May 15, 2021
कथामालिका

खेड्याकडे वाटचाल (भाग अकरावा)

Read Later
खेड्याकडे वाटचाल (भाग अकरावा)

खेड्याकडे वाटचाल(भाग अकरा)

यथावकाश दिव्याची प्रसुती झाली. आम्हाला मुलगा झाला. आता पुढे.।

 मी दुसऱ्या दिवशी दिव्याला भेटायला गेलो. एका खाटीवर दिव्या शिंत निजली होती. मी तिच्या केसांतून हात फिरवला. खूप काही बोलावसं वाटत होतं पण ती थकलेली दिसत होती. तिला विश्रांतीची गरज होती.

 तेवढ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. वाकून पाहिलं तर गुलामाने लंगोट भिजवलं होतं. रेशमी गुलाबी हात,इवलुशी पावलं, अगदी बारीक डोळ्यांनी माझ्याकडे पहात होता. 

मी उचलून छातीशी धरताच आपल्या मुठी चोखू लागला. दिव्याला चौथा महिना लागल्यापासून मी रोज रात्री तिच्या ओटीपोटावर हात ठेवून आमच्या या गोड निशाणीला अनुभवायचो. त्याची ती इवलाली पावलं तिच्या पोटावर उमटायची. मी त्याला रागे भरायचो व आईला झोपूदे,चुळबूळ करु नको असं गमतीने सांगायचो. तोही त्याच ओळखीच्या नजरेने माझ्याकडे, माझ्या आवाजाकडे बघत होता. 

इतक्यात दिव्याचे आईवडील आले. कधी आलात वगैरे चौकशी केली मग परवा संध्याकाळी दिव्याच्या पोटात दुखू लागल्यापासूनचा ते बाळ होईपर्यंतचा व्रुत्तांत त्यांनी मला सांगितला. 

सासरे मी नको नको म्हणत असतानाही चहा आणण्यासाठी बाहेर गेले.

मी बाळाला खिडकीत धरून कोवळं उन दाखवत होतो.

 तेवढ्यात दिव्याची आई म्हणाली,"मुल काय ओ मातीचा गोळा. आपण घडवू तसा घडणार. आता माझ्या मोठ्या लेकीचा लेक बघा. इकडे शहरात आहे. सीबीएसई बोर्डाच्या शाळेत नाव घातलंय त्याचं. 

फीही बरीच भरावी लागते. शाळेत स्विमिंग, कराटे,हॉर्स रायडींग,.. अशा बऱ्याच एक्टीविटीज आहेत. आपल्याला हवी ती एक्टीविटी घ्यायची. त्यात निपुण व्हायचं. मुलांचा सर्वांगिण विकास महत्त्वाचा. 

या माझ्या नातवाचं तसं नाही. तुम्हा दोघांचं आडमुठं धोरण. तुम्हाला खेड्यात राहून तिथल्या खेडुतांची सेवा करायची आहे. या माझ्या नातवाचं नुकसान होणार तुमच्या हट्टापायी."

मी काहीच बोललो नाही. बाळाचे कपडे बदलले. दिव्या उठली होती. तिने बाळाला छातीशी धरलं. बाळ चुटुचुटु दूध पिऊ लागलं. त्याने एका हाताने दिव्याचा गाऊन घट्ट धरुन ठेवला होता. 

माझा उतरलेला चेहरा पाहन दिव्याच्या लक्षात आलं की मला तिच्या मातोश्रींनी चांगलच लेक्चर दिलं असणार. तिने माझा हात तिच्या हातात घेतला व हलकेच दाबला. 

संध्याकाळी आईबाबांना घेऊन परत इस्पितळात दिव्याला व बाळाला पहायला गेलो. दिव्याची आई सांगत होती की बाळाचे कान अगदी दिव्याच्या बाबांसारखे आहेत तर माझी आई म्हणत होती की बाळाचं हसू अगदी माझ्यासारखं आहे. 

परत येताना मी विचार करत होतो,'कोण कुठली ही दिव्या! माझ्या भुतकाळातल्या प्रेमप्रकरणाचाही मान ठेवते. शुभ्राला मानाने वागवते,माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून गावातल्या गावकऱ्यांसाठी झटते. माझ्या मनाची स्पंदनं मी न सांगताही ही बेमालुमपणे ओळखते.' आता मला आस लागली होती या दोघांना घरी आणण्याची.

मी वाड्यावर आलो. माझ्या पेशंट्समधे आता बरीच सुधारणा झाली होती. शुभ्राने व दिव्याने गावकऱ्यांना स्वच्छतेच्या सवयी लावल्या होत्या. तंबाखू खाणं शरीराला किती हानिकारक आहे तसंच दारुमुळे संसाराची कशी वाताहात लागते याचं प्रबोधन केलं होतं.

हाताशी चार पैसे खेळू लागल्यामुळे गावातील महिला आहारात पौष्टीक घटकांचा वापर करु लागल्या त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यात मदत झाली. गावकरी आमच्या कामावर खूष होते.

सासुबाईंनी हिणवलं ते माझ्या मनाला लागलं होतं. मी ठरवलं, गावातल्या शाळेतच माझ्या मुलाला शिकवणार. मी गावातील शिक्षकांसोबत शाळेत गेलो. शाळेतील विजेच्या उपकरणांची फार वाईट अवस्था होती. भिंतींचा रंग उडाला होता. कौलं वानरांनी उड्या मारुन फोडली होती. 

गावकऱ्यांना मदतीसाठी हाक देताच सारे एकत्र जमा झाले. सर्वांनी मिळून शाळा झाडली. शाळेत फरशा बसवल्या. भिंतींना रंगरंगोटी केली. कौलांची शाकारणी केली. बाकांची डागडुजी केली

. नवीन बाक बनवायला सुताराकडे ऑर्डर दिली. आजुबाजूला मातलेल्या रानामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांच भय असायचं खोरी,कुदळ घेऊन सगळं फोफावलेलं रान काढून टाकलं. मुलांना खेळायला मोकळं मैदान केलं.

 नवीन पंखे,ट्युबलाईट्स आणून बसवल्या. गावातली तरुण मुलं घरचं कार्य असल्यासारखं स्वतःच्या खिशातले पैसे काढून पेमेंट करत होते. पैशासाठी कोणापुढे हात पसरावा लागला नाही.

 शाळेच्या परिसरात काही फुलझाडं व तुळसीची रोपं लावली. शाळेचा माजी विद्यार्थी दिगू पेंटर याने शाळेच्या बाहेरील भिंतीवर पाढे,थोर समाजसुधारकांची चित्रं ,माहिती लिहिली.

 ग्रामपंचायतीच्या निधीतून मैदानात मुलांसाठी घसरगुंडी,सीसॉ,झोके लावण्यात आले. 

अशी सजलीधजलेली शाळा पाहून मुलं खूप खूष झाली.
शिक्षकांनाही सांगितलं की कधीही कोणतीही अडचण आली,गरज भासली तर त्वरीत सांगा पण शाळेचं नाव राज्यस्तरावर गाजायला पाहिजे. गुणवंत विद्यार्थी या शाळेतून शिकून बाहेर पडले पाहिजेत. 

(क्रमश:)

सौ.गीता गजानन गरुड.