गोडवा - नात्यांमधला, मनामनातला - भाग 5 (अंतिम)

नात्यांमधल्या माधुर्याची एक कहाणी


गोडवा - नात्यांमधला, मनामनातला - भाग 5 (अंतिम)
© स्वाती अमोल मुधोळकर


मुग्धा वर्षाताईंनी दिलेल्या सगळ्या वस्तू घेऊन आपल्या खोलीत गेली. भरजरी प्रकार फारसे आवडत नसतानाही तिला ही चटकदार दिसणारी सिल्कची साडी मात्र फारच आवडली.

पण मुग्धा दागिने घालेल की नाही, वर्षाताईंचे मन साशंक होते. मनात एक धाकधूक ठेवूनच वर्षाताई स्वतः तयार होऊन हॉलमध्ये तिची वाट बघत बसल्या होत्या.

\"थोडया वेळात बायका यायला लागतील आता.\" त्या मनाशी म्हणाल्या.

साडी नेसून ते सर्व दागिने घालून मुग्धा सासूबाईंच्या जवळ गेली.

"आई, कशी दिसतेय मी? हा मुकुटसुद्धा लावून द्या ना." ती उत्फुल्ल चेहऱ्याने अगदी उत्साहाने त्यांना विचारत होती.

तिच्याकडे बघताच वर्षाताईंना खूप आनंद झाला.

"तू ... घातलेस हे दागिने... मला वाटलं घालतेस की नाही. तुला आवडतील की नाही." त्या आनंदाने तिच्याकडे बघत म्हणाल्या.

"हो ऽऽऽ, अगदी सगळे दागिने घातलेत मी. खूप सुंदर आहेत दागिने. फक्त मुकुट तेवढा माझा मला लावता येईना. सांगा ना मी कशी दिसतेय."

"अग सूनबाई, एकदम लक्ष्मीसारखी सुंदर आणि गोड दिसते आहेस ग. तुला सांगतो , बघ आज तुझी सासू एवढी आनंदात आहे ना की गेल्या कित्येक दिवसात मी तिला असे पाहिले नव्हते. तुला माहिती आहे? गेले दोन आठवडे अथक मेहनत करून तिने हे दागिने तुझ्यासाठी स्वतःच्या हाताने तयार केले आहेत आणि म्हणते कशी,

"अहो, मी मुग्धाला सरप्राईज देणार आहे. तिला आवडेल ना? ती घालेल ना?" " विवेक म्हणाले.

मुग्धाने वर्षाताईंना मिठी मारली.

"तुम्ही स्वतः बनवलेत हे? वॉव! कित्ती सुंदर झालेत! आई, सॉरी मी तुम्हाला दुखावले." तिने कान पकडला.

"तुम्हाला एक गंमत सांगू? मी सुद्धा तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलं आहे. डोळे बंद करा बघू. "

तिने त्यांचा हात आपल्या हाताने पुढे करत त्यावर तिने आणलेली साडी ठेवली. तिळगुळाचा एक लाडू आपल्या हाताने त्यांना भरवला आणि नमस्कार केला. वर्षाताईंचे डोळे पुन्हा भरून आले.

"हे काय आई? मी सॉरी म्हणाले ना. आता विसरून जा ना ते प्लीज. "

"अग वेडे, ते तर मी कधीच विसरले होते. हे आनंदाचे अश्रू आहेत. तुला नाही कळणार आताच. खूप सुंदर दिसते आहेस तू."

तेवढ्यात दाते वहिनी आणि सोसायटीतल्या काही इतर बायका आल्या.

"अगबाई, किती सुंदर दिसते आहेस मुग्धा! लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीच्या शुभेच्छा बेटा." दाते वहिनी खुल्या दिलाने कौतुक करत होत्या.

"थँक यू काकू. खरं म्हणजे आईंनीच ही साडी आणि हे दागिने दिलेत. दागिने तर त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेत. सुंदर झालेत ना?" मुग्धा तिळगुळाचे लाडू सर्वांना देत म्हणाली.

"अगबाई, खरच की काय? नशीबवान आहेस बरं का पोरी. भाग्य लागतं अशी सासू मिळायला." दुसऱ्या एक काकू म्हणाल्या.

"आणि अशी सून मिळायला देखील भाग्यच लागतं बरं का! नोकरी करूनसुद्धा आजची सगळी तयारी, हे तिळगुळाचे लाडू हे सर्व तिनेच केलंय. हे बघा, तिनेही मला हे सरप्राईज दिलंय. तिच्या स्वतःच्या पैशातून स्वतः जाऊन साडी आणली संक्रांतीची माझ्यासाठी." वर्षाताईही कौतुक करताना थकत नव्हत्या.

"अहो वहिनी, काय सांगू तुम्हाला, मी हे दागिने बनवायला तर घेतले, पण सारखी धाकधूक होती हो, की हिला आवडतील की नाही, ती घालेल की नाही?" वर्षाताई.

"आई, अहो मला इतके आवडलेत की मी फक्त आजच नाही तर मम्मीकडे आणि ताईंकडे हळदीकुंकू होईल ना तेव्हाही घालणार आहे हे दागिने आणि दिमाखात सांगणार की माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी प्रेमाने स्वतःच्या हाताने बनवलेत म्हणून."

सर्वांचे उखाणे वगैरे घेऊन झाल्यावर, फराळ वगैरे करून सगळ्या घरी निघाल्या. जात जाता दाते वहिनी म्हणाल्या,

"सुरेख झाला ग कार्यक्रम! असाच तिळगुळासारखा गोडवा कायम राहू देत हो तुम्हा दोघींच्या नात्यांमध्ये. "

वर्षाताई आणि मुग्धा दोघीही समाधानाने हसल्या.

तिळगुळाने नात्यातला आणि मनातला गोडवा कितीतरी पटींनी वृद्धिंगत केला होता.


समाप्त.

संपूर्ण कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.


तर बघितलेत ना? दोघीही आपापल्या ठिकाणी, आपापल्या परिस्थितीत योग्य होत्या. नात्यात जरी मतभेद झाले तरी फार काळ ताणून न धरता दोघांनीही एकमेकांना समजून घेत , मतभेदाचे मनभेद न होऊ देता वेळीच मतभेद मिटवले , त्या दिशेने दोघांनीही प्रयत्न केले, की नात्यातला गोडवा कायम राहतो.

कशी वाटली ही कथा? लाईक, कंमेंट करून नक्की कळवा.

🎭 Series Post

View all