Aug 18, 2022
कथामालिका

खेड्याकडे वाटचाल(भाग पाचवा)

Read Later
खेड्याकडे वाटचाल(भाग पाचवा)

खेड्याकडे वाटचाल(भाग पाचवा)

आईच्या हट्टापायी मला शुभ्राशी लग्न न करण्याचा निर्णय घ्यावा लागला. माझं दिव्याशी लग्न झालं. आता पुढे..

आम्ही गावी गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशी वासंतीने पुऱ्या गावातल्या बायकांना हळदीकुंकवाला बोलावलं. दिव्याला बाया यायच्या आत साडी नेसून तयार व्हायचं होतं. तिला साडी नेसण्याचा सराव नव्हता. बराच वेळ ती निऱ्यांत अडकली होती. शेवटी मला म्हणाली,"अरविंद,ये ना जरा. मला हेल्प कर." 

मी हातातलं पुस्तक ठेवून आज्ञाधारक पतीसारखा तिच्यासमोर उभा राहिलो व ती देईल ती निरी माझ्या चिमटीत धरु लागलो. तिने निऱ्या आत खोचताच मी तिथून निघणार इतक्यात परत..
"अरे जरा खाली वाक नि या सगळ्या एका लायनीत घे व हा क्लिप लाव." 

ते कामही मी व्यवस्थित केलं. तिला पाठी व्हायला सांगितलं व मागून साडी नीट केली. इतक्यात वासंती हाक मारु लागली,"डाक्दरीनबाई,समद्या बाया येऊन थांबल्यात. बेगिन येवा." मी उठून उभा रहात असताना माझं कपाळ तिच्या कपाळावर आदळलं. तिने मला परत एकदा कपाळांची ठोकाठोकी करायला लावली नाहीतर शिंग येतील म्हणे. मला दिव्याचा बालिशपणा भावला.

गावातल्या बाया दिव्याकडे कौतुकाने बघत होत्या. मी प्रत्येकीची दिव्याशी ओळख करुन दिली व त्यांना सांगितल की उद्यापासून सगळ्या लेडीजना डॉ.दिव्या तपासणार.

 हे ऐकून सगळ्या बाया खूष झाल्या कारण काही आरोग्यविषयक समस्या त्या मला सांगायला लाजायच्या. डाव्या बाजूच्या एका खोलीत दिव्याचा दवाखाना थाटला. आममची जोडी नीट रुळावी व मला ऑक्वर्ड वाटू नये म्हणून शुभ्रा दहा बारा दिवस तिच्या आजीकडे रहायला गेली.

दिव्याला मनापासून खेड्यातील वातावरणाची आवड होती. आता बायामाणसं तिच्याकडे जाऊ लागली. आपल्या नाजूक अडचणी सांगू लागली. एका मुलीच्या अंगावरून पांढरं जात होतं. दिव्याने तिला तपासलं व तिच्या आईला सांगितलं की हे नॉर्मल आहे. तुमची मुलगी वयात येत आहे. अशा वेळी शरीरात काही स्त्राव वहातात. त्याने होतं असं. 

फावल्या वेळात आम्ही आमच्या केसेसवर चर्चा करायचो. दिव्याच्या असं लक्षात आलं की या बाया आरोग्याबद्दल हव्या तशा जाग्रुत नाहीत. तिने शारिरीक  स्वच्छतेसाठी
महिलांचे वर्ग घेतले त्यात त्यांना योनीमार्गाची स्वच्छता राखणं का आवश्यक आहे,तसं न केल्यास आतमधे जंतुसंसर्ग होऊन पोटात वेदना होतात हे सारं समजावून सांगितलं. शिवाय त्या जागी कोणताही साबण लावू नये,स्वच्छ पाण्याने धुणं हेच पुरेसं असतं हेही त्यांना समजावून सांगितलं. 

दिव्याच्या एक लक्षात आलं की या स्त्रिया आर्थिकद्रुष्ट्या स्वतंत्र नाहीत. तिने शुभ्रा आली तेव्हा तिला मदतीला घेऊन बायांना घरगुती सेनिटरी पेड बनवायचे प्रशिक्षण दिले. शिवाय वरची एक रुम त्यांना या कामासाठी खाली करुन दिली. 

