Sep 23, 2023
कथामालिका

खेड्याकडे वाटचाल(भाग सोळावा)

Read Later
खेड्याकडे वाटचाल(भाग सोळावा)

खेड्याकडे वाटचाल (भाग सोळावा)

यावर दिव्याची बहीण तिच्या लेकाला म्हणाली,"कळतय रे बेटा, तुझे हाल होताहेत. मी असं करते आजीआजोबांना आपल्याकडे घेऊन येते (आता पुढे..)

यावर तिचा लेक म्हणाला,"नो वे मम्मा, आजी बरे व्हायला किती दिवस लागतील हे तुलापण माहित नाही. पप्पा तरी सकाळीच बोलत होता की तुझ्या मम्मीने तिच्या आईवडलांना इथे नाही आणलं म्हणजे मिळवली. कोण त्या म्हातारीची लेक्चर ऐकणार! 

आणि तसंही माझे एक्झाम्स जवळ आलेत व एक्झाम्स संपल्यावर मला सुट्टी एन्जॉय करायची आहे. 

मित्रांसोबत नाईट आऊट अँड ऑल देट सो प्लीज फॉर गॉड्स सेक कम अलोन. ते त्यांच बघून घेतील."

 हे सारं बोलणं स्पीकर ऑन होता असल्याने माझ्या सासूसासऱ्यांनी ऐकलं. कितीतरी आशा होत्या सासूबाईंच्या थोरल्या जावयाकडून. दिव्याच्या बहिणीने हे सारं दिव्याला सांगितलं व दिव्याने मला.

मी म्हंटल,"दिव्या तू जाऊन रहातेस का तिथे? माझी काहीच हरकत नाही."

पण मग माझी आई म्हणाली,"त्यापेक्षा त्यांना इकडे वाड्यावर घेऊन ये. चार माणसांत राहिले की बरं वाटेल त्यांना. उतारवयात नुसत्या गोळ्याऔषधांनी भागत नाही रे अरविंदा. चार गोष्टी ऐकणारे कान हवे असतात,मानसिक आधार हवा असतो."

मी आईच्या म्हणण्यानुसार सासुसासऱ्यांना घरी घेऊन आलो. सासुबाईंच्या पायाचा एक्सरे काढला. स्नायुंना दुखापत झाली होती. थोडक्यात निभावलं होतं.

 फिजिओथेरपिस्ट वेळोवेळी येऊन त्यांच्याकडून व्यायाम करुन घेऊ लागला. माझ्या बाबांचे व दिव्याच्या बाबांचे बुद्धीबळाचे डाव रंगू लागले, वासंती दिव्याच्या आईच्या हाताला धरुन तिला शेतातून फिरवून आणू लागली. 

केदार घरी आला की तो आजीआजोबांच्यामधे बसून त्यांना हॉस्टेलमधल्या गंमतीजमती,तसंच त्याच्या शिक्षणातले अनुभव सांगायचा. 

माझ्या सासुबाई त्याला कुशीत घेत व म्हणत,"शहरातल्या डामडौलाचा पडदा होता रे माझ्या डोळ्यांवर. मी पहिल्यापासून तुझ्या वडिलांना कमी लेखत आले पण त्यांनी कधीच उलट बोलून माझा अपमान नाही केला. आपल्या क्रुतीतून त्यांनी माझे डोळे उघडले व तुही आईबाबांच्या मुशीत घडतो आहेस याचा मला अभिमान आहै."

केदार एमबीबीएस झाला याचा अवघ्या पंचक्रोशीला आनंद झाला. या आनंदाप्रित्यर्थ आम्ही सत्यनारायणाची पूजा घातली. पंचक्रोशीला आमंत्रण दिलं. काही हौशी कलाकारांनी रात्रभर जागून कलशाच्या प्रतिक्रुतीचा मखर हा केळीच्या बुंध्यापासून बनवला.

 तळकोकणात कितीतरी प्रकारचे अप्रतिम मखर बनवणारे लाल मातीतले कारागिर आहेत. विठ्ठल रखुमाईचं मंदीर,कासव,गरुड,वीणा,होडी अशा नाविन्यपूर्ण प्रतिक्रुती येथे बनवून मिळतात. 

प्रसाद गव्हाचा रवा,साखर,दूध,पिकलेली केळी,मनुका,चारोळींनी बनवतात. 

आमच्या गुरुजींनी सव्वा दोन किलोचा प्रसाद बनविला होता. येणाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. खीर,पुरी,बटाटाभाजी,उसळ,वरणभात,लोणचं असा साधा,सात्विक बेत केला होता.

 एक वाईट बातमी कानावर आली,ती म्हणजे शुभ्राचा नवरा रुपेश याला सिव्हिअर एटेक आला. मी बजाबा,वासंती व दिव्याला घेऊन त्याच्या घराच्या दिशेने निघालो.

 हे असं अचानक झाल्याने शुभ्रा बधीर झाली होती. शीतल तिच्या शेजारी बसून रडत होती. तो विलाप काळजाला घरं पाडून जात होता. रात्री घरी आलो पण मन अगदी विदीर्ण झालं होतं. बजाबाची हालत बघवत नव्हती. एकसारखा डोळ्यातून टिपं गाळत होता. 

मी व दिव्या रोज वेळात वेळ काढून शुभ्राच्या घरी फेरी मारत होतो. शुभ्राचे सासूसासरे दीनवाणे दिसत होते. दिव्या शुभ्राचं मन कशाततरी गुंतवायचा प्रयत्न करीत होती. 

शीतल समजुतदार होती. तीचं बीएएमएस झालं होतं. जिल्हा रुग्णालयात.नोकरीला लागली होती. केदार घरी आला तेव्हा शीतलच्या घरी जाऊन आला.

एकदा आम्ही संध्याकाळी शेतात फिरत होतो. केदारने मला थांबवलं.

"बाबा,मला थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे."

"बोल रे."

"मला शीतल आवडू लागली आहे. मला तिच्याशी लग्न करायचंय."

"केदार,ती तुझ्यापेक्षा दिडेक वर्षांनी मोठी आहे रे.

"म्हणजे तुमचा नकार मानायचा का मी?"

"उगा डोक्यात राग घालून घेऊ नकोस. शीतलला तू आवडतोस का?"

"ते नाही माहीत."

"मग माहीत करुन घे व नंतर बोल माझ्याशी."

केदारचं म्हणणं मी दिव्याला सांगितलं तेंव्हा दिव्या म्हणाली की तिनेपण त्याला हेच सांगितलं."

केदारने शीतलला लग्नाची मागणी घातली तशी शीतल त्याला म्हणाली,"तू फार घाईत निर्णय घेतो आहेस,केदार. तुला माझ्याविषयी अनुकंपा वाटतेय रे,हे प्रेम नव्हे. हे असलं सहानुभूतीचं प्रेम नकोय मला."

केदारने तिला म्हंटल,"मी तुला आवडत नाही तर तसं सांग की सरळ."

"तसं नाही पण प्रेमाच्या भावनेने मी कधी तुझ्याकडे पाहिलच नाही." इति शीतल.

"मग आता बघ की. टेक युवर ओन टाईम." इति केदार.

मी केदारला सांगितलं की शीतलच्या मनात नसेल तर उगीच तिला फोर्स करु नकोस."

केदारचा देवदास व्हायचा बाकी होता. शेवटी केदारच्या वतीने मीच एकदा शीतलच्या रुग्णालयात गेलो व तिला विचारलं तर पोर रडू लागली.

"अरविंद काका मला लग्नच करायचं नाही. मला भाऊ नाही. मी सासरी गेल्यावर माझे आजीआजोबा, आई साऱ्यांच कसं होणार! आजीला तर आंघोळही घालावी लागते. आई अजून धक्क्यातून सावरली नाहीए."

मला शीतलचा शब्द न् शब्द पटत होता. मी तिला म्हंटलं,"तू काही काळजी करु नकोस. तुझ्या घरी आई,आजीच्या मदतीसाठी मी एक मेड ठेवतो. शिवाय तुझं नि आमचं घर जवळ तर आहे. तू शाळा सुटल्यावरही आईकडे जाऊन आईच्या हातचा वरणभात खाऊन येऊ शकतेस."

यावर मात्र शीतल गालातल्या गालात हसली. मी तिचा होकार घेऊन आलो. लग्नाची बोलणी झाली. मुहुर्त ठरला. बस्त्याची बांधाबांध झाली. शीतल व केदारचे लग्न झाले. इथे प्रेक्टीस करायची की शहरात हा आता केदारचा प्रश्न होता व त्याने इथे खेड्यातच प्रेक्टीस करायचं ठरवलं तेव्हा खऱ्या अर्थाने माझी खेड्याकडची वाटचाल पाळंमुळं धरू लागली. 

मी लावलेली झाडंही मोठी होऊन फळं देऊ लागली आहेत. आता वाड्यातल्या झोपाळ्यावर मी व दिव्या आरामात बसून आजुबाजूचा हिरवागार निसर्ग न्याहाळतो. 

माझे व दिव्याचे आईवडीलही इथे आल्यापासून बऱ्यापैकी निरोगी आहेत. त्यांचा व्रुद्धापकाळ सुखमय झाला आहे. मरण तर आपल्या हातात नसतं पण जेवढं जगणं आपल्या व आपल्या आप्तस्वकीयांच्या वाट्याला आलं आहे ते नक्कीच आपण निसर्गाच्या सानिध्यात राहून साजिरं करु शकतो. 

आजमितीला माझ्याकडे खूप सारी संपत्ती नाही पण जी आहे ती आम्हाला पुरेशी आहे. बऱ्याच महिलांना दिव्याने त्यांच्या पायावर उभं केलं आहे. माझ्या बागेतही दहाएक जणं काम करतात. अशा प्रकारे रोजगार निर्मितीसाठी आम्ही खारीचा वाटा उचलला आहे. जीवाभावाची माणसं आमच्या अवतीभोवती आहेत.

सुखाची व्याख्या आम्ही जाणली आहे.

(समाप्त)

-------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप: