खेड्याकडे वाटचाल (भाग दहावा)

Going towards village.

खेड्याकडे वाटचाल (भाग दहावा)

मला आईसोबत स्वैंपाक करायची आवड होती. माझ्या या आवडीचा मला हॉस्टेलमध्ये रहाताना व आता दिव्याचे डोहाळे पुरवताना पुरेपुर फायदा झाला. आता पुढे..

दिव्याचं रुटीन अगदी व्यवस्थित चालू होतं. सोबत समाजसेवाही चालू होती. शुभ्राची लेक शीतलही वर्षाची झाली. आम्ही तिच्या वाढदिवसाला जाऊन आलो.

 दिव्याची आई दिव्याला नेण्यासाठी म्हणून आमच्या घरी आली. बजाबा व वासंती तिची चोख व्यवस्था पहात होते.  तरीही तिला आमचं गावात प्रेक्टीस करणं खटकत होतं.

 तिचा थोरला जावई डेंटिस्ट होता. त्याचा ठाण्यात दवाखाना होता. पॉश लोकेलिटीमुळे खोऱ्याने पैसे कमवत होता. दिव्या व माझी दोघांची मिळून जी मासिक मिळकत होती त्याच्या कित्येक पटीने अधिक मिळकत तिच्या थोरल्या जावईबापूंची होती. 

हल्लीच त्यांनी माझ्या सासूसासऱ्यांना युरोपटूरही घडवून आणली होती. एकंदर पाहता माझ्या सासुबाईंच्या द्रुष्टीने मी एक कुचकामी जावई होतो. सासऱ्यांच्या मनातही तसंच होतं पण निदान ते माझ्यासमोर तरी गोड बोलायचे. वाडा खरेदी करताना त्यांचे घेतलेले पैसे आम्ही दर महिन्याला थोडे थोडे फेडत होतो व तो हिशेब वहीत लिहून ठेवत होतो. 

दिव्याच्या आईने दिव्याला हरतर्हेने समजावलं की गावातलं चंबुगबाळं गुंडाळा नि शहरात प्रेक्टीस सुरु करा पण दिव्या तिच्या निर्णयावर ठाम होती. 

दिव्या तिच्या आईसोबत माहेरी गेली. जाताना मला कितीतरी सूचना देत होती. तिचा जीव वाड्यातच घुटमळत होता. दिव्याच्या ओटीभरणीच्या समारंभाला मी पुण्याला त्यांच्या घरी गेलो. दिव्या फारच सुंदर दिसत होती. गरोदरपणाचं तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. 

माझ्या आईने साडीचोळी,फळाफुलांनी दिव्याची ओटी भरली व तिला आशिर्वाद दिला. पण आईच्या लक्षात आलं की दिव्याची आई जेवढी तिच्या मोठ्या जावयाची सरबराई करते,जेवढं त्याच्याशी गोड बोलते तेवढं ती माझ्याशी चांगलं वागत नाही. माझ्या आईचं मन तिच्या या पक्षपातामुळे खट्टू झालं.

 आईलाही आतासं वाटू लागलं होतं की त्यावेळी तिने उगाच शुभ्रा व माझ्या लग्नाला विरोध केला होता. आईच्या मनातली अपराधीपणाची भावना आईने मला बोलून दाखवली. 

मी आईचा हात हातात घेऊन तिला म्हंटलं,"आई,जे झालं ते झालं. काही गोष्टी आपण नाही बदलू शकत. शुभ्रा व दिव्या आता चांगल्या मैत्रिणी झाल्याहेत. शुभ्राचं लग्न होऊन तिला शीतल नावाची गोड कन्या आहे. शुभ्रा दिव्याला खूप मदतही करते. तेव्हा तू उगाच मनाला टोचणी लावून घेऊ नकोस." 

मी दिव्याचा निरोप घेऊन आईबाबांसह आमच्या शहरातल्या घरी गेलो. दोन दिवस त्यांच्यासोबत राहिलो. आईने मला पुरणपोळ्या खाऊ घातल्या. तिच्या हातच्या मऊसूत पुरणपोळ्या व कटाची आमटी मला फार प्रिय. तिला झेपत नसतानाही तिने मोलकरणीच्या मदतीने माझे लाड पुरवले. 

