खेड्याकडे वाटचाल (भाग चौदावा)
आमच्या घरापासून काही अंतरावर पालेकराची जमीन होती. त्याने ती विकायला काढली कारण तो परदेशात स्थायिक झालेला. मी ती जमीन विकत घेतली. सहाएक एकर होती. (आता पुढे..)
जमिनीत मी केशर आंब्याची रोपं लावली,काजूची रोपं लावली,फणस लावले,सागाची रोपंही लावली. शेताच्या बांधावर शेवग्याची रोपं लावली.
अर्ध्या एकरात फुलशेती केली. त्यात लाल,पांढरी,पिवळी शेवंती, गावठी गुलाब,तगर,अनंता,सोनटक्का लावले. यासाठी मी बागेत दोन गडी कायमस्वरूपी कामाला ठेवले.
रोज पहाटे सायकलिंग करत मी शेतावर जाऊ लागलो. तिथल्या गडीमाणसांसोबत किमान अडीचेक तास लाल मातीत घाम गाळू लागलो. मालक आपल्यासोबत काम करतात हे पाहून गडीही जोमाने काम करीत. तिथून येऊन आंघोळ वगैरे करुन मी ओपीडीत जायचो.
काही रुग्ण बरेच गरीब असायचे पण आहे त्या परिस्थितीत सुख मानायची,देवाला मानणारी साधीभोळी माणसं. डॉक्टरांनाही देव मानायची. यांना गौळ्याऔषधं देताना मला त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करुन प्रिस्क्रिप्शन लिहायला लागतं.
मनि ऑर्डर व शेतातल्या तुडुकमुडुक उत्पन्नावर जगणारी माणसं ही..मी औषध लिहून देत असताना त्यांच्या मनात विचार चालू असतो की बिल किती होतय,एसटीने घरी जायला पैसे पुरतील का. आपल्या देशातली उत्पन्नातली तफावत इथे प्रकर्षाने दिसून येते.
एकदा आईवडील त्यांच्या अपंग मुलीला घेऊन यायचे. तिला बसताउठता येत नव्हतं,बोलता येत नव्हतं. मुलगी मतिमंद होती. आईच्या पदरात आधीची दोन लेकरं तरी आईवडील दोघंही हिच्यावर इलाज करताना चालढकल करत नव्हते.
आई सकाळी उठली की तिला न्हाऊमाखू घालून,पावडरतीठ लावून बसवायची. मुलगी दिसायला नक्षत्रासारखी,गोरी गोरी पान. सगळं आवरता आवरता तिची आई तिला नाश्ता,जेवण भरवायची. अधेमधे तिच्याशी गप्पा मारायची.
तिला कधी जास्तच बरं नसलं तर मला घरीसुद्धा विजिटला बोलवायचे. मी आवर्जुन जायचो. तिच्या भावाबहिणींच लग्न झालं.
सुदैवाने वहिनीही प्रेमळ मिळाली. ही मुलगी वयात आली तेव्हा तिच्या पाळीची उस्तवार करण्याची जबाबदारी तिच्या आईवर पडली. आई ते सारं न वैतागता करत होती.
एका रात्री तिच्या आईची तब्येत बिघडली. जोराचा झटका आला व तिची प्राणज्योत हॉस्पिटलला नेण्याआधी मालवली. त्या मुलीला कुठे त्यातलं काय कळत होतं? ती बिचारी भिरभिरत्या नजरेने आईला शोधायची व साद घालायची.
त्यानंतर दोन वर्ष तिची साफसफाई व तिला भरवणं हे तिच्या दादावहिनीने केलं. दिडेक वर्षात ती तिच्या आईकडे निघून गेली. डॉक्टर पेशात असे बरेच ह्रदयद्रावक अनुभव येतात. वेगवेगळ्या स्वभावांची माणसं भेटतात. माणसं वाचता येऊ लागतात.
ही शेतकरी माणसं आईवडलांना ओझं समजत नाहीत. कितीही आर्थिक चणचण वा कामाची दगदग असो पण आईवडिलांना दूर लोटत नाहीत. माझ्या मते खरी मनाची श्रीमंती यांच्याकडे आहे व यांच्या सहवासात राहिल्याने मलाही बरंच शिकायला मिळालं.
सगळंच शिक्षण पुस्तकातून मिळत नाही. ही माणसं अर्धशिक्षित असली तरी निसर्गाकडून देण्याचा वसा घेताय यांनी. इथल्या मातीतून,अनुभवांतून झाडापानांतून बरंच काही शिकली आहेत ही माणसं.
एकदा एक वडील त्यांचा मुलगा झाडावरुन पडला म्हणून घेऊन आले होते. बरीच मोठी जखम होती. मी जखम धुवून टाके घातले. मुलाच्या वडलांकडे मला देण्याएवढी फी नव्हती. अवघे पन्नास रुपये होते खिशात. मी असुदेत म्हणालो पण चार दिवसांत त्यांनी स्वतः येऊन माझी पुर्ण फी चुकती केली शिवाय त्यांच्या परसवातला चिबुड व पपईही भेट म्हणून दिला मला. मी नि:शब्द होतो अशा माणसांपुढे.
