Aug 18, 2022
कथामालिका

खेड्याकडे वाटचाल(भाग नववा)

Read Later
खेड्याकडे वाटचाल(भाग नववा)

खेड्याकडे वाटचाल(भाग नववा)

रात्र झाली तशी नाना वेसकर सोडून गप्पांना जमलेली मंडळी आपापल्या घरी गेली. प्रत्येकजण विजेरी घेऊनच आलेला त्यामुळे त्यांना जाणं सोप्पं पडलं. आता पुढे..

दिव्या निजलेल्या शीतलला उचलून घेऊन आतल्या खोलीत गेली. 

शुभ्रा हातवारे करत होती व काहीबाही सांगू पहात होती. मधूनच भाऊसाहेब,तुम्ही माझ्या आयुष्याचा वाटोळा केलास. तुम्ही माझ्यार कधीच प्रेम केला नाय असं काहीसं अस्पष्टसं बोलत होती.

 शुभ्राचे डोळे वेगळेच दिसत होते. द्रुष्टी एकाजागी स्थिर होती. ती रडत,विव्हळत होती. ते सर्व पाहून माझ्या अंगावर काटा आला.

 बजाबाची बायको पुढे आली. तिने शुभ्राची खणानारळाने ओटी भरली. बराचवेळ ती झोपाळ्यावर झोके घेत होती. वयाची ऐंशी पार केलेले नाना वेसकर आमच्यासोबतच थांबले होते. त्यांनी तिचं नाव विचारलं तर तिने सरला असं सांगितलं. 

दिडच्या सुमारास शुभ्राने पळून जायचा प्रयत्न केला. 'माका सोडा..माका सोडा. मी भाऊसाहेबाक सोडुचय नाय. त्या चांडाळनीचा वाटोळा करतलय' असं रडतभेकत होती.

नाना व बजाबाने तिला हातीला धरून आणून ओट्यावर बसवलं. तीनेक वाजता तिचा डोळा लागला.  तिला बजाबाने उचलून खोलीत गोधडीवर निजवली.

नानांना मी सरलाताईविषयी विचारलं. ते म्हणाले,"सरलाताई ही भाऊसाहेबांची बायको. भाऊसाहेब त्यांच्या आईवडिलांचे एकुलते एक सुपुत्र, लाडाकोडात वाढलेले. सरलाताई त्यांच्या मामाची लेक. सरलाताईंशी त्यांच लग्न झालं ते फक्त लोकांसाठी. 

खऱ्या आयुष्यात भाऊसाहेबांनी कधीच सरलाताईंना पत्नीसुख दिलं नाही. भाऊसाहेबांनी शेजारच्या गावात एका विधवेशी घरोबा केला होता. कामानिमित्त म्हणून जायचे नि तिथेच रहायचे वस्तीला. 
ती विधवा बाई भाऊसाहेबांमुळे गर्भार राहिली. गावात सगळीकडे बोभाटा झाला. 

भाऊसाहेबांच्या वडिलांना जिणे मुश्कील झाले. एका रात्री भाऊसाहेबांच्या आईवडिलांनी शेतातल्या विहिरीत जीव दिला. 

त्यानंतर महिनाभर भाऊसाहेब वाड्यावर राहिले पण नंतर परत त्यांनी आपले गुण उधळायला सुरुवात केली.

 सरलाताई बिचारी सवाष्ण असुनही विधवेचं जीणं जगत राहिली. आपल्या नशिबाला दोष देत राहिली. त्याकाळची फायनल पास पोरगी होती ती. लिहायलावाचायला येत होतं तिला. मनातल्या भावना त्या डायरीत उतरवल्या आसतील पोरीने." 

दुसऱ्या दिवशी सकाळी शुभ्रा अगदी फ्रेश होती. रात्रीच्या घटनेबद्दल तिच्याकडे वरवर चौकशी केली पण तिला काहीच आठवत नव्हतं. दिव्याने शीतलला शुभ्राच्या कुशीत नेऊन ठेवलं तसं शीतल तिच्या इवल्या इवल्या हातांनी आईदुधू शोधू लागली. गुलाम आता दे दे म्हणायला शिकली होती. 

