" अग दिपाली जरा देवघरात बस. बघ मी हरितालिकेची पूजा कशी मांडते..अग मुलीची जात तू.तरीही तुला जरा म्हणून देवाचे वेड नाही. तुझे तर देवघरात येऊन देवाला नमस्कार करायचे सुद्धा जीवावर येते.किती नास्तिक मुलगी आहेस तू."
" ए आई ,सकाळी सकाळी तू मला लेक्चर देऊ नकोस.हो आहे मी नास्तिक.तुला किती वेळा सांगितलं की माझा विश्वास नाही देवावर."
" जाऊ दे तुझ्याशी डोकं लावण्यात काही अर्थ नाही.. रहा अशीच नास्तिक ,अन सासरी गेलीस की काढ माझ्या शिकवणीचे,संस्कारांचे धिंडवडे!!"
आता कुठलेही प्रत्यूत्तर न देता दिपाली तशीच ऑफिसला निघते.
कालांतराने दिपलीचे लग्न होते.सासूबाईंना सुद्धा तिचा देवावर विश्वास नाही हे जरा खटकते.कारण सासूबाई अत्यंत धार्मिक भावना जपणाऱ्या तर दिपाली देवाला न मानणारी.मग काय केवळ या एकाच गोष्टीवरून सासूबाईंनी तिच्याशी बोलणे सोडून दिले.दिपाली खूप उदास झाली. नाही माझा विश्वास देवावर,आहे मी नास्तिक.पण ती माझी खरच खूप मोठी चूक आहे का? ती संभ्रमात पडली.
दिपाली संध्याकाळी ऑफिस मधून निघाली आणि सरळ आपल्या डॉक्टर असलेल्या मैत्रिणीकडे म्हणजेच वैशालीकडे गेली.
" हॅलो मी दिपाली.डॉक्टर वैशाली यांना भेटायचंय."
हॉस्पिटल च्या रिसेप्शन काउंटर वर रिसेप्शनिस्ट म्हणाली,
" सॉरी मॅडम.डॉक्टर ५-१०मिनिटानंतर भेटतील.आता त्यांची पूजेची वेळ आहे."
दिपाली आश्चर्यचकित झाली.साधारण १० मिनिटानंतर तिला वैशालीने केबिनमध्ये बोलवले.
केबिन मध्ये आल्या आल्या दिपाली,वैशालीला म्हणाली,
" हॅलो वैशू!"
" ओहो,दिपाली, किती दिवसांनी भेटलीस!
" पण मला एक सांग आधी!तू डॉक्टर असून देवावर विश्वास ठेवते?"
" हो."
" अग बाई हाच विषय तर माझ्यासाठी डोकेदुखी बनलाय."
" का ग ? म्हणजे मी नाही समजले!"
" अग बाई माझ्या आईपासून सासुपर्यंत सर्वांना मी नास्तिक आहे म्हणून माझा राग येतो.खरच परमेश्वराचे अस्तित्व असते की हा फक्त आभास असतो ग!"
" अग दिपाली,देवाचे अस्तित्व आहे पण ते आपल्या मनातील पॉझिटिव्ह लहरींच्या स्वरूपात!"
"म्हणजे मी नाही समजले?"
" अग मी सांगते ना तुला.आता बघ,जेव्हा कोणाला ही एखादी गोष्ट हवी असेल तर,प्रथम आपण देवाजवळ ती मागतो.मग आपण त्यासाठी आपले मन देवाशी एकरूप करून त्या गोष्टीविषयी ची आपली भावना व्यक्त करतो.मग काय होतं,आपली प्रबळ इच्छा,आपले त्या गोष्टीसाठीचे प्रयत्न एक प्रकारच्या सकारात्मक पॉझिटिव्ह लहरी निर्माण करतात. ह्या लहरी आपोआप किंबहुना बरेचदा आपली देवाजवळ मागितलेली इच्छा पूर्ण करतात.पण त्यासाठी आपले प्रयत्न आणि सकारात्मक पॉझिटिव्ह लहरी एकरूप व्हायला हव्यात.त्या केव्हा होतात,जेव्हा आपण देवाजवळ बसून शांत होऊन त्या गोष्टी बद्दल विचार करतो,तेव्हा आपला मेंदू त्या गोष्टीबद्दल,ती मिळवण्यासाठी नवनवीन उपाय, तंत्र शोधून काढतो. आपण आशावादी होऊन ती मिळवण्याकरिता कसोशीने प्रयत्न करतो.आपल्याला एक नवी ताकद मिळते. म्हणून देवाची आराधना करणे महत्वाचे आहे."
" म्हणजे हा देवाचा आभास म्हणजे या पॉझिटिव्ह सकारात्मक लहरी आहेत तर!"
" येस एक्झॅक्टली! म्हणून आपण पूर्वापार देवपूजा करत आलो आहोत,जेणेकरून आपल्याला मनःशांती मिळते आणि एक सकारात्मक ऊर्जाही प्राप्त होते."
" अच्छा अस आहे होय."
" म्हणून तू तुझ्या आईला आणि सासूबाई ला समजून सांग की देवपुजेचा अतिरेक नव्हे तर केवळ देवाजवळ ५ मिनिट बसून एकरूप जरी झालं तरी पुरेस आहे आणि हो सुरुवात तुझ्यापासून कर म्हणजे त्यांना हे पटेल."
" थँक्यू डियर वैशू.. तू तर माझे टेन्शन चुटकिसरशी घालवले!"
" अग थँक्यु काय त्यात! आता आनंदी आणि सकारात्मक रहा."
" हो हो ..नक्कीच.. चल येते मी.. भेटूया परत.माझा याविषयीचा अनुभव मी नक्की तुला सांगेल."
" हो हो जरूर.."
खरच देव आहे की केवळ हा आभास आहे? या प्रश्नाचे कोडे मला वाटते आता सर्वांचे सुटले असेल.
सदर लेख हा काल्पनिक आणि वास्तववादी तत्वांवर आधारित आहे.कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा मुळीच उद्देश नाही.त्यामुळे माझे विचार सकारात्मकतेने घ्यावेत ही आशा करते.
धन्यवाद..
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय_आभास : परमेश्वराच्या अस्तित्वाचा!काय खरे ,काय खोटे?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा