत आलेली गोष्ट सांगून लहानग्यांना निजवतात. 

इथे कोकणात एक निदर्शनास आलं ते म्हणजे मुलीचा हुंड्यासाठी छळ होत नाही. कोणीही हुंडा घेत नाही. बरेचदा वरपक्ष तर फक्त मुलगी व श्रीफळ द्या म्हणून सांगतात. सुनांना मारझोड होत नाही. त्यांना ग्रुहलक्ष्मीची जागा मिळते . तरी मुलासाठी हट्ट हा इथेही आहेच. बहिणींना भाऊ हवा याकरता लांबड लावणं इथेही आहेच. दिव्या व शुभ्रा जमेल तितकी जनजागृती करत होत्या. 

आमच्या घरापासून काही अंतरावर पालेकराची जमीन होती. त्याने ती विकायला काढली कारण तो परदेशात स्थायिक झालेला. मी ती जमीन विकत घेतली. सहाएक एकर होती. 

(क्रमशः)

------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now