दिव्या खूपच समजुतदार मुलगी होती. तिलाही माझ्यासारखं समाजसेवेचं वेड होतं. निसर्गाशी बोलायला आवडायचं तिला. संध्याकाळी आम्ही दोघं नदीच्या पुलावर जाऊन तो संथ पाण्याचा प्रवाह बघत बसायचो. सुर्यास्ताच्यावेळी आकाशात होणारी रंगपंचमी पहायचो. दिव्याने तिच्या चांगुलपणाने माझ्या मनावर कब्जा केला. 

एके दिवशी शुभ्राला बघायला मंडळी आली. नवरामुलगा रुपेश हा गावातल्या शाळेत शिक्षक होता. घरदार होतं. आईवडील,धाकटी बहीण होती. वरपक्षाला शुभ्रा पसंत पडली. शुभ्राचं लग्न वाड्यातच करायचं ठरवलं.

 दिव्याने शुभ्रा,बजाबा,वासंती यांना केळवणासाठी बोलावलं. शुभ्राच्या आवडीचे उकडीचे मोदक तिला खाऊ घातले. तिला मोरपिसी रंगाची साडी भेट दिली. बजाबा व वासंतीचाही मानपान केला.

लग्नाच्या आदल्यादिवशी साखरपुडा झाला. वधुकडच्या मंडळींना शेजारच्या घरात उतरवलं होतं. खळं शेणाने सारवून घेतलं. खळ्यात हिरव्यागार पानांचा मांडव उभारला. प्रवेशद्वारावर केळीची पोसवलेली रोपे लावली. सगळ्या झाडांवर लायटींग केली. दिव्याने शुभ्राचा मेकअप, हेअरस्टाईल,मेहंदी वगैरे केली. 

लग्नाच्या आदल्या रात्री बजाबा व वासंतीने भाचीचे यजमानपण केले. आजीआजोबा फारच वयस्कर असल्याकारणाने ते येऊ शकले नाहीत. पहाटे चार वाजल्यापासून सगळ्यांच न्हाणं सुरु झालं.

 नवऱ्यामुलाकडून उष्टी हळद आली. त्या हळदीच्या वाटीत आंब्याची पानं बुडवून बायांनी शुभ्राला हळद लावली. हळद लावताना बाया हळदीची गीतं गात होत्या. नंतर लिंबातून काढण्यात आलं. अगदी आटोपशीर पद्धतीने सगळे मंगल विधी होत होते. 

शुभ्रा व रुपेशचं शुभमंगल सावधान झालं तसा मी  निर्धास्त झालो कारण नाही म्हंटलं तरी शुभ्राचं लग्न होईस्तोवर दिव्यासोबत तिच्यासमोर वावरताना मला अवघड वाटायचं. आता तो प्रश्न मिटला होता. शुभ्राची अशा रितीने तिच्या सासरी पाठवणी झाली. 

वाड्याचे मालक भाऊसाहेब पाचसहा महिन्यातून एकदा वाड्यावर चक्कर टाकायचे. यावेळी आले तेच म्हणाले की वाडा विकायचं बघतोय. घेणार असाल तर सांगा. मी म्हंटलं,"विचार करुन सांगतो." मला हा वाडा खूप आवडला होता व आतातर दिव्याच्याही मनात भरला होता. आम्हाला या वाड्याचं मालक व्हावसं वाटत होतं पण वाडा विकत घेण्याइतकी आमची आर्थिक परिस्थिती मजबूत नव्हती. 

मी माझ्या वडिलांशी वाड्याबाबत बोललो. दिव्याही तिच्या वडिलांशी बोलली. ते दोघंही आम्हाला आर्थिक सहाय्य करायला तयार झाले. त्या दोघांचे आर्थिक पाठबळ व थोडेबहुत कर्ज घेऊन आम्ही तो वाडा भाऊसाहेबांकडून खरेदी केला. भाऊसाहेबांनी आम्हाला त्यांच्याकडच्या कुलुपकिल्ल्या दिल्या. 

मुळ वास्तुला धक्का न लावता आम्ही वाड्याचं रिनोवेशन केलं. ग्रुहप्रवेशाला शुभ्राचं कुटुंब, माझे व दिव्याचे आईवडील,सगळी गावातली माणसं हजर होती. गावातल्या स्त्रियांनी गव्हाची खीर,कच्च्या फणसाची भाजी,वरणभात,वडे,काळ्या वटाण्याची आमटी,कांदाभजी,कोशिंबीर, पापड,लोणचं असा सुग्रास स्वैंपाक बनवला होता. तोही चुलीवर. मी व दिव्याने आग्रहाने सर्वांना जेवू घातलं.

(क्रमश:)

-----सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now