गोडवा - नात्यांमधला, मनामनांतला - भाग 3

नात्यांमधल्या माधुर्याची एक कहाणी


गोडवा - नात्यांमधला, मनामनातला - भाग 3
© स्वाती अमोल मुधोळकर


" मुग्धा, राग आल्यावर माणूस रागाच्या भरात जास्त बोलतो आणि त्याने मने दुखावली जातात. राग आला असेल तरी त्यावेळी शक्यतो जास्त बोलू नकोस. जरा शांत झाल्यावर तुझा मुद्दा आणि दृष्टिकोन शांत स्वरात समजावून सांग. चांगल्या स्वभावाच्या आहेत तुझ्या सासूबाई. ऐकतील त्या. एकमेकींना सांभाळून घेत पुढे जा. जसा तुला कधीकधी माझा राग येतो, पण तो तेवढ्यापुरता असतो, कायम मनात ठेवून राहत नाहीस, विसरून जातेस ना? मनातून प्रेमच करतेस ना माझ्यावर? तसेच त्यांच्याही बाबतीत राग मनात धरून ठेवू नकोस. तिथल्या तिथेच सगळे विसरून जायचे. आपण प्रेम दिले की समोरचाही प्रेम देत असतो बाळा." स्नेहाताईंनी सांगितले होते.


त्यामुळे काही न बोलता तिने शक्य तितक्या पटकन दुसरी भाजी करायला घेतली. चिरली.

तोवर वर्षाताई आल्याच. म्हणाल्या,
"मी फोडणी देते भाजीला, जा तू तयार हो. "

त्यांनी भाजीला फोडणी दिली आणि थोड्या वेळाने भाजी झाल्यावर मुग्धा आणि सुजय निघाले. मुग्धा मनात प्रार्थना करतच होती की आता बॉसने ओरडू नये . पण जे होणार होते तेच झाले होते.

मुग्धाचा तर पूर्ण दिवस खराब गेला होता. तिची चूक नसताना तिला ऐकून घ्यावे लागले होते.

तेरा तारीख उजाडली होती. सकाळी स्वयंपाक झालाच होता, तेवढ्यात वर्षाताईंनी साधारण पाऊण किलो तीळ मुग्धासमोर ठेवले.

"मुग्धा , हे जरा पाहून घे आणि मग भाजून ठेव एवढे."

मुग्धाच्या पोटात गोळाच आला.

"आई, संध्याकाळी आल्यावर केले तर नाही का चालणार? नाहीतर येताना विकत आणू का मी वड्या? "

"छे ग, विकत नको. घरच्याच वड्या, लाडू छान वाटतील , तेच करू या. दोघी आहोत ना, होतील करून. मुद्दामच तर आणायला लावलेत मी बाबांना घाईने. अग संध्याकाळी तुम्हाला आधीच उशीर होतोय यायला. संध्याकाळी त्याचे लाडू वळायचे आहेत. आता भाजून ठेवलं तर संध्याकाळी जरा लवकर आटपेल. उद्या संक्रांत आहे ना , तर संध्याकाळी हळदीकुंकू ठेवलंय आपल्याकडे. कालच बायकांना निमंत्रण देऊन ठेवलंय मी." वर्षाताई.

"काय? उद्याच आहे हळदीकुंकू आपल्याकडे? "

"अग हो, तुझी पहिलीच संक्रांत ना यावर्षी. मग त्या दिवशी केलं तर जास्त छान वाटतं. उद्याचा दिवस थोडं लवकर येशील घरी." वर्षाताई.

\"अहो आई, लवकर येण्याचे कसे मॅनेज करू? किती दमलेय मी आठवडाभर घाईघाईने ऑफिसचे , घरचे सगळे काम उरकताना. काय सांगू तुम्हाला. एकतर बॉसने कालच एवढं रागावलंय. अन एवढं सगळं आता करत बसले तर आजही उशीर होणार .\" मुग्धा मनातच विचार करत होती. रागच आला होता जरा तिला.

"मला विचारायचं तरी असतं ना आई एकवेळ. ", ती जरा घुश्श्यातच म्हणाली. आणि फणकाऱ्याने तिने तीळ निवडायला घेतले.

काही वेळात ते निवडून भाजून ठेवले. आज तिला नाश्ता करायला वेळच उरला नव्हता. तोवर वर्षाताईंनी दोघांचेही डबे भरले होते. मुग्धासाठी एका डब्यात उपमा भरून दिला .

"गाडीत बसल्यावर, जाताना हे खाऊन घे बेटा. उपाशी नको राहू हं. " त्यांनी प्रेमाने सांगितले.

पण मुग्धा अजूनही थोडी घुश्श्यात आणि बरीचशी वेळेत पोचण्याच्या टेन्शनमध्येच होती. तिला ते प्रेम कळलेच नाही. रागात असताना माणसाला समोरच्याचे प्रेमही कळत नाही ना, तसेच काहीसे. तिने डबे घेतले अन काही न बोलता फक्त एक कटाक्ष टाकला आणि निघाली. वर्षाताईंचे डोळे क्षणभर भरून आले.

क्रमशः
काय होईल पुढे? तिच्या मनात कटुता आलीय का? ती आलेली कटुता दूर होईल की नाही? बघू या पुढील भागात.

🎭 Series Post

View all