खेड्याकडे वाटचाल (भाग सातवा)

Going towards village

खेड्याकडे वाटचाल (भाग सातवा)

शुभ्राचा नवरा रुपेश याला दारुचं व्यसन लागलं हे मला गावकऱ्यांकडून समजलं. 

एवढा चांगलामुलगा..आईवडील,बहीण,घरदार,शेतीवाडी,पत्नी सगळं असताना दारुच्या आहारी गेला हे ऐकून मला व दिव्याला फार वाईट वाटलं. 

मी रुपेशच्या बहिणीला,शांतीला दवाखान्यात बोलवून घेतलं. तिने सांगितलं ते फार भयंकर होतं. शांती म्हणाली,"डॉक्टरांनू, रुपेशदादाला त्याच्या एका मित्राने सांगितलं की तुमचं नि शुभ्रा वहिनीचं प्रेमप्रकरण होतं, ते पिक्चरमधे दाखवतात तसलं. तेव्हापासून रुपेश दादा शुभ्रा वहिनीला कुठे बाहेर जाऊ देत नाही.

 दळण आणायला गेली नि जास्त वेळ लागला तर संशय घेतो. तिला विचारतो की डॉक्टरांसोबत बोलत बसलेलीस का. त्याचे नवीन मित्र त्याला बोलावून न्हेतात नि भरपूर दारू पाजतात मग रुपेशदादा घरी आला की वहिनीला परत तुमच्यावरुन बडबडतो,लय घाणेरड्या शिव्या घालतो.

 आईबाबा त्याला समजावतात. परवा तर शुभ्रा ताईला मारायला धावला. आई आडवी गेली तर आईला ढकललन. आई बिचारी खांबावर आपटली. हे रक्त वहात होतं. शुभ्रा वहिनीचं बाळ येणार आहे. तिकडे तालुक्याच्या डॉक्टरकडे तपासायला नेतात तिला. तुमच्याकडे पाठवणार नाही असं दादा म्हणत होता." 

दिव्याने शांतीकडे शुभ्रासाठी भेट पाठवली. दिव्या व मी बजाबासोबत शुभ्राच्या घरी गेलो. आम्हाला बघून शुभ्रा रडू लागली. शुभ्राला पाचवा महिना लागला होता. तिच्या चेहऱ्यावर खरं तेज यायला हवं होतं पण घरातील बिघडलेल्या वातावरणामुळे तिची रयाच गेली होती.

 रुपेश शुद्धीत होता. त्याला दिव्याने सगळं प्रकरण नीट समजावून सांगितलं. दिव्याकडे एखाद्याला समजावण्याची हातोटी होती. तिचं म्हणणं रुपेशला पटलं पण दारुच्या व्यसनाचा प्रश्न होताच. आम्ही त्याला ओळखीच्या व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं व शुभ्राला वाड्यावर तिच्या माहेरी घेऊन आलो. 

फार दिवस पाणी न मिळाल्याने कोमेजलेलं गुलाबाचं रोपटं पावसाचं पाणी पिऊन कसं तरारतं तसं माहेराच्या अंगणात आल्यावर शुभ्राने कात टाकली व ती खुलू लागली. दिव्यासोबत तिच्या दवाखान्याच्या कामात हातभार लावू लागली. महिलागट करत असलेल्या कामात जातीने लक्ष घालू लागली. शुभ्रासाठी आता रोज वाड्यावर सुग्रास,गोडधोड पक्वानं होऊ लागली. 

रुपेशही दिड महिन्यात बरा झाला. त्याला त्याची चूक उमगली. शुभ्राला भेटायला आला तेव्हा आमची माफी मागत होता. सातव्या महिन्यात वाडीतल्या सगळ्या बायका बोलावून शुभ्राचा ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पाडला.

 धनुष्यबाण,मुकुट,फुलांचा हार,बाजुबंद,क़बरपट्टा,फुलांची परडी हे सारं दिव्या व मी,रुपेश मिळून तिच्याकरता हौसेन केलं. वासंतीने बुंदीचे लाडू,रव्याचे लाडू,करंज्या,चकल्या,बर्फी हे सारं शुभ्राच्या आवडीचं घरीच बनवलं होतं. पेढा,बर्फी ओळखण्याचा कार्यक्रमही झाला. 

शुभ्राच्या सासूने दिव्याला मिठी मारली व म्हणाली,"पोरा तुज्यामुळे आज माजा घर वाचला. देव तुजा भला करो." दिव्या व मी त्यांच्या पाया पडलो. 

शुभ्राचं खाणंपिणं वासंती पहात होती. दिव्या तिच्याकडून काही योगासनं करुन घ्यायची,संध्याकाळी दोघी मिळून लांबवर फिरून यायच्या. शुभ्राला मुलगी झाली. बजाबा फार खूष झाला. रुपेश आईवडलांना घेऊन बाळबाळंतिणीला बघायला आला. लेक नाकीडोळी अगदी शुभ्रासारखी होती. तिचा बारसा अगदी झोकात केला.

 रुपेशच्या बहिणीने बाळीचं नाव शीतल असं ठेवलं. काही दिवसांत शुभ्रा लेकीला घेऊन सासरी गेली. घरं पुन्हा ओकंबोकं वाटू लागलं. शीतलच्या दुपट्यांचा,ओव्याधुपाच्या धुरीचा सुगंध घरात पुरुन राहिला होता. 

वरच्या मजल्यावरची एक खोली सदैव बंदच असायची. आमच्या व्यापात आमचं तिकडे लक्षच गेलं नव्हतं. खरं सांगायचं तर वाड्याचं रिनोवेशन करताना मी ती खोली उघडायला गेलो होतो पण बजाबा मला नको म्हणाला होता. मग मीही त्याच्या शब्दाबाहेर गेलो नाही.

एके दिवशी बजाबा बाहेर गेला होता. दिव्या व वासंती वाड्याची साफसफाई करत होत्या. त्यावेळी दिव्याने त्या खोलीचं दार वासंतीकडून उघडून घेतलं.

 आतमधे एक सागवानी पलंग होता. एका बाजूला लोखंडी झोपाळा उभा करुन ठेवला होता. दिव्या तो झोपाळा पाहून खूष झाली व तिने तो माझ्या मदतीने बाहेरच्या ओट्यावर लावून घेतला. खोलीची साफसफाई केली. पलंगात एक ट्रंक होती. त्यात भाऊसाहेब व त्यांच्या पत्नीचा फोटो होता. त्याकाळातली नववार लुगडी होती. मुली खेळतात ते सागरगोटे होते.

 बजाबा आला तेव्हा खोली उघडल्याचं पाहून थोडा बेचैन झाला. मी भाऊसाहेबांना फोन करुन त्या ट्रंकबाबत सांगितलं. ते म्हणाले,"तुम्ही तुमच्या हिशेबाने तिची विल्हेवाट लावा." मला आश्चर्य वाटले,भाऊसाहेब त्यांच्या स्वर्गवासी पत्नीच्या आठवणींबाबत एवढे त्रयस्थ का वागताहेत याचे. मी बजाबाला कारण विचारलं तर तो गप्पच राहिला.

(क्रमश:)

-----सौ.गीता गजानन गरुड.

🎭 Series Post

View all