खेड्याकडे वाटचाल (भाग तिसरा)

Going towards village

पाऊल खेड्याकडे(भाग तिसरा)

मी बजाबाला शुभ्रा कधी येणार म्हणून विचारलं. तो सूचक हसला व येईल थोड्या दिवसात असं म्हणाला. मीही जास्त चौकशी केली नाही. 

एके दिवशी बजाबा घाम पुसत आला,"डाक्टरांनू, शुभ्रा चुलीजळ जेवान करीत व्हती. परकरान पेट घितला. पोरगी लय भाजली ओ. आता सरकारी हास्पितलात एडमिट हाय." 

मी बजाबासोबत ताबडतोब निघालो. शुभ्रा साठ टक्के भाजली होती. तिचे काळेभोर केसही जळाले होते. चेहऱ्याची एक बाजू बरीच भाजली होती. दैव बलवत्तर म्हणून डोळे वाचले होते. मी डॉक्टरांशी बोललो व काय खर्च येईल तो देईन म्हणालो.

घरी आलो पण मला फारच अस्वस्थ वाटत होतं. सोनटक्क्याच्या पाकळीसारखी शुभ्र,मुलायम काया आगीने होरपळून गेली होती. 

शुभ्राचे आईवडील गेले. वयात आली तर पाठचा भाऊ गेला. आता कुठे सावरत होती तर हा जीवघेणा अपघात. तिच्या आयुष्याची वाट काटयांची होती. मी सुट्टीच्या दिवशी शुभ्राला भेटायला जायचो. जाताना तिला फळं,फुलं घेऊन जायचो. 

दोन महिन्यानंतर बजाबा तिला घरी घेऊन आला. शुभ्रा पहिल्यासारखं हुंदडणं टाळत होती. सांध्यांतील काही जखमा ओल्या होत्या.  त्यांना ड्रेसिंग करण्यासाठी माझ्याकडे येऊ लागली पण आपला विद्रुप चेहरा ओढणीने झाकून घेत असे. मी शुभ्राशी जमेल तेवढं बोलून तिला हसतंखेळतं ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. 

शुभ्राने गमावलेला तिचा आत्मविश्वास तिला परत मिळावा याकरता मी तिला दवाखान्यात माझी मदतनीस म्हणून नेमली. तिला नियमित पगार देऊ लागलो. ती पेशंटना गोळ्या,औषधं घेण्याच्या वेळा चार चार वेळा समजावून सांगी. तिच्यातला हा सेवाभाव वाखाणण्यजोगा होता. 

एव्हाना शुभ्राला मला तिच्याविषयी वाटणारी प्रेमभावना कळली होती. 

एके दिवशी आम्ही संध्याकाळी शेतावर फिरायला गेलो होतो. शेतातल्या तळ्याच्या काठावर आम्ही दोघं पाण्यात खडे टाकत बसलो होतो. 

शुभ्राला मी विचारलं,"माझ्याशी लग्न करशील?" यावर शुभ्रा क्षणभर गप्प झाली. मग म्हणाली,"डॉक्टर, तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. भावनेच्या  भरात असा कोणताही निर्णय घेऊ नका ज्याचा तुम्हाला पुढील आयुष्यात पश्चाताप होईल. तुम्हाला माझ्यापेक्षा कित्येक पटीने सरस मुलगी भेटेल."

मी शुभ्राला म्हणालो," मी तुझ्या स्वभावावर,तुझ्या मनावर प्रेम केलय शुभ्रा, तुझ्या बाह्यरुपावर नाही. माझा निर्णय पक्का आहे. हां आता तुला मी आवडत नसेल तर..'

 यावर माझ्या ओठांवर आपलं नाजूक बोट ठेवत ती म्हणाली,"असं म्हणू नका डॉक्टर. मलाही तुम्ही फार आवडता. खरं सांगायचं तर माझंही प्रेम जडलय तुमच्यावर." आनंदाने मी शुभ्राला कवेत घेतली. आमच्या जोडीचं प्रतिबिंब संथ पाण्यावर उमटलं होतं. कितीतरी वेळ आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत होतो. 

तिन्हीसांज होऊ लागली तसं वाड्याकडे निघालो. वाटेत मी शुभ्राला सांगितलं की माझ्या ओळखीचे एक तज्ञ डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे तुझी प्लास्टिक सर्जरी आपण करुन घेऊ. हे ऐकून शुभ्राला फार आनंद झाला.

----सौ.गीता गजानन गरुड.

(क्रमशः)

🎭 Series Post

View all