मी माझ्या एका मित्राला,शरदला फोन लावला तो मनोविकारतज्ञ होता. त्याला मी शुभ्राची केस समजावून सांगितली. 

शुभ्रा तशी नॉर्मल वाटत होती पण एकटीच बसली की पाय हलवायची. तिची नजर बदलायची. ती स्वतःचेच केस ओढायची. शीतलला शुभ्राच्या हाती द्यायलाही आम्हाला भिती वाटू लागली.  कधी तिच्या अंगात सरलाताई येईल याचा नेम नव्हता.

ठरवून दिलेल्या अपॉइंटमेंटच्या वेळी मी शुभ्राला घेऊन डॉ.शरदकडे गेलो. 

शरदने तिला बोलतं केलं. सरलाताईंची डायरी आपल्याकडे ठेवून घेतली. ती वाचल्यावर शरदला हे कळलं की शुभ्राने ते आत्मव्रुत्त एवढं समरसून वाचलं की ती काही काळाकरता स्वतःलाच सरलाताई समजत होती. शुभ्राच्या अतिसंवेदनशील मनामुळे असं झालं होतं.

डॉ.शरद म्हणाला,"अरविंद, हा एक प्रकारचा मनोविकार आहे. या विकारात रुग्णाचे वास्तवाशी नाते तुटते. स्वतः चं असं एक काल्पनिक जग तो निर्माण करतो. शुभ्राला तुम्ही भेटलात नि इथे घेऊन आलात पण बऱ्याचवेळा रुणांच्या नातेवाईकांना हा मनोविकार आहे हेच कळत नाही किंवा दडवून ठेवतात व अति झाले की जादूटोणा,अंगारे,मांत्रिक यांच्या मागे लागतात. 

उगाचच हातवारे करणे,असंबंध बोलणे,भ्रमिष्ठासारखे भटकणे अशी लक्षणं रुग्णांमधे दिसून येतात. शुभ्रा मात्र यातून लवकर सुटेल व लवकरच शीतलला तिची आई मिळेल." 

 काही सिटींग्स झाल्यावर  व नियमित औषधे घेतल्याने शुभ्रात सुधारणा दिसू लागली. तिच्या अंगात सरलाताई येणं जवळजवळ बंदच झालं. या काळात दिव्या दवाखाना सांभाळून शीतललाही सांभाळत होती. 

दिव्याला शीतलची फार ओढ लागली होती. शुभ्राला माहेरी येऊन सव्वा महिना होत आला होता. मधल्या काळात झालेल्या घटना आम्ही रुपेशला कळवल्या नव्हत्या. 

एक दिवस रुपेश येऊन शुभ्रा व शीतलला घेऊन गेला. वाडा पुन्हा ओकाबोका झाला. दिव्याला तर खूपच वाईट वाटलं. त्याच रात्री आम्ही स्वतःच्या बाळासाठी प्रयत्न करायचं ठरवलं. 

पंधराएक दिवसात दिव्याने गोड बातमी दिली. मी आता बाबा बनणार होतो न् दिव्या आई. 

दिव्याला कडक डोहाळे लागले होते. पोटात पाणीही टिकत नव्हतं. वरचेवर ताप यायचा. तिची ती अवस्था पाहून मला खूप अपराध्यासारखं वाटत होतं. 

वासंती दिव्याला जे आवडेल ते करुन घालत होती. एकदा तर तिला बटाटेवडे हवे झाले. ते मात्र वासंतीलाही करता येत नव्हते. मग काय मीच किचनचा ताबा घेतला.

 कढईभर तेलात बटाटेवडे तळून काढले. उरलेल्या चुऱ्यात लसूण,तिखट,मीठ घालून कोरडी चटणीही बनवली. दिव्याने चार वडे खाल्ले व ते तिला पचलेही.

 अशाप्रकारे ज्या गोष्टी वासंतीला माहित नव्हत्या पण दिव्याला हव्याच असायच्या त्या मी तिला करुन खाऊ घालू लागलो. 

मला आईसोबत स्वैंपाक करायची आवड होती. माझ्या या आवडीचा मला हॉस्टेलमध्ये रहाताना व आता दिव्याचे डोहाळे पुरवताना पुरेपुर फायदा झाला.

(क्रमशः)

-----सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now