केदारला गायीवासरांची फार आवड. त्याची आवड पाहून एका गावकऱ्याने आम्हाला त्याच्या गोठ्यातली एक गाय भेट दिली. मी पैसे देऊ केले पण तो काही केल्या घेईना. केदार तर घरभर उड्या मारु लागला. कपिलेसाठी घराच्या मागीलदारी तात्पुरती जागा केली. केदार तिला वैरण,पाणी दिल्याशिवाय न्याहारी करत नसे. तांबूस रंगाच कपिला काही दिवसांत आमच्या घराला रुळली. काजळ रेखाटल्यासारखे डोळे होते तिचे. शिंगही बारीक टोकदार होती.
बजाबा कपिलेसाठी हिरवीगार चार कापून आणायचा. तिच्याशी बोलायचा मग कपिलाही त्याला पाहिलं की हंबरु लागे. ती रवंथ करत बसली की कपिला असंच का करते असे बाळबोध प्रश्न केदार त्याच्या आईला विचारायचा. दिव्याही त्याला नीट समजावून सांगायची. केदारच्या शाळेतला परिसर विज्ञान हा विषय तो निरिक्षणातून शिकत होता. पाळीव प्राणी विचारले की त्याला लगेच घरातल्या मांजरी,कपिला गाय आठवायची.
कपिलाला दिवस गेले. आम्ही सर्वजण तिची काळजी घेत होतो. प्राण्यांचे डॉक्टर येऊन तिला तपासून जात होते. तिचे दिवस भरत आले तसा बजाबा रात्रीअपरात्रीही मागील पडवीत जाऊन तिची जागमाग घेई. केदार कपिलाला वासरु येणार म्हणून खुशीत होता. त्याने आईला आपण वासराचं बारसं करायचं का असं विचारलं. मग दिव्याने त्याला वासरांच बारसं करत नाहीत पण आपण त्याचं नाव ठेवू म्हणून समजावून सांगितलं.
एका तिन्हीसांजेला कपिलेला वेणा सुरु झाल्या. ती गोलगोल फिरु लागली.रात्री दहा वाजले तरी कपिला मोकळी होत नव्हती. केदार आजोबांच्या सोबत त्यांच्या खोलीत मुव्ही बघत बसला होता.
बजाबा कपिलाच्या थरथरत्या कातडीवर हात फिरवत होता व तिला थोडा धीर धर म्हणून सांगत होता. एकदाचे वासराचे पाय बाहेर आले आणि मग हळूहळू पुरं वासरु बाहेर आलं..अगदी पांढराशुभ्र जसा काय लोण्याचा गोळाच. बजाबाने वासराला ओल्या फडक्याने पुसलं व गवतात ठेवलं. उबेसाठी त्याच्यावर गवत पांघरलं.
वासंतीने न्हाणीतून दोन बादल्या गरम पाणी आणलं. कपिलेच्या पाठीमागल्या अंगाला तेल लावलं व कढत पाण्याने तिला न्हाऊ घातलं तशी कपिला हुशारली. वासराला कपिलेजवळ सोडलं. ते आईला लुचू लागलं. कपिलाही वासराला जीभेने चाटू लागली. तो क्षण डोळ्यात साठवण्यासारखा होता.
केदार सकाळी उठला तसे त्याचे आजोबा त्याला कपिलेकडे घेऊन गेले. ते पांढरंशुभ्र वासरु पाहतचक्षणी केदारने पहिला प्रश्न विचारला,"आजोबा,हे एवढं गोरं कसं आणि हे एवढ्या लवकर उभं कसं राहिलं?"
आजुबाजूची सहा महिन्यांची रांगणारी बाळं तो बघत होता. त्यामुळे आता माणसांची बाळं व प्राण्यांची बाळं यांच्या वाढीच्या टप्प्यांतला फरक तो निरीक्षणातून शिकणार होता.
कपिलेचं वासरु पाडा होतं म्हणून केदारने त्याचं नाव बजाबाला विचारुन ढवळ्या ठेवलं.
ढवळ्याची व केदारची गट्टी जमली. शाळेतून आल्यावर तो ढवळ्याशी गप्पा मारु लागला. त्याला आंजारुगोंजारु लागला. त्याचं तोंड आपल्या खांद्यावर धरुन त्याच्या डोक्यावर थोपटू लागला.
कपिलेच्या चीकाचा वासंती व बजाबाने गुळ,वेलची पूड,नारळाचं दूध घालून खरवस केला. केळीच्या पानावर देवाला व तुळशीला नैवेद्य दाखवला नंतर शेजाऱ्यांना वाटण्यासाठी बजाबाकडे केळीच्या पानात बांधून दिला. सोबत केदार होताच. प्रत्येक घरी सांगत होता,"आमच्या कपिलेला पाडा झाला. त्याचं नाव ढवळ्या. हा खरवस घ्या."
(क्रमशः)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा