गोडवा - नात्यांमधला, मनामनांतला - भाग 2

गोडवा - नात्यांमधल्या माधुर्याची एक कहाणी


गोडवा - नात्यांमधला, मनामनांतला - भाग 2
© स्वाती अमोल मुधोळकर


वर्षाताई विचार करत होत्या.
\"काय करावे? पहिल्या संक्रांतीला हलव्याचे दागिने घालतात ना. ते घेऊन यावे का? नको , विकत आणण्यापेक्षा घरीच बनवू या आणि तेही तिच्या अगदी नकळत. मग संक्रांतीला तिला साडी आणि हे दागिने असे एकदम सरप्राईज देऊ या. हळदीकुंकवाच्या वेळेला घालेल ती दागिने. नटून थटून छान तयार होईल. छान दिसेल ती. बस्स ठरलं. मुग्धाची पहिली संक्रांत थाटात झाली पाहिजे.\" वर्षाताईंचा चेहरा खुलला होता.

त्या दिवसापासूनच त्या तयारीला लागल्या. वर्षाताईंनी लहानमोठ्या, गोल, पाकळीसारख्या इत्यादी वेगवेगळ्या आकाराचा हलवा करायला घेतला. मुग्धा ऑफिसमध्ये गेली की त्या त्यांचे काम सुरू करत. थोडावेळ हलवा करीत . मग उभे राहून थकवा आला, तर खाली बसून वेगवेगळ्या लाल , सोनेरी चमचमणाऱ्या कागदाचे दागिन्यांचे आकार कापून ठेवत. असे त्यांनी मुकुट, कंबरपट्टा, बाजूबंद इत्यादींसाठी आकार कापून ठेवले. काही दिवसांनी हलवा बनवून झाल्यावर वर्षाताईंनी तो वेगवेगळ्या आकाराचा हलवा घेऊन दागिने बनवायला सुरवात केली. त्या रोज मुग्धा येण्याच्या वेळेआधी सगळे आवरून ठेवत, जणूकाही काही केलेच नाही.


इकडे मुग्धा मात्र रोजचा सकाळी स्वयंपाक, नाश्ता, दोघांचे डबे आणि सोबतच ऑफिसमध्येही खूप काम असल्याने घरी येईपर्यंत दमून जाई. त्यात हा एवढ्यातच आलेला नवीन बॉस. अगदी काटेकोरपणे ऑफिसमध्ये येण्याची वेळ पाळायचा त्याचा आग्रह असे. थोडेही इकडे तिकडे झालेले त्याला चालत नसे.

कालच तर त्याने मुग्धाला रागावले होते.

"मॅडम तुमचे आता लग्न झालेय त्यात ऑफिसची काय चूक आहे? स्त्री आहे म्हणून अशा सवलती मिळत नसतात. तुम्हाला वेळेवर यायला जमत नसेल तर नोकरी सोडून घरी बसा." बॉस.

आपल्या डेस्कवर येऊन बसल्यावर ती विचार करत होती,

\"काय चुकले माझे? एक सांभाळायला जावं तर दुसरीकडे बिनसते.\"

\"दिली असती एक दिवस सुजयला ती भाजी तर नसतं चाललं का यांना? पण नाही, आई पण ना. मुलाच्या आवडीप्रमाणेच सगळं झालं पाहिजे. गवारीच्या शेंगा किती छान, कोवळ्या मिळाल्या म्हणून घेतल्या होत्या मी. उशीर होऊ नये म्हणून रात्रीच निवडून, तोडून ठेवल्या . सकाळी भाजी केली . सगळा स्वयंपाक केला .\" डोळ्यातले अश्रू तिने कसेबसे थोपवून धरले होते . तिला काल सकाळचा प्रसंग आठवला.

अगदी डबे भरताना वर्षाताईंनी सांगितलं ,

"अग, सुजयला ही भाजी आवडत नाही. खाणार नाही तो. दुसरी कर त्याच्यासाठी. आपण सगळे खाऊ ही भाजी. " वर्षाताई.

"अहो आई , आता उशीर होईल ना मला . काल सांगितलं असतं तर जमलं असतं, एक आणखी भाजी चिरून ठेवली असती मी. " मुग्धा.

"अग त्याला आवडत नाही म्हणून तर ही भाजी फारशी होत नाही आपल्या घरी. मला वाटलं माहिती आहे तुला ते. तर तू केलीच असेल दुसरी भाजी. "

मुग्धाची खरं तर मनातून खूप चिडचिड झाली होती. आईने लग्नाआधी सांगितलेले तिला आठवले.


क्रमशः

लग्नाआधी आईने काय सांगितले होते मुग्धाला ?

🎭 Series Post

View all