गोडरक्त..

गोडरक्त

#कथा

#गोडरक्त...

©स्वप्ना...

      "अरे काका गेट उघडा पटकन,..गेल्या दोन महिन्यात माझं येणं झालं नाही,आजी फार चिडलेल्या असतील ना माझ्यावर पण काय झालं काका माझी आई गेली हो अचानक,..त्या दिवशी नाही का मी आजीचं ब्लड घ्यायला आलो होतो आणि मला फोन आला माझ्या मित्राला मी सगळं सोपवून घाईत निघून गेलो होतो,..नंतर येणं जमलं नाही,..कश्या आहेत आजी??म्हणजे आपलं गोड रक्त मला फार आठवण यायची बरं तुमच्या या वाक्याची,.."

काकांनी गेट उघडलं आणि काही न बोलताच पाठमोरे होऊन चालू लागले,..संकेतने परत गेट लावलं आणि तो आजोबांच्या मागे गडबडीने आला,.. काकांनी मागे न बघताच हाताने त्याला बसण्याची खूण केली,.. तो सोफ्यावर बसला आणि,..त्याच लक्ष समोर गेलं,..आजीचा हसरा फोटो आणि त्याला हार घातलेला,..त्याला काय बोलावं सुचेना,..त्याने अवंढा गिळला आणि आजोबांकडे काहीही न बोलता फक्त बघितलं,.. आजोबांचा बांधच फुटला..संकेत गेलं रे माझं गोड रक्त,..तू त्यादिवशी टेस्टिंग अर्धवट सोडून गेला आणि त्याच ब्लडचे रिपोर्ट खुप वाईट आले,..ब्लड कॅन्सर,..सगळं शेवटच्या स्टेजला,.."

संकेतने फोटो कडे बघितलं,..गेल्या वर्षभरात झालेल्या ह्या ओळखी आजोबांना ऍडमिट केलं होतं त्यांनतर नेहमी त्यांची शुगर चेक करण्यासाठी आपण यायचो,..सकाळी पाचला आजीचा फोन असायचा,..कधी येतोस चहा,नाश्ता इकडेच घे,..आजपर्यंत टेस्टिंग साठी कितीतरी घरं फिरणारे आपण, लोक पाणी लवकर विचारायचे नाही,..आजीने तर नाष्टाच ऑफर केला,..सगळा आपला पसारा बघून आजी म्हणायची,"मन फार घट्ट करावं लागतं असेल ना रे,..?दुसऱ्याच रक्त म्हणून जोरात सुई टोचवतोस??ह्यांना जरा हळू टोचव बरं का,..?खरंतर एक नंबर तिखट माणसाला शुगर कशी हेच कळत नाही मला,..?

     आजीच्या ह्या वाक्यावर तुमची दोघांची जी जुगलबंदी चालायची ती नेहमी लक्षात राहायची,..आजोबा आताही तेंव्हा हसायचे तसे खळखळून हसत,..आजीच्या फोटोकडे बघून आठवणीत जात म्हणाले,.."खर होत तिचं,.. तू पहिल्यांदा दिलेला शुगरचा रिपोर्ट पाहात ती म्हणाली होती,"तुम्ही कधी कोणाशी चटकन गोड बोलत नाही आणि तुमच रक्त गोड कसं??"तिच्या या प्रश्नावर मी आवक झालो,..खरंतर ती म्हणते तसाच तर होतो मी,..रागीट, चिडका, वसका,..दुसऱ्याला काहीतरी टोचून बोलणारा,.. पण तिच्या ह्या प्रश्नाने अंतर्मुख केलं,..खरंतर आजार,रिपोर्ट ह्या पलीकडे जाणारं काहीतरी मला बदलवायचं होतं माझं मला,.. मग मी तिला चिडवायचो तुझं रक्त नक्कीच गोड असेल,..तू तर सगळ्यांवर प्रेम करतेस,..खरंच ती प्रत्येकावर माणूस म्हणून प्रेम करायची,..तुला प्रत्येकवेळी चहा,नाष्टा ऑफर करणं हे त्यातलंच होतं,.. तुलाही मग दरवेळी माझी शुगर कमी नसली की तिचं ते विचारणं,.. रक्त तर माझं गोड मग ह्यांना शुगर कशी,..??तू नेहमी हसायचास आणि म्हणायचा,....काकु तुमचा स्वभाव माणसात उतरला,..ह्यांचा रक्तात उतरला,..म्हणून तुम्ही जरी आजोबांच्या भाषेत गोडरक्त असल्या तरी तुम्हाला आमच्या वैदकीय भाषेत शुगर होणार नाही,..ती अश्याच तिखट लोकांना होईल,.."

    पण इतक्या चांगलं वागणाऱ्या तिचं रक्त इतकं कसं दूषित निघालं रे,..?काहीही वेळ राहिला नाही त्या रक्ताच्या कॅन्सर मधून सुटायला,..शेवटच्या क्षणी जाणवलं मला शेवटी गोडरक्ताने धोका दिला होता,..पण त्या गोडरक्ताच्या स्वभावाने स्मशानभूमीत जागा पुरत नव्हती तेंव्हा लक्षात आलं,..मृत्यु कसा येईल ते माहीत नसतं,.. पण मृत्यूनंतर जर गर्दी झाली तर एवढं नक्की त्या माणसाचं रक्त गोडच असतं,.. तुझ्या मेडिकलच्या भाषेतून नाही तर आमच्या माणसांच्या भाषेतलं,.."

     वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा,..अश्या कथांचे पुस्तक हवे असल्यास 9822875780 ह्या no वर msg करा,.धन्यवाद

 ©स्वप्ना मुळे (मायी)औरंगाबाद