घरची लक्ष्मी उपाशी (लघुकथा)

वृंदाने एका बाजूला सकाळी शिजवून ठेवलेल्या डाळीचे पुरण बनवण्यास ठेवले. कांदा चिरून मसाला बनवा??

"वृंदाऽऽ, झाला का चहा? अजून कितीवेळ वाट बघायची?" सुलभा बैठक खोलीत बसून वृंदाला म्हणजे, तिच्या सूनेला आवाज देत होती.


"झाला. आणते आहे." वृंदा कपात चहा ओतत बोलली.


"दिवाळीचा दिवस आणि हिचं आपलं आरामात सुरू आहे. काय बोलणार? बोललं की, आपलं तोंड दिसतं." समोरून येणाऱ्या गिरीशला बघून सुलभा बोलली."


गिरीशने आतून येताना, एकदा स्वयंपाक घरात डोकावून बघितले. वृंदा चहाचे कप ट्रे मध्ये ठेवत होती. सोबतीला खारी आणि बिस्कीट पण ठेवले होते. नंतर तो सोफ्यात जाऊन बसला. एक नजर घड्याळात किती वाजलेत? हे बघितले. अजून सकाळचे सात वाजले होते. तितक्यात मागून वृंदा चहाचा ट्रे घेऊन आली.


"किती उशीर वृंदा. चल दे लवकर चहा. मला अंघोळ करून पूजा करायची आहे." वृंदाच्या हातून चहाचा कप घेत सुलभा बोलली.
नेहमी नऊला पूजा करणारी सुलभा आज सातलाच पूजा करणार होती.

वृंदाने एक कप गिरीशच्या हातात दिला आणि एक स्वतः घेतला.


"वृंदा पाणी दे गं जरा. कोमट पाणी दे. घसा जरा दुखतोय." वृंदा खुर्चीत बसणार तितक्यात गिरीश बोलला.


"ठिक आहे." म्हणत वृंदाने चहाचा कप खाली ठेवला आणि आत गेली.


"सगळं सांगाव लागतं हिला. त्याला आता गरम पाणीच देत जा. काळजी घे थोडी त्याची. मला पण गरम पाणीच देतजा आता. काय गं पहाटे लवकर उठून दिवे लावायचे असतात विसरलीस ना? आणि गिरीशला उटणे लावून आंघोळ घालायची होती ते पण राहिलं. तरी काल सांगितलं होतं की, सकाळी चारला उठ म्हणून. माझं काही काम नव्हतं म्हणून मी झोपले, तर तू पण झोपलीस." सुलभाने परत बडबड केली.



"आई कशाला बोलते आहेस. आधी विचारात जा. ती चार पासून उठलेली आहे. उठून अंघोळ करून तिने दिवे लावले. मग मला उठवून तेल, उटणे लावून आंघोळ घातली. मुलांना मीच उठवू नको म्हणून सांगितलं. अंघोळ करून मी परत झोपलो, तिने मात्र घर झाडून पुसून घेतले." इतक्यावेळ शांत बसलेला गिरीश बोलला.


"घ्या जरा काही बोललं की, लगेच घेतली बायकोची बाजू. तू बोलतो आहेस. तिला तोंड नाही का बोलायला?" सुलभा बोलली.


"ती आत आहे, म्हणून मी बोललो." असं म्हणत गिरीश पेपरमध्ये तोंड खुपसून बसला.


वृंदा मात्र काहीही न बोलता तिचे काम करत होती. तिने दोघांसाठी पाणी गरम करून आणले. चहा जरा थंड झाला, म्हणून सगळ्यांसाठी तिने परत तो गरम करून आणला.

\"आता जरा आरामात गरम गरम दोन घोट चहा घेऊ आणि लागू कामाला.\" ह्या विचारात ती खुर्चीत बसली. तोच आतून मोठ्या मुलाने आवाज दिला. मोठा म्हणजे साधारण आठ वर्षांचा मुलगा.


"मम्मा ये न." नील बोलला.

त्याच्या आवाजाने लहान मुलगा यश, जो दोन वर्षांचा होता तो पण उठून बसला. त्यामुळे चहाचा कप खाली ठेऊन वृंदा पळतच आत गेली. दोघांची समजूत काढून बाहेर येईपर्यंत चहा गार झाला होता.


"आता परत गरम करत बसले तर, अजून उशीर होईल. त्या पेक्षा असाच घेऊ." म्हणत वृंदाने गार चहा कसातरी गिळला.

नंतर नाष्टा, मुलांचे अवरले त्यांना खाऊ घातले. मग दुपारचा स्वयंपाक करून जेवणं आवरेपर्यंत दुपारचे दोन वाजले. तिचे जेवण मात्र अजून देखील बाकी होते.



"वृंदा मी पडते जरा. दमला बाई जीव आज माझा. तासभर जेवत बसू नकोस. आज खूप काम आहे. तू आता लगेच स्वयंपाक कर. पाच वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक करून घे. पुरणाच्या स्वयंपाकाला वेळ लागतो. रात्रीसाठी काही ठेऊ नकोस." म्हणत सुलभा तिच्या खोलीत निघून गेली.



नील मित्रांसोबत बाहेर खेळत होता. यश मात्र रडारड करत होता, कारण त्याची झोपेची वेळ झाली होती.


"आज ह्यांना सांगते यशला झोपवायला. खूप काम आहे. त्याला झोपवत बसले तर उशीर होईल." वृंदा मनातच बोलत होती.

तितक्यात,

"वृंदा, मी पण झोपतो. तू एक काम कर मुलांना झोपवून दे. कमीत कमी यशला तरी झोपव. नील तर काही झोपणार नाही. तो बाहेर खेळतो आहे. म्हणजे यश झोपला तर, माझी पण झोप होईल. मग कर बाकीचे काम." म्हणत गिरीश पण आत निघून गेला.


बिचारी वृंदा कढेवर यशला घेऊन एका हाताने दूध गरम करून बॉटल मध्ये भरलं आणि घेऊन गेली झोपवायला. नशिबाने यश लवकर झोपला. पण तरी अडीच वाजले होते.


वृंदाने एका बाजूला सकाळी शिजवून ठेवलेल्या डाळीचे पुरण बनवण्यास ठेवले. कांदा चिरून मसाला बनवायला घेतला. मसाला परतवून घेत उभ्यानेच अर्धी पोळी आणि भाजी तोंडात कोंबली. कसेतरी पाणी पिले आणि वड्यांची डाळ वाटून घेतली, भज्यांचे पीठ भिजवले. एकीकडे आमटी करायला घेतली. दुसरीकडे पुरण बारीक करायला सुरुवात केली.


सगळं आवरून किचन ओटा पुसून, भांडी घासून होईपर्यंत पाच वाजले. दरम्यान दोन वेळा यश उठला होता त्याला परत झोपवले होते. त्या नंतर रांगोळी टाकली. तोपर्यंत सगळे उठले. मग परत संध्याकाळचा चहा केला. मुलांची तयारी करून दिली. नैवेद्याची, पूजेची, मांडणी केली. हे सगळं करायला वाजले साडेसहा.


"चल वृंदा आवर. आता मेकअप करत बसू नकोस. सात वाजता पूजा करायची आहे." सुलभाची घाई सुरू झाली होती.


"हो आई, साडीच नेसते पटकन. बाकी मेकअप तर मी करतच नाही काही कधीच." वृंदा बोलली.


वृंदा साडी नेसे पर्यंत. सुलभाने तीनदा तिला आवाज दिला. केस देखील नीट न विंचरता नुसता अंबाडा घालून वृंदा पूजेसाठी पाळली.

गिरीशने दिवे तेव्हडे लावले.
सगळी पूजा, आरती झाली.

"चल बाई सगळा नैवेद्य नीट झाला लक्षीला आवडला म्हणजे ती प्रसन्न. सगळं छान पार पडलं. मी आहे म्हणून झालं सगळं नीट. लक्ष्मी माते तुझी कृपा आमच्या घरावर सदैव राहूदे. दामले बाबा आज मी." सुलभा सोफ्यात बसत बोलली.


वृंदा सगळं ऐकत होती. उलट बोलण्याचा स्वभावच नव्हता तिचा आणि बोलून देखील फक्त वादच वाढले असते हे तिला माहीत होते. कारण गिरीश म्हणजे आई म्हणेल ती पूर्व दिशा असं म्हणणारा आदर्श मुलगा. त्याला ही माहीत होते की, त्याची आई चुकते पण बोलून आईला दुखवायचे नाही असा त्याचा अट्टाहास होता. त्यामुळे वृंदा गप्प बसणे हाच मार्ग धरायची.



"मम्मा बाबा, चला ना खाली फटाके उडवायला जाऊ." नीलने हट्ट धरला.


"चल जाऊ नाहीतर अजून उशीर होईल. जेवणं बाकी आहेत अजून. वृंदा, यश चला खाली जाऊन येऊ. आई चल गं." गिरीश बोलला.



"नको रे बाबा, आज खूप दामले मी. तुम्हीच जा." म्हणत सुलभा सोफ्यातच आडवी पडली.


गिरीश, वृंदा मुलांना घेऊन खाली गेले. एक तास फटाके उडवून मन भरल्यावर नील घरी यायला तयार झाला. गिरीश आणि वृंदा आकाशात उडणारे फटाके बघत होते.


घरी आल्यावर वृंदाने आधी सुलभा आणि गिरीशला जेवणाचे ताट वाढले. ते दोघे बसल्यावर यश आणि नीलला देखील ताट दिले. पण दोघे अजून लहान असल्यामुळे ते वृंदाच्या हातून जेवत. सुलभा आणि गिरीशला वाढणं करत यश आणि नीलला ती जेऊ घालत होती.

"मम्मा हे काय? ते काय? आज माझा मित्र असा बोलला. त्याच्याकडे बंदूक होती पण माझ्या पेक्षा लहान." असे अनेक विषय नील बोलत होता. यश देखील त्याच्या सारखे बोलण्याचा प्रयत्न करत वृंदाशी बोलत होता. सुलभा आणि गिरीश जेवले पण यश आणि नीलला जेवायला तासभर लागला.



"मम्मा तू कधी जेवणार?" नीलने प्रश्न केला.


"अरे बाळा, यशला झोप येत आहे. त्याला झोपवून जेवेल मी. तू पण झोप आता." वृंदा पेंगलेल्या यशला घेत बोलली.


दमल्यामुळे मुले लगेच झोपली पण तोपर्यंत साडेदहा वाजले होते.


"वृंदा आता कोणाची वाट बघते आहेस? जेवून घे. झालं की, आवर आता बाकीचे तू. मी जाते झोपायला. गिरीश तू पण जा आता झोपायला." सुलभा बोलली.

"आई आता नाही जेवत मी. इच्छा होत नाहीये जेवायची." दमलेली वृंदा बोलली.


"ठिक आहे. पण आवरून झोप." असं बोलून सुलभा निघून गेली.


गिरीशला वाटतं होते, वृंदाला आग्रहाने जेऊ घालावे पण \"आपण काही बोललो तर आईला अजून वाईट वाटेल. सकाळी आधीच चिडली होती.\" ह्या विचाराने गिरीश काही न बोलता झोपायला निघून गेला.


वृंदाने बाकीचा पसारा अवरला. सगळं किचन स्वच्छ केले. आत येऊन अंथरुणात पडली खरं, पण मनात मात्र विचार सुरू होते.


"घरात दिवाळीच्या आठ, दहा दिवस आधी पासून मी राबते आहे. साफसफाई, फराळ सगळं केलं. पण माझी कोणाला काळजीच नाही. आज तर दिवसभरात चहा देखील नीट मिळाला नाही मला. देव्हाऱ्यात असणाऱ्या त्या लक्ष्मीला प्रसाद आवडेल की नाही? ह्याची काळजी आहे. पण घरातील लक्ष्मी दिवाळीच्या दिवशी उपाशीच झोपणार ह्याबद्दल काहीच वाटत नाही. घरातली लक्ष्मी उपाशी असताना देव्हाऱ्यातील लक्ष्मी प्रसन्न होईल का?

ते काही नाही. अति चांगुलपणा देखील काही बरा नाही. हे आता माझ्या चांगलेच लक्षात आले आहे. कितीही केले तरी जर समाधानच होणार नसेल, तर मग काय करणार? गिरीश नाही बोलला तरी आता मी बोलणार. माझ्या हक्कासाठी, मनासाठी मला बोलावेच लागेल." असा मनातच निर्धार करून वृंदा झोपी गेली.




 कशी वाटली नक्की सांगा.

धन्यवाद

©वर्षाराज