जेव्हा देव्हाऱ्यातला देव निघून जातो भाग 1

Thriller story Suspense Marathi story Marathi story

"राजेपाटील " कुटुंब संपूर्ण कोल्हापुरात आपल्या श्रीमंती, दिलदार आणि नम्रपणासाठी प्रसिध्द होतं . घरातला प्रत्येक व्यक्ती उच्चशिक्षण आणि उच्च विचारसरणी यांवर भर देणारा होता. प्रत्येक व्यक्ती प्रचंड तेजस्वी. कोणी तबला वाजवण्यात तरबेज होतं तर कोणी भरतनाट्यम करण्यात. कोणी बॉक्सिंग champion तर कोणी स्विमिन्ग एक्स्पर्ट. मॉडर्न विचारांसोबत आपल्या संस्कृतीची मुळं देखील खोलवर रुजली गेली होती. लक्ष्मी , सरस्वती  आणि नारायण हे तिघेही तिथे आनंदाने नांदत होते. प्रत्यक्ष रामचंद्रांनी तिथे येऊन सहवास घ्यावा अस वातावरण  कुटुंबात होत. " राजेपाटील " हे आडनाव नसून एक उच्च प्रतीचा वारसा म्हणून नांदत होतं.

राजेपाटील घराणं म्हणजे "अहिल्या राजेपाटील " -सगळ्यात जेष्ठ व्यक्ती सगळे जण  त्यांना  " अक्का " या नावाने हाक मारत असत. त्यांचा स्वभाव अगदी कोमल आणि नम्र होता. राजेपाटील घराण्याला शोभतील असे सगळे गुण  त्यांच्यात  होते.  संपूर्ण कोल्हापूर त्यांना प्रचंड आदराने आपल्या अडचणी सांगत असत आणि त्या मदत करण्यास कधी मागे हटत नसत.

त्यांना ३ मुलं होती सगळ्यात मोठा महेश, रमेश आणि सुरेश. रमेश आणि सुरेश ला २-२ मुले होती पण महेश ला मात्र मूल होत नव्हतं. दोघांचीही मोठी मुलं आत्ताच शाळेत जायला लागली होती आणि लहान मुलं अजून पाळण्यातच खेळत होती. घरातलं वातावरण लहान पावलांमुळे अजूनच उल्हासित झालं. अक्का पहाटे सगळ्यांना प्रार्थेनेसाठी उठवत असत. पण ह्यात सुद्धा आग्रह नसे. ज्यांची इच्छा आहे त्यांनी यावे आणि आपापला दिनक्रम सुरु करावा. अक्काचं वय जरी बरच असलं तरी विचार अजून तरुण होते.

"राजेपाटील " घराणं सुखी आणि समाधानी असण्याचं एक मोठं गुपित अक्का कडे होतं. आणि ते गुपित म्हणजे घरात कोणालाही कोणत्याच गोष्टीचा आग्रह नसे , प्रत्येकाला जे योग्य वाटतं ते त्याने कराव पण  मर्यादा सांभाळून, प्रत्येकाला स्वातंत्र्य होतं त्यामुळे कोणी कधी खोटं बोलणे , चोरी करणे ह्या गोष्टींचा विचार केला नाही.

अक्काचं एक ठाम मत होतं, सगळ्यांना समान  प्रकारचा आदर आणि वागणूक दिली गेली पाहिजे, मग ते स्त्री असो कि पुरुष, लहान असो की म्हातारं. मुलं १२ वर्षाची होईपर्यंत त्यांना चांगलं-वाईट याची जाणीव करून द्यायची आणि नंतर त्याचं आयुष्य स्वेच्छेने जगू द्यायचं. कोणतंही बंधन नसल्याने घरातली मुलं स्वतंत्र, सामाजिक जाणीव असलेली आणि आपली मर्यादा जाणून असलेली होती.

सगळं काही सुरळीत चालू असतांना एक विचित्र घटना घरात घडली. अशी घटना जिने" राजेपाटील " घराण्याचा ५० वर्षांच्या  वारशाला मातीत मिसळलं. 

राजेपाटील घराण्याला ५० वर्षांपूर्वी एक २० किलो सोन्याचा "देव्हारा" कोल्हापुरातल्या प्रतिष्ठीत मंदिरातून प्रसाद म्हणून मिळाला होता. तो देव्हारा म्हणजे "राजेपाटील " घराण्याच्या वैभवाचं आणि प्रतीष्ठेचं  प्रतीक. देव्हारा भव्य आणि इतका सुरेख होता की कोल्हापूरच्या बाहेर त्याची प्रसिद्धी होती. आणि काही गावात तर अशी अफवा होती की ज्या घरात हा देव्हारा आहे त्या घरात साक्षात लक्ष्मी वास करते.

ह्या देव्हाऱ्याला ४ सोनेरी अगदी कोरीव काम केलेले सोन्याचे खांब आणि वर एक सूर्य प्रकाशालाही तोड देईल असा कळस.

पण रविवारच्या दिवशी सकाळी सगळे जण प्रार्थनेसाठी जमले, अक्काचं लक्ष कळसाकडे गेलं..कळस देव्हाऱ्यात नव्हता. अक्काचा श्वासच थांबला.. दुसऱ्या कोणाचंही लक्ष जाण्याच्या आत अक्कानी पूजेचं ताट घेतलं आणि देव्हाऱ्याच्या एकदम समोर उभं राहून आरती करायला सुरवात केली जेणेकरून कोणालाही समजणार नाही.. कारण देव्हाऱ्याचा कळस चोरणे ही  गोष्ट पसरायला वेळ लागणार नाही.. पण अक्काच्या स्मृती नुसार चोरी कोणीतरी घरातल्या व्यक्ती ने केली तेच हे नक्की होतं, कारण रात्री अक्का ने झोपण्याच्या आधी  देवदर्शन घेतलं तेव्हा कळस तसाच होता. अक्का ने ठरवलं घरातला चोर शोधायचा..पण कसा? ते पण कोणालाही न समजता? अक्का हाच विचार करत होत्या आणि पूजा संपली, सगळेजण आपापल्या खोलीत गेले पण अक्का मात्र विचारातच होत्या..

पुढील भागात  उर्वरीत.... 

🎭 Series Post

View all