गोडवा पुरणपोळीचा

No One Can Understand Women's Mind
कथेचे नाव:गोडवा पुरणपोळीचा 
विषय: स्त्रीला समजून घेणं खरंच कठीण असतं का हो?
फेरी: राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा


"अहो,बाईसाहेब उठा आता."अवनीच्या तोंडावरुन मोरपीस फिरवत अनुप म्हणाला.

तिला मोरपीसाने गुदगुल्या होत होत्या. तिने हाताने मोरपीस ढकलून दिला आणि कूस बदलून ती परत झोपून गेली.

अनुपने परत तिच्या तोंडावरुन मोरपीस फिरवला.

"मनू,गप्प बस मला झोपू दे."

"ठीक आहे तू झोप.मी चाललो खाली पहिल्याच दिवशी आजीचा ओरडा खायचा का?"

आजीच नाव ऐकलं आणि अवनी पटकन उठली.आपण माहेरी नाही, तर सासरी आहोत  याचं तिला भान आलं.

"अनुप,मला लवकर उठवायच ना.पहिल्याच दिवशी उशीर झाला,तर माझी काय इमेज बनेल?"

"तू लवकर उठायचं ना." अनुप हसत म्हणाला.

"ही सगळी तुझी चूक आहे.मला तू काल झोपू दिलं नाही ना. मग माझी झोप पूर्ण झाली  नाही." ती बोलून तर गेली,पण लाजून लाल झाली.

"अरे वा आमच्या लवंगी मिरचीला लाजता पण येतं.मला तर माहितचं नव्हतं.मला वाटायचं तुला फक्त भांडता येतं."तो तिचे केस उडवत म्हणाला.

"काही पण काय बोलतोस.मी काय तुझ्याशी नेहमीच भांडते का?बरं ते जाऊदेत,किती वाजले?"

"सात"

"सात म्हणजे फारसा उशीर नाही झाला."

"आपल्यासाठी नाही,पण आजीसाठी हा उशीरच आहे. तिचा दिवस पाचलाच सुरु होतो. तू जा लवकर तयार हो.सगळे आपली वाट पाहत असतील."

ती पटकन तयार झाली. मोरपंखी कलरची  सोनेरी काठाची साडी घातली. हातभर  बांगड्या,डोक्यात सिंदूर,आधीच मोठे असलेले डोळे काजळ घालत असल्याने अजून पाणीदार आणि टपोरे दिसत होते.

"किती सुंदर दिसतेस.असं वाटतं आताही इथंच तुझ्या जवळ बसावं आणि..."

"ओ रोमँटिक हिरो,चला लवकर खाली,नाही तर उशीर होईल."असं म्हणून अवनी खाली गेली.

"अवनी बेटा खूप सुंदर दिसते." सुप्रियाने म्हणजेच अवनीच्या सासूने अवनीला दृष्ट लागू नये,म्हणून काजळची तीट लावली.

"अवनी लग्नातही तू खूप सुंदर दिसत होती. मला वाटलं माझीच दृष्ट लागते की काय? "

"काहीतरीच काय आई."

"खरंच बेटा,खूप सुंदर दिसत होतीस. मी नशीबवान आहे. तुझ्या सारखी सून मला भेटली म्हणून. लग्नात सगळे तुझे कौतुक करत होते."

"नशीबवान तर मी आहे,तुमच्या सारख्या प्रेमळ सासूबाईंचा सहवास मला लाभेल.लग्नाआधी सासू या नावाची खूप भीती  होती.पण तुम्हाला पाहिलं आणि ही भीती कुठल्या कुठे गेली."

"तुझ्यासाठी या घरातील माणसं नवीन आहेत, त्यामुळे तुला थोडं रुळायला वेळ लागेल, पण बिनधास्त रहा. कसलंही दडपण घेऊ नको. कुणाचा फारसा परिचय नसला तरी अनुपला तर चांगलंच ओळखतेस ना?"

"आई अनुपच्या तोंडून तुमच्या विषयी इतकं ऐकलं की, तुमचा माझा परिचय नसेल असं वाटतं नाही."

सुप्रियाने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला."जा घरातील देवाच्या पाया पड त्यानंतर घरातील सर्वांच्या पाया पड. सगळ्यांसाठी काहीतरी गोड पदार्थ बनव."

"हो आई."असं म्हणून ती देवघरात गेली.

अनुपची आणि तिची ओळख जुनिअर कॉलेज पासून होती.आधी दोन तीन वर्ष फक्त मैत्री होती.नंतर ते कधी प्रेमात पडले ते त्यांनाच कळलं नाही. खरं तर त्या दोघांचा स्वभाव वेगळा होता.अनुप तोलून मापून बोलणारा, तर अवनी बोलकी.कोणती ही गोष्ट मनात ठेवणारा अनुप.तर धाडकन मनातलं खरं सांगणारी अवनी, पण तरी ते एकमेकांच्या प्रेमात पडले.पडले कसले ते तर आकंठ बुडाले होते.

अवनीच्या घरी फक्त तिची आई व लहान बहीण व पप्पा रहात असे. अवनीचे पप्पा तिचा खूप लाड करायचे, म्हणेल ती गोष्ट हजर करायचे. तीचं आईपेक्षा पप्पां बरोबर खूप मस्त बॉण्डिंग होती. ती त्यांच्या सोबत सगळं शेअर करायची.अगदी कॉलेज मधील प्रत्येक गोष्ट. अगदी अनुपची पहिली भेट, मैत्री वगैरे.आई व पप्पांनी ग्रीन सिग्नल दिला होता.

अनुपच्या घरुन फारसा विरोध नव्हता. आजीला पसंत पडायला हवी होती,कारण आजीच सर्वेसर्वा होती. घरातील सगळे निर्णय तीचं घेत असे. बाकी कसला अडथळा येणार नाही याची अनुपला खात्री होती.

मोजक्या पाहुण्यात लग्न रजिस्टर पध्दतीने केलं. घरात पाच सहा दिवस पाहुणे होते. नंतर सगळे गेल्यावर घरात खूप शांत शांत वाटतं होतं.

सध्या अनुपवर ऑफिसच्या कामाचा लोड पडल्यामुळे बाहेर गावी जाण्याचा प्लॅन पुढच्या आठवड्यात ढकलला होता. अनुप आजपासून जॉबला जाणार होता.

अवनी लवकरच या घरी रुळली होती. घरात जास्त माणसे नव्हते. अनुपचे आई,वडील आणि अनुपची आजी.अनुप व त्याच्या आईच्या सांगण्यावरुन तरी आजीचा स्वभाव कडक वाटत होता.

आज होळीचा सण होता. घरात पुरणपोळीचा बेत होता.अवनीने अनुपला आधीच सांगितलं होतं की, मला कामापुरतं जेवण बनवता येत. बाकीचं फारसं काही येत नाही. मी हळूहळू शिकेन.

या वर्षी लग्न झालं, म्हणून होळी पेटवणार नव्हते,पण सणाचा स्वयंपाक मात्र करणार होते.सुप्रियाने पुरणपोळ्या केल्या होत्या.सगळं टेबलवर मांडून ठेवलं होतं.

"अवनी,आजीने जर विचारलं,तर तुचं पुरणपोळ्या केल्या म्हणून सांग. नाहीतर उगीच चिडचिड करायच्या, तुझ्या सूनेला साध्या पुरणपोळ्या करता येत नाही,म्हणून माझ्यावरचं ओरडायच्या." 

"आई मी असं खोटं कसं सांगणार,त्यांना कधी  ना कधी कळणारच."

"नंतरच नंतर बघू.आता कळलं तर त्या जेवणार सुद्धा नाही."सुप्रिया म्हणाली.

अवनी काहीच बोलली नाही.

सगळे जेवायला बसले.
सुप्रियाने सांगितलं,
"आज सगळा स्वयंपाक अवनीने केला बरं."

सगळे आवडीने जेवले. अवनीला मात्र खोटेपणाचं दडपण येत होतं.

जेवण झाल्यावर आजीने तिला जवळ बोलावले.
"बाळ रोजचा स्वयंपाक तर तू छान करतेस, पण आज पुरणाचा स्वयंपाकही तू छान केलास. मस्त पुरणपोळ्या बनवल्या होत्या. मन तृप्त झालं."

आजीने आपल्या बटव्यातून चांदीचा छल्ला काढून दिला.
"तुझ्यासाठी माझ्याकडून छोटीशी भेट."

अवनी छल्ला हातात घेऊन म्हणाली,
"आजी,मी या पुरणपोळ्या बनवल्या नाही. आईंनी बनवल्या. बाकी स्वयंपाकात मदत मात्र मी केली."

"म्हणजे तू पुरणपोळ्या बनवल्या नाहीस. मग सुप्रिया तू खोटं का बोललीस?आतापासून  सूनेला पाठीशी घालायला लागलीस का?"

सुप्रिया काही बोलणार तेवढ्यात अवनी म्हणाली,
"आजी."

अनुप पटकन पुढे येऊन म्हणाला,
"आजीला उलट उत्तर दिलेले आवडत नाही. तू काहीचं बोलू नकोस."

"आजी,मला माहिती आहे,नव्या सूनेने आज  पुरणपोळ्या बनवायला हव्या होत्या,पण मला खरंच येत नाही.याचा अर्थ असा नाही की, मी कधीच बनवणार नाही.आधी कॉलेजमुळे वेळ नसायचा, नंतर लगेच जॉब लागला, स्वयंपाक शिकायला फारसा वेळ भेटला नाही. तसं मला कामापुरता स्वयंपाक येतो,पण पुरणा वरणाचा येत नाही. मी शिकायचा प्रयत्न करेल. तुम्ही शिकवा, मी नक्की शिकेन. काही न करता श्रेय घ्यायला मला आवडणार नाही. हा घ्या छल्ला परत घ्या. मी जेव्हा करेन तेव्हा द्या."
नम्रपणे अवनी म्हणाली.

आजी काहीच बोलल्या नाही.त्या पटकन त्यांच्या रुममध्ये गेल्या.

"झालं आता महायुद्धाला सुरवात होणार. आधी आजी आणि आईचं असायचे,त्यात अवनीची भर पडणार." डोक्यावर हात मारत अनुप पुटपुटला.

"इतक्या दिवस युद्ध होत नव्हतं, तर शीतयुद्ध व्हायचं कारण, आजीचं तोंड चालू असायचे आणि आई शांत बसायची.आता मात्र ही लवंगी मिरची शांत बसणार नाही."अनुप मनात म्हणाला.

सुप्रियाला भीती वाटत होती.सासूबाई अवनीवर रुसून बसतील. बिचारी एकतर घरात नवीन आहे,उगीच बावरुन जाईल.
सुप्रियाला आठवलं की, तिच्या हातून असंच एकदा चुकलं होतं महालक्ष्मीच्या स्वयंपाकात काहीतरी करायचं राहून गेलं होत. तेव्हा त्या तिला खूप बोलल्या होत्या.
एकदा अनुप न सांगता शाळा बुडवून  मित्रां बरोबर बाहेर गेला होता,त्याला एक दिवस आजीने जेवायला दिलं नव्हतं. बरं नातवावर एवढा जीव की, त्या सुद्धा उपाशी राहिल्या होत्या. अनुपला याचाच त्रास झाला होता. स्वतः उपाशी राहिल्याचं दुःख त्याला नव्हतं, पण आपल्या मुळे आजी उपाशी राहिली याचं जास्त वाईट वाटलं होतं.

"आजीचा स्वभाव तसा कडक त्यांचे नियम मोडलेले त्यांना चालत नव्हतं.अवनीला त्यांचा स्वभाव अजून माहित नव्हता.आता रुममध्ये दार लावून बसतील."
सुप्रिया मनात म्हणाली.

अवनीला वाईट वाटलं,आपल्या मुळे आजीला  राग आला.

"अनुप,माझं काय चुकलं? मी तर खरं बोलले." अवनी म्हणाली.

अनुप म्हणाला,
"अवनी मी आजीला समजावेल. तू वाईट वाटून घेऊ नको."

तेवढ्यात आजी परत येऊन म्हणाल्या,
"अवनी इकडे ये."
ती घाबरतच त्यांच्या जवळ गेली.

"हात पुढे कर."त्यांनी तिच्या हातात नाजूक नेकलेस दिला.

"आजी,हे काय आहे?" अवनीने विचारले

"हे तुझ्यासाठी. तू खरं बोललीस.खरं बोलायला धाडस लागतं. तू पुरणपोळी बनवली नाही, हे मी पहिल्या घासातचं ओळखलं होतं. सुप्रियाच्या हाताची चव मी ओळखते. तू काय बोलतेस? हे मी पाहत होते.

"सुप्रिया तशी चांगली आहे,कामसू आहे, पण घाबरट आहे. माझ्या रागाची तिला नेहमी भीती वाटते.मी रागवेल म्हणून, नेहमी अशी सारवा सारव करत असते. मला तिचा मुळूमुळू स्वभाव आवडत नाही. माणसाने कसं रोखठोक असावं. सून नाही पण, नातसून तरी माझ्या सारखी  आहे छान वाटलं. आपलं छान जमणार बघ. त्या समाधानाने हसल्या.

अनुपला वाटलं होतं की, आईला आजीने नाव ठेवलं, तर तिला राग येईल,पण आई हसत होती.तिला तिच्या सूनेचं कौतुक केल्याचं समाधान वाटत होतं. महायुद्धाच्या ऐवजी ही तर महायुती झाली. खरंच या बायकांच्या मनातलं काही कळत नाही.

समाप्त
©®वर्षा लाड
टीम: अहमदनगर