गोडवा - नात्यांमधला, मनामनातला - भाग 4

नात्यांमधल्या माधुर्याची एक कहाणी


गोडवा - नात्यांमधला, मनामनातला - भाग 4
© स्वाती अमोल मुधोळकर


वर्षाताईंचे डोळे क्षणभर भरून आले. पण त्यांनी लगेच मनात येऊ घातलेल्या विचारांना झटकून टाकले.

\"यांना काय जातंय भाजून ठेव, करून ठेव म्हणायला. इथे धावपळ , तडफड माझी होतेय. कशाला हवंय एवढं सगळं. एवढंच आहे तर स्वतः करायचं असतं.\" मुग्धाला वाटत होतं.


पण वर्षाताईंचे तर दागिन्यांचे थोडेसे काम राहिले होते. एक शेवटचा हात त्यावरून फिरवायचा होता. मार्केटमध्ये जाऊन साडी तर त्यांनी आणली होती पण तिला फॉल पिको करायला, ब्लाऊज शिवायला टाकलेले होते , तिथून आणणे , रांगोळी वगैरे आणणे इत्यादी कामे त्यांना होती आणि हे सगळे मुग्धा परत यायच्या आत व्हायला हवे होते. त्यामुळे त्यांना तसा वेळ मिळणार नव्हता.

वर्षाताईंनी अत्यंत नाजूकपणे आणि कलात्मकतेने हलव्याचे दाणे लावून सुंदर डिझाईन असलेले गळ्यातील नेकलेस, मोठे हार, हलव्याच्या बांगड्या, भांगात लावायची बिंदी, कंबरपट्टा, मुकुट, बाजूबंद इत्यादी सगळे दागिने स्वतःच्या हाताने बनविले होते. तेरा तारखेला, संक्रांतीच्या आदल्या दिवशी सगळा सेट तयार झाला, तशा वर्षाताई स्वतःशीच खूष होत हसल्या.

"झाला बाई सेट. झालं सगळं पूर्ण. " त्या मनाशी म्हणाल्या. त्यांना आनंदात बघून विवेक म्हणजे सुजयचे बाबा हसून म्हणाले,

"झालं का बाईसाहेबांच्या मनासारखं. किती ही खुषी दिसतेय चेहऱ्यावर. फार लाडाची आहे बुवा सूनबाई!"

"हो मग, आहेच ना. " वर्षाताई हसून म्हणाल्या.
"पण अहो ती घालेल ना हे?"

"घालेल ग." विवेक म्हणाले.

ऑफिसमध्ये गेल्यावर काही वेळाने मुग्धा शांत झाली. तिला थोडे वाईटही वाटले. राहून राहून तिच्या डोळ्यासमोर वर्षाताईंचे भरून आलेले डोळे दिसत होते. त्यांच्याजागी आपली आई असती तर, आपण असेच वागलो असतो का? तिने विचार केला. मनाशी काहीतरी ठरवले. संध्याकाळी ती घरी आल्यावर दोघींनी तिळगुळाचे लाडू बनविले.

संक्रांतीच्या दिवशी तिने लवकर उठून सकाळीच हॉल आवरून घेतला. बैठकीची तयारी करून ठेवली. फुले आणून फुलदाणीत छानशी रचना करून ठेवली, चांदीच्या तबकात वाट्या ठेवून तिळगुळाचे डबे टेबलावर काढून ठेवले. अत्तरदाणी ठेवली. रांगोळी काढली. स्वयंपाक करून डबा घेऊन ऑफिसमध्ये गेली. दुपारी अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली आणि बाजारात जाऊन वर्षाताईंसाठी एक सुंदरशी साडी घेऊन मग घरी आली.

ती घरी आली तर वर्षाताईंनी फराळाची तयारी सुरू केलेली होती. त्यात मदत करत ती तिने पूर्ण केली. त्यांनी तिला खोलीत बोलावले आणि तिच्या हातावर त्यांनी आणलेली काळी लाल भरजरी काठापदराची सुंदर साडी आणि एका मखमली बॉक्समध्ये छान मांडून ठेवलेले हलव्याचे दागिने ठेवले.

\"मला माहिती आहे की तुला नाजूक दागिने आवडतात. पण आजच्या दिवशी हे दागिने घालशील ना?\" त्या मनातच म्हणाल्या.

क्रमशः

आता वर्षाताईंना मुग्धाच्या आवडीची साडी आवडेल की नाही?

नेहमी नाजूक दागिनेच वापरणारी मुग्धा हे हलव्याचे दागिने घालेल का ? की त्यावरून पुन्हा काही वाद निर्माण होतील?
बघू या पुढील भागात.

🎭 Series Post

View all