गुरुदक्षिणा

A gift to honourable teacher

#गुरुदक्षिणा

मी व माझे यजमान दोघे एकटेच रहातो आमच्या वन रुम किचनमधे. हो वन रुम किचनच. या मुंबईत तो तरी का स्वस्त आहे!

 मुलीचं,जान्हवीचं लग्न करुन दिलय. ती येते अधुनमधून पण तिलाही तिच्या जबाबदाऱ्या आहेतच की. येताना आवर्जुन काहीतरी जिन्नस करुन आणते. तिचं प्रेम तिच्या बाबावर जरा जास्तच. नाही ओ जेलस नाही मी. चालायचच. मीही होतेच की बाबाची परी. मुलींना एकंदर बाबाचा ओढा जास्त असतो. 

तिच्याहून धाकटा मुलगा,जयेश. तो चार वर्ष झाली,शिकायला म्हणून अमेरिकेत गेला आणि तिथेच रुळला. सध्या त्याच्या लग्नाचं बघतोय. पण तो तिथं नि मुली इथं..खरंच लग्न ठरवताना तारांबळ होते. बरं,याने तिथे एखादी मड्डम बघितली असेल तर..अशी अगोचर शंकाही मनाला चाटून जाते. तसं त्याला आडून आडून विचारलं मी पण पठ्ठ्या ताकास तूर लागू देत नाही. 

हल्ली घरकामही झेपत नाही हो. तुम्ही म्हणाल दोन माणसांच काम ते केवढं! खरंच हो..काम कमी पण कधी विचारांच्या भोवऱ्यात अडकते नि कुकरच्या चारपाच शिट्ट्या होऊन जातात,दूध करपतं कळतसुद्धा नाही.

 सकाळी पोळीभाजीचे डबे उरकून मुलांना शाळेत सोडून दहाच्या टोल्याला माझ्या शाळेत विद्यार्थ्यांसमोर डोळे मिटून वंदे मातरम म्हणणारी मी कुठे आणि कुठे ही दोन दोन तास स्वतःच्याच विचारांत गढणारी मी. 

हल्ली सारखं अंग गरम व्हायचं. डॉक्टरकडे जाऊन तपासून घेतलं. वेळेवर औषधगोळ्या घेतल्या. तरी दोन दिवसांनी पुन्हा तेच. बरं ताप आला की डोकं प्रचंड दुखतं. डोळ्यांतून ऊन ऊन पाणी येतं. भूकही प्रचंड लागते पण काही खायची इच्छाच होत नाही.

 आठवडाभर डॉक्टरांनी आलटूनपालटून औषथं दिली.  रात्री वाटतं जास्तच ताप आलेला. हे मीठाच्या पाण्याच्या घड्या ठेवत होते कपाळावर. सकाळी यांनीच रव्याची पेज भरवली मग रिक्षेत बसवून डॉक्टरकडे घेऊन आले.. 

मोठं हॉस्पिटल आहे हे आमच्या बदलापुरातलं. जास्त झालं,फेमिली डॉक्टरकडून गुण येत नाहीसा वाटला की पुढची पायरी ही ठरलेली. नर्सने माझं वजन केलं. तसं वयाच्या मानाने बाळसं घेतलय मी. 

वजनकाट्यावर उभं रहायला भीतीच वाटते. हे मग गालातल्या गालात हसतात. स्वतः काडीपैलवान आहेत ना! असो आमची फाईल बनवून आम्हाला केबिनमध्ये पाठवलं. डॉक्टरांनी मला पुढे चेक केलं मग वेणी पुढे करायला लावून पालथं झोपवलं व पाठीवरही दोनचार ठिकाणी स्टेथोस्कोप लावला. काय समजलं काय माहित पण म्हणाले," मला यांना ट्रीट करावं लागेल. एडमिट व्हा. झालं..आता किती दिवस इथे मुक्काम देव जाणे."

हाताच्या नसीत सुई टोचली. सलाईन लावलं. एकेक थेब त्या प्लेस्टीकच्या बाटलीतून खालच्या नळीत ओझरत होता. ताप थोडा ओसरला होता. लेक आली. मला असं पाहून तिला रडूच आलं. मी म्हणाले,"अगं वेडी की काय तू. रडतेस कसली मुळूमुळू. काही होत नाही मला.
 जरा चार दिवस आराम करायला आलेय इथे असं समज." 

बाजुच्या बेडवर एक म्हातारा एडमिट झाला. त्याची सून नुसती चिडचिड करत होती."बुड्ढा जाता भी नहीं। घडी घडी कितना पैसा खर्चा करेंगे इसके उपर. हमेंभी हमारी जिंदगी है,बालबच्चे है।" काय चुकत होतं तिचं? वैतागलेली बिचारी. या संसारनामक यंत्रात पिळून निघालेली तरी सकाळसंध्याकाळ म्हाताऱ्याला गरमगरम रोटीसब्जी खाऊ घालायची. सगळेच बोलणारे वाईट नसतात हो. 

असो मला पुन्हा ताप भरला. मी डोक्यावरुन पांघरुण घेतलं. हे नर्सला आणायला गेले. नर्सने ताप मोजला. नर्सने यांना पाण्याने भरलेला छोटा टब दिला व मला पुसून काढायला सांगितलं. तितक्यात निवासी डॉक्टर आले. त्यांनी सलाईनमधून इंजेक्शन दिलं. पहाटे ताप ओसरत आला.

"बाई,आता कसं वाटतय?" मी हाकेने जागी झाले. किती वर्षाने बाई म्हणून साद घातली कोणी!
"बाई,ओळखलत मला। मी निनाद..तुमचा विद्यार्थी."
झरकन माझं मन सहावी अ च्या वर्गावर गेलं. 

 चापूनचोपून भांग पाडणारा निनाद. बासरी काय उत्तम वाजवायचा! मी मुद्दाम वाजवायला सांगायचे त्याला. खिडकीच्या बाहेर मोठं झाडं होतं. त्याच्या पानापानांतून ठिबकणारा पाऊस पहायला फार आवडायचं त्याला. माझा मारही खायचा या तंद्रीमुळे.

 एकदा शाळेची वर्षासहल जाणार होती. साऱ्यांचे पैसे आले होते. निनादचे सोडून. मी निनादला म्हंटलं,"अरे पैशाची अडचण आहे का?" तर काहीच बोलेना. शेवटी मीच पैसे भरले त्याचे. खूष झाला होता. माझा जयेशही याच वर्गात होता. अभ्यासात दोघं तोडीसतोड होते.

 वार्षिक परीक्षेत दोघांचाही नंबर पहिला होता पण मी पार्सलिटी केलेली. आईचं मन वरचढ ठरलं होतं. आमच्या शाळेत मुलांना पेपर बघायला मिळायचे. निनाद व जयेश दोघं एकाच बाकावर बसून एकमेकांचे पेपर पहात होते. निनादचं एक उत्तर तंतोतंत बरोबर असतानाही मी एक मार्क कापला कमी दिलेला. अजुन एका पेपरात अनवधानाने तसंच झालेलं. जयेशने माझ्याकडून दोन्ही उत्तरं परत तपासून घेतली. निनादचा पहिला नंबर व जयेशचा दुसरा नंबर आला. तरीही जयेश आनंदी होता. त्याचं वागणं मला खूप काही शिकवून गेलं. 

त्यानंतर मी त्या दोघांत कधीच भेदभाव केला नाही. निनादची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याची फी भरणं,जयेशसोबत त्यालाही पाठ्यपुस्तकं घेऊन देणं अशी मदत करत होते. पुढे जयेश व निनादच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. जयेशने एमटेक केलं,परदेशात गेला तर निनाद शिष्यवृत्तीच्या जोरावर डॉक्टर झाला.

 गेला आठवडाभर जयेशने केली असती तितकीच अगदी काकणभर जास्तच सेवा डॉ.निनाद करतोय. आज मला डिस्चार्ज मिळणार. आता वायरलचा जोर ओसरलाय. प्लेटलेट्सही वाढत आहेत. 

डॉ.निनादने सकाळीच मला गुड मॉर्निंग केलं. माझ्या पाया पडून गुलाबी गुलाबांचा बुके दिला हातात. शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाई म्हणाला.

 "बाई,तुम्ही वेळोवेळी केलेल्या मदतीने मला शिकण्यास प्रोत्साहन मिळालं," असं म्हणाला. माझ्या हातात मिठाईचा पुडाही ठेवला. मी त्याला शुभाशीर्वाद दिला व घरचा पत्ता सांगून घरी ये कधी म्हंटलं. तो वेडा डोळ्यांच्या कडा पुसत होता. माझ्या मात्र मनाला मी त्याचे दोन गुण कापलेले अजुनही सलत होते,जरी नंतर ते वाढवून दिलेले तरीही.

हे बिल भरायला मेन डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले. डॉ. म्हणाले, "तुमचं बील डॉ.निशांत यांनी भरलय. तुम्ही त्याचे रिलेटिव्ह अहात म्हणाला". माझे डोळे भरुन आले.

-------सौ.गीता गजानन गरुड.