Oct 24, 2021
कथामालिका

गोड गोजिरी ( भाग -1 )

Read Later
गोड गोजिरी ( भाग -1 )

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

आज आरती व प्रथमेश चं घर सुखाने भरून गेलं होतं. घरात आनंदाची लहर पसरली होती. त्यांच्या घरी कन्यारत्न जन्माला आलं होतं. सर्व शेजारील मंडळी तसेच नातेवाईकांनी घरामध्ये गर्दी केली होती. प्रथमेशने जिलेबीचे खूप सारे बॉक्स आणून ठेवले होते. तो आनंदाने सर्वांना जिलेबी देत होता.

 

आरती व प्रथमेश च लग्न होऊन तब्ब्ल नऊ वर्षे झाली होती. नऊ वर्षानंतर त्यांना अपत्यप्राप्ती झाली होती! नऊ वर्ष! अनेक नवस केल्यानंतर तसेच अनेक उपचारानंतर त्यांना हे सुख मिळालं होतं. त्यांनी तिच्यासाठी खूप वाट बघितली होती. खूप संयम ठेवलं होतं. शेवटी त्यांना संयमाचं फळ मिळालं होतं.

 

शेजारच्या जोशी काकू तिला हातात घेत म्हणाल्या, "अरे वा! किती गोड आहे बाळ."

 

आरतीचे तर डोळेच भरून आले. आपल्याकडे एखाद्या स्त्रीला मुल होत नसेल तर तिला बरंच काही ऐकावं लागतं. बरेच लोक अश्या स्त्रिकडे वेगळ्याच नजरेने बघतात. काही ठिकाणी वेगळीच वागणूक दिली जाते. हे सगळं तिने सोसलं होतं. सगळं सहन केलं होतं. ते सर्व दिवस, आठवणी तिच्या डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. किती आतूर होती ती बाळासाठी!

 

बाळ जन्माला येतं तेव्हा ते त्याच्यासोबत आनंद घेऊन येतं. किती आनंद दिसत होता प्रथमेश च्या आईवडिलांच्या डोळ्यांत! एकुलता एक मुलगा होता प्रथमेश. ते त्याच्याकडून नातवाची किती आस धरून बसले होते! दोन्हीकडील आजीआजोबा खूप खुश होते. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान होते.

 

बाळ पाळण्यात पडून सर्वांना बघून गोड हसत होतं. तिला फार मज्जा वाटत असणार! प्रत्येकजण तिला पाळण्यातून काढून ओंजळीत घ्यायचं. तिला कुरवाळत. तिच्यासंगे खेळत. तिला परत अलगद पाळण्यात ठेऊन झोका देत.

 

तिच्यासाठी आलेल्या गिफ्ट्स बद्दल तर कायच सांगावं. प्रत्येक बघायला येणाऱ्या व्यक्तीने तिच्यासाठी काही ना काही आणलेलं होतं. तसंतर तिच्या आईबाबांनी अगोदर तिच्यासाठी विविध प्रकारची खेळणी आणून ठेवलेली होती. त्यात आणखीनच भर पडली.

 

कुणी तिच्यासाठी चैन आणले होते तर कुणी बाळ्या. तसेच बऱ्याच जणांनी विविध प्रकारची खेळणी पण आणली होती. विविध रंगांच्या, वेगवेगळ्या आकरांच्या बाहुल्या. तसेच लहान-मोठे, मऊमऊ वाटणारे टेडीबेअर. तसेच चेंडू, घरघर खेळण्यासाठी लहानलहान कुकर, गॅस, पातेलं, मिक्सर यांचा सेट. अश्या अनेक गोष्टींनी घर जवळपास भरून गेले होते. तसेच प्रत्येकजण तिच्यासाठी ड्रेस तर घेऊनच आला होता. वेगवेगळ्या रंगाचे, डिझाईनचे ड्रेस. काहींवर छानछान वेलीफुलं होती तर काहींवर कार्टूनमधील पात्र. बाळाचा मस्त थाट होता.

 

बघायला आलेली मंडळी फक्त जिलेबीने कुठं खुश होणार होती. त्यांच्यासाठी चहा, कोल्ड्रिंक्स, चिवडा, सामोसे, कचोरी या सर्व गोष्टी पण तयार होत्या. हे सर्व वाटप करण्यात व सर्वांशी निदान दोन शब्द तरी बोलण्यात त्या दोघांची बरीच कसरत झाली. दोघेही पार दमून गेले होते.

 

हळूहळू प्रत्येकजण त्यांचा निरोप घेत होता. हळूहळू त्यांचं घर रिकामं होऊ लागलं. त्या दोघांचे आईवडील पण निघून गेले. घर शांतशांत भासत होतं. आरती किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी निघून गेली. प्रथमेश हॉलमधील सर्व पसारा आवरत होता. सर्व खेळणी, ड्रेस व इतर गोष्टी त्याने उचलून एका जागी ठेवल्या. मिठाईचे बॉक्स पण उचलून कचऱ्यामध्ये टाकले.

 

नंतर तो पाळण्याजवळ आला. त्याने बाळाला ओंजळीत घेतले. तो डोळे भरून बाळाला बघू लागला. बघता-बघता अचानक त्याचं मन जड झालं. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद उडून गेला. त्याचा चेहरा गंभीर झाला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता व भीतीचे सावट दाटले. त्याला आठवलं जेव्हा त्याने तिला रुग्णालयात बघितलं होतं तेव्हा तिच्या डाव्या हातावर तीळ होता. पण आता तो दिसत नव्हता. बाळांची अदलाबदल तर झाली नसेल ना? हा प्रश्न त्याला त्रस्त करू लागला. की त्याने नीट बघितलं नव्हतं? कदाचित त्याने जे बघितलं होतं तो तीळ नसावा. त्याला भास तर झाला नसेल? की खरंच बाळांची अदलाबदल झाली? तो खूप अस्वस्थ झाला होता. त्याला काय करावं? कुणाशी बोलावं? काहीच सुचत नव्हतं.

 

तेवढ्यात त्याच्या कानावर आरतीचा आवाज पडला. ती दरवाजात उभी होती. ती बाळाकडे बघून हसली. त्याच्या जवळ आली.

 

ती म्हणाली, "तुम्ही जेवून घ्या. मी बघते बाळाला."

 

त्याने बाळाला तिच्या हाती दिलं. त्याला मात्र चिंता सतवू लागली. तिला एवढं खुश बघून तिला ते सांगणं त्याला योग्य वाटलं नाही. उगाच तिला खूप त्रास होईल. काहीतरी करणं त्याला भाग होतं. त्याला खात्री देखील नव्हती की त्याने खरंच तीळ बघितला होता की नाही. हे वेगळंच संकट त्यांच्यावर ओढवलं होतं. त्याला नीट जेवण पण गेलं नाही.

 

ती म्हणाली, "अहो, काय झालं? स्वयंपाक चांगला नाही झाला का? "

 

तो म्हणाला, "नाही. चांगला आहे."

 

ती म्हणाली, "मंग इतक्यात कसं आटोपलं? दुसरं काही बनवून देऊ का? "

 

तो म्हणाला, "नाही. नको. ते आज इतर बरंच काही खाण्यात आलं ना त्यामुळे. "

 

ती म्हणाली, "हो बरोबर आहे. मला पण जास्त भूक नाहीये."

 

तो उठून हॉलमध्ये निघून आला. एकतर नऊ वर्षानंतर घरात बाळ आलं. त्यातही असं! तो प्रार्थना करू लागला की तो त्याचा भ्रमच असावा.

 

पुढील भाग लवकरच.

 

कथा कशी वाटतेय? पुढील भाग वाचण्यासाठी उत्सुक आहात का? ते कंमेंट मध्ये नक्की कळवा. तसेच share करायला विसरू नका.

 

©Akash Gadhave

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Akash Gadhave

Writer

नमस्कार.