खर तर मी स्थुलता ,थायरॉईड तसेच संधिवात या समस्यांनी ग्रस्त होते.काय करणार? वयाची एवढी वर्षे संसार म्हणजेच चूल आणि मूल,आमचे नवरोबा यांच्यासाठी राब राब राबल्यावर कधीतरी ही यांत्रिक मशीन थकणारच किंवा व्याधीग्रस्त होणारच! म्हणून चिडचिड , मूड स्विंग्ज हे रोजचेच झाले होते.म्हणून यातून बाहेर पाडण्यासाठी विपश्यना केंद्र १ महिन्यासाठी जॉईन करायचे ठरवले.
मग काय आमचे अहो नेहमीप्रमाणे हटकन लावत म्हणाले," बघ बर का,तुला खरच जमणार नाही हे! अग आता कुठे तू मोबाईल शिकून स्वतःचे जग शोधले आहेस,त्यात रममाण झाली आहेस,कशी काय राहशील मोबाईल शिवाय? एकवेळ आमच्या शिवाय राहशील पण मोबाईल शिवाय? छे शक्यच नाही!"
" काय हो तुम्ही! मी जरा कुठे काहीतरी करायचे ठरवले की सारखी हटकन लावता आणि मग सर्व विस्कटते.राहील मी तुम्हा सर्वांशिवाय आणि मोबाईलशिवाय सुद्धा! समजलं?"
" हा हा हा.. बघुया हे मोबाईल विरहित आयुष्य तू जगू शकते का ते? कळेल लवकरच!"
झालं. घरात असा विषय झाला आणि मी मात्र खूप धास्तावले .खरच जमेल मला मोबाईल शिवाय राहायला? मग मी मनोमन खूप निश्चय केला ,हो जमेल मला.मोबाईल शिवाय किती गोष्टी असतात करण्यासारख्या,उपभोगन्यासारख्या.. जमेल मला ,हो नक्की जमेल .. देवा परमेश्वरा सांभाळून घे रे बाबा.. एवढ्या दिवसांनी नव्यानेच काहीतरी करायला जातेय,यश येऊ दे रे बाबा!
साधारण तिसऱ्याच दिवशी मी विपश्यना केंद्रात दाखल झाले.कोणाशी बोलणे नाही ,काही नाही.केवळ आपण नी फक्त आपण हीच गोष्ट लक्ष्य केंद्रित करण्यासाठी.पण मुळातच बोलघेवडी असणारी मी सारखं सलवारच्या खिशात मोबाईल चाचपून पाहायचे.सवयच भयंकर लागली होती ना मोबाईल ची.मोबाईलचा आभास मला रोजच तीव्रतेने उठता बसता जाणवायला लागला.अगदी वेड लागण्याची वेळ आली होती.पण मग विपश्यनेच्या काही सुंदर तंत्रांचा वापर करून मी स्वतःमध्ये रमायला शिकले.शरीराचा पूर्णतः अभ्यास केला ,मन खूप शांत झालं.आता मोबाईलचा काय ,चंचल विचारांचा देखील आभास होत नव्हता.मन एकदम शांत आणि प्रफुल्लित झालं होतं.हे जग ,माझा संसार पुन्हा मला हवाहवासा वाटू लागला होता. म्हणजे थोडक्यात स्वतःवर ,मनातील भावनांवर आता माझा पूर्णपणे कंट्रोल होता.म्हणून मोबाईल काय इतर कुठल्याही लोभसवाण्या वस्तूकडे मन केंद्रित होत नव्हते.एक निरोगी मनाची मानसिकता तयार करून विपश्यना केंद्रातून एक महिन्याने मी बाहेर पडले.
मला घ्यायला आमचे अहो आले आणि म्हणाले," छान राहिलीस एवढे दिवस मोबाईल आणि आमच्याशिवाय !"मी मात्र आता कुठलेही प्रत्युत्तर न देता केवळ मान डोलावली.मग माझे मलाच कुठेतरी मी स्वतः पुन्हा नव्याने भेटल्यासारखी वाटली. खरच विपश्यनेची ताकद मला मोबाइलच्या तसेच वाईट विचारांच्या आभासापासून स्वतःला सावरण्यात यशस्वी झाली होती.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा