Jan 19, 2022
नारीवादी

संक्रांतीचे वाण

Read Later
संक्रांतीचे वाण
स्नेहाची लग्नानंतरची पहिलीचं संक्रांत ,म्हणून सासुबाई मोठ्या हौसेने आणि जोशाने तयारीला लागल्या होत्या. त्यांना स्वतः ला ही छान राहण्यास आवडत असे. साड्या,दागिण्यांची आवड असणाऱ्या सासुबाईंकडे प्रत्येक प्रकारच्या आणि सर्व रंगांच्या साड्यांचे कलेक्शन होते.त्यावर साजेसे सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरी चे सेट्स होते.
सणसमारंभ असो, छोटामोठा कार्यक्रम असो, त्यांना छान सजण्यास आवडतं असे.
सर्व सण,उत्सव आनंदाने, उल्हासाने साजरे करत. स्वतः ही आनंदी राहत आणि सर्वांना आनंद देत असत.

आपल्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नात तर प्रत्येक कार्यक्रमात आपली हौस पूर्ण केली.

आपण जसे हौशी, आनंदी तसेचं आपल्या सुनेने ,स्नेहाने ही राहवे असे त्यांना वाटत असे.
आणि त्या त्यासाठी प्रयत्नही करत राहायच्या.

लग्नानंतरच्या पहिल्या संक्रातीची स्नेहालाही हौस होती,उत्सुकता होती पण तिच्या सासुबाईंचा तिच्यापेक्षा उत्साह जरा जास्तचं...
त्यांनी तिच्यासाठी काळ्या रंगांची, गोल्डन काठाची छान साडी आणली. हलव्यांच्या दागिण्यांची ऑर्डर ही दिली.
स्नेहा जॉब करीत असल्याने तिला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे तिच्या लाडक्या आणि हौशी सासूबाई सर्व तयारी करीत होत्या.

आपण आणलेली साडी स्नेहाला दाखवत म्हणाल्या," अगं स्नेहा, मी तुझ्यासाठी आणलेली साडी तुला आवडली का बघं आणि आवडली असेल तर लगेचं ब्लाऊज शिवून आण बरं पटकन."

स्नेहा- " अहो आई, तुमची चॉइस माझ्यापेक्षा निश्चितचं चांगली आहे. मला आवडली साडी,खुप छान आहे . आणते मी ब्लाउज शिवून वेळ काढून."

सासूबाई - " हलव्यांच्या दागिण्यांची ऑर्डर दिली आहे, स्त्रियांना देण्याचे वाणही आणले आहे. लाडू बनविते दोन दिवस अगोदर."

स्नेहा - " अरे वा! आई,जोरात सुरू आहे तयारी! बरं ,हळदी
कुंकूसाठी कोणाकोणाला बोलवायचे आहे ते पण ठरवू,म्हणजे वाण आणि नाश्ताचा ही अंदाज येईल ना? "

सासूबाई - " ते पण काम होतचं आले आहे. मी माझ्या ओळखीतील ,नात्यातील आणि आपल्या बिल्डिंग मधील स्त्रियांची नावे लिहिली आहेत.तू तुझ्या ओळखीतील,नात्यातील नावे लिहून दे.मगं आपण फायनल लिस्ट बनवू."

स्नेहा - " हो आई,मी बनविते माझी लिस्ट आणि देते तुमच्याकडे."


दुसऱ्या दिवशी सकाळी स्नेहा सासूबाईंकडे लिस्ट देऊन ऑफिसला निघून गेली.


संध्याकाळी घरी येते तेव्हा नेहमी हसतमुखाने स्वागत करणाऱ्या सासूबाईंच्या चेहऱ्यावर थोडासा ताण व चिंता दिसली. स्नेहाला जाणवले पण तिने लगेच काही कारण विचारले नाही. ती रोजप्रमाणे फ्रेश होऊन स्वयंपाकघरात गेली.
रात्री जेवण झाल्यानंतर सर्व कामे आटोपल्यावर तिने सासूबाईंना विचारले,"आई,काही प्रॉब्लेम आहे का? काय असेल ते सांगा मनमोकळेपणाने."

सासूबाई - " तसं काही नाही गं , पण कसं सांगू ? हे समजत नाही. तुला नाराज करायचं नाही पण सासूबाईंना ही कसे समजावयाचे ते समजत नाही आहे."

स्नेहा - " का ? काय झाले? आजींना काय समजावयाचे आहे ? "

सासूबाई - " अगं,तू तुझी जी लिस्ट दिली ना हळदीकुंकूसाठी बोलवायच्या बायकांची,त्यात तुझी ती मैत्रीण सारिका चे ही नाव आहे.
जि....जि....जिचा नवरा गेल्यावर्षी अपघातात वारला. ती तर सवाष्ण नाही ना ? मगं तिला सौभाग्य स्त्रियांच्या हळदी कुंकू कार्यक्रमात कसे बोलवायचे? आणि तुझी तर ही पहिलीचं संक्रांत.....
उगाचं काही अपशकुन नको. सासूबाई तर मान्यचं होणार नाही या गोष्टीला...
आणि माझ्या मनालाही हे पटतं नाही."

स्नेहा - " आई,मला तुमचा आणि आजींचा प्रॉब्लेम समजलायं,तुमच्या दोघांचेही म्हणणे पटते आहे,कारण तुम्हीं ज्या वातावरणात वाढल्या,ज्या विचारांमध्ये तुम्हीं सर्व आयुष्य घालवले त्यांचा परिणाम तर होतोचं ना ?
पण मला सांगा,सारिकाचा नवरा अपघातात गेला ,त्यात तिचा काय दोष?
उलटं ती किती दुःखी आहे तिच्या आयुष्यात .
तिचे वय तरी काय? तिने आतापासूनचं आयुष्यात वैराग्य धारण करायचे का ? तिने चांगले कपडे,दागिने घालायचे नाही का? कोणत्याही शुभकार्यात जायचे नाही का? पतीच्या निधनाबरोबर स्त्रीचे ही सुखी जीवन संपून जाते का? नंतरच्या तिच्या आयुष्याला काही अर्थ नसतो का?
उलट ती कोठे कार्यक्रमात गेली ,सर्व तिच्या शी प्रेमाने वागले तर तिलाही दुःखाचा हळूहळू विसर पडेल आणि जीवनात आनंदी होईल. गेलेली व्यक्ती तर परत येत नाही ना ..."

सासूबाई - " हो,बरोबर आहे तुझे. पण हे सर्व पूर्वीपासून सुरू आहे ना ? या रूढी,परंपरा आपण जपल्या पाहिजेत ना ?"

स्नेहा - " हो,तुमचे म्हणणे समजते आहे मला. पण मला सांगा अगोदर सती जाणे,केशवपन,बालविधवा या पद्धती होत्या.स्त्रीशिक्षणासं मान्यता नव्हती,विधवापुनर्विवाह मान्य नव्हता. पण हळूहळू अनिष्ट पद्धती बंद केल्या आणि चांगल्या गोष्टींना मान्यता मिळाली. त्यामुळे स्त्रियांवरील अन्याय थोड्या प्रमाणात तरी कमी झाले आणि स्त्री वर्गाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे.
या गोष्टीं घडवून आणण्यासाठी अनेकांनी खुप त्रास सहन केला,खुप वर्षे लागली ,हळूहळू लोकांची विचारसरणी बदलत गेली.
बदल घडवून आणण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो पण सुरुवात करणे महत्त्वाचे!

\"स्त्री सुधारणा\" यावर बोलणे सोपे असते पण प्रत्यक्षात करून दाखविणे थोडे अवघडं जाते.

सासूबाई - " खरं आहे गं तुझे! तुझे म्हणणे मला ही पटायला लागले आहे ,मी पण एक स्त्री आहे त्यामुळे स्त्रीचे दुःख समजू शकते. पण सासूबाईंना कसे तयार करायचे? आणि या वयात त्यांना त्रास द्यायचा नाही असे मला वाटते."

स्नेहा - " आजींशी आपण सर्व मिळून बोलू, त्यांना समजावून सांगू.बाबा,तुम्ही आणि स्वप्नील तर तयारचं आहात त्यामुळे आजींना समजावून सांगणे सोपे होईल.

सासूबाई - "बरं बघू बोलून त्यांच्याशी ,पटल्या तर ठीकचं!"

स्नेहा - " पटवू आपण त्यांना. तुम्ही माझ्या तयारीत लागल्या आहात पण तुमची स्वतः ची काही तयारी केली का नाही?"

स्नेहाने हसून विचारले.

सासूबाई - " अगं हो,मगं तुला तर माहितचं आहे ,तुझी सासू कशी आहे ते ? "

सासूबाईनीं पण हसतं हसतं उत्तर दिले.

दुसऱ्या दिवशी आजीजवळ हा विषय काढताचं त्या थोड्या रागावतात, नाराजी दाखवतात. रुढी,परंपरा यांचा अपमान होतो वगैरे असे विचार मांडू लागतात.
पण स्नेहा,स्वप्नील आपल्या गोड गोड बोलण्याने आजीबाईंना पटवून देतात की, चांगला बदल किती आवश्यक आहे,स्त्रीचा आनंद, आदर कशात असतो वगैरे गोष्टी सांगतात आणि आजींचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात.
सुरुवातीला विरोध करणाऱ्या आजीबाई मुलांचे विचार ऐकून आपल्या आयुष्याचा विचार करू लागतात.
आपले आयुष्य कसे गेले? नवरा लवकर गेल्यामुळे विधवेचे आयुष्य कसे असते ? हे त्यांनी उपभोगलेले असते.अनेक इच्छा असूनही मनाप्रमाणे जगता आले नाही. कुठलीही हौस नाही, मौज नाही. जसे नवऱ्याबरोबर सर्व सुख आपल्या आयुष्यातून निघून गेले.

आजी विचार करतात की,आताची पिढी प्रगत विचारांची आहे.चांगल्या गोष्टींचा विचार करणारी आहे.आणि आपण काय? आज आहे तर उद्या नाही. आपण विरोध केला तरी ऐकणार नाही...
त्यामुळे आजींनी सारिकाला बोलवण्याची परवानगी दिली.

सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला...


स्नेहाने जेव्हा सारिकाला हळदीकुंकवाचे सांगितले तेव्हा ती ही नको म्हणाली.
" तुझ्या घरात आजेसासूबाई,सासूबाई आहेत. त्यांना या गोष्टी पटणार नाहीत. "

पण स्नेहाने सर्वांची परवानगी आहे,कोणाचेही काही म्हणणे नाही असे सांगितले तेव्हा सारिका कार्यक्रमास येण्यासाठी तयार झाली.

कार्यक्रमाच्या दिवशी आजी,सासूबाई, स्नेहा छान तयार झाल्या होत्या.
सासूबाईंनी लाडक्या सूनेला स्वतः सर्व दागिने घालून तयार केले होते.स्नेहा खुप छान दिसत होती. फुलांचा व अत्तराचा सुगंध घरभर दरवळत होता.वातावरण छान प्रसन्न होते.
संध्याकाळी सर्व बायका आल्या. सारिका ही आली होती.त्यामुळे स्नेहाला खुप आनंद झाला होता.ज्या बायका सारिकाला ओळखत होत्या त्यांनी तिला पाहून नाके मुरडली.पण स्नेहाने हसून दुर्लक्ष केले व सारिकालाही दुर्लक्ष करण्यास सांगितले. पण चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्या घरापासून झाली त्यामुळे ती खुप खुश होती.

आणि आपल्या सासूबाईंच्या आग्रहाखातर उखाणा ही घेतला ,


ठेवते मी सर्व
स्त्रियांचा मान,
स्वप्नीलचे नाव घेऊन
देते संक्रांतीचे वाण
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now