माझ्या लहानपणीही आईबाबा जास्तीतजास्त वेळ दवाखान्यात असायचे. आई बालरोगतज्ज्ञ असल्याने मलाही तिच्यासोबत सुट्टीला दवाखान्यात जायला आवडायचं. सगळे चिंटूपिंटू आपापल्या आईबाबांसोबत आलेले असायचे.  माझ्या सोबतीला घरात एक मावशी ठेवली होती. तिच्या बऱ्याचदा दांड्या असायच्या. 

थोडा मोठा झालो तसा मी घराची चावी खिशात ठेवू लागलो. दार उघडून घरात शिरायचो. मावशीने रजा घेतली तर घरात कोणी नसायचं. सकाळी आईने बनवलेला गारढोण वरणभात जेवायला कंटाळा यायचा. मग आईनेच मला अन्न गरम करायला,पापड भाजायला,पोहे करायला शिकवलं. माझी स्वैंपाकातली रुची वाढत गेली. मी कधी मावशींकडून,कधी आईकडून एकेक पदार्थ शिकू लागलो. 

 दोन रात्री आईबाबांसोबतच झोपलो. आईबाबांना गावातल्या गमती सांगितल्या. बाबा म्हणाले,"तुझ्यासारखं
माझ्याही मनात होतं खेड्यात व्यवसाय करावा पण धीर झाला नाही. तू मात्र धीट निघालास. तुझं म्हणणं खरं करुन दाखवलंस. पैसा काय सगळेच कमवतात रे पण त्यासोबत तू आशिर्वादाची पुंजी गोळा करत आहेस व दिव्या तुला या कामात खंबीर साथ देत आहे."

मी म्हणालो,"हो बाबा,दिव्यामुळेच मला काम करताना हुरुप येतो. तीही तेवढ्याच आत्मियतेने तिचं कार्य करते." 

मी वाड्यावर परतताना आईने मला लाडू,चकल्या,लोणची बांधून दिली. अर्थात तिथे वासंती कामाला असल्याने तिला माझी तेवढी चिंताही नव्हती.

मी पुन्हा स्वतःला कामात गुंतवून घेतलं. गावकऱ्यांसोबत वेळ मजेत जायचा. काही गावच्या जत्रा,दशावतारी नाटकंही पाहिली. दशावतार कोकणात फार लोकप्रिय आहे.

 दशावतार या नाट्यप्रकारात कलाकार विष्णूच्या दहा अवतारावंर(मत्स्य,कूर्म,वराह,नरसिंह, वामन,परशुराम, राम,क्रुष्ण किंवा बलराम,बौद्ध,कल्की) आधारित नाटक करतात. 

साधारण कार्तिक पौर्णिमेपासून ते चैत्र महिन्यापर्यंत हे नाट्यप्रयोग गावच्या जत्रांतून सादर केले जातात. त्यांना धयकाले म्हणतात

. यात स्त्रीपात्रही पुरुष कलावंतच रंगवतात. या कलाकारांकडे कोणतीही लिखित संहिता नसते.

 केवळ आपल्या ज्ञानाच्या जोरावर व शब्दसामर्थ्यावर हे कलाकार आपली भूमिका साकारतात. युद्धप्रसंगी हे कलाकार विशिष्ट असा पदन्यास करतात. तो बघण्यासारखा असतो. यातलं संकासूर हे पात्र विविध अंगाने विनोदनिर्मिती करतं म्हणून बाळगोपाळांना भरपूर आवडतं. 

दशावतारी कलाकारांची कला खरंच वाखाणण्याजोगी आहे पण त्यांच्या कलेचं हवंतसं कौतुक  झालं नाही तरी ते आपली ही कलासंस्कृती आवडीने जोपासतात.

यथावकाश दिव्याची प्रसुती झाली. आम्हाला मुलगा झाला. मी दिव्याला व बाळाला भेटायला गेलो.

(क्रमशः)

------सौ.गीता गजानन गरुड.

🎭 Series Post

View all